Wiki भाऊ ने सँडविच ची व्याख्या इतक्या छान भाषेत समजावून सांगितलेय ,” सँडविच म्हणजे दोन ब्रेड स्लाईसच्या मध्ये भाज्या, चीजचा तुकडा किंवा चिकन/मटण असा तत्सम मांसाहारी पदार्थ भरून केलेला खाद्यपदार्थ होय!
सॅन्डविचमध्ये ब्रेड हा एखाद्या कन्टेनेरचे काम करतो.” सँडविच हा पदार्थ जगात इतका प्रसिद्ध झाला की त्याला कधी कम्फर्ट खाद्यपदार्थांत स्थान मिळाले याची नोंदही मिळणे अशक्य आहे !”The Wall Street “ जर्नल ने तर सँडविच ही ब्रिटन ने जगाच्या खाद्यसंस्कृतीला दिलेली एक देणगी आहे असे म्हटले असले तरी भारतीयांनी जितके या सॅन्डविचला आपलेसे केले आहे त्याचे किती वर्णन करावे तितके थोडेच !
साध्या काकडी, टोमॅटो, बटाट्याच्या चकत्यांपासून ते चॉकोलेट शेंविंग्स पर्यंत सॅन्डविचच्या स्टफमध्ये वापरून रस्तोरस्ती गाड्या लावून , कॅफेंमध्ये आणि मोठमोठ्या हॉटेलात सँडविच आवडीने खाल्ले जाते . झटपट बनणाऱ्या या सॅन्डविचचे निरनिराळे प्रकार – नुसते दोन मऊ लुसलुशीत ब्रेड वापरून केलेले, तव्यावर शेकलेले म्हणजेच ग्रिल किंवा कोळशाच्या शेगडीवर टोस्टर मध्ये भाजलेले ! पावसाळ्यात जसे वडापावच्या गाडीवर गर्दी होते ना तेवढीच गर्दी या सॅन्डविचच्या गाड्यांवरही दिसते बरं का ! कोसळणारा पाऊस, बटर पेपरमध्ये दिलेले टोस्ट सँडविच , भरपूर चटणीचा झटका मारलेले आणि वाफाळता कटिंग चहा – अप्रतिम कॉम्बिनेशन !
आता मान्सूनच्या खादाडीची सुरवात करायचीच आहे , तर आपल्या संग्रहात ही मुंबईची खास आलू मटार टोस्ट सँडविचची रेसिपी हवीच ना ! घ्या तर मग पटकन !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिटे
- साहित्य:
- ५ मोठ्या आकाराचे बटाटे= ४५० ग्रॅम्स , उकडून, साली काढून
- १/२ कप = १०० ग्रॅम्स फ्रोझन मटारचे दाणे
- ५-६ लसणीच्या पाकळ्या
- ३ हिरव्या मिरच्या
- १ इंच आल्याचा तुकडा
- १ लहान कांदा = ६० ग्रॅम्स बारीक चिरून
- १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
- ६ ब्रेड स्लाईसेस
- बटर
- ३ चीज क्युब्स
- तेल
- हिरवी चटणी
- मीठ
- १/२ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून जिरे
- १/२ टीस्पून हळद
- २ टीस्पून लाल मिरची पूड
- १/४ टीस्पून हिंग
- १ टेक्स्पोन पाव भाजी मसाला किंवा गरम मसाला
- १ टीस्पून धणे पावडर
- १/२ टीस्पून चाट मसाला पावडर ( किंवा १ टीस्पून लिंबाचा रस )
- कृती:
- सर्वप्रथम आले. लसूण आणि मिरच्यांचा १-२ टेबलस्पून पाणी घालून जाडसर ठेचा वाटून घ्यावा.
- उकडलेले बटाटे मॅशर ने मॅश करून घ्यावेत. गुठळी राहू देऊ नये.
- सॅन्डविचच्या स्टफ साठी २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. त्यात १ टेबलस्पून बटर घालून वितळू द्यावे. मोहरी घालून तडतडू द्यावी, जिरे , हिंगाची फोडणी होऊ द्यावी. बारीक चिरलेला कांदा घालून नरम होऊ द्यावा. त्यानंतर हळद, वाटलेला ठेचा , आणि थोडी कोथिंबीर घालून एकत्र करून घ्यावे. जरा २ मिनिटे परतले की त्यात लाल मिरची पूड, धणे पावडर , पाव भाजी मसाला किंवा गरम मसाला आणि चवीपुरते मीठ घालावे. थोडे पाणी घालून मसाले चांगले परतून घ्यावेत.
- मसाल्याला ६-७ मिनिटे परतल्यावर त्याला तेल सुटू लागते. मटारचे दाणे आणि थोडे पाणी घालून झाकून शिजू द्यावेत. फ्रोझन मटार २-३ मिनिटांत शिजतात , ताज्या मटारला थोडा जास्त वेळ लागतो. मटार शिजला की त्यात मॅश केलेला बटाटा घालून मीठ, कोथिंबीर घालून नीट एकत्र करून घ्यावे. चाट मसाला घालून ढवळून गॅस बंद करावा. सॅन्डविचचे स्टफ तयार आहे.
- दोन ब्रेडच्या स्लाइसना मऊ बटर नीट लावून घेऊ. प्रत्येक स्लाइसवर हिरवी चटणी सुद्धा लावून घेऊ. आता मटार बटाट्याचे सारण नीट पसरवून एकसंध लेअर करून घेऊ. फार जाड पसरवू नये. नंतर चीज किसून घालावे, दुसरी स्लाईस वर दाबून बसवावी!
- आपण हे सँडविच टोस्टरमध्ये टोस्ट करणार आहोत कारण टोस्टर मध्ये त्यांच्या कांदा घट्ट चिकटतात आणि ते दिसायला छान दिसते . टोस्टरला बटर लावून गॅसवर गरम करीत ठेवावा. इलेकट्रीक टोस्टरही वापरू शकता . त्यात सँडविच ठेवून दोन्ही बाजूंनी ३-४ मिनिटे खरपूस टोस्ट करून घ्यावे.
- अगदीच टोस्टर मिळाला नसेल तर तव्यावर किंवा ग्रिल पॅनवर सुद्धा ग्रिल करू शकता . हे चटपटीत सँडविच टोमॅटो केचअप सोबत खायला द्यावे.

Leave a Reply