दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई , फटाक्यांची आतषबाजी , सुंदर नवीन वस्त्रालंकार आणि राहिलेच की फराळाचा घमघमाट ! दिवाळीत घर उजळून टाकायची जबाबदारी तसे प्रत्येकजण आपापल्या परीने करीत असतोच , परंतु फराळ बनवणे हे जोखमीचे काम ….
त्याची पूर्वतयारी साधारण आधी दोन आठवड्यांपासून तरी करावी लागते , नाहीतर ऐनवेळेला चक्कीवाल्याच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतात , आपले भाजणीचे पीठ लवकर देण्यासाठी ! मग घाईघाईच्या त्या शृखंलेत काही ना काही चुका होतात आणि फराळ बिघडतो ! दिवाळीचा फराळ हा सुग्रणींना एक चॅलेंज म्हणूनच दिलेले काम आहे कि काय असे वाटते . पहा ना तेलाचे मोहन , लाडवांसाठीचे बेसन किती रवाळ , करंजीचे सारण मिळून येण्यासाठी घातलेले थोडे पीठ , शंकरपाळ्या तळण्याचे तंत्र , अनारशांचा ऐनवेळेला फटफजिती करणारा मनमौजीपणा यांना ताब्यात ठेवण्यासाठी अनुभवाची जोड असणे गरजचे आहे. म्हणून कितीही प्रयत्न करून ते तंत्र एक कुशल सुग्रण किंवा बल्लवाचार्य आत्मसात करतातच!
आज मोह होतोय तरीही माझ्या लेखणीला आवर घालतेय आणि शक्य तितका हा ब्लॉग दिवाळीतील एकदम सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या “चकली” यांचे ” स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ” लिहिण्यासाठी लिहितेय . चकली किंवा इतर फराळ हा एका दिवसात बसले आणि बनवला असे कधी होतच नाही . कधी भाजणी बिघडते , तर कधी तेलाचे मोहन , तर कधी काय कारणाने बिघडते , याचा शोध CID ला सुद्धा लागणे अशक्यप्राय ! म्हणूनच आजच्या ब्लॉगमध्ये मी चकली विषयी मला उपयोगी पडलेल्या काही टीप्स देणारेय , ज्या मी माझ्या आईकडून , माझ्या आजूबाजू राहणाऱ्या सुगरणींकडून व स्वानुभवातून शिकलेल्या आहेत . तुम्हाला त्यांचा उपयोग होईल याची अशा बाळगते .
चकली बनवण्याचे तीन टप्पे – भाजणी , पिठाची उकड आणि तळणी !
भाजणी :
महाराष्ट्रात विविध प्रदेशांत उपलब्ध इन्ग्रेडिएंट्स चा वापर करून चकलीची भाजणी बनवली जाते . या भाजणीत तांदूळ , साबुदाणे , डाळी , जिरे , धणे यांचा वापर होतो तसेच पोहे , गहू , ज्वारी असे धान्य देखील मिसळले जाते . आमच्या विठाताई अकलूज सोलापुरातील पद्धत सांगत होत्या , की तिकडे साबुदाणे महाग मिळतात किंवा कधी कधी मिळत नाहीत तर तेव्हा या भाजणीत मूग , मटकी सुद्धा मिसळली जाते .
दिवाळीत या चकलीला मान , आणि नंतर कधी चकली बनवायला वेळ नाही मिळाला तर मस्त घाला या पीठाचे धपाटे किंवा खमंग थालीपीठे , हाय काय आणि नाय काय !
भाजणीचे साहित्य मंद आचेवरच कडकडीत होईपर्यंत भाजावे . कारण धान्यातील आर्द्रता निघून गेली तरच ते पीठ टिकते आणि याच्या चकल्या तळताना तेल व्यवस्थित जितके गरजेचे आहे तितकेच शोषले जाते .
हे साहित्य भाजताना किंवा नंतर त्याला पाण्याचा हात लागू देऊ नये . चक्कीतून दळून आणताना चक्कीवाल्याला किमान तीनदा बारीक दळावे असे बजावून सांगावे . जाडसर राहिली तर चकल्या बनवताना त्रास होतो . अगदीच चक्की जवळपास नसेल तर घरघंटी किंवा मिक्सरवर दळावी आणि चाळणीतून चाळून घ्यावी .
भाजणी एका हवाबंद डब्यात ठेवून कोरड्या स्वच्छ ( म्हणजे धुळीपासून दूर ) ठेवली तर ती वर्षभर सुद्धा टिकते !
