“The purest and most thoughtful minds are those which love colour the most. ” – John Ruskin
मला लहानपणापासूनच रंगांचे फार आकर्षण … फ्रॉकपासून दप्तरापर्यंत , पेन्सिलींपासून वह्यांचे पुट्ठे देखील रंगीबेरंगी असतील तरच माझी स्वारी खुश ! चित्रकला , हस्तकला यांत बऱ्यापैकी हात असल्याने या रंगांवर तर अजून प्रेम बसले ! आईने ही माझी क्रेझ ओळखून मला प्रोत्साहन देण्यासाठी परवडत नसले तरी वेगवगेळे क्रेयॉन्स , पोस्टर कलर्स , ट्यूब कलर्स असे नानाविध प्रकार आणून दिले होते . माझ्या दिवाळी वहीला आणि मूल्यशिक्षणाच्या वहीला सजावटीत नेहमी पहिला नंबर मिळायचा ! नंतर नंतर वर्तमानपत्रातली, मासिकांतील रंगीत चित्रांची कात्रणे यांनी टेबलाची ड्रॉवर्स तुडुंब भरायला लागली की पलंगावर बिछान्याच्या खाली त्यांना जागा करून दिली . एके दिवशी आमचा बिछाना साईन वेव्ह सारख्या टेकड्यांसारखा दिसू लागला , मग आईचा साग्रसंगीत धपाटा खाल्ल्यावरच बाबाच्या मदतीने त्या कात्रणांना तिलांजली देण्यात आली . काय आहे , तेव्हा मोबाइल नव्हते ना, नाहीतर आता आझ्याकडे सुंदर चित्रांची, रांगोळ्यांची रेपॉजिटरी असती! असो पण माझी आजी मात्र मला लाडाने गालगुच्चे घेत ” माझे फुलपाखरू ते ” म्हणत सगळा माझा पसारा आवरायची !
माझ्या बाबाची कंपनी सौदीची होती , त्याला दिवाळीत नेहमी बोनसच्या पाकिटासोबत मिठाईचा पुडा मिळायचा ! बोनस मिळायच्या दिवशी बाबाची वाट पाहत मी चाळीच्या जिन्यावरच्या झरोक्यांत डोळ्यांची दुर्बीण लावून बसायचे ! गडद निळ्या रंगाच्या डिझेल मॅकॅनिकच्या मळखाऊ शर्ट पॅण्टमधली बाबाची काळीसावळी बुटकी आकृती दिसली की वानरासारखे उड्या मारत आमची स्वारी तळमजल्यावर बाबाच्या स्वागताला तयार ! मग बाबाच्या हातात हात गुंफून जिने वर चढताना पिशवीतील बांधणीच्या डिजाइनचा पुडा माझ्या नजरेने हळूचकन टिपलेला असायचा ! मग लगेचच हात पाय धुऊन ते बोनसचे पाकीट आणि मिठाईचा पुडा देवासमोर निरंजन लावून ठेवायचे काम माझे !
नंतर तो मिठाईचा पुडा उघडेपर्यंत धीर निघायचा नाही , त्या पुड्यात वेगवेगळ्या प्रकारची मिठाई जसे लाडू, काजू बर्फी, मोहनथाळ , खव्याचे पेढे असे बरेच प्रकार असायचे ! पण माझे डोळे विस्फारायचे ते बटर पेपर मध्ये गुंडाळलेले लाल, हिरव्या , केशरी रंगाचे कराची हलव्याचे चौरस पाहून! हो हो चौरसच म्हणेन मी इतके काटेकोरपणे ते घन असायचे! आई लगबगीने चहा टाकायच्या तयारीला लागलेली आणि आमची स्वारी बाबाला लगटून ते बॉम्बे कराची हलव्याचे गोड , चिवट तुकडे चवीचवीने चाखत बसलेली ! आजी दुरूनच प्रेमाने माझा चेहरा न्याहाळत ” फुलपाखरू ग माझी सोनी” म्हणत भाजी निवडत बसलेली ! हलवा खाल्ल्यानंतर ते हाताला लागलेले तूप देखील इतके सुगंधी असायचे ना की आजही आठवण आली की नकळत बोटांच्या टोकावर तो सुगंध दरवळतो! त्या मध्यमवर्गीय घरात या एवढ्याश्या साध्या प्रसंगाने दिवाळीआधीच दिवाळी वास करायला लागायची!
मागे काही महिन्यांपूर्वी माझ्या युट्युब चॅनलने २५०००० सब्सकॅराईबरचा पल्ला गाठला ! माझ्यासाठी ही आनंदाची गोष्टच ! या प्रवासात बरेच दर्शक एका कुटुंबाप्रमाणे माझ्याशी जोडले गेले , दिलखुलास तारीफ , सुधारणा करण्यासाठी प्रेमळ सल्ले आणि एक मानसिक आधार नेहमीच माझ्या दर्शकांनी मला दिला आहे . अशाच माझ्या एक ताई आहेत . मुंबईच्या “अलका सुळे ” ताई! त्यांची कंमेंट आली नाही की मला कसनुसं व्हायला लागते, इतक्या त्या जवळच्या आहेत. स्वतः कमालीची सुगरण असूनही , नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकायला , आत्मसात करायला एका पायावर तयार ! अधूनमधून त्यांच्याशी व्हाट्सऍप वर आणि कधीकधी फोनवर देखील माझ्या गप्पा होतात ! नुसते तारीफ किंवा सल्ले न देता , त्यांनी मला बऱ्याच रेसिपी अशा सुचवल्या आहेत की त्या मी सराव करून चॅनेलवर टाकल्यावर खरंच फार लोकप्रिय झाल्यात! अलका ताईंना मायक्रोवेव्ह कूकिंग ची खास आवड आहे, विशेष म्हणजे गोडधोड बनवणे ! त्यांनी मला एकदा बॉम्बे कराची हलवा बनवून दाखवशील का अशी प्रेमळ विचारणा केली !
इतका आनंद जाहला म्हणून सांगू , मग लागलेच तयारीला , जवळ जवळ ३ प्रयत्नानंतर मी ही रेसिपी फायनल करून मगच चॅनेल वर टाकली . अलकाताईंच्या कंमेंट मध्ये त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता ! त्यांनी हा हलवा माझ्या पद्धतीने कित्येकदा बनवून आपल्या नातेवाइकांना भेट म्हणून दिला आहे , आजही जेव्हा त्यांच्यासहीत फोन वर बोलणे होते तेव्हा नेहमी माझी या बाबतीत तारीफ करतात . अलका ताई आज ही पोस्ट खरंच तुमच्या सारख्या माझ्या कामावर प्रेम करणाऱ्या माझ्या दर्शकांसाठी आणि वाचकांसाठी ! आयुष्यात पुढे जाण्यासाठी नक्कीच अशा प्रेमळ साथीची आणि प्रोत्साहनाची गरज असते , हो ना ?
तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा , तुमच्या अभिप्रायांची आतुरतेने वाट पाहत आहे !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English

- ३/४ कप + २ टेबलस्पून = २०० ग्रॅम्स साखर
- १/२ कप = ५० ग्रॅम्स कॉर्नफ्लोअर
- १ टीस्पून लिंबाचा रस
- १ टीस्पून वेलची पावडर
- १ टेबलस्पून मगज बीज
- १ टेबलस्पून = ५-६ काजू
- पाणी
- हिरव्या खाद्य रंगाचे काही थेंब
- तूप
- एका मायक्रोवेव्ह सेफ काचेच्या बाऊलमध्ये साखर घालून घेऊ. त्यात १५० ml = १/२ कप + २ टेबलस्पून पाणी घालावं. लिंबाचा रस घालून मिसळून घ्यावे.
- मायक्रोवेव्ह सेटीन्ग्स :
- a) मोड : मायक्रोवेव्ह b) पॉवर : ९०० वॅट ( हाय ) c) वेळ : ६ मिनिटे d) स्टार्ट चे बटण दाबून झाकण न घालता साखर विरघळू द्यावी.
- साखर विरघळतेय तोपर्यंत आता आपण कॉर्न फ्लोअरचे मिश्रण बनवून घेऊ. अर्धा कप पाण्यात अर्धा कप कॉर्न फ्लोअर घालून फेटून घ्यावे गुठळी राहू देऊ नये .
- ६ मिनिटांनी साखर विरघळली की त्यात कॉर्न फ्लोअरचे मिश्रण ढवळून घालावे . नीट एकत्र करून घ्यावे.
- मायक्रोवेव्ह सेटीन्ग्स :
- a) मोड : मायक्रोवेव्ह b) पॉवर : ९०० वॅट ( हाय ) c) वेळ : ३ मिनिटे d) स्टार्ट चे बटण दाबून झाकण न घालता शिजू द्यावे.
- ३ मिनिटांत हे कॉर्न फ्लोअरचे मिश्रण जसे जसे शिजू लागते तसे घट्ट होत जाऊन जेलीसारखे पारदर्शक दिसू लागते . भांडे ओव्हन मधून बाहेर काढून त्यात आपल्या आवडीचा खाण्याचा रंग २-३ थेंब घालावा . १ टेबलस्पून तूप न विसरता मिसळून घ्यावे. या हलव्यात तूप अतिशय महत्त्वाचे आहे , तूप कमी घातले तर हलवा कोरडा पडतो.
- मायक्रोवेव्ह सेटीन्ग्स :
- a) मोड : मायक्रोवेव्ह b) पॉवर : ९०० वॅट ( हाय ) c) वेळ : ३ मिनिटे d) स्टार्ट चे बटण दाबून झाकण न घालता शिजू द्यावे.
- ३ मिनिटांनंतर भांडे बाहेर काढून एकदा मिश्रण ढवळून घ्यावे. त्यात मगज बीज , काजूचे तुकडे आणि वेलची पावडर घालून अजून १ टेबलस्पून तूप घालून नीट एकत्र मिसळून घ्यावे. तुपामुळे एक छानपैकी चमक येते या हलव्याला!
- मायक्रोवेव्ह सेटीन्ग्स :
- a) मोड : मायक्रोवेव्ह b) पॉवर : ९०० वॅट ( हाय ) c) वेळ : ३ मिनिटे d) स्टार्ट चे बटण दाबून झाकण न घालता शिजू द्यावे.
- ३ मिनिटांनंतर हलवा छानपैकी स्मूथ आणि पारदर्शक होतो. भांडे ओव्हनच्या बाहेर काढून एका काचेच्या ट्रेला किंवा चौकोनी/गोल थाळीला तुपाचा हात लावून थापून घ्यावा. चमच्याच्या साहाय्याने हलवा चौरस आकारात जाडसर थापून घ्यावा. ३० मिनिटे बाहेरच थंड होऊ द्यावा ( फ्रिजमध्ये ठेवू नये ) .
- थंड झाल्यावर हलव्याच्या आपल्या हव्या त्या आकारात वड्या कापून घ्याव्यात!
- बॉम्बे कराची हलवा तयार !

Leave a Reply