स्ट्रीट फूड कल्चर हा भारतीय खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि मग कोणी कितीही निंदो किंवा नाक मुरडो , ” रस्त्यावरचे खाणे ” म्हणून , तरी भारतीय खाद्य संस्कृती जगात नावारूपाला आली त्यात ह्या स्ट्रीट फूड चा मोठा हात आहे.
हे पदार्थ इतके बहुढंगी , आणि उत्तम चवीचे , की बारकाईने पाहिले तर कधी कधी प्रश्न पडतो … त्या ठेलेवाल्याने तेच खाद्यघटक , तेच मसाले वापरून प्रत्येक डिश बेमालूमपणे इतकी चवदार आणि वेगळी कशी काय बनवली ?आता उदाहरणासहित स्पष्टीकरण द्यायचे म्हटले , तर या प्रश्नात मला परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील ! विनोदाचा भाग सोडला तर बघा ना , एवढ्या मोठ्या लोखंडाच्या तव्यावर चमचमीत चिजी पाव भाजी बनते , त्याच तव्यावर मसाला पाव बनतो आणि याच तव्यावर झणझणीत तवा पुलाव मारला जातो ( मारला हे “बनवला” असे वाचावे ) ! चायनीज च्या गाड्यावरच्या त्या भल्या मोठ्या लोखंडी कढईत जिथे चौउमीन बनते तिथेच फ्राईड राईस आणि मन्चुरिअन ही तरंगते ! मॅनेजमेंट च्या अभ्यासात टाईम मॅनेजमेंट , रिसोर्सफुलनेस आणि क्रीएटिव्हिटी सारखे गुण शिकायचे असतील तर ह्या गाडीवाल्यांशिवाय दुसरे कोणतेच बेश्ट उदाहरण मला आठवत नाही ! आपल्या ब्लॉग वर पावभाजी , काळी पावभाजी आणि तवा पुलावाची रेसिपी आहे , कुठेतरी हा मसाला पाव माझ्या नजरेआड झाला होता ! मागे काही दिवसांपूर्वी एका फेसबुक ग्रुप वर याचा फोटो पाहिला , माझ्या वाचकांसाठी आणि दर्शकांसाठी इतकी छान रेसिपी मी नक्की बनवायच ठरवले !
पावभाजीचा क्विक अवतार म्हणजे मुंबईचा मसाला पाव . शाळा कॉलेजात बऱ्याच पैजा जिंकल्या किंवा हरल्यानंतरच्या आनंदोत्सवात सामील होणारा हा चटपटीत पदार्थ तुमच्या घरातील छोट्या मोठ्या स्नॅक्स पार्टीचेही आकर्षण ठरू शकते !स्पेशली जेव्हा लहान मुले पूर्ण भरलेली पाव भाजीची प्लेट संपवू शकत नाहीत तेव्हा हा पाव भाजीचा धाकटा भाऊ – मसाला पाव त्यांना नक्की आकर्षित करतो. मग कधी बनवताय मसाला पाव , तुमच्या अभिप्रायांची वाट पाहत आहे !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English

- ६ नरम पाव
- २ मोठे कांदे = १८० ग्रॅम्स बारीक चिरून
- ४ मध्यम आकाराचे टोमॅटो =२७५ ग्रॅम्स बारीक चिरून
- १ मोठी भोपळी मिरची = ७५ ग्राम बारीक चिरून
- १ मध्यम आकाराचा बटाटा = ९० ग्राम , उकडून , साली काढून
- १/५ इंच आल्याचा तुकडा
- ८-१० लसणीच्या पाकळ्या
- ३-४ हिरव्या मिरच्या
- पाव कप कोथिंबीर बारीक चिरून
- पाव टीस्पून हळद
- १ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- १ १/२ टेबलस्पून पावभाजी मसाला
- मीठ
- २ बटरचे क्यूब्स
- १ चीजचा क्यूब
- तेल
- मसाला पाव बनवण्यासाठी मी पावभाजीचा लोखंडी तवा वापरला आहे . तुम्ही नॉनस्टिक तवा वापरला तरी चालेल . तव्यावर २ टेबलस्पून तेल चांगले तापवून घ्यावे . तेल तापले की त्यात १ टेबलस्पून बटर घालून घ्यावे . बटर वितळले की त्यात चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर चांगला पारदर्शक होईपर्यंत ४ते ५ मिनिटे परतून घ्यावा .
- कांदा परतला की त्यात आले -लसूण -हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून घ्यावी ( पेस्ट बनवताना १ टेबलस्पून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे ) . २ -३ मिनिटे चांगले परतल्यावर त्याचा कच्चेपणा निघून जातो !
- आता हळद , बारीक चिरलेली भोपळी मिरची व १-२ टेबलस्पून पाणी घालून नरम होईपर्यंत शिजवून घ्यावी. ३ मिनिटे मध्यम आचेवर शिजवल्यावर भोपळी मिरची जरा नरम होते . आता त्यात चिरलेला टोमॅटो व थोडे मीठ घालून पूर्ण नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे .
- जवळजवळ १० मिनिटे शिजवल्यावर, टोमॅटो नरम झाले की आता लाल मिरची पूड, पाव भाजी मसाला , थोडी चिरलेली कोथिंबीर , १ टेबलस्पून बटर आणि चवीपुरते मीठ घालून हा पूर्ण मसाला छान परतून घ्यावा . मसाले करपू नयेत म्हणून १-२ टेबलस्पून पाणी घालून परतावा . छान तेल सुटू द्यावे .
- मसाला चांगला ८-१० मिनिटे परतल्यानंतर उकडलेला बटाटा चांगला कुस्करून त्याचा लगदा घालून घ्यावा . बटाट्याच्या फोडी नाही राहिल्या पाहिजेत . बटाट्याचा लगदा घातल्याने हा मसाला मस्त क्रिमी होतो आणि पावावर छान गुळगुळीत पसरतो .
- आता चीझ किसून घालावे जेणेकरून मसाल्यात अजून क्रीमीपणा येतो! पाव कप पाणी घालून मिसळून घ्यावे . हा मसाला फार पातळ किंवा घट्ट नसावा , पावावर पसरण्याइतका असावा! मसाला तयार झाल्यावर तो तव्याच्या कडेला सरकवून त्यावर कोथिंबीर भुरभुरावी!
- तव्याच्या मध्यभागी थोडे बटर घालून त्यात कडेचा मसाला थोडा घालून घ्यावा . या मसाल्यावर आत बाहेर दोन्ही बाजूंना बटर लावून पाव शेकून घ्यावे .
- पावाच्या मध्ये मसाला घालून आणि वरूनही मसाला लावून पावाला पूर्णपणे मसाल्याने कोट करून घ्यावे .
- गरम गरम मसाला पाव, वरून चिरलेला कांदा , थोडे चीझ घालून आणि लिंबाच्या फोडी बरोबर खायला द्यावा !

Leave a Reply