स्थळ : कामत कॅफे , मणिपाल,कर्नाटक
वेळ: संध्याकाळचा ५ चा सुमार
आमच्या पोस्ट ग्रॅजुएशनचे प्रॅक्टिकल्स अचानक रद्द झाल्याने बराच मोकळा वेळ मिळाला होता. अजूनही बीएचएम ( बॅचलर ऑफ मॅनेजमेंट ) चे वर्ग चालू असल्याने , कॅफेत गर्दी कमी होती .खिदळतच आमचा ग्रुप कॅफेत शिरला आणि स्वयंसेवकाप्रमाणे दोन टेबलं एकत्र जोडून आमची वानरसेना स्थिरावली .
गल्ल्यावर बसलेला अण्णा आमच्या या नेहमीच्या हालचालींना सरावलेला , गालात हसून त्याने आमच्या डोक्यावरचा फॅन फुल्ल स्पीड मध्ये लावला आणि हात उंचावून आपल्या पोऱ्याला आमची ऑर्डर घ्यायला पिटाळले ! आमच्या मित्रमैत्रिणींचा गलबलयातच वेटर ऑर्डर लिहून घेत होता , मणिपालच्या उष्ण दमट वातावरणात सगळ्यांच्या, फ्रेश लाईम सोडा आणि चायनीज च्या ऑर्डरी सुटल्या ! सगळ्यांच्या ऑर्डरी लिहिल्यावर मी वेटरला म्हटले ” अण्णा मेरे लिये एक कड्डक अदरकवाली चाय और ग्रीन चटनी सँडविच , एक्सट्रा स्पायसी !” इतका वेळ दंगा मस्ती करणारा माझा ग्रुप क्षणभर शांत बसला आणि परत नॉर्मल झाला , त्यांच्यासाठी माझे तिन्ही त्रिकाळ चहा प्रेम आणि एक्सट्रा स्पायसीचा हेका नवीन नव्हता . परंतु वेटर मात्र नवीन होता , ” काय पण येडबंबू आहे , एवढ्या उन्हाळ्यात चहा आणि चटणी सँडविच मागतेय ” अशा अविर्भावात माझ्याकडे पाहत असतानाच , गल्ल्यावरचा अण्णा आपल्या तुळुमिश्रित हिंदीत बोलला ,” पूना कि दीदी का ऑर्डर है बोल देना अंदर , उनको पता हाई !” हिरवी तिखट चटणी लावलेले ताज्या ब्रेडचे सँडविच आणि आल्याचा वाफाळलेला चहा , हे एकदा घेतले की माझा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. जिभेवर राहणारा तो कोथिंबीर-पुदिन्याचा स्वाद मला प्रचंड आवडतो. हे जे चटणी सँडविच आहे ह्याचे श्रेय खरंतर आपल्या भारतीय आयांना जाते . नव्वदच्या दशकात बालपण व्यतीत करणाऱ्या माझ्यासारख्यांना रस्त्यावरच्या किंवा ,आजी जसे कुत्सिततेने म्हणायची – हाटीलातील खाणे , हे वारंवार मिळणे तसे दुरापास्तच! थोडे फार पॉकेटमनी वाचवून , वडापाव, पाणीपुरी हे स्वस्त आणि मस्त ऑपशन्स दिमतीला होतेच! त्याउप्पर आमची मजल कधीच गेली नाही.
सँडविच हा प्रकार नव्याने ग्लोबल खाद्यसंस्कृतीतून भारतात रुजू होत पाहत होता. ब्रेड बटर , ब्रेड जॅम यांखेरीज आमच्या आया ब्रेडमध्ये निरनिराळे प्रयोग करून आपापली क्रीएटिव्हिटीची हौस भागवून घेत होत्या . त्यातच हे चटणी सँडविच म्हणजे शाळेतल्या एक दिवसीय सहलीसाठीचा हमखास डब्यातला खाऊ! आंबट , थोडीशी कमी तिखट हिरवीगार चटणी लावलेल्या त्या ब्रेडच्या कडा पाहूनच आमच्या जिभा खवळायच्या . सहलीमध्ये एका रांगेत बसून तो सहभोजनाचा आनंद अवर्णनीयच ! असे हे छोटे छोटे प्रसंग परंतु खाद्यपदार्थांमुळे स्मरणात अगदी एखाद्या चित्रासारखे उमटलेत !
तर असे हे चटणी सँडविच , बनवण्यास अगदी सोप्पे आणि पार्टीमध्ये एक मस्त फिंगर फूड . घरी बनवलेले मेयॉनीज ( बाजारचे नाही ) घालून तुम्ही ते अजून मजेदार बनवू शकता फॉर युअर बच्चा पार्टी ! घेताय ना मग रेसिपी …
नोट: लहान मुलांच्या बर्थडे पार्टीत ” नो कूकिंग कॉमपिटिशन थिम ” साठी ही उत्तम रेसिपी आहे !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English

- तयारीसाठी वेळ: १० मिनिटे
- कितीजणांसाठी बनेल: ४ ते ५
- साहित्य:
- १ कप पुदिन्याची पाने
- १ कप ताजी निवडलेली कोथिंबीर
- १/२ कप खवलेला ओला नारळ
- १ टीस्पून जिरे भाजून , कुटून घ्यावी
- १ लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
- २ हिरव्या मिरच्या
- ब्रेड स्लाईसेस
- बटर
- कृती:
- सर्वप्रथम चटणी वाटून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात , हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना , जिरे पावडर, मीठ , लिंबाचा रस आणि खोबरे घालून थोडे पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्यावी. चटणी घट्ट असावी , पातळ झाल्यास ती नीट पावाच्या स्लाईसेसवर लागत नाही. म्हणू मी फक्त १-२ टेबलस्पून पाणी वापरून घट्ट चटणी वाटून घेतली आहे.
- ब्रेड स्लाईसेसच्या कडा कापून घेऊया. एका स्लाईस ला बटर लावून घेऊ. बटर त्यासाठी मऊ पाहिजे. सँडविच बनवण्याआधी किमान अर्धा तास आधी बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावे. दुसऱ्या स्लाईसला चटणी लावून घ्यावी.
- दोन्ही स्लाईसेस एकावर एक ठेवून सँडविच बंद करून घ्यावे. अशाच प्रकारे लागतील तेवढे सँडविच बनवून घ्यावेत.
- मुलांच्या डब्यात भरताना सँडविच त्रिकोणी आकारांत कापून भरावेत आणि पार्टीसाठी सॅन्डविचचे छोटे चौकोनी फिंगर फूड प्रमाणे सर्व करावेत. आवडत असल्यास सोबत टोमॅटो केचअप द्यावे . लहान मुलांसाठी बनवताना मिरच्या कमी घालाव्यात.

Leave a Reply