हिंदू कालगणनेप्रमाणे माघ हा वर्षातला अकरावा महिना .. यात पौर्णिमेच्या मागे किंवा पुढे मघा नक्षत्र म्हणूनच याचे नाव माघ ! या मासाला कुठेतरी ” तपमास ” म्हणून म्हटल्याचे सुद्धा ऐकिवात आहे . शिशिर ऋतूची सुरुवात याच महिन्यात होते आणि पूर्ण निसर्ग धुक्याची चादर ओढून जरासा आळसावलेला !
माघ शुक्ल प्रतिपदेपासून ते पंचमी पातूर श्रीगणेश जयंतीचा उत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो. माघ चतुर्थीला तिलकुंद वरद चतुर्थी , विनायक चतुर्थी ( ज्याच्या जन्मासाठी नायकाची गरज नव्हती, अहो पार्वतीने उत्पत्ती केलेला हा बालगणेश नव्हे का ) आणि कोकणात सहज बोलण्यात ” माघी चतुर्थी ” किंवा ” माघी गणेश जयंती ” असे म्हटले जाते..
बाप्पाला कोकणात जेवढे निसर्ग रुपात पाहिले जाते त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे, बाप्पाची आरास ते बाप्पाचा नैवेद्य हे सगळे स्वतःच्या हातांनी नैसर्गिक गोष्टींचा वापर करून बनवले जाते. विशेषतः माघी जयंती ला आमच्या गावात काही घरांत गणेशाची स्थापना होते तर वाड्यांमधून सार्वजनिक मंडपात सुद्धा गणेशाची स्थापना होते आणि गावकरी मिळून सर्वजण मनोभावे विनायकाची सेवा करतात! मागच्या वर्षी नेमकी गणेश जयंतीच्या दरम्यानच गावी गेले होते . बाबासोबत रात्रीच्या जेवणानंतर गावात शतपावली करताना जरा वीसेक पावलांवर असलेल्या शिवलकर वाडीत उभारलेल्या गणपतीच्या मंडपात गेलो . गणपतीची आरास साधीशी परंतु अतिशय देखणी अशी … बाप्पाच्या दोन्ही बाजूंना छोट्याश्या शेकोट्या पेटवून मंडपात अगदी उबदार वातावरण निर्माण केलेलं .. विनायकाच्या चेहऱ्यावरही शांत, धीरगंभीर असे केशरी तेज पसरलेलं ! गणपतीच्या आजूबाजूचा मांडलेला प्रसाद विशेष लक्षणीय होता. कोणीतरी या सिद्धिविनायकाला प्रसन्न करण्यासाठी तिळाच्या भल्यामोठ्या लाडवांची भेट दिली होती . तसेही या चतुर्थीला ” तिळकुंद चतुर्थी” म्हणतात व गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवद्य व पूजेत कुंद पुष्पांचा वापर केला जातो !
मागे खाली ताडपत्री अंथरून ढोलकी , टाळ , चिपळ्या घेऊन वयोगट सहा ते साठ असे भक्तगण स्वेटर , माकडटोप्या घालून ताल धरायला तयार… कोकणात भजन हे एक वेगळेच रसायन असते , ते शरीरात न भिनणारे बहुधा सापडणारच नाहीत ! ढोलकीवर कीरांच्या विराजच्या मजबूत थापेने हे सगळं भारावून पाहत असणाऱ्या माझी तंद्री भंगली नी शिरधनकर आजोबांनी ” श्री सच्चिदाssssनंद सदगुरु श्री साईssssनाथ महाsssराज… ” अशी सत्तरीतल्या खणखणीत आवाजात सुरुवात केली . आणि मग सुरु झाला भक्तीचा मंगल सोहळा .. भजनांचा निनाद क्षणार्धात आसमंतात पसरला .. शिशिराच्या गोठवणाऱ्या थंडीत मनामनांवर नकळत भक्तीची उबदार ऊर्जा आरूढ व्हायला लागली .
मी या वेळी भाद्रपदात गणेश चतुर्थीला आंब्याच्या रसातील उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बनवला होता, त्यांचे फोटो पाहून बऱ्याच जणांनी माझ्याकडे रेसिपी मागितली होती. म्हणूनच आज माघ गणेश जयंतीच्या निमित्ताने ” आंब्याच्या_रसातले_उकडीचे_मोदक ” !

- साहित्य:
- मोदकांच्या उकडीसाठी:
- • २ कप = ३०० ग्रॅम्स सुवासिक तांदळाची बारीक पिठी ( बासमती किंवा आंबेमोहोर )
- • १ कप = २५० ml पाणी ( ज्या कपाने पिठी मापलीये त्याच कपाने पाणी मापून घेणे )
- • १कप = २२० ग्रॅम आंब्याचा गर किंवा रस ( ताजा किंवा फ्रोझन )
- • १/२ टीस्पून तूप
- • थोडे केशराचे धागे
- मोदकांचे सारण बनवण्यासाठी :
- • २ कप = २०० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- • पाऊण कप गूळ बारीक चिरून किंवा किसून ( १५० ग्रॅम्स )
- • १ टेबलस्पून पांढरे तीळ
- • २ टेबलस्पून खसखस
- • १/४ टीस्पून जाडसर कुटलेली वेलची पावडर
- • १/४ टीस्पून जायफळ पावडर
- • ३/४ कप = १७० ग्रॅम्स आंब्याचा रस / गर
- • १ टेबलस्पून तूप
- कृती:
- सर्वप्रथम गणेशाचे मनोमन नामस्मरण करून नैवेद्य बनवण्यास सुरुवात करूया ! पहिल्यांदा आपण मोदकाची उकड काढून घेणार आहोत. एका खोलगट जाड बुडाच्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे . जितके कप तांदळाची पिठी घेतली आहे त्याच कपाने पाणी घ्यावे सम प्रमाणात , कमी नाही की जास्त ! जास्त पाणी घेतले तर उकड फार चिकट होते आणि कमी पाणी घातले तर उकड कोरडी पडून मोदकाला भेगा पडतात ! यातच १ कप आंब्याचा रस घालून नीट ढवळून घ्यावा म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत ! थोडे केशराचे धागे घालावेत .
- पाण्यात अर्धा टीस्पून तूप घालावे म्हणजे उकड छान मऊ होते . जास्त तूप घालू नये नाहीतर उकड पसरते म्हणजेच फार मऊ होते आणि मोदकांचा आकार देताना त्रास होतो.
- पाणी उकळत आले की आच मंद करावी व तांदळाची पिठी त्यात वैरावी. चमच्याने चांगली पाण्यात ढवळून घ्यावी. पिठीने पाणी शोषले की गॅस बंद करून पातेल्यावर घट्ट झाकण ठेवून वाफ दवडू देऊ नये.
- उकड जरा थंड होतेय तोवर मोदकाचे सारण बनवून घेऊ. एका जाड बुडाच्या कढईत किंवा नॉनस्टिक कढईत १ टेबलस्पून तूप घालावे. किसलेला गूळ घालून मंद आचेवर वितळू द्यावा .
- ५ ते ७ मिनिटांत मंद आचेवर गूळ पूर्णपणे वितळला की त्यात ओले खोबरे, खसखस आणि पांढरे तीळ घालावे हे सर्व मिश्रण एकत्र ढवळत छान कोरडे होईपर्यंत शिजवावे. गूळ आणि नारळाचे पाणी कढईत राहू देऊ नये. फार जास्त वेळ शिजवले तर गुळाचा पाक होऊन सारण कडक होते , आणि मोदक फाटतात ! फार पातळ सारण राहिले तर मोदक वळताना त्रास होतो. आता सारण कोरडे होत आले की आंब्याचा गर आणि थोडे केशराचे धागे घालावेत नी परत हे मिश्रण जरासे कोरडे होऊ द्यावे .
- वेलची नी जायफळ पावडर घालून , ढवळून गॅस बंद करावा. सारण पूर्ण थंड होऊ द्यावे.
- उकड जरा उष्ण असतानाच मळायला घ्यावी , पूर्ण थंड झाल्यावर मळताना त्रास होतो. हाताला पाणी लावून उकड चांगली दाब देऊन मळून घ्यावी .
- मोदक बनवण्यासाठी सारण आणि उकड तयार आहे . हाताशी एक पाण्याची वाटी व तुपाची वाटी तयार ठेवावी. तसेच एका थाळीला तुपाचा हात लावून एक मलमल किंवा सुती कापड भिजवून घट्ट पिळून तयार ठेवावे .
- हाताच्या तळव्यांना तूप लावून उकडीचा छोटा गोळा बाजूला काढावा व बाकीची उकड पातेल्याखाली झाकून ठेवावी म्हणजे कोरडी पडत नाही .
- आपल्याला ज्या आकाराचे मोदक बनवायचे आहेत त्या आकाराचे छोटे गोळे बनवून घ्यावेत . गोळ्याला मध्यभागी अंगठ्याने खोल दाबून एका छोट्या वाटीचा आकार द्यावा . हाताच्या दोन अंगठ्यांचा व बोटांचा वापर करत गोल फिरवत मोदकाची पातळ पारी करून घ्यावी . ही पारी सुबक , एकसंध बनली गेली पाहिजे , जर ती भेगाळली तर उकड परत चांगली मळून घ्यावी .
- पारी हाताच्या तळव्यावर ठेवून हाताची पहिली दोन बोटे पाण्यात बुडवून मोदकांना कळ्या पाडून घ्याव्यात . अगदी जवळ जवळ आणि जितक्या जास्त कळ्या तितका तो मोदक देखणा दिसतो .
- आता मोदकात सारण भरून घेऊ . सारण फार दाबून भरू नये , एक किंवा २ चमचे भरून ठीक ! हाताची पोकळी करून मोदकांच्या कळ्या जवळ आणून मोदकांचे शिर बंद करून घ्यावे. व्यवस्थित चिमटीत पकडून मोदक , नाहीतर उकडताना मोदक उमलतात!
- अशाच प्रकारे एका भरण्यात मोदकपात्रात बसतील एवढे मोदक बनवावे . जसजसे मोदक बनतील तसतसे ते कपड्याखाली झाकून ठेवावेत .
- मोदकपात्रात पाणी उकळत आले की मोदकांच्या थाळीला तूप लावून किंवा केळीच्या पानावर मोदक ठेवावेत . थाळी मोदकपात्रात ठेवून झाकण घालून मध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटे उकडून घ्यावेत .
- गरम गरम केशरी सोनसळी मोदकांवर सजून तुपाची धार घालून नैवेद्य दाखवावा !
- " गणपती बाप्पा मोरया !"
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply