स्वयंपाकासाठी मातीचे भांडे वापरणे ही परंपरा आपल्यासाठी काही नवीन नाही . अगदी पुराणकाळापासून धातूचा शोध लागेपर्यंत मातीच्या भांड्यांत चुलीवर रांधणं ही एक कलाच जणू! आजही खेडोपाडी खापरावर पोळ्या , मोठ्या गाडग्यात मटणाचे रस्से बनवले जातात . चुलीवर कमी लाकडांच्या मंद जाळात हळूहळू शिजणाऱ्या त्या अन्नात सगळे रस इतके बेमालूमपणे उतरतात आणि त्यातच मिसळतो त्या मातीच्या गाडग्याचा सुगंध !
माझ्या आईच्या मावशीचे कुटुंब कोकणात आंजर्ल्याजवळ वेळवी म्हणून एका छोट्या गावात वास्तव्यास आहे. हे गाव छोटेसे , उंच कातळावर मावशी आजीचे कौलारू घर .. समोरच वीसेक पावलांवर आदिवासींचा पाडा , ज्यांना मावशीआजीनेच आपल्या जमिनीवर घरे बांधायला मुभा दिली आणि जरा अर्ध्याएक किलोमीटरवर लोहार , कुंभार अशा बलुतेदारांची वस्ती ! १९९३-९४ चा काळ , अजूनही गावात विजेचे दिवे पोचले नव्हते … संध्याकाळी सूर्यास्तानंतर घासलेटचे कंदील , पणत्या यांच्या मिणमिणत्या प्रकाशात घर उजळून निघायचे ! या मावशी आजीच्या घरी उन्हाळी सुट्टीत मी कित्येकदा गेलीये . हा जो अनुभव होता ना तो आयुष्याला पुरणारा , कधीतरी सविस्तर लिहीनच .. माझी आजी आणि मावशी आजी संध्याकाळी लवकर स्वयंपाकाला लागायच्या आणि साडेसातच्या आत सगळा स्वयंपाक तयार ! आम्ही पोरेसोरे बाहेरच मामाच्या दृष्टीपथात राहू इतक्या जवळ घरापाशीच खेळत असायचो. मागील दारी असलेल्या स्वयंपाकघरातून मातीच्या भांड्यात शिजणाऱ्या पदार्थाचा सुगंध असा अलगद वाऱ्यावर हेलकावे खात आमच्या नाकापाशी दरवळला की आमच्या पैजा लागायच्या की आज भरली वांगी आहेत की पारूने ( आदिवासी पाड्यातील महिला ) जंगलातून आणलेल्या ओल्या काजूची आमटी की मामाने नदीतून पकडून आणलेल्या ताज्या खेकड्यांचे घट्ट बरबाट ( भंडारी बोलीभाषेतील शब्द , अर्थ : मसालेदार रस्सा ) !
मग उड्या मारतच लाडाने आज्यांच्या गळ्यात पडत ” आज्जी काय बनवलस ग ” विचारात जेवायला बसायचो , आणि अवघ्या सोळा सतरा वर्षातली परकर पोलक्यातली मनीषा मावशी हसत हसत गरमगरम भाकऱ्या बडवायला घ्यायची !
बाजारात , जत्रेत ही मातीची भांडी पाहिली ना की मन गलबलून येते मावशीआजीच्या आठवणीने , आता नाही राहिली ती , पण आठवणीत राहिली , कौतुकाने जेव्हा हसायची ना तेव्हा तिच्या सावळ्या उजव्या गालावरचा ,एरवी चपटा असलेला चामखीळ अगदी उठून दिसायचा !
मला मातीच्या भांड्यांचे फार आकर्षण , आईने मला लोणच्यासाठी व दह्यासाठी चिनीमातीच्या बरण्या दिल्यात , परंतु भीमथडी जत्रेत दरवर्षी मी एक तरी मातीचे भांडे घेतेच , दह्यासाठी , बिर्याणीसाठी आणि चिकन मटणाच्या रस्श्यासाठी ! थोडी सांभाळून मात्र वापरावी लागतात हां ही भांडी , मी एकदा बिर्याणीचा घाट घातला , बिर्याणी दम वर ठेवताना घट्ट बंद केली हंडी आणि गेला ना हो तडा बंद वाफेने ! अर्धकच्च्या बिर्याणीकडे हताश नजरेने पाहत शेवटी मॅग्गी खाल्ली ! म्हणून सांगते चांगल्या कुंभाराकडूनच मातीची भांडी विकत घ्या !
त्यानंतर थोडे दिवस मी जरा नवीन प्रयत्न करायची हिम्मत केली नाही पण एकदा पार्टनरच्या ऑफिस मधल्या लोकांना लंच साठी बोलावले होते त्यावेळी मी पहिल्यांदा माझ्या नवीन हंडीचे उदघाटन केले आणि बनवले होते चिकन हंडी , आवडले सगळ्यांना खूप .. म्हणून आज तुमच्यासोबत ही चिकन हंडीची रेसिपी शेयर करतेय …
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १ किलो चिकन ( मध्यम आकाराचे तुकडे करून )
- २ मोठे कांदे , लांब चिरून = २५० ग्रॅम्स
- २ मोठे टोमॅटोची प्युरी = २५० ग्रॅम्स
- २०० ग्रॅम्स दही
- तेल
- मीठ
- ३ तमालपत्र
- २ टीस्पून जिरे
- ४ हिरव्या वेलच्या
- १ टीस्पून काळी मिरे
- ३ मसाला वेलच्या
- अर्धा टीस्पून लवंग
- दीड इंच दालचिनीचा तुकडा
- १ टेबलस्पून काश्मिरी मिरची पूड
- अर्धा टीस्पून हळद
- १ लिंबाचा रस
- अर्धा टीस्पून कसूरी मेथी भाजून पावडर केलेली
- २ टेबलस्पून धणे पावडर
- २-३ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
- पाव कप कोथिंबीर
- स्वच्छ धुतलेल्या चिकनच्या तुकड्यांना १ टीस्पून मीठ , अर्धा टीस्पून हळद , लिंबाचा रस चोळून लावावा. चिकन असेच झाकून अर्धा तास मुरत ठेवावे .
- खडे गरम मसाले भाजून घेऊ . एका तव्यात तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, काळी मिरे , मसाला वेलच्या , हिरव्या वेलच्या , जिरे आणि लवंग घालून मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावेत . थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून पावडर करून घ्यावी .
- चिकनच्या दुसऱ्या मॅरिनेशनसाठी चिकनवर ही गरम मसाला पावडर, लाल मिरची पूड, धणे पावडर, आणि दही घालावे व नीट एकत्र करून घ्यावे. चिकन झाकून या मॅरिनेशनमध्ये १ तास फ्रिजमध्ये ठेवावे.
- १ तासानंतर चिकन बनवण्यास सुरुवात करू . एका मातीच्या हंडीत ४-५ टेबलस्पून तेल गरम करून त्यात कांदा घालावा. हा कांदा चांगले परतून घ्यावा .
- कांदा खरपूस परतला की त्यात आले लसणाची पेस्ट घालावी . तिचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यावी . थोडी कोथिंबीर घालावी आणि मॅरीनेट केलेले चिकन घालून मोठ्या आचेवर परतून घ्यावे .
- ५ मिनिटे परतून घेतल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी घालावी . चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे .
- दहा मिनिटांत एकदा चिकन वर खाली करून घ्यावे . आपण या रेसिपीत पाणी वरून घातले नाहो आहे , चिकनच्या अंगच्या पाण्यातच परत झाकण घालून ते शिजू द्यावे .
- पूर्ण २५ मिनिटांत चिकन शिजले आहे . जर रस्सा घट्ट हवा असेल तर झाकण काढून चिकन थोडा वेळ शिजवून जास्तीचे पाणी सुकू द्यावे . आता यात भाजलेली कसूरी मेथी पावडर घालून मिसळून घ्यावी . गॅस बंद करावा .
- एका बाजूला १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी करून घ्यावी . हे फोडणी चिकन रश्श्यात मिळसळावी , वरून कोथिंबीर घालावी . झाली चिकन हंडी तयार! फुलके , पोळ्या, नान, लच्छा परोठा किंवा वाफेवरच्या भातासोबत वाढावे .

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply