दोन आठवड्यांपूर्वी आई मला भेटायला पुण्याला आली होती … प्रेमाने भरलेल्या मनासोबत लेकी-जावयासाठी आवडीचा खाऊ , वर्षभराचा साठवणीचा मसाला , ड्राय फ्रुटस , कडधान्ये, गरम मसाले जे पुण्यात शक्यतो मिळत नाहीत असा सारा जामानिमा सोबत घेऊन आली होती. माझे लग्न झाल्यापासून २ दिवस खास मुक्कामासाठी अस येण्याची आईची पहिलीच वेळ !
तसं आमचे घर म्हणजे सासरच्या पाहुण्यारावळ्यांसाठी , आमच्या मित्रमैत्रिणींसाठी खास हक्काचे पाहुणचाराचे ठिकाण! माझ्या पार्टनरला नेहमी होस्ट करायची हौस , त्याला प्रचंड आवड ! यातूनच मला स्वयंपाकघराची गोडी लागली हे वेगळे सांगणे न लगे! परंतु खास माझ्या आई बाबांसाठी मी काही बनवलय अस कधीच घडले नव्हते . आईकडे जाते तेव्हाही माहेरवाशिणीचे लाड करण्यातच , आईचा सगळा वेळ आमची सरबराई करण्यातच जातो ! यावेळी मात्र मी आणि पार्टनरने ठरवले , की आईच्या या दोन दिवसाच्या मुक्कामात काहीतरी छान तिच्या आवडीचे करायचे ! तसे आईचे खाण्यापिण्याचे चोचले काहीच नाही , कितोतरी वेळा आम्हाला छानपैकी ताजे जेवायला घालून , स्वतः मात्र कामाच्या रगाड्यात जुंपलेली ती …. , शिळ्या भातात चटणी मिसळून खाताना अनेकदा पाहिलेय तिला ! विचारल्यावर म्हणायची ” अग कालचा घासभर भात उरला होता , अन्न फेकायचे कसे , जे चाललय ते सगळे पोटासाठी ना !” तिचे हे बोल मला नेहमी आठवतात आणि म्हणूनच अन्नाची नासाडी करण्याची आजही हिम्मत होत नाही, आणि पुढे करणारही नाही !
आईला जर काही आवडत असेल तर गोड पदार्थ आणि थंड आईस क्रीम ,, थंड खाण्याची आवड माझ्या आजीकडूनच तिच्याकडे आलीये ! सुरकुतलेले डोळे मिचमिचे करत कोपरापर्यंत आलेले बर्फाच्या गोळ्याचे ओघळ एखाद्या लहानग्या पोरीसारखे चाटतानाची आजी आजही माझ्या स्वप्नांत येऊन मला खुद्कन हसवून जाते ! माझी आई दुधाच्या पातेल्याची खरवडसुद्धा साखर घालून खाते ! अजून तिची एक वाईट खोड , हॉटेलात जायचे म्हटले की कमालीचे आढेवेढे घेते , मी आणि बाबा मात्र जिभेने चटखोर , आणि ही आलीच हॉटेलात तर , कुठले हॉटेल आहे , इथे काय मिळते , मेनू कार्ड वगैरे बघावे असले काही न करता , सरळ वेटरला विचारते की , दही वडा मिळेल काय ? कर्म माझे , कितीही महागड्या हॉटेलात जा , हिची सुई दहीवड्यावर अडकलेली ! इतके हिचे दहीवड्यावर प्रेम.. अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला पण मी माझ्या लग्नातल्या कॅटेररला ही बजावून दही वडे ठेवायला लावले होते मेनूमध्ये!
मग ठरले तर आईला खुश करायचे तिचे आवडीचे दही वडे बनवून !
