२०१५ साल आयुष्यात एक वेगळीच वावटळ घेऊन आले. नवीन विचारांची वावटळ , काही निर्णय , त्यांचे बरे वाईट परिणाम स्वतः एकट्याने आकलन करून घेण्याची शक्ती देणारी वावटळ , आजवर कोणाच्या तरी पंखांआड सुरक्षेच्या कवचात बसण्याची सवय असलेल्या मनाला नवी उभारी देऊन आपणही आपल्या कुटुंबियांचे वाईट काळात संरक्षण करू शकतो हा आत्मविश्वास देणारी वावटळ!
अशातच आय टी चा स्थिर जॉब सोडून कलिनरी आर्टस् मध्ये पोस्ट ग्रॅजुएशन साठी जायचा निर्णय मनात जोर धरू लागला होता . त्याच संबंधी चौकशी करण्यासाठी , आम्ही कर्नाटकमधील मणिपाल येथे ” वेल्कमग्रुप स्कुल ऑफ हॉटेल ऍडमिनिस्ट्रेशन ” या बहुचर्चित आणि देशातल्या प्रसिद्ध अशा कॉलेजमध्ये जाण्याचा कार्यक्रम आखला . साधारण सप्टेंबर संपत आला होता . मणिपाल हे छोटेसे शहर , चहूबाजूंनी टेकड्यांनी वेढलेल.. पुण्याहून इथे जाण्यासाठी उडुपी हा अगदी जवळचा थांबा , अगदी पाच -सहा किलोमीटरवर मणिपाल .. आम्ही थोड्या कालावधीत बरंच रिसर्च केले होते , तरी आमचा अंदाज चुकला नी आम्ही मंगलोर ला वास्तव्य ठरवले . कारण पुण्याहून संध्याकाळी साडेपाच ला निघणारी स्लीपर बस उडुपी ला सकाळी ५ ला पोचायचं अंदाज दाखवत होती , एवढ्या सकाळी बुक केलेलं हॉटेल कसे काय शोधायचे या विचाराने आम्ही सेफ मार्ग निवडला नी पुढे मंगलोरला सात वाजता उतरलो . पार्टनरचे प्रवासाच्या बाबतीत प्लांनिंग अगदी परफेक्ट असते , म्हणजे मी खर मनापासून सांगते की आमच्या फिरण्याच्या , राहण्या विषयीच्या बाबतीत मी कधीच ढवळाढवळ करत नाही . HE IS THE बॉस ! अर्थातच काय काय खवय्येगिरी करायची हे आमचे दोघांचे प्लांनिंग असते , तिकडे मात्र गाल फुगवाफुगवी आमची चालूच असते ..
ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी आम्ही मंगलोर मध्येच आधीच अभ्यास केल्याप्रमाणे अनेक प्रसिद्ध मत्स्याहार नि मांसाहाराचा आस्वाद घेतला . तरीही एक पदार्थ जो या मंगलोरच्या नावानेच ओळखला जातो तो मात्र काही आम्हाला मिळाला नाही . एके ठिकाणी दुपारी जेवणाच्या वेळेला विचारले तर तो वेटर अतिशय घाईत उत्तरला , ” वनली इन मवॊर्नींग .. ऑर शाम को वूडलॅंड मे देको मिलता हाय क्या “. दुपारी बाहेरून जेवून आल्यावर हॉटेलात थंडगार एसी ची हवा जादू करूनच गेली , तसेही चौदा तास स्लीप्पर बस मध्ये डोंगरातल्या वळणांवर कंबरेचे सीटला आपटून आपटून धिरडे झाले होते . मग जो डोळा लागला तो उघडला ५ च्या सुमारास .. आवरून वूडलँड ला पोहोचतोय तोवर तिथल्या पोऱ्याने सुद्धा हातानेच संपले म्हणून इशारा केल्यावर मुकाट मेदुवडा खाऊन आलो .
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलातच कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट करून नऊच्या बसने आम्ही मणिपाल ला पोचलो . ती माझी पहिली भेट माझ्या कॉलेजमधली , ज्याने माझ्यातली स्वयंपाक कलेला अजून उत्तम होण्यासाठी ज्ञानाचा मुलामा चढवला . मी माझ्या आय टी च्या क्षेत्राखेरीज ही जराशी वेगळी वाट चोखंदळायला निघाले होते त्यात माझ्या या कॉलेज ने पदोपदी माझा आत्मविश्वास वाढवला , जिथे अडखळले, धडपडले तिथे माझ्या शिक्षकांनी मला सावरले , खूप ऋण आहेत या संस्थेचे माझ्यावर ! कॉलेजमध्ये अगदी निवांत २ -३ तास चौकशी करून , कॅम्पस मध्ये फेरफटका मारल्यावर पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले होते. आसपास तशी बरीच हॉटेलं होती परंतु पार्टनरने पोटात भुकेचा आगडोंब उसळला असताना सुद्धा गूगल बाबाला चौकशी करून माहिती करून घेतली आणि अचानक रिक्षाला हात दाखवला . मी जराशा वैतागल्या आवाजात म्हटलेच ,” चल ना समोर सँडविच वाला दिसतोय खाऊया … ” . माझ्याकडे दुर्लक्ष करीत त्याने रिक्षावाल्या अण्णाला म्हटले “उडुपी बस स्टॅन्ड , किदीयूर हॉटेल” ! असा राग आला होता , मी पूर्ण रस्ताभर गाल फुगवून बाहेर बघत बसले , रिक्षातून येणारी ती वाऱ्याची झुळूक हळूच माझ्या रागावर फुंकर घालीत होती , पण नाही .. मला भांडण करायची जोरदार हुक्की आली होती .. अहो माझे मूड हे माझ्या भूकेवर आणि खायला काय आहे यावरच बदलतात हे पार्टनरला आता चांगले ठाऊक झालेय ! दहा पंधरा मिनिटांत आम्ही किदीयूर हॉटेलात शिरलो , उडुपी बस स्टँडच्या अगदी समोर मोक्याच्या जागी हे multi cuisine हॉटेल आहे . प्रवेशद्वारातून शिरतानांच समोर श्रीकृष्णाची भव्य मूर्ती आणि बाजूला जवळ जवळ ४ फुटांची तेवणारी समई! आता मात्र माझी कळी खुलली , पार्टनरचा हात पकडून आत शिरले , हसला मोठ्याने .. सवय झालीय त्याला आता !
साधारण ३ वाजले होते आणि हॉटेलचा happy hour सुरु व्हायला अर्धा तास होता , साडेतीनपासून या हॉटेलमध्ये उडुपी , मंगलोर विशेष पदार्थ वाढले जातात . पण आमचा थकलेला चेहरा पाहून आणि पार्टनरने त्यांना सांगितल्यामुळे की आम्ही खास मंगलोर बन्स खाण्यासाठी आलोय म्हंटल्यावर पुढच्या दहा मिनिटांत गरमागरम टम्म फुललेले बन्स आणि नारळाची फ्रेश चटणी व सोबत फिल्टर कॉफीचे वाफाळते कप आले. ज्या मंगलोर बन्स साठी आम्ही कालपासून तरसलो होतो ते समोर होते . बन्स चा तुकडा तोंडात कोंबत मी आनंदाने म्हटले , ” काय मस्त टम्म फ़ुगलेत ” तर पार्टनर खोडकरपणे म्हणाला ,” तुझे गाल थोड्या वेळापूर्वी एवढेच मोठ्ठे फुगले होते !” लटक्या रागाने त्याच्याकडे पाहत मी आपले माझे खाण्याचे काम सुरूच ठेवले .
या बन्स मध्ये काय विशेष असे वाटेल तुम्हाला तर सांगते , पिकलेल्या केळ्यांचा वापर करून आणि थोडा जिऱ्याचा स्वाद असे हे बन्स , कर्नाटकात घरोघरी सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी स्नॅक्स मध्ये खाल्ले जातात . केळ्यातील साखर आणि अजून वरून साखर पिठात घातल्याने या बन्स ना एक वेगळाच क्रस्ट वरून येतो जो अतिशय चविष्ट लागतो . थोडे से गडद लालसर रंगाचे , पुरीपेक्षा मोठे आणि आतून मऊसूत असे हे बन्स नुसते खायला सुद्धा अप्रतिम . मी हे घरी जेव्हा करते तेव्हा बनवतानाच खायचा मोह आवरत नाही !
या बन्स ची कहाणी खूप रंजक आहे . उडुपीचे श्रीकृष्ण मंदिर इतिहासातले प्राचीन मंदिर आहे . हा शाळीग्राम खाण्यासाठी आसुसलेला , आपल्या बाललीलांनी त्याने अवघे ब्रह्माण्ड भरून टाकलेय . या कृष्ण भगवंताला निरनिराळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो . तसेच हा नैवेद्य कांदा लसूण विरहित असतो . या देवालयात प्रसाद म्हणून बरीच केळी नी इतर फळे वाहिली जात . हे केळी पिकून खराब होऊ नये म्हणून देवळाच्या महापंडितांनी एक शक्कल लढवली की जेणेकरून केळी फुकट जाणार नाही आणि भक्तांना खायला ही घालता येतील . अशातूनच या बन्स चा शोध लागला आणि उडुपीपासून हे बन्स प्रवास करीत मंगलोरच्या खाद्यसंस्कृतीतही जाऊन विराजमान झाले . बाहेरून येणाऱ्यांनी मंगलोरमध्ये बन्स खाल्ले म्हणून त्यांचे नामकरण झाले ” मंगलोर बन्स ” , यांना तिकडे बनाना पुरी असे ही म्हणतात! मंदिराच्या आवारातच ” मित्र समाज ” म्हणून एक जुने हॉटेल आहे . इकडे सात्त्विक भोजन आणि नाश्त्याचे पदार्थ मिळतात . आमच्या पहिल्या सेमिस्टर मध्ये फील्ड ट्रिप मध्ये आम्ही मित्र समाजात हे बन्स , गोळी बज्जी असे बरेच पदार्थ खाल्ले होते . तिथले बन्स हे माझे एक आवडते एकदम ऑथेंटिक!
कधी तुम्ही उडुपीला गेलात तर या हॉटेल्स ना नक्की भेट द्या , कारण कर्नाटक फिरून आले आणि उडुपी ची खाद्यसंस्कृती नाही चाखली तर नक्कीच काहीतरी राहून गेले असे मी म्हणेन !

- मोठी केळी पिकलेली दीड , लहान असली तर २ केळी घ्यावीत ,
- ३ टेबलस्पून साखर ,
- २ टेबलस्पून दही ,
- सव्वा कप = २०० ग्रॅम गव्हाचे पीठ
- पाव कप = ५० ग्रॅम्स मैदा
- पाव टीस्पून मीठ ,
- पाव टीस्पून खाण्याचा सोडा,
- पाव टीस्पून जिरे ,
- तेल
- पहिल्यांदा केळी , साखर आणि दही एकत्र मिक्सरमधून प्युरी करून घ्यावी.
- एका मोठ्या खोलगट भांड्यात गव्हाचे पीठ , मैदा, मीठ , सोडा आणि जिरे एकत्र मिसळून घ्यावे .
- हे पीठ केळ्याच्या प्युरीत नीट मळून घ्यावे , पाणी घालू नये .
- हे मळलेले पीठ पाण्याने ओले करून घट्ट पिळलेल्या कापडाने झाकून ठेवावे , किमान ४ तासांसाठी ते ८ तासापर्यंत .
- हे पीठ साधारण ५ तासांत चांगले फुलून येते .
- थोडेसे चिकट असेल तर हाताला तेल किंवा तूप लावून चांगले मळून घ्यावे .
- मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून किंचित पिठावर त्याच्या जाड पुऱ्या लाटून घ्याव्यात .
- कढईत तेल मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यावे आणि नंतर आच मध्यम करून पुऱ्या चांगल्या दोन्ही बाजूंनी लालसर रंगावर तळाव्यात .
- हे बन्स नारळाच्या चटणीसोबत किंवा नुसते सुद्धा खायला छान लागतात , सोबत एक फिल्टर कॉफीचा मग तयार असू द्या म्हणजे झाले !:-)

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply