महाराष्ट्रात ज्वारी अमाप पिकते आणि हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे ! हिवाळ्यात ज्वारीची कोवळी कणसे शेकोटीवर भाजून जागोजागी जिथे ज्वारीची शेते आहेत तिथे हुरडा पार्ट्या केल्या जातात !
हा हुरडा भाजून खाल्ला जातो किंवा त्याची खिचडी बनवली जाते. हुरडा वाळवून त्याचे पीठ दळून थालीपीठही बनवले जाते. लहान लहान मोत्यांसारखे दिसणारे फिकट हिरव्या रंगाचे गोडसर दाणे फार चविष्ट लागतात. याच हुरड्याचा वापर करून आज आपण एक मजेदार रेसिपी बनवणार आहोत, हुरड्याची भजी !
मराठी जेवणात जितके महत्त्व भाज्या ,आमटी, वरण,भात, रस्सा आदी प्रकारांना आहे , तितकेच महत्व चटण्या, कोशिंबिरी, लोणची,पापड, भजी , मेतकूट वगैरे ,” Accompaniments ” ज्याला आपण म्हणतो – शुद्ध मराठीत ” तोंडी लावणे ” यांना हि आहे. माझी एक मामी तर आवडत नाही ना भाजी कोणाला , तर घाल ती भाजी बारीक चिरून बेसनाच्या घोळात आणि काढ पोळा किंवा भजी , असले प्रकार करायची! घरातली मंडळी तर जेवताना श्वास मुठीत धरूनच बसायची कि काय माहित आज कुठल्या वरणात किंवा आमटीत काय नवीन शोध सापडतील !
यात गंमतीचा भाग सोडला तर आमची ही मामी खरंच अन्नपूर्णा आहे! असल्या एकेक रेसिपीस करायची ना .. आणि खरं सांगू का आपण भारतीय ना अगदी भजी प्रेमी हो , उत्तर भारतात जिला पकोडा किंवा पकोडी म्हणतात आणि दक्षिणेकडे बज्जी किंवा बोनडा ! कितीहीकंटाळा आला तरी वाफाळलेला चहा आणि कढईतून गरमगरम तळून काढलेली भजी पाहिली ना, कि अंगात एकदम बाहुबली संचारतो , हो कि नाही ? आयुष्यात कितीतरी पैजा या भजी पावाच्या गाड्यावर येऊन जिंकलेल्या आहेत! तर आज आपण या हिवाळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ताज्या हुरड्याची भजी बनवू, एकदम कुरकुरीत आणि चविष्ट !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १/२ कप ज्वारीचा हुरडा
- १ १/२ इंच आले किसलेले
- ५-६ लसूण किसलेले
- ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- १/४ कप कोथिंबीर बारीक चिरलेली
- १/४ टीस्पून हळद
- १ टेबलस्पून पांढरे तीळ
- मीठ
- १/२ कप बेसन / चण्याचे पीठ
- २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- तळण्यासाठी तेल
- एका मोठ्या बाऊल मध्ये हुरडा , किसलेले आले , किसलेले लसूण, बारीक चिरलेल्या मिरच्या , कोथिंबीर, हळद, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, बेसन , तांदळाचे पीठ आणि १ टेबलस्पून गरम तेल , एकत्र मिसळून घेऊ. अतिशय थोडे पाणी घालून भज्यांचे पीठ घट्ट भिजवून घेऊ.
- भजी तळण्यासाठी कढईत तेल घालून गरम करून घ्यावे. तेल चांगले गरम झाले की आच मध्यम करून एका चमच्याने भज्यांच्या पीठाचे छोटे गोळे तेलात सोडून देऊ. बारीक ते मध्यम आचेवर भजी खरपूस तळून घेऊ.
- हे भजी नुसतेही खायला चांगले लागतात. आवडत असल्यास चिंचेच्या गोड़ चटनी किंवा टोमॅटो केचप सोबत खायला द्यावेत.

Leave a Reply