आमच्या लग्नानंतरचा , सत्यनारायणाच्या पूजेचा दिवस .. सकाळी पूजा आटोपली आणि संध्याकाळी दर्शनासाठी बिल्डिंगमधल्या ओळखीच्या लोकांची तसेच शेजाऱ्यापाजाऱ्यांची रीघ लागली होती . उत्तरप्रदेशातल्या ” सिंह” परिवारात एका मुंबईकर कोकणकन्येने गृहप्रवेश केला होता . डोंबिवलीच्या त्या १०-१२ बिल्डींग्सच्या सोसायटीत या प्रेमविवाहाची बऱ्यापैकी चर्चा झाली होती , अहो साधारण १० वर्षांपूर्वीचा काळ ना … सोसायटीत मराठी , तामिळ , गुजराती , हिंदी , मारवाडी अशा बहुभाषिकांची घरे एकत्र नांदतात. छोटा भारत म्हटलेत तरी हरकत नाही !
सासूबाईंच्या मैत्रिणींनी नवविवाहित स्नुषा पाहण्यासाठी एकत्रच प्रवेश केला . मी माझ्या एकूणच स्वभावाला न शोभणारा लाजाळूपणा आणि अबोलपणा धारण करून आलेल्या पाहुण्यांचे आगतस्वागत करीत होते . काही जणींनी चेष्टा मस्करी करण्याचा लाडिक प्रयत्न केला तेव्हा एरवीचे माझे सातमजली हसणे आत गिळून त्यांना फक्त ” हंहंहंहं ” इतकेच करून मी हसून उत्तरं देत होते . एका दक्षिणेकडच्या काकूंनी अगदी पायापासून डोक्यापर्यंत निरखत मला विचारले , ” व्हाट इज युववर आयजूकेशन?” , त्यांच्या बाणांना इंग्रजीतून परतून लावताना एक दुसरा जरासा मुंबैया हिंदीतला टेकनिकल बाण आलाच ,” तुम आय टी में हैं तो फॉरेन गयी थी क्या ? ” , या बाणाला ” हां यूएसए , अभि अगले महिने वापस जाना है ,” अशा माझ्या उत्तरावर तो बाण सोडणारा धनुर्धारी अपेक्षाभंग झाल्यामुळे जरासा हिरमुसला , नंतर सासूबाईंकडून कळले की , या काकूंनी आपला मुलगा ऑस्ट्रेलियाला एम. एस. करायला जाताना ,” अख्ख्या गंगेश्वर नगरात कोणी नाही गेले हो परदेशी आतापर्यंत ” , म्हणून पेढे वाटले होते , पण मला त्यांनी हिंदीत का प्रश्न विचारला देव जाणे !
एक अय्या मिश्रित बाण अगदी हलकेच टोचून गेला , ” अय्या तुझे गाव रत्नागिरी , आम्ही येऊ हं कधीतरी तुझ्या गावी पिकनिकला , आंब्याची झाडे असतीलच ना ..काय हो सिंग भाभी ( हे माझ्या सासूबाईंना उद्देशून ) !” असे या ना त्या प्रकारे मराठी , हिंदी आणि प्रसंगी इंग्रजी अशा तीन भाषांत त्या भगिनी माझा जणू इंटरव्हयू च घेत होत्या. एक बराच वेळ शांत बसलेल्या सत्तरीकडे झुकलेल्या आजी बाई जराशा वैतागानेच म्हणाल्या , ” अरे किती त्या पोरीला प्रश्न विचाराल , ये ग बाळ बैस इकडे , भाग्यवान हो भाभी तुम्ही , राजापूरची गंगाच जणू आली हो तुमच्याकडे , एक छानपैकी उखाणा घे पाहू बायो माझी ..” असा पटकन मुका घ्यावासा वाटला होता हो मला त्या आजीबाईंचा … मीही थोडेसे खोटे खोटे आढेवेढे घेत . ” रुक्मिणीने पण केला कृष्णालाच वरीन , प्रणयरावांच्या साथीने आदर्श संसार करीन ” ,असा माझा रथ दौडवलाच! महिलामंडळ भारीच इंप्रेस झाले माझ्यावर आणि त्यांनी तो मोर्चा आता प्रणय कडे वळवला , ” काय रे पिंकू ( प्रणयचे टोपण नाव ) , आता तू घे बघू नाव , मराठी बायको म्हणजे आता तुला मराठी बोलायला लागेलच ..” मी स्वतःसाठी उखाण्यांची प्रॅक्टिस केली होती , पण प्रणयला सुद्धा ही परीक्षा पास करावी लागेल याची सुतराम कल्पना नव्हती मला आणि जेव्हा प्रणय नाव घ्यायला पुढे सरसावला तेव्हा तर माझे धाबे दणाणले . तस प्रणय उत्तम मराठी बोलतो पण उखाणे .. जरा वांदा च ! ” भाजीत भाजी बटाट्याची , स्मिता माझ्या प्रीतीची..” मारला की हो पठ्ठयाने सिक्सर! काय आनंदाने चित्कारले महिलामंडळ , अगदी तोंड भरून आशीर्वाद देऊन गेल्या ! नंतर मला कॉलर टाइट करत चिडवत होता , ” तुही है क्या होशियार ,मैने भी तैयारी की !”
त्या उखाण्यात असलेली मेथी त्याने हुसकावून लावून माझ्या आवडीच्या बटाट्याच्या भाजीला मुकुट चढवला , आजही आठवले की हसू येते .
माझे आणि बटाट्याचे सूत पूर्व जन्मीचेच जुळले असावे , इतका मला बटाटा आणि त्याचे पदार्थ आवडतात ! तुम्ही कधी माझ्या हिंदी आणि मराठी यू ट्यूब चॅनेलवरील प्लेलिस्ट पाहाल , तर त्यात बटाट्याच्या रेसिपीजची प्लेलिस्ट आहे . भाजी , वडे तर सोडा मी बटाट्याचे गुलाबजाम सुद्धा बनवलेत .
अहो माझ्या खानदानाचे मूळ गोव्यात आणि रत्नागिरीतला जन्म माझा … पोर्तुगीजांनी हे मात्र चांगले केले हो आपल्या देशात , बटाटा रुजवला पश्चिम घाटात ! त्यामुळे सणासुदीच्या पंगतीला , मुंजीच्या , लग्नाच्या , इतकेच काय तर श्राद्धाच्या जेवणाला आमच्याकडे बटाट्याची भाजी असतेच ! वडे , भजी हे चमचमीत पदार्थ अजून राहिलेच की! माझ्यासाठी आत्मा मोक्षदायी जेवण म्हणजे शेवग्याची शेंग घातलेले वरण , आंबेमोहोराचा भात नी पिवळी बटाट्याची भाजी ! पंगतीत जेवताना मी केळीचे पान चाटून माझ्या मावस भावंडांना सुद्धा लाज आणली हाती . असो , तर आज मी तुमच्यासोबत मला आवडणारी , आणि माझी आई जशी बनवते , त्याच पद्धतीने बटाट्याच्या भाजीची पाककृती शेअर करणार आहे . ही भाजी हॉटेलात मिळणाऱ्या पुरीभाजीच्या ढंगाने जाणारी , पोळी फुलक्यांसोबत अप्रतिम लागते . तसेच नैवेद्यासाठी बनवायची असेल तर कांदा , लसूण वर्ज्य करू शकता आणि डोशासोबत खायची असेल तर बटाटे अगदी कुस्करून घेऊ शकता ! आहे की नाही मज्जा ..
घ्या तर पटकन रेसिपी लिहून …
Rating

- ८ उकडलेले बटाटे ( ७०० ग्रॅम ) ,
- २ मोठे कांदे लांब चिरलेले ( २०० ग्रॅम ),
- ५-६ कढीपत्ता बारीक चिरलेला ,
- १ इंच आल्याचा तुकडा बारीक चिरलेला ,
- ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या ,
- ५-६ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या ,
- पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर,
- १ टीस्पून मोहरी ,
- १ टीस्पून जिरे ,
- १ टीस्पून उडीद डाळ ,
- पाव टीस्पून मेथी ,
- पाव टीस्पून हिंग ,
- १ टीस्पून हळद ,
- मीठ चवीनुसार ;
- अर्धा टीस्पून साखर ,
- १ लिंबाचा रस,
- तेल
- प्रेशर कूकरमध्ये बटाटे बुडतील इतके पाणी घालावे . त्यात चांगले १ टेबलस्पून मीठ घालावे ,म्हणजे बटाटे उकडताना पाण्यात फुटत नाहीत . बटाटे उकडल्यावर थंड झाले की सोलावेत आणि त्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात .
- कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी , जिरे , हिंग , मेथी , उडीद डाळ , चिरलेला कढीपत्ता आणि लसूण घालावी . लसूण जराशी गुलाबी रंगावर परतून घ्यावी .
- आता आले घालावे आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावे . हिरव्या मिरच्या घालून जरा परतून घ्याव्यात . त्यात कांदा घालून जरासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा .
- त्यात हळद घालावी आणि मिनिटभर परतावी . नंतर थोडी चिरलेली कोथिंबीर घालून परतावे . बटाट्याच्या फोडी घालून मध्यम आचेवर एकत्र करून घ्यावे . चवीपुरते मीठ घालावे . मंद आचेवर झाकण घालून २ मिनिटे शिजू द्यावे .
- नंतर साखर घालावी . लिंबाचा रस घालून एकत्र ढवळून घ्यावे .
- वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि गॅस बंद करावा .
- स्वादिष्ट बटाट्याची भाजी पोळी , फुलके , पुरींसोबत किंवा वरण भातासोबत वाढावी .

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
चवदार चविष्ट भाजी
आणि लिहिले पण छान
Thank you So much Renu Tai 🙂