पिठाची उकड :
चकलीचे पीठ मळताना काही जण त्याची उकड काढतात तर काही वरून गरम पाणी घालून मळतात . मला उकड काढणे हा माझ्यासाठी नेहमी अचूक मार्ग वाटतो म्हणून मी पिठाची उकड काढली आहे .
पीठ व पाणी यांचे समप्रमाण घ्यावे ( १:१ ) , पाणी जास्त झाले तर उकड चिकट होते आणि पाणी कमी झाले की उकड कोरडी पडते . मग अशा वेळेला ही बिघडलेली उकड सांधण्यासाठी नवीन थोडी उकड काढून त्यात मिसळून घेऊन घट्ट गोळा बनवून घ्यावा. पीठ घट्ट असेल तरच चकलीला छान काटे येतात .
भाजणीच्या पिठात तेलाचे मोहन घालताना प्रमाणात घालावे कारण मोहन बिघडले कि चकल्यांचे तुकडे पडतात . मी पिठाच्या वजनाच्या ५ ते ७ टक्के एवढेच मोहन घेते , म्हणजे २५० ग्राम पीठाला मी फक्त १ टेबलस्पून तेल घातले आहे – १५ ML .
उकड मळताना हाताला तेल वगैरे लावू नये , पीठावर तेलाचे आवरण येऊन चकल्या तेलात पसरु शकतात .
चकल्यांची तळणी:
तेल कढईत मध्यम आचेवर तापवून घ्यावे . तेल गरम होणे जरी आवश्यक असले तरी मोठ्या आचेवर तापवून त्यातून धूर निघू देऊ नये . चकल्या अशा तेलात हमखास करपतात . छोटा पिठाचा गोळा घालून तो पटकन वर आला की समजावे की तेल तापलंय .
मग अलगद चकल्या सोडाव्यात , आणि त्या तेलाच्या पृष्ठभागावर तरंगेपर्यंत त्यांना झारा लावू नये . त्यांचा आकार घट्ट झाला की मग त्या उलटाव्यात आणि मंद आचेवर आतपर्यंत शिजेपर्यंत तळून घ्याव्यात .
चकल्यांना तळायला वेळ लागतो ( किमान ४ ते ५ मिनिटे ) . जर घाई केली तर अर्धकच्च्या राहतात आणि काही वेळातच सांदळतात !
चकल्या जशा आतपर्यंत शिजल्या की तेलाचे बुडबुडे थोडे शांत होतात मग समजावे की त्या शिजल्या .
त्यांना टिश्यूपेपरवर काढून थंड कराव्या व लगेच हवाबंद डब्यात ठेवाव्यात . महिनाभर सुद्धा टिकतात , आता हा भाग वेगळा की त्या कुरकुरीत चकल्या लगेचच फस्त होतात !
जीवनातले सुखदुःखाचे चक्र दर्शवणारी ही चकली , आयुष्यात दुःखाचीही कितीही नागमोडी वळणे आली तरी अंततः सुखाची वाट दिसतेच असाच जणू कानमंत्र देते !
या दिवाळीला चकल्या नक्की बनवा आणि सगळ्यांची शाबासकी व पतिराजांकडून पाडव्याची लठ्ठ ओवाळणी घ्यायची सुवर्णसंधी सोडू नका !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- २ १/२ कप = ५०० ग्रॅम्स तांदूळ ( इंद्रायणी/ सुरती कोलम/ बासमती तुकडा ) शक्यतो जुना तांदूळ
- २ १/४ कप = २५० ग्रॅम्स साबुदाणे
- २ १/४ कप = २५० ग्रॅम्स चण्याची डाळ
- अर्धा कप = १२५ ग्रॅम्स उडीद डाळ
- अर्धा कप = १२५ ग्रॅम्स मूग डाळ
- १//४ कप = ३० ग्रॅम्स जिरे
- १/४ कप = २० ग्रॅम्स धणे
- चकलीची उकड :
- २ कप = २५० ग्रॅम्स चकलीचे भाजणी पीठ
- २ कप= ५०० ml पाणी
- १ टेबलस्पून पांढरे तीळ
- अर्धा टीस्पून हळद
- १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- १ टीस्पून मीठ किंवा चवीप्रमाणे
- मोहन घालण्यासाठी व चकल्या तळण्यासाठी तेल
- सर्वप्रथम तांदूळ व डाळी वेगवेगळ्या स्वच्छ धुऊन चाळणीत निथळत ठेवाव्यात . पाणी पूर्ण निघून गेले कि एका स्वच्छ कोरड्या कापडावर पसरवून पंख्याखाली रात्रभर वाळवून घ्यावयात . रात्रभर शक्य नसेल तर ४-५ तास पुरेसे आहेत .
- मग एका जाड बुडाच्या कढईत भाजणीचे सारे जिन्नस एका मागोमाग एक वेगवेगळे कडकडीत होईपर्यंत भाजून घ्यावेत . भाजताना आच मंदच ठेवावी . जिन्नसांचा रंग काळसर पडू देऊ नये किंवा मोठ्या आचेवर घाईने भाजून करपू देऊ नये .
- सारे भाजलेले जिन्नस एका परातीत काढून नैसर्गिकरित्या थंड होऊ द्यावे . थंड व्हायला पंख्याखाली ठेवू नये .
- थंड झालेली भाजणी चक्कीतून बारीक दळून आणावी , किंवा घरी मिक्सरमधून बारीक दळून चाळणीने चाळावी .
- चकलीची उकड काढण्याची कृती:
- भाजणीचे पीठ एका परातीत घ्यावे . त्यात १ टेबलस्पून कडकडीत गरम केलेल्या तेलाचे मोहन घालावे . झाऱ्याने किंवा चमच्याने पिठात नीट एकत्र करून घ्यावे. मग त्यात हळद, मिरची पूड, मीठ व तीळ घालून नीट एकत्र करावे .
- एका खोलगट पातेल्यात २ कप पाणी उकळत ठेवावे ( २ कप पिठासाठी २ कप पाणी , १:१ प्रमाण ) पाणी उकळले की आच मंद करून त्यात भाजणीचे पीठ वैरावे . पलित्याच्या टोकाने नीट ढवळून पाण्यात एकत्र करावे . जसजसे पाणी पिठाने पूर्ण शोषून घेतले की गॅस बंद करावा आणि ही उकड किमान अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावी .
- चकल्या पाडण्यासाठी :
- अर्ध्या तासानंतर उकड हलके गरम असतानाच हाताने किंवा हाताला उष्णता सोसत नसल्यास तांब्याच्या बुडाने मळून घ्यावी . हाताला तेल वगैरे लावून मळू नये . नाहीतर चकल्या तेलात फसतात . पीठ व्यवस्थित घट्ट मळून त्याचा गोळा बनवून घ्यावा . याचे लहान आकाराचे ( सोऱ्यात बसतील एवद्या आकाराचे ) लंबगोल बनवून घ्यावेत .
- एका बटर पेपरवर किंवा किचन वापराच्या प्लास्टिक शीट वर सोऱ्याने चकल्या पाडून घ्याव्यात . एकाच वेळी सगळ्या चकल्या पाडून घेऊ नयेत . नाहीतर तळेपर्यंत त्या कोरड्या पडतात .
- चकल्या तळण्यासाठी :
- कढईत मंद ते मध्यम आचेवर तेल तापवून घ्यावे . मोठ्या आचेवर तापवून तेलातून धूर निघेपर्यंत तेल तापू देऊ नये . तेल तापलेलं आहे हे पाहण्यासाठी त्यात पिठाचा एक लहान गोळा घालून पाहावा , जर तो तळून लगेच वर पृष्ठभागावर आला तर समजावे तेल तापले आहे .
- चकल्या तेलात सोडताना झाऱ्यावर घेऊन अलगद कडेने तेलात सोडाव्यात , आच मध्यमच ठेवावी . लगेचच त्यांना हलवू नये . त्यांचा आकार तेलात जरा घट्ट झाला व त्या तरंगून वर आल्या कि त्यांना झाऱ्याने बाजू फिरवून घ्यावी . आच मंद करावी आणि त्यांना दोन्ही बाजूंनी एकाच रंगावर तळून घ्यावे . जसे तेलाचे बुडबुडे थांबतील तसे समजावे की चकल्या आतपर्यंत शिजल्यात .
- चकल्या तळताना घाई केली तर त्या काही वेळाने सांदळतात आणि कुरकुरीत होत नाहीत !
- तळलेल्या चकल्या किचन टिश्यू पेपरवर काढून थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात ठेवल्या तर बरेच दिवस टिकतात .

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply