हॉटेलमध्ये जेवायला गेलो की आम्ही सूप, स्टार्टर्स , मेन कोर्स आणि डिझर्ट अशी सगळी साग्रसंगीत ऑर्डर देतो! त्यात ग्रुप मधले एखादे तरी मॉकटॆलची आठवण काढतंच , जणू काय काहीतरी सुर्र्प सुर्र्प केल्याशिवाय घासच गिळता येणार नाही !मला स्वतःलाही मॉकटॆल्स आणि पर्यायाने कधी कधी प्रसंगी , कॉकटेल्स देखील खूप आवडतात ! या मॉकटॆल्स ची खासियत अशी की चव घेणे वगैरे नंतर. पहिल्यांदा ” ती पाहताच बाला , कलिजा खलास झाला” ….. इतक्या सुंदर रंगसंगतीत ते सर्व्हरच्या हातातल्या ट्रे मध्ये बसून मुरडत टेबलावर विराजमान होतात ! माझ्या एका मैत्रिणीला वाईट खोड आहे , तिला ना तिचे मॉकटॆल सोडून दुसर्यांचेच जास्त आकर्षक वाटते , आणि उगाचच बिल येईपर्यंत ऐकवत बसते , ” शी बाई , माझे मॉकटॆलच नव्हते चांगले , तुझे वाले ऑर्डर केले असते तर बरं झाले असते!” हा जर ब्लॉग तिने वाचला ना तर , माझे काही खर नाही … असो ! मजेचा भाग सोडला तर सगळ्या जरा मोठ्या फॅमिली हॉटेलातल्या मेनूकार्डवर मॉकटॆलचे पान असतेच! लहान मुलांप्रमाणेच मोठ्यानांही भुरळ घालणारी अशी मॉकटेल्स – फ्रुट पंच, ब्लडी ग्वावा , मिंट लेमोनेड , वॉटरमेलॉन मोहितो आणि माझे सगळ्यात आवडते व्हर्जिन पिनाकोलाडा !
पिनाकोलाडा या शब्दाचा अर्थ स्पॅनिश भाषेत ” strained pineapple ” म्हणजेच “अननसाचा रस”! खरतर या नावाचे कॉकटेल खूप प्रसिद्ध आहे आणि त्यात व्हाईट रमचा वापर केला जातो ! जेव्हा पिनाकोलाडा मधून मदिरा वर्ज्य होते तेव्हा त्याला ” व्हर्जिन पिनाकोलाडा” म्हणतात असे माझ्या वाचनात आलेय! या पेयाचा इतिहास फारच रंजक आहे , पुएर्तो रिको नावाचा कॅरिबियन समुद्री बेटसदृश एक देश आहे .. १८०० शतकात तिथल्या एका समुद्री चाच्यांच्या “रॉबर्टो कॉफरेसी ” नामक नायकाने आपल्या टोळीला प्रोत्साहित करण्यासाठी ह्या पेयाचा शोध लावला असे काही लोककथांत म्हटले आहे . पुढे १८२५ दरम्यान त्याला पकडून मृत्युदंड ठोठावण्यात आला आणि ह्या पेयांची पाककृती देखील काळाच्या पडद्याआड गेली . अशा बऱ्याच कथा पिनाकोलाडाविषयी ऐकिवात आहेत आणि पुएर्तो रिको या देशात हे इतके आवडते आहे की तिथे १० जुलै हा ” नॅशनल पिनाकोलाडा डे ” म्हणून साजरा केला जातो ! किती मजेदार ना !
हॉटेलात पितो ना किंबहुना त्याहीपेक्षा चांगले ,आपण व्हर्जिन पिनाकोलाडा घरी बनवू शकतो , व्हाईट रमला बाजूला ठेवू, आणि नारळाचे दूध , व्हॅनिला आईस्क्रीम घालून मधुर , फेसाळते व्हर्जिन पिनाकोलाडा बनवायची तयारी करायला घेऊ! खात्रीने सांगते तुमच्या पाहुण्यांना इंप्रेस करायची संधी गमावू नका!
घ्या पटकन ही रेसिपी लिहून….
माझे पिनाकोलाडा ग्लासेस आवडले असतील तर तुम्ही ते इथून ऑर्डर करू शकता
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Also read this post in English

- ३०० ग्रॅम्स अननसाचे तुकडे
- २-३ टेबलस्पून साखर किंवा चवीप्रमाणे
- १ कप बर्फाचे तुकडे
- १ कप=२५० ml नारळाचे दूध
- २-३ सकूप्स व्हॅनिला आइसक्रीम
- १ १/२ कप पाणी
- ब्लेंडरच्या भांड्यात अननसाचे तुकडे, २-३ बर्फाचे तुकडे , २ टेबलस्पून साखर आणि १ कप पाणी घालून फिरवून घ्यावे.
- हा अननसाचा रस गाळून घ्यावा. जर तुम्ही कॅन मधला अननसाचा रस वापरला तर साखरेऐवजी साखरेचा पाक घालून फिरवून घ्यावे.
- पिनाकोलाडा बनवण्यासाठी ब्लेंडरच्या भांड्यात गाळून घेतलेला अननसाचा रस, नारळाचे दूध , अर्धा कप बर्फाचे तुकडे , ३ सकूप व्हॅनिला आइसक्रीम घालून चटकन फिरवून घ्यावे.
- पिनाकोलाडा तयार आहे , ते एका भांड्यात काढून सर्व करेपर्यंत फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावे.

Leave a Reply