दही वडा हा आपल्या देशातल्या चाट संस्कृतीचा एक भाग म्हटले तर हरकत नाही , परंतु उत्तर भारतातला हा दही भल्ला , महाराष्ट्रात दही वडा , दक्षिणेकडे थाईर वडा अशा वेगवेगळ्या नावांसोबत थोड्याफार पाककृतींच्या फरकाने प्रादेशिक थाळीचही एक मुख्य अंग आहे ! बनवायला अतिशय सोप्पा, खायला प्रचंड स्वादिष्ट , असा ह्या दहीवड्याचा चमच्याने घास घेताना माझी तर ब्रह्मानंदी टाळीच लागते ! ह्याचे मिश्रण बनवताना एकच फक्त मेहनतिचे काम आहे ते म्हणजे वाटलेल्या डाळीचे मिश्रण फेटणे ! हाताने जमले तर हाताने फेटा नाहीतर तंत्रज्ञान आहेच कि मदतीला – इलेक्ट्रिक बीटर ज्याने आपण केकचे बॅटर फेटतो ना ते ही वापरू शकतो! थोडीशी मनगटांची कसरत समजून करा , पण विश्वास ठेवा इतके छान वडे बनतात की काय सांगू ! आई माझी खुश झाली हे तर तुम्हाला कळून चुकलेच असेल …. तुम्हाला कोणाला खुश करायचे असेल , नवऱ्याला , सासूला , मुलांना किंवा स्वतःला सुद्धा , तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अभिप्राय लिहायला विसरू नका खाली कंमेंट सेक्शन मध्ये !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १/२ कप = १०० ग्रॅम्स उडीद डाळ , स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजवून किंवा कमीत कमी ४ तासांसाठी भिजवून
- १/४ कप = ५० ग्रॅम्स मूगाची डाळ , स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजवून किंवा कमीत कमी ४ तासांसाठी भिजवून
- १ इंच आल्याचा तुकडा
- ३ हिरव्या मिरच्या
- २ टेबलस्पून कोथिंबीर
- २ कप= ४०० ग्रॅम्स दही
- १/४ कप दूध
- २-३ टेबलस्पून साखर
- १ टीस्पून भाजून जिरे पावडर
- १/२ टीस्पून लाल मिरची पूड
- १/२ टीस्पून चाट मसाला
- १/४ टीस्पून काळे मीठ
- २ कप ताक
- १/४ टीस्पून हिंग
- मीठ चवीनुसार
- हिरवी तिखट चटणी
- चिंचेची गोड चटणी
- तेल तळण्यासाठी
- वडे तळल्यानंतर आपण ते ताकात भिजवून ठेवणार आहोत, म्हणून आपण पहिल्यांदा ताकात हिंग आणि चवीपुरते मीठ घालून ढवळून घेऊ. ( नोट : हे ताक अर्धा कप दह्यात २ कप पाणी घालून मी घुसळून तयार केले आहे ) . ताक बाजूला झाकून ठेवून देऊ आणि दही सेट करून घेऊ.
- एका भांड्यात दही घेऊन त्यात दीड टेबलस्पून साखर , काळे मीठ , चवीपुरते मीठ घालून नीट फेटून घेऊ . गुठळी राहू देऊ नये. आता यात १/४ कप दूध ( रूम टेम्पेरचर वर दूध असावे ) घालून जरा पातळ करावे कारण हे दही वड्यांवर नीट पसरले गेले पाहिजे . दही फ्रिजमध्ये थंड होण्यास ठेवावे.
- आता डाळींचे पाणी काढून त्यांना एकत्र मिक्सरमधून वाटून घेऊ . पाव कप पाणी वापरून डाळीची घट्ट आणि एकदम बारीक पेस्ट करून घेऊ . फार जास्त पाणी घालून पातळ करू नये. मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यात आले, मिरची आणि कोथिंबीरीचे पाणी न घालता जाडसर वाटण करून घेऊ.
- आता महत्त्वाची स्टेप: डाळीचे मिश्रण हाताच्या तळव्याचा वापर करून चांगले एकाच दिशेने गोलाकार फेटून घ्यावे. १० मिनिटे तरी फेटून घ्यावे. असे केल्याने वडे फार हलके होतात . मिश्रण जितके चांगले फेट्ले जाईल तितके वडे कापसासारखे मऊ आणि हलके नाहीतर खूप जड होतात ! मिश्रण फेटल्यावर तयार आहे कि नाही हे पाहण्यासाठी एका पाणी भरलेल्या भांड्यात मिश्रणाचे थेंब घालावेत , जर ते पटकन पाण्याच्या पृष्टभागावर तरंगायला लागले तर समजावे की मिश्रण छान हलके झाले आहे .
- वाटलेला मसाला मिश्रणात मिसळून १० मिनिटे बाजूला झाकून ठेवावे.
- वडे तळण्यासाठी वडे बुडतील इतके तेल कढईत घालून मध्यम आचेवर गरम होऊ द्यावे. . तेल गरम झाले की आच मंद करून हाताला पाणी लावून गोल गोल छोटे वडे तेलात अलगद सोडावेत. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस सोनेरी रंगावर वडे तळावेत . मंद आचेवर तळल्यामुळे वडे बाहेरून छान खरपूस भाजले जाऊन कुरकुरीत होतात!
- मला वड्यांची एक बॅच तळायला ७-८ मिनिटे लागली. एका भांड्यात हलके गरम पाणी घेऊन त्यात हे तळलेले वडे ३-४ मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत जेणेकरून ते पाणी शोषून आतपर्यंत मऊ होतील!
- ३-४ मिनिटांनंतर वडे दोन्ही हातांच्या तळव्यांत अलगद दाबून त्यातले पाणी काढून टाकावे . वडे तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मग हे वडे वाढेपर्यंत ताकात भिजवून ठेवावेत. अशा प्रकारे सारे वडे तळून क्रमाने पाण्यात आणि नंतर ताकात भिजवून ठेवावेत.
- दही वडे सर्व करताना , प्रथम टाकत बुडवलेला वडा सर्विंग डिश मध्ये घेऊन त्यावर थंड दही घालावे , मग आवडीप्रमाणे लालमिर्ची पूड, जिरे पावडर आणि चाट मसाला भुरभुरावा . आवडीप्रमाणे हिरवी तिखट चटणी आणि चिंचेची गोड चटणी घालून थंड खावयास द्यावे!

Leave a Reply