वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन शाळेबाहेरच्या वडापाववाल्याकडे भरपेट खाल्ल्यावर आमच्या स्वाऱ्या हसत खिदळत घरी पोचतात ! आता भल्या मोठ्या लांबलचक उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय धम्माल करायची हे पक्के मनाशी ठरवत घरात शिरतो ना शिरतो तोवर आईसाहेबांचे फर्मान निघते ……
“पहिल्यांदा उद्यापर्यंत अभ्यासाचे टेबल आवरून , दप्तर , गणवेश धुवावयास टाकणे आणि मगच कॅरम , पत्ते ,सापशिडी सारखे तत्सम खेळ बाहेर काढणे “… हे इतक्यावरच थांबत नाही हो , तर जुन्या पुस्तकांचे गट्ठे बांधून वाचनालयात देणे जेणेकरून गरजू मुलांना त्याची मदत व्हावी, ग्रंथालयाची वर्गणी भरून साहित्य वाचनाचा छंद जोपासावा , मला अभिनयाची आवड म्हणून बाबांनी बालनाट्य प्रशिक्षणाच्या शिबिरात नाव भरती केल्याची पावती अभ्यासाच्या टेबलावर सरप्राईझ म्हणून फडफडत असते , असे किती ना किती प्रसंग तुमच्या आमच्या ९० च्या दशकात जन्माला आलेल्यांच्या आयुष्यात सेम टू सेम घडल्या असतील ना ! यातले एक काम मला मनापासून आवडायचे , कोणते माहितेय का …. जुन्या वह्यांची उरलेली पाने काढून त्याना , एक रेघी , दुरेघी आणि पूर्ण कोरी अशा पानांमध्ये विभागणी करणे ! मग या पानांना जाड सुतळीने बांधून कापडी पिशवीत ठेवले जायचे . येणाऱ्या रविवारी बाबाबरोबर ते गठ्ठे घेऊन लालबागला प्रिंटिंग प्रेसमध्ये घेऊन जाणे हा माझा आवडता कार्यक्रम ! यामागे दोन कारणे असायची की त्या प्रेसमध्ये जुन्या उरलेल्या पानांना छान घट्ट बाइंडिंग करून मिळायचे , ३००-४०० पानांची ही भली मोठी वही आणि दुसरे म्हणजे बाबा कुठे ना तरी खादाडी करायला नक्की घेऊन जायचा !
माझ्या ब्लॉग वाचकांना जे मुंबईशी थोडे अनभिज्ञ असतील त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की औद्योगिकरणाच्या त्या ९० च्या दशकात ज्यांना ” मिल सिटी ” किंवा ” गिरणगाव” म्हटले गेले तेच हे लालबाग , परळ होय! आता हाच भाग ” टॉवर सिटी” म्हणून उदयास आला आहे ! मुंबईचे आराध्य दैवत म्हटले तरी हरकत नाही तो ” लालबागचा राजा गणपती ” ऐकून असालच ,तेच हे लालबाग! छोट्या छोट्या गल्लीबोळांतून , वाट काढत मी आणि बाबा पोचतो. एका छोट्या १० बाय १२ च्या खोलीत असलेली ती प्रेस , भिंतीचे पापुद्रे उडालेल्या , पत्र्याच्या छप्पराखाली , झाकण गायब असलेल्या जुनाट गंजलेल्या पात्याच्या टेबलफॅनची हवा घेत , फाटकी गंजी घातलेले , प्रेस वाले काका पुढे येऊन बाबाच्या हातातली पिशवी घेऊन गठ्ठे बाजूला काढतात ! मला आठवतेय हे काका सुद्धा कोकणातल्याच कुठल्याशा खेड्यातले , नेहमी एकच प्रश्न माझ्या बाबाला विचारताना माझ्या स्मरणात आहेत , ” ओ मयेकरांनू , आंबो इलो काय , इलो असला तर रत्नागिरीस जावं म्हणतंय , नाहीतर अजून महिनोभर तरी काय प्रेस बंद ठेवुची नाय!” मग या धंद्यात कसा राम नाही राहिला , वगैरे बाबा आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्यावर मी जवळजवळ बाबाच्या शर्टाची बाही खेचायला लागायचे !कारण बाजारातले ठेले आणि गाड्यांवरचे पदार्थ त्यांच्या सुवासाने भुरळ पाडायला लागलेच असायचे.
कधी मिसळ, वडापाव , तर कधी मुंबई लाडू सम्राटाचा मोतीचुराचा लाडू हे माझे लालबागचे खास आकर्षण .. लालबागला गेले की बाबा मला नेहमी पियुष प्यायला न्यायचा , पोस्ट ऑफिसाआधीच्या चौकात वळणावर ते हॉटेल होते छोटेसे , नाव नाही आठवत , आज ते हॉटेल अस्तित्वात नाही , इमारत नवीनीकरणामुळे पाडले गेले असावे , परंतु पिवळ्या रंगाच्या भिंती आणि लाल टेबलं असलेल्या त्या हॉटेलमध्ये आंबा पियुष चाटून पुसून प्यायलेल्याची आठवण काढून आजही मी आणि बाबा खीखी हसतो , कारण एवढे पोट भरल्यावर घरी येऊन दोघे दुपारी चांगले २ तास घोरत पडायचो ! आई संभ्रमात … की हे दोघे न जेवता कसे काय झोपले ….
पियुष चा अर्थ म्हणजे म्हणजे अमृत , आणि हे पेय कुठल्याही निकषांवर अमृताहून कमी नसावेच असे माझे स्पष्ट मत आहे! लस्सीसदृश परंतु त्यात मराठमोळ्या श्रीखंडाचा स्वाद उतरलेला , केशर , वेलची , जायफळ पावडर युक्त असे हे पेय सर्वप्रथम दादर येथील तांबे आरोग्य भुवनात १९४१ साली बनवण्यात आले . इथे मिळणाऱ्या पियुष मध्ये जायफळ आणि केशर जरूर वापरले जाते. हे छोटेखानी हॉटेल आजही चालू आहे , जर कधी संधी मिळाली दादरला जाण्याची तर नक्की तांबे आरोग्य भुवनाला भेट द्या! श्रीखंडाप्रमाणे पियुषाचे मूळ नक्की कुठले , महाराष्ट्रात की गुजरातेत असा काहीसा विवादित मुद्दा आहे, परंतु ही दोन्ही राज्ये पूर्वी एकच भाग असल्यामुळे खाद्यसंस्कृती एकच असणे स्वाभाविक आहे ! मागे एकदा एका फेसबुक ग्रुप वर पियुषाची रेसिपी विचारली होती , मी टाईप करतच होते रेसिपी आणि काही मजेशीर , खोडसाळ म्हटलेत तरी चालेल अशा कॉमेंट्स वाचण्यात आल्या जसे की ” श्रीखंडाचे पातेले पाण्याने दुधाने घुसळून धुतले की त्याला पियुष म्हणतात “.. तुम्ही मात्र अशा अफवांवर विश्वास ठेवू नका हं , मी देतेय तुम्हाला रेसिपी , नक्की करून पहा , आवडेल याची खात्री बाळगते !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English
- ३ कप = ६०० ग्रॅम्स दही
- १ कप = २५० ग्रॅम्स आम्रखंड ( आंब्याचे श्रीखंड )
- १ कप= २५० ग्रॅम्स केशर विलायची श्रीखंड
- ४ टेबलस्पून =६० ग्रॅम्स साखर
- १/४ टीस्पून जायफळ पावडर
- १/४ टीस्पून वेलची पावडर
- थोडे केशराचे धागे आणि पिस्त्याचे काप वरून सजवण्यासाठी
- आपण या रेसिपीसाठी ६०० ग्रॅम्स दही वापरले आहे .. ३०० ग्राम दह्याचे आपण केशर वेलची पियुष बनवूं आणि उरलेल्या ३०० ग्रॅम्स दह्याचे आंबा पियुष बनवू . पहिल्यांदा आपण केशर वेलचीयुक्त पियुष बनवून घेऊ. एका ब्लेंडरच्या भांड्यात दही, केशर वेलची श्रीखंड , २ टेबलस्पून साखर किंवा चवीनुसार , वेलची पावडर, आणि जायफळ पावडर घालून एकत्र घुसळून घेऊ. पियुष तयार आहे , जर पियुष फार घट्ट वाटले तर त्यात १-२ टेबलस्पून दूध घालून फिरवून घ्यावे .
- अशाच प्रकारे आंबा पियुष बनवून घ्यावे .
- हे दोन्ही पियुष वेगवेगळ्या भांड्यांत काढून , झाकण घालून फ्रिजमध्ये किमान २ तासांसाठी थंड होऊ द्यावे आणि मगच थंड प्यायला द्यावे . प्यायला देताना वरून केशराचे धागे आणि पिस्त्याचे काप घालावयास विसरू नये !
Leave a Reply