रमदानचा पवित्र महिना सुरु आहे . रमदान म्हटले की डोळ्यांसमोर उभी राहते ती विविध सॅलड , उंची सरबते , सुक्या मेव्याने भरलेल्या थाळ्या , मिठाया ,बिर्याणी आणि निरनिराळ्या शाकाहारी व मांसाहारी पदार्थांनी भरलेलया हंड्यांनी सजलेली इफ्तारी ची संध्याकाळ उभी राहते .
परंतु महिनाभर पहाटेपासून ते दिवस मावळेपर्यंत कडक रोजे करण्यामागे किती मानसिक धैर्य लागत असेल हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहित आहे ! भौतिक सुखांपासून स्वतःला वगळून , मनावर नियंत्रण ठेवून धर्माचे पारायण करणे आणि आत्म्याचे परमात्म्याशी संवाद साधणे हा एवढाच शुद्ध पवित्र हेतू शिकवणारा हा रमदानचा महिना !
रमदानमधली सेहरी म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ ही अत्यंत महत्वाची ! थोडी गडबडीची कारण सूर्योदयापूर्वी अगदी साखरझोपेच्या वेळी पूर्ण कुटुंबासाठी नाश्ता बनवणे थोडे जिकिरीचे काम ! जर सेहरीचा नाश्ता झटपट बनणारा आणि बऱ्याच वेळेपर्यंत पोट भरलेले ठेवू शकणारा असेल तर त्यासारखी सुखकर गोष्ट नाही ! आज माझी रमदान विशेष रेसिपी ही खास सेहरी साठी – ऑमलेट करी ! या रेसिपीची कल्पना मला मारिया नासिर यांच्या “रमदान रेसिपीस – ७ डेज मेनू ” या पुस्तकातून मिळाली. इतके सोप्पे पण मजेदार आहे हे व्यंजन! कसे आहे , याची करी म्हणजे रस्सा / कालवण वेगळे बनवायचे आणि जेव्हा रस्सा शिजत येईल तेव्हा अंड्याचे ऑमलेट ( अंड्याची पोळी ) बनवून त्याचे तुकडे घालून फक्त १-२ मिनिटे शिजवायचे जेणेकरून ऑमलेट रस्सा शोषून घेईल ! आदल्या दिवशी करी बनवून ठेवली तर पहाटे फक्त झटपट ऑम्लेट बनवून या रश्श्यात घालून गरम गरम साधा पराठा किंवा चपातीबरोबर खाता येतो! मला तर ही ऑमलेट करी पावाबरोबर खूप आवडते .महत्त्वाचे म्हणजे ही करी तुम्ही तुम्हाला आवडते तशी बनवू शकता , पातळ किंवा घट्ट , तळलेल्या कांदा , लसूण,आल्याच्या वाटणात किंवा हिरव्या वाटणात , जसे तुम्हाला सोईस्कर असेल तसे तुम्ही हा रस्सा बनवू शकता ! मी ही करी कांदा खोबऱ्याच्या वाटणात बनवली आहे , जी तुम्ही पोळी, भाकरी, पाव किंवा भातासोबतही ओरपू शकता !
कधी तुमच्या वीकेंडला ब्रंच साठी पावासोबत खाऊन बघा , आणि एखादे आवडते पुस्तक घेऊन आरामात सोफ्यावर लोळत पहुडा !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English

- ४ अंडे
- १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स बारीक चिरून
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- २ टेबलस्पून दूध
- २ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
- तेल
- मीठ चवीनुसार
- १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब चिरून
- १/२ कप कोथिंबीर
- १ मोठा टोमॅटो = १०० ग्रॅम्स बारीक चिरून
- १/२ कप = ४० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- ३ हिरव्या मिरच्या
- ८-१० लसणीच्या पाकळ्या
- १ इंच आले बारीक चिरून
- १ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून जिरे
- पाव टीस्पून हिंग
- १/२ टीस्पून हळद
- १ १/२ टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर
- १ टीस्पून धणे पावडर
- १ टीस्पून गरम मसाला
- सर्वप्रथम मसाल्याच्या वाटणासाठी एका पॅन मध्ये सुके खोबरे मंद आचेवर खरपूस रंगावर भाजून घेऊ. एका ताटलीत काढून घ्यावे.
- त्याच गरम पॅन मध्ये २-३ टेबलस्पून तेल घालून आले आणि लसूण घालून घ्यावे. लसूण गुलाबी रंगावर परतून झाली की त्यात चिरलेला कांदा घालून
- खरपूस करड्या रंगावर तळून घ्यावा.
- मंद ते मध्यम आचेवर ८ मिनिटांत मी कांदा परतून घेतलाय . आता त्यात कोथिंबीर घालून तेलात परतून घ्यावी . नंतर भाजलेला कांदा घालून हा मसाला नीट एकत्र करून गॅस बंद करावा . मसाला पूर्ण थंड होऊ द्यावा .
- मसाला थंड झाला की मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यावा . वाटण्यासाठी मी ३/४ कप पाण्याचा वापर केला आहे . मिश्रण चांगले गंधगोळीसारखे वाटून घ्यावे . जाडसर ठेवू नये.
- एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी करून घ्यावी. हिरव्या मिरच्या घालाव्यात, थोडी कोथिंबीर घालून मिसळून घ्यावी. आता आच मंद करून तेलात हळद आणि लाल मिरची पूड घालून परतून घ्यावी. करपू देऊ नये . तेलात मिरची पूड घातल्याने रस्श्याला छान लालसर तर्री येते.
- आता टोमॅटो घालून घेऊ, त्यात थोडे मीठ घालावे , मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजायला मदत होते. आच मंद करून झाकण घालून शिजु द्यावे . टोमॅटोऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील वापरू शकता!
- ३ मिनिटे टोमॅटो झाकून शिजवल्यावर त्यात वाटलेला मसाला , धणे पावडर आणि गरम मसाला पावडर घालावा . हे सगळे मसाले ५-६ मिनिटे तरी चांगले परतून घ्यावेत . कडेने तेल सुटेपर्यंत मसाला परतावा.
- रस्सा थोडा घट्टच ठेवावा म्हणून दीड कप गरम पाणी घालावे. मीठ चवीनुसार घालून घ्यावे. मंद आचेवर झाकण घालून रस्सा हळूहळू शिजू द्यावा! रस्सा शिजतोय तोपर्यंत ऑम्लेट बनवून घ्यावे.
- एका भांड्यात ४ अंडी फोडून घ्यावीत , त्यात दूध, मीठ , बारीक चिरलेला कांदा , कोथिंबीर आणि हिरव्य मिरच्या घालून फेटून घ्यावे. जितके चांगले मिश्रण फेट्ले तितकेच छान फुगीर ऑम्लेट बनतात .
- एका सपाट तव्यात १ टीस्पून तेल घालून तव्यात नीट पसरून घ्यावे . आपण या मिश्रणाचे २ ऑम्लेट्स बनवणार आहोत. म्हणून अर्धे मिश्रण तव्यात घालून पसरवून ऑम्लेट दोन्ही बाजूंनी परतवून घ्यावे . अशाच प्रकारे दुसरे ऑम्लेटही बनवून घ्यावे. ऑम्लेटचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत .
- रस्श्यावरचे झाकण काढून त्यात हे ऑम्लेटचे तुकडे घालून मंद आचेवर फक्त १ मिनिटासाठी झाकून मुरू द्यावे . त्यानंतर गॅस बंद करावा आणि ही ऑम्लेट करी गरम गरम चपाती, पराठा, पाव किंवा भातासोबत वाढावी!

Leave a Reply