मागे काही वर्षांपूर्वी कुटुंबासमवेत पाचगणी महाबळेश्वरला चाललो होतो . मी तेव्हा इन्फोसिस मध्ये नोकरीला होते आणि शिफ्टच्या जॉबमुळे कंपनीच्या कॅब ने येणे जाणे असायचे . असंच आमचे एक मावळचे कॅब वाले शिवाजी दादा आहेत , त्यांचीच कॅब प्रायव्हेटली बुक करून आम्ही पाचगणी महाबळेश्वर प्लॅन केले .
शिवाजी दादा म्हणजे उत्साहाचा धबधबा , बारीक एकशिंगी शरीरयष्टी , परंतु आवाज असला भारदस्त की रॉंग साईडने ओव्हरटेक करणारा ट्रक किंवा कट मारणार मोटारसायकल वाल बेणं यांच्या ‘भ’ काराने हासडल्या गेलेल्या शिवीनेच गर्भगळीत व्हायचे. दादांचा रस्त्याचा अभ्यास दांडगा ,तसेच कुठल्या हाटिलात चिकन चांगले ,कुठले मटण म्हंजी नुस्ता रब्बर तर कुठल्या हाटिलातल्या मावशींच्या हातची भाकर येक नंबर sssss ह्या सगळ्यांत त्यांची पी एच डी … पूर्ण रस्ताभर बाकी सगळे पेंगत असताना माझ्या आणि त्यांच्या तोंडाची टकळी चालुच होती . या ट्रिप बाबत आणि आमच्या शिवाजी दादूस बद्दल नक्की सांगेन कधीतरी .. आज ही रेसिपी टाकताना त्यांची खूप सय आली कारण ढाब्यावरच्या चिकन रस्श्याचा आस्वाद आम्ही आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी नेलेल्या हाटिलावरच ( हा त्यांचाच शबूद ) चाखला . अहो ढाबे फकस्त पंजाबीच नसतात वं ताई , आपले मऱ्हाटी लोकं बी हायेत की , हे शिवाजी दादांचेच उत्तर ! हायवेवरून कट मारून कच्च्या रस्त्यावरून गाडी ढूचुक ढूचुक नेत दुपारच्या जेवणासाठी आम्ही एका जागी पोचलो . माझ्याकडे ते फोटो सुद्धा आहेत , जुनी हार्ड डिस्क लावून हाटिलाचे नाव पण सांगितले असते , पण आज तसाही ब्लॉग टाकायला उशीर झालाय , म्हणून पुन्हा कधीतरी नक्कीच सविस्तर लिहीन ! आजूबाजूला सुनसान प्रदेश आणि गाडीचा धुरळा खाली बसतो न बसतोच तर बरेच ट्रक पार्क केलेलं पाहून सासूबाई माझ्याकडे आणि पार्टनर कडे चिंतीत नजरेने पाहू लागल्या .. मग मीही दादांना विचारले , ” दादा फॅमिलीसाठी ठीक ना ..” माझे वाक्य पुरे होते ना होतेय तोवर दादा माझ्या सासूबाईना ,” अवो ताई आप घबरनेका नई , में हैं ना ,, मेरा पैचान है ” ! सासूबाईंच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं पाहून मीही थोडी खुश झाले ..
लाल पिवळी लाकडी टेबले , पाण्याचे स्टीलचे जग आणि व्यवस्थित मांडलेली मोट्ठी ताटे , त्यात वाटी आणि छोटी परात वजा डीश ! आम्ही आई बाबांसाठी ब्रॉयलर चिकन थाळ्या मागवल्या , परंतु शिवाजी दादांच्या प्रेमळ आग्रहास्तव मी आणि पार्टनरने गावठी चिकन थाळी मागवली . तसे आमच्याकड़े म्हणजे माझ्या माहेरी बाबा फक्त आणि फक्त गावठी चिकनच आणायचा , ज्या दिवशी खायचेय त्या आधी काही दिवस बाजूच्या चाळीतलया चाळ मालकाला ( जो कुक्कुटपालन त्यांच्या चाळीच्या अंगणातच करायचा ) एखादा कोंबडा हेरून बुक करून ठेवायचा . फक्त हे चिकन महाग असूनही ढाब्यावर मिळते यांवर माझा विश्वास बसेना! परंतु हॉटेलच्या आवारात कॉक कॉक करत फिरणाऱ्या कोंबड्यांना आणि त्यांना झाकण्यासाठी रचून ठेवलेल्या टोपल्या पाहून खात्री पटली . हॉटेल छोटेखानी असल्या कारणाने स्वयंपाक करण्याची जागा सुद्धा नजरेच्या टप्प्यातच होती . एका चुलीवर मोठ्या जर्मनच्या पातेल्यात रस्सा खवळत होता तर दुसरीकडे दोन तीन मावश्या चटचट भाकऱ्या थापीत होत्या . त्यांची हिरव्याकंच चुड्याची होणारी किणकिण आणि भाकरी थापणारी निमुळती बोटे , डोळ्यांत माझ्या साठवून आहेत .
एका बाजूला वार्धक्याने पाठीला बाक आलेली आजी कपाळभर पदर घेऊन चिमट्याने चुलीच्या निखाऱ्यात काहीसे भाजत होती , मला नीट दिसेना म्हणून आजींना हाक मारून विचारले , आजी काय भाजताय .. दंताजींचे ठाणे उठलेल आपल तोंडाचे बोळकं पसरून आजी खुदुखुदू हसत म्हणाली , ” कांदे … वाटायला ” … अँग.. हे काय ? म्हणजे जरी माझ्या पिढीने बालपण , उन्हाळी सुट्ट्या गावात हुंदडून घालवल्या असल्या तरी कांदे चुलीच्या निखाऱ्यात का भाजायचे हे नाही कळले मला ! मग ते उत्तर मिळाले जेव्हा चुलीच्या धूनगाराचा खमंग सुवास उतरलेला चिकन रस्श्याच्या वाटीचा पहिला भुरका मारला ना तेव्हा ! अहाहा काय ती ताज्या मसाल्यांची चव , आणि गावठी चिकनचा चविष्ट स्टॉक , बाजूला दिलेले घट्ट मसाल्यात लपेटलेले चिकन ! अस्सा ताव मारलाय ना आणि एका मागोमाग येणारी गरम खरपूस बाजरीची भाकर . आमच्या तृप्त चेहर्यांकडे पाहत शिवाजी दादूस आपल्या मिशांवर ताव द्यायला विसरले नाही . त्या जेवणांनंतर मात्र गाडीत सगळ्यात पहिल्यांदा मीच घोरायला लागले .. 🙂
आत्ता तसेही नवरात्राची धामधूम संपलीय ,दसऱ्याच्या पुरणपोळ्या देखील गट्टम झाल्यात , आता खवय्यांच्या जिभेला वेध लागलते झणझणीत कोळंबी, चिकन ,मटणाच्या रश्श्याचे ! गावच्या चुलीवरच्या चमचमीत कोंबडी रश्श्याची चव घ्या आता आपल्या स्वयंपाकघरात !आता जरी चुलीवरचा स्वाद शहरी स्वयंपाकघरात नाही येणार असे जरी असले तरी आपल्या पारंपरिक , गावाकडच्या पाककृती थोड्या फार प्रयत्नाने बनवून पाहायला काय हरकत आहे , नाही का ? मातीच्या भांड्यात बनवलेले गावठी / गावरान कोंबडीचे सुकं आणि झणझणीत रस्सा ! ही रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल याची खात्री आमची !
खाली मी काही टिप्स दिल्या आहेत की मातीचे भांडे स्वयंपाकासाठी कसे तयार करावे, नक्की वाचा :
विकत आणल्यानंतर किमान २ तास ते जास्तीत जास्त २४ तास पाण्यात बुडवून ठेवावे . ज्यामुळे मातीची छिद्रे मोकळी होतात आणि त्यांची पाणी शोषण्याची क्षमता वाढते .म्हणूनच जेव्हा आपण त्यात अन्न शिजवतो तेव्हा भांड्यातील ओलसरपणा वाफेत परिवर्तित होऊन जेवण छान शिजते .
नंतर कापडाने पुसून तुम्ही अन्न शिजवण्यासाठी वापरू शकता .
ही भांडी वापरताना त्यांचे तापमान स्थिर राखणे गरजेचे असते . मोठया आचेवर जास्त वेळ या भांड्यात शिजवले आणि वाफ आत कोंडून राहिली तर ह्या भांड्याला तडा जातो . तसेच अति गरम भांडे कधी थंड जागी म्हणजे फ्रिजमध्ये किंवा किचन ओट्यावर ठेवू नये , तापमानात फरक झाल्याने त्याला भेगा पडतात .
या भांड्यांना साफ करताना नेहमीचा भांड्याचा साबण वापरावा आणि जास्त खरवडु नये . नरम चोथ्याचा वापर करावा.
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १२०० ग्रॅम्स गावठी कोंबडीचे चिकन, मध्यम आकाराचे तुकडे , साफ करून आणि स्वच्छ धुऊन
- १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स बारीक चिरून
- १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब चिरून
- २ टीस्पून हळद
- साडेतीन टेबलस्पून लाल मिरची पूड ( २ टेबलस्पून काश्मिरी आणि दीड टेबलस्पून तिखट मिरची पूड )
- मीठ चवीप्रमाणे
- तेल
- वाटणासाठी :
- २ मोठे कांदे = २०० ग्रॅम्स
- १ कप कोथिंबीर
- १ टेबलस्पून पांढरे तीळ
- १ टेबलस्पून जिरे
- १५ -१६ लसूण पाकळ्या
- दीड इंच आल्याचा तुकडा
- दीड कप = १२५ ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- ताजा गरम मसाला वाटण्यासाठी :
- पाव टीस्पून लवंग
- १ तमालपत्र
- अर्धा टीस्पून शाही जिरे
- १ टीस्पून धणे
- १ जावित्रीची पाकळी
- पाव टीस्पून हिरव्या वेलच्या
- पाव टीस्पून काळी मिरे
- चिकनच्या तुकड्यांना हळद आणि मीठ चोळून ३० मिनिटे बाजूला ठेवावे.
- ताजा गरम मसाला कुटण्यासाठी वर गरम मसाल्याच्या साहित्यात दिलेले सारे मसाले एकत्र एका तव्यात हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावेत . एका ताटलीत वेगळे काढून घ्यावेत .
- आता वाटणासाठी एका पॅनमध्ये जिरे घालून १-२ मिनिटे खरपूस भाजून घ्यावे . नंतर तीळ घालून चांगले तडतडेपर्यंत खरपूस भाजावेत . नंतर सुके खोबरे अगदी करड्या रंगावर खरपूस भाजावे . हे सगळे एका ताटात काढून घ्यावे .
- २ मोठे कांदे डायरेक्ट गॅसच्या जाळावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत . एका रोटी स्टॅन्ड वर ठेवून खरपूस भाजून घ्यावेत . पूर्ण थंड करून घ्यावेत . त्यांच्या साली काढून सुरीने ४ तुकडे करावेत आणि मिक्सरच्या भांड्यात घालावेत . कांदा चुकुन ही धुऊ नये , वाटल्यास कापडाने काळसर भाग पुसून घ्यावा . मिक्सरच्या भांड्यात भाजलेले खोबरे , तीळ , जिरे ,आले लसूण , कोथिंबीर व पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
- एका कढईत ४ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात बारीक चिरलेला कांदा घालून करडा होईपर्यंत परतून घ्यावा . नंतर त्यात चिकनचे तुकडे घालून २-३ मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्यावेत . नंतर ५ कप गरम पाणी घालून आच मंद करून झाकण घालून शिजू द्यावे .
- साधारण ३५ मिनिटे चिकन शिजवल्यावर , चिकनचे मांसल तुकडे सुक्क्यासाठी वेगळे काढून घ्यावेत आणि काही तुकडे रस्श्यातच राहू द्यावेत . त्यात दीड टेबलस्पून लाल मिरची पूड , २ टीस्पून गरम मसाला , आणि एक तृतीयांश भाग मसाल्याचे वाटण रश्श्यात घालावे . मीठ चवीप्रमाणे घालावे . मंद आचेवर ७-८ मिनिटे शिजू द्यावे . चिकन रस्सा तयार आहे , गॅस बंद करून झाकून ठेवावे .
- चिकन सुक्क बनवण्यासाठी एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात लांब चिरलेला कांदा घालून साधारण गुलाबी होईपर्यंत परतावा. त्यात उरलेली लाल मिरची पूड, उरलेला गरम मसाला पावडर , उरलेले वाटण आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर . घालून एकत्र करून घ्यावी . मसाला नीट मंद आचेवर शिजवून घ्यावा .
- मसाला शिजला की त्यात चिकनचे तुकडे घालून एकत्र करावेत . त्यात दीड कप गरम पाणी घालावे . मंद आचेवर शिजु द्यावे.
- ७-८ मिनिटे शिजवल्यावर चवीप्रमाणे मीठ घालावे . गॅस बंद करावा , चिकन सुकं तयार आहे .
- गावरान चिकन रस्सा आणि सुक्क भाकरी व भातासोबत वाढावे !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply