भारतीय रेस्टॉरंट खाद्यसंस्कृतीत अग्रगण्य म्हणजे पंजाबी क्विझिन , व्यक्ती कोणत्याही भागातून असली तरी रेस्टॉरंट मध्ये पंजाबी छोले भटुरे किंवा मटर पनीर किंवा बटर चिकन यातले एखादे ऑर्डर मध्ये असतेच असते !
तुम्हाला एक मज्जा सांगते , उडुपीला स्टॅन्डजवळच कर्नाटक खानपानासाठी प्रसिद्ध तसेच मल्टी क्विझिन हॉटेल आहे “Kediyur “- माझे आणि पार्टनरचे अत्यंत आवडते ! आम्ही दोघे आपले तिकडचे प्रसिद्ध खाणे पिणे ऑर्डर करण्यात बिझी आणि बाजूच्याच टेबलावर सत्तरीच्या घरात पोचलेले एक एव्हर यंग कपल बसलं होतं , आजींनी आपल्या तुळू मिश्रित हेलात दिमाखात ऑर्डर दिली , ” छोले भटुsss रे ” , त्यांच्याकडे पाहता पाहता माझी मुडे इडली बचकन पडली ना सांबारात … आजोबाही त्यांच्याकडे मिश्किल नजरेने पाहत वेटरला म्हणाले ,” मँगो लस्सी वन बाय टू “… कसले भारी वाटले मला सांगू ! याचे मुख्य कारण म्हणजे रेस्टोरंटमधल्या पंजाबी जेवणातला चमचमीतपणा , त्यातल्या मसाल्यांचा वापर आणि अगदी योग्य रीतीने बॅलन्स केलेल्या आंबट तिखट चवी , तसेच ग्रेव्हीला दाटपणा आणण्यासाठी दही किंवा क्रीम यांचा अचूक वापर !
दिवाळीच्या सणाची धामधूम चालू आहे , आणि उद्या आहे भाऊबीज ! घरोघरी पाहुण्या रावळ्यांची येजा असते , मग येणाऱ्या पाहुण्यांच्या मेजवानीसाठी पंजाबी दम आलू आणि पुरी किंवा लच्छे पराठे जर बनवता आले तर काय सोने पे सुहागा ना ! ऐन दिवाळीत पावसालाही जोर आहे आणि नवीन बटाटे देखील बाजारात मिळू लागलेत . चला तर बनवूया चमचमीत दम आलू !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १५-१८ = ४०० ग्रॅम्स बेबी पोटॅटो ( नाही मिळाले तर मोठे बटाटे ४ तुकडे करून घ्यावेत )
- पाऊण कप = १८० ग्रॅम्स दही
- ३ टेबलस्पून फ्रेश क्रीम
- मीठ चवीनुसार
- पाऊण कप = १५० ग्रॅम्स टोमॅटो प्युरी
- तेल
- २ मोठे कांदे = २०० ग्रॅम्स लांब चिरून
- १ इंच आल्याचा तुकडा
- ६-७ लसणाच्या पाकळ्या
- ५-६ बदाम
- ८-१० काजू
- १ टीस्पून हळद
- २ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- १ टीस्पून भाजलेली जीरा पावडर
- १ टेबलस्पून धणे पावडर
- १ टीस्पून गरम मसाला पावडर
- चुटकीभर वेलची पावडर
- पाव टीस्पून साखर
- अर्धा टीस्पून भाजलेली कसूरी मेथी पावडर
- २ तमालपत्र
- बटाटे स्वच्छ धुऊन साली काढून घ्याव्यात . बटाट्यांना काट्याने टोचे मारून घ्यावेत . एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. मंद ते मध्यम आचेवर बटाटे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत .
- नंतर त्याच कढईत आले ,लसूण , कांदा घालून परतून घ्यावा . कांदा चांगला खरपूस परतून झाल्यावर काजू आणि बदाम देखील परतून घ्यावेत.
- मसाला गॅसवरून उतरवून थंड करून घ्यावा . मग ३-४ टेबलस्पून पाणी घालून बारीक पेस्ट वाटून घ्यावी .
- एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात तमालपत्र , आणि वाटलेला मसाला घालून ३-४ मिनिटे परतून घ्यावा . टोमॅटो प्युरी घालून एकत्र करून घ्यावी . आत हळद, लाल मिरची पूड , धणे पावडर , गरम मसाला पावडर , जिरे पावडर, साखर आणि चवीनुसार मीठ घालावे . मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा .
- नंतर आच मंद करून किंवा गॅस बंद करून दही घालून घ्यावे . दही फेटलेले असावे . गॅस पेटवून मंद आचेवर दही मसाल्यात नीट एकत्र करून घ्यावे .
- मसाला नीट परतून घेतल्यावर त्यात तळलेले बटाटे घालून घ्यावेत. आता दीड कप गरम पाणी घालावे , दम आलू ही घट्ट ग्रेव्ही असते म्हणून जास्त पाणी घालून पातळ करू नये .
- \मध्यम आचेवर एक उकळी फुटल्यावर मंद आचेवर शिजू द्यावे .
- मग त्यात वेलची पावडर, कसूरी मेथी ( हातानेच चुरून ) घालावी . दम आलू तयार आहेत ,आता क्रीम घालूरंगास बंद करावा .
- क्रीमी , स्मूथ चमचमीत दम आलू तयार आहेत . पराठे , नान , पुरी किंवा जीरा भातासोबत वाढावेत .

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply