मला असे नेहमीच वाटतं की भौतिकशास्त्राचा हा नियम ” opposite poles attract each other and similar ones repel “, विज्ञानापेक्षा नात्यांमध्येच जास्त लागू पडतो. नाही का ?
माझ्यावरूनच सांगते , मला मित्रमैत्रिणींच्या , कुटुंबियांच्या घोळक्यात हाहाहूहू करायला आवडते , तो मात्र आपले आवडीचे पुस्तक घेऊन सोफ्यावर पहुडलेला ! मला आणि पार्टनरला दोघांनाही खायचीप्यायची आणि कूकिंगची खूप आवड , परंतु आमच्या दोघांच्याही खाण्यापिण्याच्या आवडी निवडी व सवयी पूर्णतः वेगळ्या ! माशांशिवाय एकही रविवार जाऊ न देणारी मी , तो पाऊण तास ताटात दोन हातांनी माशाचे काटे सोलत जेवत बसलेला! चिकन आणि मटणाचा फक्त रस्सा चाखणारी मी आणि तो नळ्या फोडण्यात एक्स्पर्ट ! तशा सगळ्या भाज्यांशी माझी गट्टी , परंतु फ्लॉवरचा गड्डा फक्त पाव भाजीसाठीच वापरणाऱ्या मला आठवड्यातून एकदा तरी त्याच्यासाठी आलू गोभी, ते ही सरसों के तेल मधली बनवावी लागायची ! आता इतक्या वर्षांनंतर ही परिस्थिती पूर्ण बदललेली असली तरी एकमेकांच्या आवडीनिवडी जपणे हे चॅलेंज सुद्धा आनंददायक असते . शाळेतल्या तोंडी परीक्षेत दूध आणि दुधापासून बनवले जाणारे कोणतेही पाच पदार्थ सांगा , या प्रश्नाचे उत्तर मी नेहमी ” दूध, दही, ताक, लोणी. तूप व खवा” असे पटदिशी सांगून शाबासकी मिळवली आहे ! त्यात ” पनीर” हा पदार्थ देखील दुधापासून बनतो , हा शोध मला फार उशोरा लागला !
पार्टनरला तसे झणझणीत मांसाहार प्रिय , परंतु जर व्हेज खायचे झालेच तर पनीरचे स्टार्टर, ,पनीरची भाजी , पनीर भरलेले कुलचे किंवा पराठे , पनीर पुलाव , हे असे सगळे पनीरचे तो खाऊ शकतो. शप्पथ सांगते , मी अजिबात अतिशयोक्त्त करीत नाहीये ! नोकरीसाठी बाहेर राहायला लागलो तेव्हा ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये थाळीत असलेल्या ,पाणी घालून वाढवलेल्या पनीरच्या भाज्या खाऊन मी अतिशय कंटाळले होते . अगदीच माझे काही पनीरशी हाडवैर नाही , कारण पनीर पकोडा, पनीर पराठा , तंदूर पनीर स्टार्ट्स हे मात्र माझ्या आवडीचे !
आताशा काय झालेय की या ब्लॉग व चॅनेलच्या निमित्ताने मी बरेच पदार्थ घरी तयार करीत असते . कधी गरज वाटली तर घरीच दही, खवा आणि पनीर बनवावे लागते. एके दिवशी आमच्या घरी पाहुणे येणार होते , त्यांच्यासाठी मटर पनीर बनवल्यावर सुद्धा पनीरचा एक छोटा ब्लॉक उरला होता. डाएटवर असल्याने पकोडे बनवायचे टाळले होते आणि पराठे बनवायला तितकासा वेळ हातात नव्हता ! सहजच दुपारची वामकुक्षी घेत असलेल्या माझ्या सासूबाईंना पाहून एक कल्पना सुचली . त्या रोज संध्याकाळी त्यांच्या मैत्रिणीबरोबर गार्डन मध्ये वॉक साठी जातात ! नेमके नीता मेहतांचे सँडविच या विषयावरील पुस्तक चाळताना मला पनीर टिक्का सँडविच ची रेसिपी मिळाली . घरात सगळे सामान होतेच , थोडे रेसिपीमध्ये आपला परीने बदल करून मी हे सँडविच बनवले . सासूबाईंची मैत्रीण मेहता ऑंटी कांदा लसूण न खाणाऱ्या , मग ते वगळून मी सँडविच बनवून छान छोटे छोटे त्रिकोण कापून गुपचूप डब्यात भरून ठेवले . जेव्हा सासूबाईंच्या हातात तो सॅन्डविचचा डबा ठेवला तेव्हा कोण खुश झाल्या , एखादे लहान मूल नाही का आईने आवडीचा खाऊ डब्यात दिल्यावर होते तस्सेच !
मी माझे आटपून जिममध्ये गेले , थोड्याच वेळाने मेहता ऑंटीचा फोन आला , त्यांचा हसरा आवाज ऐकून खूप बरं वाटले !
त्या दिवसापासून हे पनीर टिक्का सँडविच माझ्या आवडीच्या रेसिपी लिस्ट मध्ये स्थानापन्न झाले ! हे सँडविच तुम्ही थोडे कमी तिखट बनवून ब्राउन किंवा मल्टिग्रेन ब्रेड वापरून बनवू शकता , आणि ब्रेड खायचाच नसेल तर साध्य चपातीत कच्च्या भाज्यांच्या सॅलाडसोबत, चटणी लावून गुंडाळून मस्त फ्रॅन्कीच्या रुपात आपलया मुलांच्या डब्यात देऊ शकता ! मग करून पाहताय ना …
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
- तयारीसाठी वेळ: २० मिनिटे
- बनवण्यासाठी वेळ: २० मिनिटे
- कितीजणांसाठी बनेल: ४ ते ५
- साहित्य :
- १ पॅकेट ब्रेड स्लाईसेस ( व्हाईट / ब्राउन )
- २५० ग्रॅम्स पनीर , छोटे चौकोनी तुकडे कापून
- १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स, बारीक चिरून
- १ मध्यम आकाराची भोपळी मिरची = ७० ग्रॅम्स बारीक चौकोनी आकारांत चिरून
- १/२ कप = ७५ ग्रॅम्स टांगलेले दही / चक्का/ हंग कर्ड ( १२५ ग्रॅम्स दह्याला मलमलच्या कपड्यात बांधून किमान अर्ध्या तासासाठी टांगून ठेवणे )
- हिरवी चटणी
- बटर
- १ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
- १/४ टीस्पून हळद
- १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- १/२ टीस्पून धणे पावडर
- १/२ टीस्पून गरम मसाला पावडर
- १/२ टीस्पून चाट मसाला पावडर
- २ टीस्पून तंदूरी मसाला पावडर
- १ टेबलस्पून तेल
- मीठ चवीनुसार
- कृती:
- पनीर साठी मॅरिनेड बनवून घेऊ. एका भांड्यात टांगलेले दही, आले लसणाची पेस्ट , हळद, काश्मिरी लाल मिरची पूड, धणे पावडर, गरम मसाला पूड, चाट मसाला , तंदूरी मसाला पावडर, आणि चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे. गुठळ्या राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
- या मॅरिनेड मध्ये पनीरचे तुकडे, भोपळी मिरचीचे तुकडे, आणि चिरलेला कांदा घालून १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
- १५ मिनिटांनंतर एका पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल घालून गरम करून घ्यावे. त्यात मॅरिनेटेड पनीर घालून मध्यम आचेवर १ मिनिट परतून घ्यावे. मंद आच करून झाकण घालून शिजू द्यावे. पनीर शिजल्यावर त्यातील जास्तीचे पाणी निघून जाण्यासाठी झाकण काढून थोडा वेळ शिजू द्यावे. अतिशय कोरडे होईपर्यंत थांबू नये नाहीतर ते सॅन्डविचमध्ये व्यवस्थित पसरत नाही. गॅस बंद करून हे पनीर चे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यावे.
- आता सँडविचेस बनवून घेऊ. एका ब्रेड स्लाईस ला बटर लावून घ्यावे. बटर त्यासाठी मऊ पाहिजे. सँडविच बनवण्याआधी किमान अर्धा तास आधी बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावे. दुसऱ्या स्लाईसला हिरवी चटणी लावून घ्यावी. या दोन स्लाईसमध्ये पनीरचे मिश्रण घालून हलक्या हाताने दाबून घ्यावे. सँडविच खूप जास्त भरू नये . नाहीतर ग्रिल करताना तुटू शकते.
- सँडविच ग्रिल करण्यासाठी आपण ग्रिल पण किंवा नेहमीच्या वापराचा तवा किंवा टोस्टर देखील वापरू शकतो. गरम तव्यावर बटर घालून त्यावर सँडविच दोन्ही बाजूंनी छानपैकी ग्रिल करून घ्यावे. एक बाजू साधारण २ मिनिटे मंद आचेवर चांगली भाजून घ्यावी. मग दुसरी बाजू ग्रिल करून घ्यावी.
- तयार सँडविचेस आपल्याला हव्या त्या आकारात कापून सर्व करावेत. डब्यात भरताना अल्युमिनियम फॉईल मध्ये गुंडाळून ठेवावेत.
Leave a Reply