काही घरांच्या ना खाद्यपरंपरा असतात , आता बघा , माझी एक मैत्रीण आहे त्यांच्या घरात सकाळी साडेनऊलाच पूर्ण स्वयंपाक होतो आणि सगळं घर १० वाजता सकाळी जेवणं उरकतं . त्यामुळे ती जेव्हा माझ्यासोबत जनरल शिफ्टला असायची तेव्हा पूर्ण चार खणांचा डबा खांद्याला लटकवून यायची . नं
तर एकदा तिच्या घरी जाणे झाल्यावर तिच्या सासूबाईंशी गप्पा मारता मारता कळले की गावी त्यांचे कुटूंब शेतीत व्यग्र असल्याकारणाने , सकाळी पहाटे शेतावर काम करून आलेल्या दमल्या भागल्या भुकेल्या जीवाला शांत करण्यासाठी त्यांच्या घरातलया सगळ्या महिला स्वयंपाक तयार ठेवीत . आता माझ्या सासरी मटार , चणा डाळ , तांदूळ बटाट्याचे पीक अमाप होते म्हणून नाश्त्यात गरमागरम मटार पोहे , चण्याच्या डाळीचे पराठे किंवा आलू कचालू म्हणून हिरव्या मसाल्यातले चटपटीत बटाटे बनवतात तेही मसाला अगदी ताजा पाट्यावर वाटून…
या जानेवारीत आम्ही सातारला “लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् ” साठी सातारच्या खाद्यसंस्कृतीतले १२१ पारंपरिक पाककृती सादर केल्या आणि आनंदाची गोष्ट अशी की आमचा रेकॉर्ड ठरवल्यापेक्षाही कमी वेळात पूर्ण झाला . त्या रेकॉर्डससाठी अभ्यास करताना , रेसिपी रिसर्च करताना इतक्या घरगुती आणि वेगळ्या रेसिपीज ची माहिती झाली आणि त्या निमित्ताने सातारच्या खाद्यपरंपरेशी सुद्धा ! तिथे सुद्धा माझ्या हेच लक्षात आले की आपल्या खाण्यात त्या त्या भागात पिकणाऱ्या घटकांचा वापर जास्त करून आपल्या पारंपरिक पाककृती जन्माला आल्यात . सातारला उच्च प्रतीच्या खपली गव्हाचे उत्पादन होते , तिथे गव्हाची लापशी किंवा खीर तूप घालून एकदा खाल्ली की जन्मभर त्याची चव विसरली जाणार नाही , हीच खीर कोकणात येता येता आंबेमोहोर तांदळाच्या सुगंधाने आणि अप्रतिम चवीने भारली जाते . अशी एक ना अनेक उदाहरणे ..
पोहे , उप्पीट , शिरा हे आपले महाराष्ट्रीयन न्याहारीचे अग्रस्थानी असलेले पदार्थ , परंतु ते मुख्यत्वे शहरात घाईघाईच्या जीवनशैलीत आत्मसात करून घेतलेले आहेत असे मला वाटते . तुमचे मत वेगळे असू शकते , अगदी मान्य !
मुंबईत आयुष्याची जडणघडण झाली असली तरी कोकणाशी जोडलेली नाळ आमची कायम राहिली याचे मुख्य कारण म्हणजे आजीचे , बाबाचे प्रत्येक सुट्टीत गावी घेऊन जाणे , ते ही रत्नागिरी आणि हर्णे- दापोली अशा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत . एकीकडे काईलीवर चटचट घातलेली घावणे , आंबोळ्या तर दुसरीकडे आईच्या मामीच्या हातची मऊसूत खिमटी पेज नी लिंबाचे लोणचे , एकीकडे गावठी लाल तांदळाचा भात नी माशाचा रस्सा तर दुसरीकडे काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत फुगलेले वडे .. आमच्या घरात मुंबईला सुद्धा रोज न्याहारीला कधी चहा चपाती कधी नाचणीची भाकरी नी भाजी तर कधी नाचणीची आंबील किंवा सत्त्व असेच असायचे . आईच्या नोकरीमुळे रोज घावन आंबोळ्या करायला नाही जमायचे , परंतु रविवार हा त्यासाठी राखून ठेवलेला असायचा . एक तर आमच्या सामिष भोजनाचा दिवस , मग मासे असो कि चिकन आंबोळ्या कशातही छानच लागायच्या आणि एकदा पीठ भिजवले की नाश्त्याचीही सोय !
मागे मी तांदळाच्या आंबोळीची रेसिपी विडिओ आणि ब्लॉग मध्ये शेअर केली होती , तिला वाचकांकडून खूप उत्तम प्रतिसाद मिळाला , म्हणून आज ठरवले की तुमच्यासोबत आंबोळीचा अजून एक प्रकार जो पारंपरिक च आहे तो शेअर करते . ही आहे रव्याची आंबोळी .. सर्वप्रथम आंबोळीला “आंबोळी” का म्हणतात याचा अर्थ मी माझ्या पुरता लावून घेतलाय , आंबवून केली ती आंबोळी , बघा पटतंय का तुम्हाला 🙂 ही रव्याची आंबोळी सुद्धा कोकणी घरांत सर्रास बनते आणि तिची चव जास्त छान लागते ती गरमगरम गोडसर चहात बुडवून खाताना , का ठाऊक आहे ? ही आंबोळी लुसलुशीत तर बनते परंतु रव्यामुळे खरपूस भाजली गेल्याने तिला एक वर कुरकुरीत पापुद्रा येतो . यात वापरलेला रवा कोणता याबाबतीत मी सांगू इच्छिते . बाजारात इडलीचा रवा मिळतो , तो तांदळाचा रवा असतो . आपल्याला तो न वापरता , जो नेहमीचा गव्हाचा रवा असतो ना तोच घ्यायचाय , ज्या रव्याने आपण शिरा किंवा उपमा बनवतो . मुख्य म्हणजे तांदळाच्या आंबोळी पेक्षा ह्या आंबोळीचे साहित्य भिजवायला कमी वेळ लागतो , म्हणजे ४ तास पुरेसे ! तसेच पोटाला जरा , ही त्या मानाने हलकी , म्ह्णून आई शक्यतो रविवारची हीच आंबोळी घालायची , कारण चारी ठाव आमची खादाड तोंडे चालू असायची ना !
तर अशी ही साधी सोप्पी रव्याची आंबोळी नक्की वाचा आणि करून पहा , हो आणि सांगायला नकोच , काळ्या वाटाण्याचे सांबार आहे बरं का आंपल्या ब्लॉग वर , जर सोबतीला बनवायचे असेल तर ..

- १ कप = २०० ग्रॅम्स गव्हाचा बारीक रवा
- अर्धा कप = १२५ ग्रॅम्स उडीद डाळ
- अर्धा कप = ४० ग्रॅम्स पोहे
- १ टीस्पून मीठ
- तेल
- पाणी गरजेनुसार
- सगळ्यात आधी उडीद डाळ आणि पोहे स्वच्छ धुऊन ३-४ तासांसाठी भिजत घालावेत . रवा आंबोळीचे वाटण करण्याआधी फक्त ३० ते ४५ मिनिटें आधी भिजत घालावा .
- ४ तासांनंतर डाळ आणि पोह्यातले जास्तीचे पाणी काढून टाकून ते एकत्र मिक्सरला अगदी बारीक वाटावी .वाटताना साधारण पाऊण कप पाण्याचा मी वापर केला आहे . त्या आधी रवा साधारण अडीच कप पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजत घालावा .
- रवा भिजला की तो डाळीच्या वाटलेल्या मिश्रणात हाताने एकाच दिशेने गोलाकार फिरवत नीट मिसळून घ्यावा . ही क्रिया साधारण ५-६ मिनिटे करावी .
- हे पीठ सरसरीत पातळ असावे . झाकण घालून ८ ते १० तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवावे.
- ८ ते १० तासांनंतर हे पीठ चांगले फुगून वर येते . त्यात मीठ घालून हलक्या हाताने डावाने ढवळून घ्यावे.
- आंबोळी बनवण्यासाठी एक बिडाची काहील किंवा नॉन स्टिक तवा तापवून घ्यावा. त्यावर तेल चांगले पसरवून घ्यावे. नारळाच्या शेंडीचा किंवा कांद्याचा वापर करावा तेल पसरवून घेण्यासाठी. आच मंद ते मध्यम ठेवून २ डाव भरून आंबोळीचे पीठ तव्याच्या मध्यमभागी घालून गोलाकार पसरवून घ्यावे. आंबोळ्या जास्त पातळ न घालता जाडसरच बनवाव्यात . झाकण घालून २-३ मिनिटे एका बाजूने शिजून द्यावी. त्यानंन्तर झाकण काढून आंबोळी पलटवून दुसऱ्या बाजूनेही शिजू द्यावी.
- अशा प्रकारे साऱ्या आंबोळ्या बनवून घ्याव्यात . कोकणात या आंबोळ्या नारळाच्या किंवा कैरीच्या चटणीबरोबर , काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत आणि चिकन / मटणाच्या रस्स्यासोबत फारच छान लागतात !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply