महाराष्ट्रात मकरसंक्रांत ३ दिवस साजरी केली जाते- भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी , तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि नव्या तांदळाची मऊसूत तूप घातलेली खिचडी हे ह्या सणाचे मुख्य आकर्षण!
तसे म्हटले तर थंडीच्या दिवसांत रोजच खायप्यायची चंगळ असायची , परंतु भोगी जवळ आलीये हे आमची आज्जी आठवड्या आधीपासूनच घरात आठवण करू लागू द्यायची. आई मग तिच्या नेहेमीच्या भाजीवालीला रोज ऑफिस ला येता जाता आठवण करू लागायची. भोगीच्या सणाचे अजून एक महत्त्व आजीने आम्हा पोरासोरांच्या मनावर बिंबवले होते , कसे , सांगतेच तुम्हाला ! ” स्मितु बाय उद्या भोगी आहे , लवकर उठ ग, तुझी डोई धुऊन देईन शिकाकाईने !” मी आज्जीला म्हणायचे ,” ए काय ग आजी, सकाळी सकाळी उठून केस धुऊन , ते कधी वाळायचे , वेण्या कधी घालायच्या आणि शाळेत तसेच ओले दमट केस मला नाही आवडत ssss !” माझा गालगुच्चा घेऊन म्हणायची माझी म्हातारी, ” नाही हां पोरी, भोगीच्या दिवशी केस नाही धुतले तर नवरा रोगी मिळतो , उठ हां ६ ला !” आता आली का पंचाईत ,, गप गुमान सकाळी आईच्या एका हाकेत आमची स्वारी न्हाणीघरात , आज्जी आपली शिकेकाई घेऊन केस रगडायला गालातल्या गालात हसत उभी ! तसेच ओलसर केसांच्या वेण्या घालून शाळेत गेल्यावर माझ्यासारख्या बऱ्याच मुली दिसायच्या ,कोणी ओलसर केस खाजवत तर बॉबकट वाल्या ,पावसात भिजलेल्या कावळ्यागत ! आजतागायत मी भोगीच्या दिवशी केस न चुकता धुते, गंमतीचा भाग म्हणजे मला पार्टनर ऑलरेडी निरोगी मिळालाय! यानंतर हा भोगीचा दिवस मात्र खरंच खूप मजेत जायचा. सकाळी सकाळी आईने बनवलेली नव्या तांदळाची भरपूर तूप घालून केलेली डाळ खिचडी, आणि आंब्याच्या लोणच्याचा नाश्ता ! डब्यात भरली काटेरी वांगी आणि माझी आवडती तांदळाची भाकरी! संध्याकाळी घरी गेल्यावर मात्र नुसती धमाल असायची , एकीकडे आज्जी भाज्या निवडून वेगळ्या करून , पाट्यावर मसाला वाटत बसलेली असायची, आणि आई ऑफिसमधून लवकर घरी येऊन तीळगुळाच्या लाडवांची तयारी करत बसलेली असायची. बाबा आणि मी फक्त ओट्याजवळ फिरत कसला ना कसला तरी बकाणा भरत असायचो. आज्जीचे वाटण झाले कि भोगीच्या भाजीला सुरुवात व्हायची , लोखंडी कढईत बनवलेल्या त्या आज्जीच्या हातच्या भोगीच्या भाजीला काय चव लागायची , हे विसरता ना विसरे. एरवी बनणाऱ्या नाचणी ज्वारीच्या भाकऱ्यांऐवजी त्या दिवशी खास बाजरीचे ताजे पीठ दळून त्याची भाकरी बनवली जायची! सोबत कारळ्याची चटणी आणि गरमगरम भात !अहाहा , आनंद आनंद म्हणजे काय असतो हो , हाच कि तो ! आज आज्जी नाही पण आईने अजूनही ती परंपरा कायम ठेवली आहे. साठी ओलांडलेली माझी आई प्रत्येक सण तितक्याच हुरूपाने साजरा करते आणि मलाही सांगते , “आयुष्य सुंदर आहे आणि ते साजरे करण्यासाठीच आपल्यासाठी सणसूद आहेत ! ”
तर निसर्गाने या धनुर्मासाच्या समाप्तीच्या दिवशी , इतक्या छान भाज्या आणि फळांची बरसात केली आहे , तर चला आपण ही बनवूया ही भोगी विशेष भाजी! ही जितकी पौष्टिक तितकीच चविष्ट कारण यात जास्त मसाल्यांची पखरण न करता भाज्यांच्या स्वतःच्या चवीतच ती शिजवली जाते!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Rating

- १ जुडी चाकवत ( आवश्यक )
- १ छोटे काटेरी वांगे ( आवश्यक )
- १ गाजर ( आवश्यक )
- ५-६ वालपापडी/ घेवडा / सुरती पापडी ( आवश्यक )
- १/४ कप हरभऱ्यांचे दाणे ( नसल्यास हिरवे चणे उकडून घातले तरी चालतील)
- १/२ कप भुईमुगाचे दाणे ( नसल्यास कच्चे शेंगदाणे १५ मिनिटे गरम पाण्यात भिजवून वापरावेत )
- १/४ कप आंबट बोरे गावठी ( बोरे नाही मिळाली तर वगळली तरी चालतील , भाजीला आंबटपणा देण्यासाठी बोरांच्या जागी १ टेबलस्पून चिंचेचा कोळ घालावा )
- १/४ कप ताज्या मटारचे दाणे ( आवश्यक )
- १/४ कप हुरडा ( नाही मिळाला तरी चालेल )
- १/४ कप तुरीचे दाणे ( आवश्यक )
- ५-६ छोटे बटाटे किंवा २-३ नवीन मोठ्या बटाट्यांच्या फोडी ( आवश्यक )
- १/४ कप पावट्याचे दाणे ( ओला पावटा नाही मिळाला तर कडधान्यातला पावटा उकडून घालावा )
- ५-६ हिरव्या मिरच्या
- १ लसणीची गाठ ( १५-१६) ( बाजारात मिळत असलेली हिरव्या लसणीची पात वापरली तरी चालेल )
- तेल
- १ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून जिरे
- १/४ टीस्पून हिंग
- चुटकी भर हळद
- २ टेबलस्पून पांढरे तीळ
- मीठ चवीप्रमाणे
- सगळ्या भाज्या धुऊन , स्वच्छ करून , निवडून घ्याव्यात . भाज्या स्वच्छ धुऊन एकत्र एका चाळणीत निथळत ठेवाव्यात .
- चाकवताची पाने आणि कोवळे देठ घ्यावेत चाकवत चिरून घ्यावा. . वांगे, गाजर आणि बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात . फार लहान फोडी करू नयेत. बटाट्यांच्या साली शक्यतो काढू नयेत.
- एका खलबत्य्यात किंवा पाट्यावर हिरव्या मिरच्या आणि लसूण जाडसर वाटून घ्यावी.
- कढईत तेल तापवून, मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी करावी. पांढरे तीळही तेलात खरपूस परतून घ्यावेत.
- हळद घालून परतावी. तिचा कच्चेपणा निघून गेला कि त्यात मिरची आणि लसणीचे वाटण घालावे. चांगले परतून घ्यावे.
- वाटण परतून झालं कि त्यात साफ केलेल्या सगळ्या भाज्या एकत्र घालून घ्याव्यात. मंद आचेवर मध्ये मध्ये थोडे पाणी घालून शिजू दयाव्यात.
- ढवळणीच्या चमच्याने चाकवताची पाने मॅश करत भाजीला घट्टपणा येऊ द्यावा. परंतु दुसऱ्या भाज्यांचे तुकडे जसे कि बटाटे , गाजर यांचे तुकडे मॅश करू नयेत. हे तुकडे अक्खे भाजीत छान दिसतात.
- भाजीला शिजायला १५ मिनिटे लागतात . मीठ घालून ढवळून घ्यावे आणि गॅस बंद करावा.
- भोगीची ही विशेष भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर उत्तमच लागते. परंतु भातखाऊ स्वभावाच्या मला मात्र ही वाफाळलेल्या मऊसूत भाताबरोबर खायला फार आवडते.

अफलातून रेसिपी…पारंपारिक..
छान आठवणी सकट..त्यामुळे एक आपलेपणाचा फील येत जातो ..वाटत की हे आपल्या घरी च घडतय की काय..हेच वैशिष्ट्य आहे स्मिता तुझ्या ब्लॉग च.
ऊत्साह बघुन आम्ही थक्क होतो..कारण ईतकं खोलात जाऊन रेसिपी लिहणं सोपं नाही..
शुभेच्छा.
धन्यवाद दादा , आज ब्लॉगवर तुमची कंमेंट पाहून जास्त आनंद झाला . इतक्या मेहनतीने वेळ काढून दुसऱ्याचे कौतुक करणे या चांगल्या वृत्तीला सुद्धा तोड नाही . खूप आभार तुमचे , आशीर्वाद असू द्या !