” You can’t make everyone happy , you are not Aloo Ka Parantha !” सकाळी सकाळी व्हाट्सअँप वर आलेल्या या फॉरवर्ड मुळे जाम हसले मी ! माहित नाही कोणाच्या सुपीक डोक्यातून हा भन्नाट विनोद आलाय , परंतु जे लिहिलेय ते एक वैश्विक सत्य ( युनिव्हर्सल ट्रूथ ) आहे !
दाक्षिणात्य इडली – डोसा ,महाराष्ट्राचा वडापाव , बंगालची मिठाई , हे पदार्थ जसे आपापल्या प्रदेशाचे सीमोल्लंघन करून देशातच नाही पार साता समुद्रापार पोचले तसेच उत्तर भारतीय पराठा याला अपवाद नाहीये !
भारताने विविध प्रकारचे ब्रेड म्हणजेच पोळी , चपाती , भाकरी ,पराठे जगाच्या खाद्यसंस्कृतीला दिले . हे भारतीयांच्या थाळीत मुख्य अन्न ( main course ) या श्रेणीत मोडणारे . … कर्बोदकांचा उच्च स्रोत असलेल्या गव्हाच्या पिठापासून बनलेले आणि त्यातून जर भरलेला पराठा असेल तर “वन डिश मिल ” म्हणून पोट भरणारा हा पराठा सगळ्यांचा आवडता !
आलू पराठा , गोभी पराठा , पनीर पराठा , मुली पराठा. हे या पराठा घराण्याचे मूळ पुरुष , मग येते ती त्यांची वंशावळ ! जसे आलू मेथी पराठा , किंवा गोभी चीज पराठा , अहो एवढेच काय मांसाहारी पराठे देखील यात मागे नाहीयेत . कीमा पराठा , अंडा पराठा आणि हल्लीच मी बटर चिकन पराठा खाल्लाय .. बटर चिकनचा धुन्गारी स्वाद आणि पराठ्याचा खुसखुशीतपणा दोन्ही एकदम ! म्हणूनच हे पराठे वन डिश मिल म्हटले जातात ते वावगे नाही !
आलू पराठा हा सर्वांचा खासमखास कारण पोर्तुगीजांनी भारताला दिलेली देणगी म्हणजे बटाटा , सगळ्यांच्या घरात आढळणारा , तसेच कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात हा पराठा पटकन होतो ! उत्तर प्रदेशातले रोटीप्रिय सासर माझे आणि माझ्या सारख्या भात व भाकरी खाऊ कोकण कन्येला सासरी कॉलर टाईट करण्यासाठी पराठ्याचं ज्ञान आत्मसात करणे भागच होते ! म्हणूनच आज तुमच्यासोबत मी आलू पराठ्यांची रेसिपी शेअर करणार आहे , थोडे वेगळ्या प्रकाराने , म्हणजे आपण बटाट्याचे सारण शिजवणार आहोत व पिठात थोडा मैदा मिसळणार आहोत . का ते जाण्यासाठी मी तुम्हाला विनंती करिन , खाली दिलेली व्हिडिओची लिंक नक्की पहा म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला पाहता येईल !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- २ कप्स= ३०० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
- पाव कप = ५० ग्रॅम्स मैदा
- १ टीस्पून मीठ
- तेल आवश्यकतेनुसार
- अर्धा किलो उकडलेले बटाटे
- १ लहान कांदा = ७० ग्रॅम्स बारीक चिरलेला
- अर्धा कप कोथिंबीर बारीक चिरलेली
- ७-८ लसणीच्या पाकळ्या
- ७-८ हिरव्या मिरच्या
- २ इंच आल्याचा तुकडा
- पाव टीस्पून हळद
- अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- पाव टीस्पून गरम मसाला पावडर
- दीड टीस्पून धणे पावडर
- १ टीस्पून भाजलेली जिरे पावडर
- अर्धा टीस्पून आमचूर पावडर
- मीठ चवीप्रमाणे
- पराठ्यांसाठी पीठ मळण्यासाठी एका परातीत गव्हाचे पीठ , मैदा , मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे . त्यात १ टेबलस्पून तेल घालून पिठात रगडून घ्यावे .
- १ कप पाणी थोडे थोडे घालून पीठ मळून घ्यावे. कणिक फार घट्ट किंवा सैल मळू नये . हाताला तेल लावून पीठ व्यवस्थित लवचिक होईपर्यंत तिंबून घ्यावे .
- पिठाचा गोळा एका मलमलच्या किंवा सुती ओलसर कापडाने झाकून काही वेळ बाजूला ठेवावे . आता बटाट्याचे सारण बनवून घेऊ . हिरव्या मिरच्या , आले आणि लसूण मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे . वाटताना पाणी घालू नये .
- आता उकडलेले बटाटे किसून घ्यावेत . कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा . आता हळद घालून १-२ मिनिटे परतून घ्यावा . त्यात हिरवा मसाला घालून २-३ मिनिटे परतून घ्यावा, त्यातच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि तेलात परतावी म्हणजे सारणाला छान सुगंध येतो .
- नंतर लाल मिरची पूड , गरम मसाला पावडर , धणे पावडर , जिरे पावडर घालावे . मसाला परतताना तो करपू नये म्हणून १-२ टेबलस्पून पाणी घालून परतावे .
- मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर चवीनुसार मीठ घालावे . मग त्यात किसलेले बटाटे , आमचूर पावडर, कोथिंबीर घालून एकत्र ढवळून घ्यावे . गॅस बंद करावा , आणि हे सारण पूर्ण थंड होऊ द्यावे .
- कणकेचे हव्या त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत . गोळ्याला पीठ लावून वाटीचा आकार द्यावा . त्यात बसेल एवढेच बटाट्याचे सारण भरून गोळ्याचे तोंड बंद करावे . या गोळ्याला पोळपाटावर हाताने हलकेच दाब देऊन चपटे करून सारण सगळीकडे पसरून घ्यावे . हलक्या हाताने पराठे जाडसर लाटून घ्यावेत .
- पराठे तव्यावर शेकताना दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस भाजावेत .

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply