दक्षिण भारतासाठी आंतरिक ओढ कधी नी कशी निर्माण झाली हे मला नाही सांगता येणार , परंतु माझ्या जीवनातल्या महत्त्वाच्या टप्प्यांत आणि पर्यायाने खाद्यजीवनात, हा दक्षिण भारत नेहमीच हिरीरीने भाग घेत आलाय . ‘शिक्षण’, हाच मानाने आणि उत्तम जीवन जगायचा मार्ग आहे , असे मानणाऱ्या मुंबईतील मध्यमवर्गीय घरातला जन्म आणि त्यानंतर स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पंखांत बळ देणारी माझी आय टी तली नोकरी , ही कर्नाटकाची भेट ! घरापासून पहिल्यांदाच दूर , जिथे माता पिता जवळ नसताना , जीवाला जीव देणारे माझ्याच वयाचे सखे-सवंगडी ,हे सगळे कधी आपलेसे झाले कळलेच नाही!
म्हैसूरला ट्रेनिंग मध्ये वीकएंडला पटकन दोन दिवसांत , आई वडलांना भेटून परतणारा हैद्राबादचा मित्र ,मला आवडते म्हणून ,आठवणीने अवकायाची ( आंब्याचे चटपटीत तिखट लोणचे ) बरणी घेऊन यायचा , तर केरळाची मैत्रीण, रात्रीच्या अभ्यासाच्या जागरणाला माझ्यासाठी खास लपवून कुरकुरीत अचप्पम घेऊन यायची ! त्यांचे प्रेम पाहून सहा महिने आई -बाबांना ,आजीला भेटता नाही आल्याची खंत ,डोळ्यांतल्या पाण्यासारखी डोळ्याच्या कडांवरच थोपवली जायची ! नंतर पुण्यात आल्यावर तर ,मित्रमैत्रिणींचा गोतावळा अजून वाढला . कधी तेलगू टीममेट सोबत लंच अवर मध्ये चापलेली हिंजवडीतील आंध्रा मेसमधली थाळी टाउनहॉल मध्ये डुलकी आणायला भाग पाडायची , तर वीकएंड मेजर प्रोडकशन मायग्रेशनचा प्लॅन बनवताना, लंचसाठी काय ऑर्डर करायचे ,यासाठी मीटिंग मधली शेवटची १५ मिनिटे राखून ठेवली असायची . असेच एकदा प्लांनिंग चालू असताना नवीनच जॉईन झालेलया हैद्राबादच्या राधे आणि चेन्नईच्या वसंतामध्ये बिर्याणी की मद्रास हाऊसची परोटा थाळी, हे ऑर्डर करण्यावरून जुंपली होती . तो वाद सोडवताना टीमने दोन्ही पदार्थ मागवले हे काही सांगायला नकोच , पण आमची हसून हसून पुरेवाट झाली तो भाग वेगळाच !
खोटे नाही सांगत – माझ्या एका केरळच्या जुनिअरने , नावही सांगते .. सुमीशने चक्क फ्लाईट मधून त्याच्या दारातील फणसाचे ताजे गरे डब्यातून लपवून आणले होते आणि वर एग अप्पम सुद्धा ! गिरीशच्या लग्नात Calicut ला गेलो होतो …. एवढ्या गडबडीत पाहुण्यांच्या वर्दळीतसुद्धा गिरीशचे आई बाबा आम्हाला सकाळचा नाश्ता स्वतःच्या हाताने वाढत होते! त्यात कडला करी ( काळ्या चण्याची केरळा पद्धतीची भाजी ) सोबत वाढलेले इडीयप्पम पाहून पार्टनर फक्त ” wow idiyappam ,” एवढे उद्गारल्यावर गिरीशच्या बाबांनी त्याला खळखळून हसून कडकडून मिठी मारल्याचे अजूनही मला डोळ्यांसमोर दिसतेय ! पुढे आयटी नंतर जेव्हा खाद्यक्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला , तेव्हा सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कॉलेज होते कर्नाटकातच – मणिपालला ! इथल्या आठवणींचा तर एक वेगळाच सबंध गोफ विणायला लागेल , राखते पुढच्या ब्लॉगसाठी !
मुळातच ” जाऊ तिथे खाऊ ” हे आमचे ब्रीदवाक्य असल्याने आमचे मित्र मैत्रिणी सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांना भेट देऊ, तेव्हा तेव्हा आम्हाला छोट्या छोट्या ऑथेंटिक रिजनल जेवणं देणाऱ्या हॉटेलात घेऊन जातात , जिथे चविष्ट खाणं महत्त्वाचे , बाकी अँबियन्स वगैरे मोहमाया हो ! अशातच पुण्यातच माझ्या घराजवळच ” बनाना लीफ” म्हणून तामिळनाड खाद्यपदार्थांसाठी खास असे छोटेखानी हॉटेल सुरु झाले . या दोघा मालक नवरा बायकोंनी अक्षरशः जीव ओतून मेनू बनवला होता , त्यात इडली , डोसा , मेदुवडा या नेहमीच्या पदार्थांसोबत त्यांनी आपल्या घरची खाद्यसंस्कृती खवय्यांसमोर आणली होती , अगदी साधे तरीही अप्रतिम चविष्ट !प्रत्येक रविवारची सकाळची फिल्टर कापी नी नाश्ता आमचा तिकडेच ठरलेला ! अल्पावधीतच आमची चांगली मैत्री झाली आणि उमा- प्रकाश ने ( मालक जोडपे ) तामिळनाड आणि चेट्टीनाड खाद्यसंस्कृती आम्हाला माहीत करून दिली ! पुढे काही कारणास्तव हॉटेल बंद करण्यात आले , पण उमा लवकर ते सुरु करील याची मला खात्री आहे ! पुढे कित्येक रविवार मी त्या मैत्रीला आठवून व्याकुळ होत होते !
अचानक एके दिवशी माझ्या नावाने पार्सल आले , उघडून पाहते तो काय , Meyyammai Muruggapan and Visalakshi Ramaswamy यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक – ‘The Chettinad Cookbook’ त्यात होते ! माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही , प्रेषक कोण होते पुस्तकाचे सांगावे लागेल काय – अहो पार्टनर , त्याला ठाऊक आहे ; पुस्तक .. ते सुद्धा रेसिपीजचे असेल तर माझी कळी नेहमीच खुलते आणि घरातल्यांनाही ताटात नवनवीन पदार्थ चाखायला मिळतात!
या पुस्तकात दक्षिण तामिळनाडूतल्या चेट्टीयार समाजाच्या खाद्यसंस्कृतीची अगदी विश्लेषणात्मक ओळख करून दिली आहे . अतिशय सोप्प्या भाषेतल्या रेसिपी आणि मुख्य म्हणजे कमी साहित्यातलया ! आजची पाककृती ही अशीच एक सोप्पी भाजी , Onion Curry – वेंगाया कोसू ! कांद्याचा जास्त वापर , एखादा बटाटा , आणि हाताच्या बोटावर मोजता येईल इतके साहित्य ! ही भाजी झणझणीत नी खायची आपल्या इडली व डोशासोबत ! म्हणजे नेहमीच्या चटण्या , सांबाराचा घाट घालायचा कंटाळा आला तर ही भाजी नक्की करावी .
भारताचा दक्षिण भाग … म्हटले तर सगळ्या संस्कृती – कानडी , तामिळ , केरळी , तेलगू , तुळू , चेट्टीनाड अशा अनेक.. एकमेकांत गुंफलेल्या तरीही त्यांच्या माणिकमोत्यांना एक वेगळेच पाणी , एकमेकांत उठून दिसणारे, लख्ख चमकणारे !

- साहित्य:
- ४ मोठ्या आकाराचे कांदे = ३२५ ग्रॅम्स , लांब पातळ चिरून ,
- १ मोठा बटाटा = १६० ग्रॅम्स , जुलियन्स मध्ये चिरून , माचीस च्या काड्यांप्रमाणे उभट आयताकृती आकारात
- ३ मध्यम आकाराचे टोमॅटो = २०० ग्रॅम्स बारीक चिरून
- २ टेबलस्पून तिखट लाल मिरची पूड
- २ टेबलस्पून किसलेले ओले खोबरे
- १ इंच दालचिनीचा तुकडा
- २ टीस्पून बडीशेप
- मीठ चवीनुसार
- तेल
- १०-१२ कढीलिंबाची पाने
- कृती:
- टोमॅटो , लाल मिरची पूड , १ टीस्पून बडीशेप आणि खोबरे साधारण पाव कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
- ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात उरलेली १ टीस्पून बडीशेप , दालचिनी , कढीलिंब यांची फोडणी करून घ्यावी . नंतर चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
- ५ मिनिटांनी बटाटा घालावा आणि नीट परतून घ्यावा . झाकण घालून मंद आचेवर शिजवून घ्यावेत .
- पाचेक मिनिटांनी बटाटे मऊ झाल्यावर त्यात वाटलेला मसाला घालावा , नीट एकत्र करून घ्यावा . मध्यम आचेवर मसाला चांगला शिजवून घ्यावा .
- मसाला शिजला की त्यात ३ कप गरम पाणी घालून ढवळून घ्यावे . चवीपुरते मीठ घालावे .
- मध्यम आचेवर एक उकळी आली की झाकण घालावे आणि मंद आचेवर भाजी शिजू द्यावी .
- दहा मिनिटांनंतर झाकण काढून पाणी जरासे आटले नी भाजी मसालेदार दिसू लागली की गॅस बंद करावा .
- ही वेंगाया कोसू इडली डोशासोबत अप्रतिम लागतेच , कधी पोळीसोबत डब्यात घेऊन जा , हिच्या सुगंधानेच भूक खवळते यात शंकाच नाही !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply