आपण सर्वांनाच झटपट होणारे नूडल्स , फ्राईड राईस हा नाश्ता अत्यंत आवडता ! रस्त्यावर गाड्यांवर मिळणाऱ्या चायनीज पासून ते फाईव्ह स्टार हॉटेलातल्या मिड नाइट मिल पर्यंत नूडल्स ऑर्डर करायचा मोह क्वचितच कोणाला आवारत असेल !मागे मी हक्का नूडल्सची रेसिपी शेअर केली होती , त्या रेसिपीच्या प्रतिसादाला पाहूनच आज म्हटले चाऊमीन ची रेसिपी शेअर करूया .
यामागे एक कारण म्हणजे रस्तोरस्ती लागणाऱ्या चाउमीन च्या गाड्यांवर उभ्या असलेल्या गर्दी कडे पाहताक्षणीच लक्षात येते की किती प्रसिदध आहे ही डिश आणि दुसरे म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात असा गैरसमज आहे की हक्का नूडल्स आणि चाऊमीन हे सारखेच असते !
दोन्ही पदार्थांमध्ये नूडल्स हा घटक सारखाच असला तरी , चाऊमीन मध्ये जरासे बारीक आकाराचे पातळ नूडल्स वापरले जातात . हक्का नूडल्स हा हक्का क्विझिन चा भाग तर चाऊमीन तैशान संस्कृतीचा , दोन्ही चायनीजच ! परंतु शिजवण्याच्या पद्धतींमध्ये थोडा बदल! हक्का नूडल्स मध्ये कमी मसाले , भाज्या , मीट वापरले जाते तर चावुमीन तितकेच चटपटीत चायनीज सॊसेस वापरून , थोड्या जास्त रंगीबेरंगी भाज्या वापरून बनवण्याकडे कल असतो ! ” Chow ” म्हणजे ” stir – fry ” आणि ” Mein ” म्हणजे ” Noodles ” !
कधी एकदम साग्रसंगीत स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला तर नेहमी नेहमी गाड्यांवर जाऊन चायनीज खाण्यापेक्षा घरातच हे चाऊमीन पटकन बनवता येते , आणि अगदी आपल्या आवडीच्या भाज्या घालून ! म्हणूनच घ्या पटकन ही रेसिपी , इतकी चविष्ट चाऊमीन बनेपर्यंत घरात कोणाचाच दम निघणार नाही !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
- १५० ग्रॅम्स नुडल्स ( ड्राईड ) - चिंग्ज ब्रँड चे मी वापरले आहेत , बाजारात वेगळे बारीक जाडीचे चाऊमीन नूडल्स मिळाले ते वापरले तर उत्तम
- १ लहान कांदा लांब चिरलेला ( ६० ग्रॅम्स )
- पाऊण कप = ७० ग्रॅम्स कोबी लांब चिरलेला
- १ कप = १०० ग्रॅम्स तीन रंगाची भोपळी मिरची लांब चिरून
- अर्धा कप = ५० ग्रॅम्स गाजर लांब पातळ चिरलेला
- अर्धा कप हिरव्या पातीचा कांदा बारीक गोल चिरून
- ५-६ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
- अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून
- २ टीस्पून सोया सॉस
- २ टीस्पून रेड चिल्ली सॉस
- २ टीस्पून ग्रीन चिली सॉस
- १ मॅग्गी सिजनिंग क्यूब /अजिनोमोटो अर्धा टीस्पून
- अर्धा टीस्पून पांढरी मिरी पावडर /काळी मिरी पावडर
- २ टीस्पून व्हिनेगर
- मीठ १ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
- तेल
- नूडल्स शिजवण्यासाठी एका कढईत १० कप ( अडीच लिटर ) पाणी उकळत ठेवावे . पाण्याला दणकून उकळी आली कि त्यात अर्धा टीस्पून मीठ घालावे म्हणजे चाऊमीन मध्ये नूडल्स फिके लागणार नाहीत . नूडल्स पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगेपर्यंत शिजवावेत . त्यानंतर फोर्क च्या साहाय्याने त्यांना सुटे करावेत . अजून ३ मिनिटे शिजू द्यावे म्हणजे ते al-dente शिजतात , दाताखाली चावायला लागतील इतकेच शिजतात . या उप्पर शिजवले तर चाऊमीन चिकट बनते . गॅस बंद करून हे नूडल्स थंड पाण्याखाली स्वच्छ धुऊन घ्यावेत म्हणजे त्यांचा स्टार्च धुऊन निघतो आणि ते मोकळे मोकळे राहतात , चिकट राहत नाहीत .
- नूडल्स एका ताटलीत पसरवून ठेवावेत , त्यावर १ टीस्पून तेल घालावे म्हणजे ते सुटे सुटे राहतात . पूर्ण थंड होऊ द्यावेत . नूडल्स थंड झाल्यावर त्यात सोया सॉस घालून नीट एकत्र लावून घ्यावा .
- एका जाड बुडाच्या लोखंडी कढईत ३ टेबलस्पून तेल तापवून घ्यावे . आच मोठी ठेवावी . तेलात आले आणि लसूण घालून ३० -४० सेकंद चांगले परतून घ्यावे . नंतर कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा . कांदा मऊ झाला कि त्यात साऱ्या भाज्या म्हणजेच गाजर , कोबी, भोपळी मिरची आणि . .अर्धा पातीचा कांदा घालून भाज्या २- ३ मिनिटे परतून शिजवाव्यात . फार मऊ होऊ देऊ नयेत .
- २ मिनिटे भाज्या शिजवल्यास त्यात अर्धा टीस्पून मीठ आणि सॉसेस - रेड चिली व ग्रीन चिल्ली सॉस घालून मिक्स करून घ्यावेत .
- ३० सेकंदानंतर नूडल्स , पांढरी मिरी पावडर व मॅग्गी सिजनिंग क्युबची पावडर घालून फोर्क च्या साह्याने नूडल्स मिक्स करून घ्यावेत.
- विनेगर घालून मिसळावे व गॅस बंद करावा . व्हेज चाऊमीन तयार !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply