बऱ्याच दिवसांपासून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्याचे मनात होते . शेवटी काल माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तो योग आला . आदल्या दिवशी मी एका फेसबुक ग्रुप वरून त्या ठिकाणी असलेल्या फूड जॉईंट विषयी माहिती गोळा करून ठेवली होतीच !
सकाळी सकाळी घरातून जरा लवकरच बाहेर पडलो ! खरतर मला आणि पार्टनरला दोघांनाही हा दिवस ” एक उनाड दिवस “ असाच व्यतीत करायचा होता , म्हणून कोणतीही घाई गडबड न करता , वेळेचे बंधन नसल्यामुळे मुद्दामच रिक्षा किंवा कॅब न घेता आम्ही मनपा ची बस पकडली . गच्च भरलेल्या बसमध्ये ब्रेकचे , माणसांचे धक्के खातानाही आज आपण मनसोक्त भटकंती करणार याचिच एक्ससाईटमेन्ट जास्त होती !
मनपाला उतरल्यावर रिक्षा वाल्यांच्या हाकाऱ्यांकडे दुर्लक्ष करतच आम्ही चालत निघालो. नशिबाने इतके छान कुंद वातावरण होते की कोणतयाही क्षणी धारा कोसळतील असे वाटत होते .
रमतगमत शनिवारवाड्याशी पोचलो तर कडक चहाचा सुगंध नाकाशी दरवळला… !चहाला नाही म्हणणे ही आम्हा दोघांच्या दृष्टीने अक्षम्य चूक , म्हणूनच “कडक स्पेशल “ मध्ये मसाला चहाचे घोट घेतले . तेथल्या पुणेरी पाट्या जितक्या मजेशीर तितक्याच वचक बसवणाऱ्या , थोडे घाबरतच त्यांच्या माणसांना विचारले की फोटो काढला तर चालेल ना? चक्क हसून हो म्हणाले 😂
मग स्वारी आमची पुढे कसबा गणपतीचे दर्शन घेत , गल्लीबोळातून हिंडत दगडूशेठला हजर झाली, छान पैकी दर्शन झाले आणि मागच्या बाजूने बाहेर आलो. प्लॅन आमचा आरोग्य भुवन, श्रीकृष्ण भुवन किंवा अगत्यला जायचे होता !
पण सगळे काही प्लॅन करून होईल ती भ्रमंती कसली? वाटेत “लंबोदर स्नॅक्स” मध्ये लोणी स्पंज डोसाचा बोर्ड पाहिल्यावर पार्टनर माझे डोसा प्रेम जाणता, तिथे घेऊन गेला आम्ही एकाच ठिकाणी पोट भरून घेण्यापेक्षा फक्त एकच लोणी स्पंज डोसा मागवला आणि तो निर्णय अगदी योग्य ठरला !
तीन मऊ लुसलुशीत डोसे आणि नारळाची चटणी व थोडे चटणीसदृश तिखट सांबार ! मी उडुपीला असताना बऱ्याचदा बेनी डोसा खाल्ला आहे ,ती चव चांगली लक्षात आहे माझ्या ! हे डोसे चांगले होते , परंतु थोडे त्यावरचे बाजारचे बटर वासाळलेले वाटले मला ! सांबार छान चव होती , नारळाची चटणी पाणीदार , नसती दिली तरी चालली असती 😂
थोडे उदरभरण झाल्यावर तुळशीबागेत इकडे तिकडे उगाच हिंडत आम्ही श्रीकृष्ण भुवनला जाऊन” मिसळ खायचे ठरवले . तुळशीबागेत व्यापारी आपली दुकाने लावण्यात व्यग्र होते आणि मी उगाचच याचा भाव किती त्याचा किती, हे दोन्ही मिळून ५० ला देणार का असे प्रश्न विचारून त्यांचा आणि स्वतःचा असा टाईमपास करून घेत होते. पार्टनर मात्र एखाद्या वाटाड्यासारखा पुढे शिस्तीत चालत हॉटेल शोधत होता. मधेच मी कुठे रेंगाळले की तोंडाने त्रासिक चकचक आवाज करत मला हाळी देत होता ! आले बाई एकदाचे “श्रीकृष्ण भुवन “ -सुंदर छोटेखानी , नीटनेटके हॉटेल. .. आम्ही मिसळ आणि गोल कांदा भजी ऑर्डर केली. २ मिनिटांत डिश हजर …भजी चवीला छान होती , मिसळ हे एक सरप्राईझ होते. लाल तर्री आलेला कट परंतु जास्त तिखट नाही , मिसळीमध्ये पोहे, उकडलेले बटाटे , शेंगदाणे आणि शेवेचा समावेश होता ! आमचा कल थोडा तिखट खाण्याकडे , कोल्हापुरी मिसळ आणि मिश्र कडधान्यांची, रत्नागिरीकडची मिसळ यांच्यावर जास्त प्रेम ! परंतु ही मिसळ छान चव देऊन गेली , एक वेगळाच अनुभव !
आता मात्र पोटोबा भरला होता , चालत चालत “कावरे आईस्क्रीम”चा बोर्ड मी हेरला होताच , म्हटले जरा मिसळ जिरवून मग आईस्क्रीमवर ताव मारू !
शाळेतल्या उनाडक्या करणाऱ्या पोरांसारखे फिरत “महात्मा फुले मंडई” च्या रस्त्यावर कधी पोचलो कळलंच नाही ! मला ही मंडई पाहिल्यावर मुंबईच्या आठवणी प्रखरतेने जाग्या झाल्या ! दादरला महिन्यातून कितीतरीवेळा आईबरोबर मंडईला चकरा व्हायच्या ! भाज्या, फळे, कडधान्ये यांची खरेदी , खूप मजा वाटायची ! माझे एक फेसबुक मित्र आहेत अजिंक्य शेंडे ! ते स्वतः उत्तम शेफ असून , यांचे स्वतःचे खारघर मुंबई येथे “स्वामी मिसळ आणि वडापाव सेंटर” आहे . अजिंक्य भाऊनीं काही दिवसांपूर्वी फेसबुकवर कैरीच्या लोणच्याची रेसिपी टाकली होती , त्यात त्यांनी गुजरातच्या लाडवा कैऱ्यांची माहिती दिली होती! त्या लाडवा कैऱ्या मिळाल्या मला मंडईत , १ किलो घेतल्या , संध्याकाळी घरी गेल्यावर लोणचे घालीन! एक शेवळा रानभाजीचा प्रकार आहे , ते शोधत होते पण नाही मिळाले.. असो ! एवढे गरागरा फिरल्यावर घशाला कोरड पडली आणि सरबत पिण्याचा मोह आवरला नाही , वाळा सरबत आणि जांभूळ सरबत रिचवल्यावर लक्षात आले हात्तिच्या कावरेंना भेट द्यायची होती ना! 🙊
नंतर थोडे फार गुलकंद, कुळथाची पिठी , सब्जा, तुळस बी ( तुळस बी चे महत्तव साक्षात बेडेकर गृहोद्योग समूहाचे तरुण वंशज खुद्द आमोद बेडेकर यांच्याकडून कळले होते ) , अशी काहीशी खरेदी करत ,सगळ्यात आवडते काम म्हणजे पुस्तक खरेदी करण्यासाठी “रसिक साहित्य प्रा. लि.” या दुकानाला भेट दिली . दुकानात मी आणि पार्टनर आपण सोबत आहोत हे विसरून त्या नव्या कोऱ्या पुस्तकांच्या दुनियेत थोडा वेळ का होईना गुंग होऊन गेलो.. अचानक घड्याळाच्या इशाऱ्याने भानावर येत , पटकन बिल करून आम्ही निघालो “ दुर्वांकुर डायनिंग हॉल “च्या दिशेने ! अर्धा एक किलोमीटर चालून गेल्यावर पाऊस सुरु झाला …मग खाकी कागदाच्या पिशवीतली पुस्तके भिजू नयेत म्हणून एका जागी आडॊशाला थांबलो , छत्रीने अगोदरच आपली एक कांडी मोडली असून असहकार पुकारला होताच !
पण म्हणतात ना आज सारी कायनात आमच्या सोबतीला होती ! जिथे थांबलो होतो तिथे “ पादाभ्यंग “ म्हणून काशाच्या वाटीने पायाचा मसाज करणारे केंद्र होते . शिरलो आत आणि तिकडच्या मॅडमनी आयुर्वेदिक महत्त्व सांगत छान साजूक तुपाने मालिश करायचा सल्ला दिला ! दहा मिनिटे अगदी पॉवर नॅप च घेतली मी!
त्यानंतर जोशात चालत आम्ही एकदाचे दुर्वांकूरला पोचलो! आठवड्याचा मधला दिवस असूनही गर्दी होती , पटकन टेबल पकडून थाळी वाढण्याची वाट पाहत बसलो . कालचा मेनू होता- आंबरस , वेलची श्रीखंड , मूग भजी , पापड, काकडी कोशिंबीर, खिचडी, थालिपीठ, भाकरी, पोळी , मटार पनीर , बटाट्याची सुकी भाजी, मटकी उसळ , आणि वरणभात ! मला जेवण प्रचंड आवडले,, स्पेशली विविध चटण्या – लसूण/ कारळे / शेंगदाणा अगदी स्वादिष्ट होत्या आणि गरम भातावर वाढलेले वरण व त्यावर साजूक तुपाची धार .. एकच शब्द “स्वर्गसुख”! पोळ्या तर इतक्या मऊसूत होत्या की पार्टनरने आडवा हातच मारला !
आंबरस हा अगदी घरी बनवल्या सारखा , घट्ट, आणि मधुर ! एकंदरीत उत्तम महाराष्ट्रीयन थाळी आणि उत्कृष्ट सर्विस ! परत नक्की जाईन ..
दिवस सार्थकी लागल्याचे समाधान उराशी बाळगत, रिमझिम बरसणाऱ्या धारा अंगावर झेलत आणि जडावलेल्या डोळ्यांची झापडे सावरत , परतीच्या प्रवासासाठी रिक्षाला हात दाखवला !
Leave a Reply