Bhogichi Bhaji | भोगीची भाजी
Author: 
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : ६० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
किती जणांना पुरेल : ७ ते ८
साहित्य:
नोट : भाज्यांच्या उपलब्धतेनुसार भाज्या घ्याव्यात .
 • १ जुडी चाकवत ( आवश्यक )
 • १ छोटे काटेरी वांगे ( आवश्यक )
 • १ गाजर ( आवश्यक )
 • ५-६ वालपापडी/ घेवडा / सुरती पापडी ( आवश्यक )
 • १/४ कप हरभऱ्यांचे दाणे ( नसल्यास हिरवे चणे उकडून घातले तरी चालतील)
 • १/२ कप भुईमुगाचे दाणे ( नसल्यास कच्चे शेंगदाणे १५ मिनिटे गरम पाण्यात भिजवून वापरावेत )
 • १/४ कप आंबट बोरे गावठी ( बोरे नाही मिळाली तर वगळली तरी चालतील , भाजीला आंबटपणा देण्यासाठी बोरांच्या जागी १ टेबलस्पून चिंचेचा कोळ घालावा )
 • १/४ कप ताज्या मटारचे दाणे ( आवश्यक )
 • १/४ कप हुरडा ( नाही मिळाला तरी चालेल )
 • १/४ कप तुरीचे दाणे ( आवश्यक )
 • ५-६ छोटे बटाटे किंवा २-३ नवीन मोठ्या बटाट्यांच्या फोडी ( आवश्यक )
 • १/४ कप पावट्याचे दाणे ( ओला पावटा नाही मिळाला तर कडधान्यातला पावटा उकडून घालावा )
मसाल्याच्या वाटणासाठी :
 • ५-६ हिरव्या मिरच्या
 • १ लसणीची गाठ ( १५-१६) ( बाजारात मिळत असलेली हिरव्या लसणीची पात वापरली तरी चालेल )
फोडणीसाठी :
 • तेल
 • १ टीस्पून मोहरी
 • १ टीस्पून जिरे
 • १/४ टीस्पून हिंग
 • चुटकी भर हळद
 • २ टेबलस्पून पांढरे तीळ
 • मीठ चवीप्रमाणे
Instructions
कृती :
 1. सगळ्या भाज्या धुऊन , स्वच्छ करून , निवडून घ्याव्यात . भाज्या स्वच्छ धुऊन एकत्र एका चाळणीत निथळत ठेवाव्यात .
 2. चाकवताची पाने आणि कोवळे देठ घ्यावेत चाकवत चिरून घ्यावा. . वांगे, गाजर आणि बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात . फार लहान फोडी करू नयेत. बटाट्यांच्या साली शक्यतो काढू नयेत.
 3. एका खलबत्य्यात किंवा पाट्यावर हिरव्या मिरच्या आणि लसूण जाडसर वाटून घ्यावी.
 4. कढईत तेल तापवून, मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी करावी. पांढरे तीळही तेलात खरपूस परतून घ्यावेत.
 5. हळद घालून परतावी. तिचा कच्चेपणा निघून गेला कि त्यात मिरची आणि लसणीचे वाटण घालावे. चांगले परतून घ्यावे.
 6. वाटण परतून झालं कि त्यात साफ केलेल्या सगळ्या भाज्या एकत्र घालून घ्याव्यात. मंद आचेवर मध्ये मध्ये थोडे पाणी घालून शिजू दयाव्यात.
 7. ढवळणीच्या चमच्याने चाकवताची पाने मॅश करत भाजीला घट्टपणा येऊ द्यावा. परंतु दुसऱ्या भाज्यांचे तुकडे जसे कि बटाटे , गाजर यांचे तुकडे मॅश करू नयेत. हे तुकडे अक्खे भाजीत छान दिसतात.
 8. भाजीला शिजायला १५ मिनिटे लागतात . मीठ घालून ढवळून घ्यावे आणि गॅस बंद करावा.
 9. भोगीची ही विशेष भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर उत्तमच लागते. परंतु भातखाऊ स्वभावाच्या मला मात्र ही वाफाळलेल्या मऊसूत भाताबरोबर खायला फार आवडते.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/bhogichi-bhaji-in-marathi/