मला तसे कोणत्याही ऋतूचे वावडे नाही. प्रत्येक येणाऱ्या ऋतूची चाहूल माझे शरीर आणि आंतरिक मन आपोआप देत असते . आता बघा हां , येणारा पावसाळा हा डराव डराव करणाऱ्या बेडकांना नाही समजत तितका माझ्या घरातल्या तळणीच्या कढईला आणि स्टॅण्डमध्ये सगळ्यात मागे अडकवलेल्या झाऱ्याला कळतो . कुळथाच्या पिठीसाठी आईला प्रत्येक वेळी फोनवरून आठवण केली जाते , ” अग आई माझ्यासाठी भरडून घे आठवणीने कुळीथ ..”
पावसाळा सरत आला की छानपैकी धुऊन ठेवलेल्या , सुती कापडात गच्च बांधलेल्या ब्लॅंकेट पलंगाच्या खणातून वर येतात . फिल्टर कापीचे आणि चिकोरीचे दळण कांडण बाजूच्या केरला कॅफे मधून करून आणले जाते .
आणि जसा सूर्य सकाळी सकाळी लवकर हजेरी लावून बेडरूमच्या खिडकीतून माझ्या डोळ्यांवर तिरीप मारायला लागला की मानेभोवती जमलेल्या घर्मबिंदूंची माळ पुसत चरफडत उठायला लागले की समजावे, ” ग्रीष्म पातला , सूर्य तापला , ऊन कडक जिकडे तिकडे ..” मग आपोआप फ्रीजच्या एका कोपऱ्यात लिंबाची रास लागते , एक खण पूर्ण दह्या ताकाच्या माडग्यांनी भरला जातो , फ्रिजचा दरवाजा घरी केलेल्या कैरीच्या पन्ह्यांनी , कोकम सरबताने भरून जातो .
मला इतरांपेक्षा जरा जास्तच उकडते , इतके की ते आपले कवी सौमित्र म्हणतात त्याप्रमाणे ” घामाशिवाय शरीरात कोणीच बोलत नाही ” त्यातली गत होते ! पोटात सुद्धा भुकेची जागा उष्णतेने घेतली जाते , मग नेहमीच्या जेवणाला फाटा देऊन काहीतरी सारखे थंड खायला माझी जीभ सोकावते. कधी लस्सी , तर कधी पन्हे तर कधी काकड्या उभ्या चिरून त्यावर तिखट मीठ लावून खाण्याकडे माझा कल असतो .
मग कधीतरी या कडकडीत उन्हाळ्यात माझ्या मदतीला धावून येते ती पोटाला थंडावा देणारी आपली मराठमोळी कोशिंबीर, प्रत्येक पंगतीची शान , जिच्याशिवाय वाढलेले पान अपूर्णच !
मला ही कोशिंबीर इतकी आवडते की दुपारच्या जेवणाला सुट्टी देऊन मी कधी कधी हीच खाते,😝 मागे आमच्या घरी मित्र मैत्रिणींच्या डिनर पार्टीसाठी ही बनवलेली असताना पार्टनर च्या मित्राने चक्क शेवटचा भात मस्त कोशिंबिरी सोबत अगदी मिटक्या मारत खाल्ला होता 😘 वर त्याच्या बायकोला माझ्याकडून ही रेसिपी सुद्धा घ्यायला सांगितली !
दही आणि दह्यापासून बनवलेले रायते , कोशिंबीर आपल्या भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग आहे . दह्यामध्ये प्रथिने असतातच तसेच पचन संस्थेला मदत करणारे अन्न घटक दह्यातून मिळतात. या दह्यात आपण निरनिराळ्या भाज्या मिसळतो तेव्हा त्या भाज्यांची चव , आणि त्यांचे गुणधर्म यांमुळे शरीराला फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ मिळतात . तसेच कोशिंबीरीला रंग, चव आणि पोत म्हणजेच टेक्सचर मिळते ते वेगळेच !
आपले दह्याचे रायते आणि कोशिंबीर चविष्ट व्हावी म्हणून काही टिप्स लक्षात घेणे गरजेचे आहे :
१ Selection of Curd : शक्यतो घरी लावलेल्या दह्याचा वापर करावा . बाजारातून दही आणायचे झाले तर डेअरीचे दही वापरावे . दह्याला थोडे अर्ध्या तासासाठी टांगून ठेवावे , म्हणजे कोशिंबिरीसाठी छान घट्ट दही मिळते . कारण अति पाणीदार दह्याने कोशिंबीर पांचट लागते .
२. Selection of Vegetables : कोशिंबिरीत अशा भाज्या किंवा फळे वापरावीत ज्यांना स्वतःची अशी चव आणि क्रचं असतो , जसे काकडी , कांदा, बीट , टोमॅटो , भोपळा , अननस , डाळिंब किंवा पेरु वगैरे ! रंग आणि चव अफलातून येते कोशिंबीरीला !
३. Selection of Spices : मसाले किंवा फ्लेवरिंग एजंट्स आपला आवडीनुसार घालता येणे हीच तर रायत्याची आणि कोशिंबिरीची मजा असते . लाल मिरची पूड , काळें मीठ , सैंधव मीठ , आमचूर , जिरे पावडर, साखर आपल्या चवीनुसार घालावे .
तर नक्की या उन्हाळ्यात या टिप्ससहित ही कोशिंबीर बनवून पहा आणि मला अभिप्राय कळवायला विसरू नका खाली कंमेंट्स मध्ये !
Prep time:
Cook time:
Total time:

- २ कप घट्ट दही ( ४०० ग्रॅम )
- १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून , ८० ग्रॅम
- २ मध्यम आकाराच्या काकड्या , बारीक तुकडे करून , १५० ग्रॅम
- २ मध्यम आकाराचे टोमॅटो , बारीक तुकडे करून , १५० ग्रॅम
- पाव कप शेंगदाणे , ६० ग्रॅम
- १ हिरवी मिरची बारीक चिरून
- मीठ चवीनुसार,
- १ टीस्पून साखर
- दीड टीस्पून भाजलेली जिरे पावडर ,
- पाव कप डाळिंबाचे दाणे ( ऐच्छिक)
- शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजावेत . थंड झाल्यावर त्यांची टरफले काढून खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमधून जाडसर कूट करून घ्यावा .
- एका बाऊलमध्ये दही घालून व्यवस्थित फेटून घ्यावे . गुठळी राहू देऊ नये .
- दह्यात चिरलेल्या भाज्या , डाळिंबाचे दाणे , साखर , मीठ , जिरे पावडर घालून नीट ढवळून एकत्र करून घ्यावे .
- नंतर दाण्याचा कूट घालून एकत्र करून घ्यावा . वरून सजावटीसाठी थोडे डाळिंबाचे दाणे घालावेत .
- नंतर ही कोशिंबीर फ्रिजमध्ये ठेवावी , वाढण्यापूर्वी फक्त १५ मिनिटे आधी बाहेर काढावी .

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply