” जीवनातला सगळ्यात आनंदमयी ऋतू म्हणजे बालपण !” खरोखरच आहे , कधीकधी अगदी किरकोळ आनंद देणाऱ्या गोष्टीच , त्या आठवणीच ह्रदयातील मोठा कप्पा व्यापून जातात . साने गुरुजींनी आपल्या ” श्यामची आई ” या पुस्तकात म्हटलेच आहे , ज्याने बालपणी लहान लहान गोष्टींत आनंद उपभोगला नाही , तो आयुष्यात कधीच कोणत्या चांगल्या गोष्टीला पटकन स्वीकारू शकत नाही .
माझे ब्लॉग वाचून मला अनेक जणांनी हा प्रश्न विचारलाय की इतक्या छान आठवणी आहेत तुझ्या आणि तू त्या तुझ्या रेसिपीज शी कशा जोडतेस , खरं तर या जोडाव्या लागतच नाहीत , त्या आठवणी मनात घर करून बसल्यात आणि हा त्यांचा घरोबा म्हणजेच माझे अवघे जीवन जगण्याचे सार !
आत्ता सोप्प करून सांगते , माझी आई नोकरी करणारी , त्यामुळे घडाळ्याच्या काट्यावर धावणारे आयुष्य ! अगदी सहा महिन्यांची असल्यापासून माझ्या आईच्या मातोश्रींनी म्हणजे माझ्या आज्जीने
मला आणि पर्यायाने आईची नोकरी सांभाळायला मोलाचा सहभाग दिला ! आईपेक्षा जास्त आजीने माझ्या बाळ लीला पाहिल्या . त्या लीला म्हणण्यापेक्षा खोड्या च जास्त होत्या हा झाला वेगळा भाग ! अतिशय कृश शरीरयष्टीची , बावकाडे ( कोकणी भाषेत खांद्याच्या हाडांना म्हणतात ) वर आलेली , वरवरून पाहता शांत भासणारे असे माझे व्यक्तिमत्त्व होते ( माझ्या आताच्या शरीरयष्टीवर जाऊन फसायला होऊ शकते , पण हो हे माझेच वर्णन आहे ) . परंतु खेळाच्या नादात शाळेतून आल्या आल्या पटकन कपडे बदलून चाळीसमोरचा रस्ता डावी उजवीकडे न पाहता क्षणात क्रॉस करून मैदानावर पळणारी , आवारातील वडाच्या झाडाखाली चिकचिकीत झालेल्या चिखलाचे लाडू करून एकमेकांच्या अंगावर फेकण्यात पटाईत , असे बरेच ऑलिम्पिक मध्ये सहभागी करता येतील असे खेळ खेळणारी माझी बाल मूर्ती अवघ्या चाळीत ” तुडतुडी ” म्हणून प्रसिद्ध होते . माझ्या आई बाबाच्या आधीच आजीकडे माझ्या तक्रारी यायच्या , सगळे बिचारी सांभाळून घ्यायची !
तिचे आणि माझे नातेच वेगळे होते , शाळेतून आल्यावर जिन्यावरून धावत तिच्या खपाटीला गेलेल्या पोटाला मिठी मारत घेतलेला तिच्या लुगड्याचा सुगंध , उन्हाळी सुट्टीत दुपारची तिची अर्ध्या तासाची वामकुक्षी आमच्या कॅरम खेळाच्या गोंधळाने उडवल्यानंतर ” उच्छाद मांडलाय कार्ट्यांनी ” म्हणत तिचे पाठीतले धपाटे , आमच्या दोघींचे टीव्हीला नाक लावून दूरदर्शनवरचे ” दामिनीई दामिनीई ” अशा शीर्षकगीतांचे कार्यक्रम पाहणे , बाजारातून येताना तिने आणलेली जिलेबी नी मी खाली मैदानात खेळताना कुल्फी वाल्याकडून तिच्यासाठी धावत घेऊन आणलेली कुल्फी एकत्र खाणे , हे सगळेच एकूण भारलेले बालपण होते ..
म्हणूनच की काय मला कधी लहान भावंडाची उणीव भासली नाही नी एकुलते एक असण्याचे अवास्तव लाड सुद्धा झाले नाहीत !
आम्हा दोघींमध्ये वय हा अडसर कधीच ठरला नाही . आपल्या जीवनातले सगळे मजेशीर प्रसंग, कडू गोड आठवणी सांगण्यासाठी माझ्यासारखा हक्काचा श्रोता होता तिच्याकडे . शनिवारी माझी अर्धी शाळा असायची , फक्त छोट्या सुट्टीचा खाऊचा डबा दिला जायचा , घरी येईपर्यंत १२ वाजायचे नी पोटात भुकेने कावळे कोकलायला लागायचे . आजीचा स्वयंपाक तयार असायचा , मला आवडते म्हणून कधी कोकमाचे सार नी बिरडे तर कधी बटाट्याची कापे तळून ठेवायची .
त्या शनिवारी आमच्या म्हाडाच्या चाळीत भाडेवाला बऱ्याच दिवसांनी आला म्हणून भाडे भरण्यासाठी ही गर्दी झाली होती , आजीचा नंबर येईपर्यंत वाजले की बारा … मग खाली स्कूल बस मधून मी उतरायला नी आजीच्या हातात भाड्याची पावती पडायला एकच गाठ , आम्ही दोघी जिना चढून वर आलो . माझी नेहमीची भुणभुण सुरु , भूक लागली भूक लागली खायला दे .. आजीने दिला चिवडा लाडू तात्पुरता नी लागली पटकन स्वयंपाकाला ! तेव्हा माझे मन रमवण्यासाठी आजीने सांगितलेली एक गोष्ट मला अंधुकशी आठवतेय… आजीचे आजोबा म्हणजे माझ्या आईचे पणजोबा हे कोकणात हर्णे – मुरुडचे मोठे प्रस्थ .. . त्यांचे दादरला कबुतरखान्यानजीक ” भारत हिंदू हॉटेल ” का असेच काहीतरी नाव आजीने सांगितले , हॉटेल होते . ते मुरुडात .. मग ते हॉटेल त्यांनी एकाला चालवायला दिले होते . अतिशय छान कोकणी पद्धतीचे नाश्ता जेवणाचे हॉटेल होते , पुढे काही कारणास्तव श्रीमंती नाही राहिली , आईच्या पणजोबांना देवाज्ञा झाली . मग त्यांच्या मुलांनी ती हॉटेलची जागा विकून आपापले वाटे करून घेतले , नी मुंबई एका कोकणी खाद्यसंस्कृतीच्या हिऱ्याला मुकली ,, असो ! तरीच जेव्हा जेव्हा मी आजी सोबत त्या भागातून जायचे तर तिच्या सुरकुतलेल्या पापण्या का ओलावायच्या !
आजीची आठवण सांगून झाली नी माझ्या ताटलीतला चिवडा सुद्धा संपला , आणि ताटात समोर आला गरमागरम कांदा घातलेला फोडणीचा भात , सोबत माझे आवडते लिंबाचे लोणचे ! ” खा माझी बाय ती ” , असे म्हणत माझा गालगुच्चा घेत बसली माझी म्हातारी मला न्याहाळत !
त्या वेळेला या तिच्या भावनांचे , आठवणींचे महत्त्व नाही कळले . परंतु आता कळतेय .. बघा ना , आयुष्य हे भातासारखेच आहे , कणाकणांनी बनलेल, अनेक क्षण , अनेक प्रसंग … त्यांना जेव्हा आठवणींची , सुख दुःखाची चुरचुरीत फोडणी बसते ना तेव्हाच तर आयुष्य बनते अगदी चमचमीत , चटपटीत – अगदी या फोडणीच्या भातासारखे ! बरोबर ना ?
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- २ कप शिजवलेला भात ( ताजा किंवा शिळा )
- २ लहान कांदे लांब चिरलेले = १०० ग्रॅम्स
- ४ हिरव्या मिरच्या लांब मधून चिरलेल्या
- अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- १०-१२ लसूण पाकळ्या सालीसहित
- तेल
- १ टीस्पून मोहरी
- २ टीस्पून जिरे
- पाव टीस्पून हिंग
- १ टीस्पून हळद
- २ टेबलस्पून मालवणी मसाला
- ८-१० कढीपत्ता
- मीठ चवीनुसार
- भात एका परातीत किंवा मोठ्या ताटात पसरवून घ्यावा . त्यात हळद, मालवणी मसाला आणि चवीपुरते मीठ घालावे . जर मालवणी मसाला नसेल तर त्याऐवजी ३ टीस्पून काश्मिरी किंवा बेडगी मिरची पावडर आणि २ टीस्पून घरगुती गरम मसाला वापरला तरी चालेल .
- एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी तडतडू द्यावी . नंतर जिरे , हिंग घालावे . लसूण पाकळ्या सालीसकट ठेचून घालाव्यात . लसूण जराशी गुलाबी रंगावर आली की हिरव्या मिरच्या , कढीपत्ता आणि कांदा घालून जरासा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यावा .
- थोडी कोथिंबीर घालावी आणि परतून घ्यावी .
- आता कालवलेला भात आणि चवीपुरते मीठ घालावे . मंद ते मध्यम आचेवर ३-४ मिनिटे भात मसाल्यात चांगला परतून घ्यावा .
- वरून कोथिंबीर घालावी . गॅस बंद करावा . आवडत असल्यास जरा वाफ निवल्यावर लिंबू पिळून भात खायला द्यावा सोबत एक आंब्याच्या लोणच्याची फोड किंवा भाजलेला पापड !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply