स्वयंपाक बनवणे ही जबाबदारी माझ्यासाठी ” काळाची गरज ” म्हणून अंगावर आली असली तरी माझ्या पार्टनरच्या चवीच्या जिभेमुळे ती फक्त निव्वळ जबाबदारी न राहता सासरच्या कुटुंबाला आणि पर्यायाने स्वतःला आनंदी ठेवण्याचा माझ्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणून मोकळा झाला ! आयटी च्या शिफ्ट्स , आणि २४*७ सपोर्ट जॉब मुळे , मनावर आलेला ताण दूर करण्यासाठी कूकिंग हे एक स्ट्रेस बस्टर होते यात माझे दुमतच नाही !
आज काल रिलेशनशिप गोल्स यांवर बरीच शिबिरे , सेमिनार्स भरवले जातात . नुकत्याच विवाह झालेल्या किंवा अनेक विवाहेच्छुक युवकयुवतींसाठी हे
नक्कीच मदतशीर आहे . एक छान वाक्य मध्यंतरी वाचनात आले होते , ” Relationship is like a house . When a light bulb burns out, you don’t go and buy a new house , you fix the light bulb!”
कोणत्याही नात्यांत जबाबदारीची जाणीव दोन्ही बाजूंना असल्यास ते नाते अक्षय राहते . परंतु जर त्यात तुझे माझे आले , तर ते नाते , नाते न राहता , घशात अडकलेल्या घासासारखे अस्वस्थ करते , ना गिळता येत , ना थुंकता!
घरातील कामे खांद्याला खांदा भिडवून करणे , असा पार्टनरचा नेहमी आग्रह ! मग तो स्वयंपाक असो , घरातला पसारा आवरणे असो ( तसा पसारा करणाराही तोच असतो 🙂 ) किंवा दिवसातून एकदा तरी गरमागरम वाफाळता चहा बनवणे असो ! आम्हा दोघांनाही खाण्यापिण्याची प्रचंड आवड , म्हणूनच शनिवारी रविवारी काय स्पेशल बनवायचे याचे डिस्कशन आदल्या सोमवारपासून दोघांत चालायचे. असेच एका शनिवारी पार्टनरने मला इंडो – चायनीज कूकिंग क्लास चे रजिस्ट्रेशन लिंक पाठवली . मी फारच गळ घातली म्हणून त्याने ही रजिस्टर केले . ठरल्या दिवशी आम्ही गेलो आणि पाहतो तर काय स्वतःच्या बंगल्यातल्या एका गॅरेजसदृश दिसणाऱ्या रिकाम्या जागेत छानपैकी सफाई करून , मंडप घालून शेफ ( महिला शेफ ) ने आपला क्लास सेटअप केला होता . मुख्य म्हणजे त्या क्लास मध्ये सगळ्या महिलावर्गात पार्टनर एकच पुरुष होता . पहिल्यांदा थोडे मला कसनुसं झाले , परंतु त्या शेफ ने पार्टनरला पुढे बोलावून स्वतः बरोबर कूकिंग डेमो देण्यात सामील करून घेतले . इतके छान सेशन होते की त्यात शिकवलेल्या छोट्या छोट्या कूकिंग टिप्स आजही माझ्या ध्यानात पक्क्या झाल्यात ! त्यात नेमक्या ५-६ रेसिपीस आम्हाला ठरवलेल्या वेळेत शिकवल्या गेल्या . हे कूकिंग सेशन केल्यानंतर माझ्या मैत्रीणींसाठी दिवाळी डिनरला पार्टनर ने इतके मस्त स्टार्टर पनीर चिल्ली बनवले होते ना त्याची आठवण आजही माझ्या मैत्रिणी भेटल्या कि आवर्जून काढतात !
हा मान्सून चा सीजन , म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्याचा ! कधी चटपटीत, तर कधी तळलेले खाणे … बाहेर जाऊन गाड्यांवर चायनीज खाणे एखाद दुसरे वेळा ठीक , सारखे खाल्ले तर पोटाच्या रोगांना आमंत्रण! म्हणून आजची ही रेसिपी घरी बनवण्यासाठी एकदम सोप्पी ” व्हेज हक्का नूडल्स ” ! ही रेसिपी हक्का क्विझिन मधून येते . हे मुख्यतः तैवान , हॉंगकॉंग, इंडोनेशिया, मलेशिया , सिंगापूर या देशांचे क्विझिन ! याचे मुख्य आकर्षण म्हणजे , हे हक्का पद्धतीचे जेवण बनवताना घटक पदार्थांच्या टेक्सचर वर शिजवताना जास्त लक्ष दिले जाते . तसेच अति मसाले न वापरता लाईट चवीचे सॉसेस वापरून पदार्थ बनवले जातात ! म्हणूनच हक्का डिशेस चा आनंद घेताना घटकपदार्थांचा फ्रेशनेस नेहमी
जाणवतो . तर आज बनवूया आपला इंडो चायनीज पद्धतीचा ” व्हेज हक्का नूडल्स ” !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
- १५० ग्रॅम्स नूडल्स
- १ मध्यम आकाराचा कांदा लांब चिरून ( ८० ग्रॅम्स )
- १ भोपळी मिरची लांब पातळ चिरून ( जुलिअन कट ) ( ७० ग्रॅम्स )
- १ गाजर लांब पातळ चिरून ( जुलिअन कट ) ( ६० ग्रॅम्स )
- अर्धा कप कोबी लांब चिरून ( ५० ग्रॅम्स )
- १ १/२ टीस्पून सोया सॉस
- १ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
- अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर
- २ टीस्पून व्हिनेगर
- मॅग्गी सिजनिंग क्यूब ( किंवा अर्धा टीस्पून अजिनोमोटो किंवा एमएसजी )
- तेल
- मीठ चवीनुसार
- बाजारात बरेच हक्का नूडल्स चे ब्रॅण्ड्स आहेत , तुम्ही कोणताही ब्रँड वापरला तरी चालेल , फक्त त्यामागे दिलेल्या कूकिंग इंस्ट्रक्शन्स प्रमाणे नूडल्स शिजवावेत . मी चिंग्ज ब्रँड वापरला आहे . हे १५० ग्रॅम्स चे पॅक आहे . ते शिजवण्यासाठी जवळजवळ १० कप पाणी म्हणजे अडीच लिटर पाणी एका मोठ्या कढईत उकळत ठेवावे. पाण्यात अर्धा टीस्पून मीठ घालावे . पाण्याला उकळी आली की त्यात नूडल्स न तोडता घालावेत . मध्यम ते मोठ्या आचेवर दीड मिनिटांत नूडल्स नरम होतात आणि पाण्यावर तरंगू लागतात . एका फोर्क च्या मदतीने ते हळुवारपणे सोडवून घ्यावेत आणि काही वेळ अजून शिजवावेत .
- नूडलस कधीही पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवू नयेत . नेहमी ते " Al-Dente " होईपर्यंत म्हणजेच दाताखाली एक बाइट मिळेपर्यंतच शिजवावेत . अजून ३ मिनिटांत नूडल्स शिजतात . त्यांना एका चाळणीत काढून थंड पाण्याखाली धुऊन घ्यावेत जेणेकरून त्यांचा एक्सट्रा स्टार्च धुऊन निघेल . असे केल्याने ते चिकट राहत नाहीत . नूडल्स एका थाळीत पसरवून थंड होऊ द्यावेत .
- नूडल्स थंड झाल्यावर त्यावर १ टीस्पून तेल घालून मिसळून घ्यावे. सोया सॉस घालून एकत्र करून घ्यावेत .
- एका लोखंडी कढईत ३ टेबलस्पून तेल घालून मध्यम आचेवर गरम करून घ्यावे . आले लसणाची पेस्ट घालून तिचा कच्चे पणा जाईपर्यंत परतून घ्यावे.
- चिरलेला कांदा घालून नरम होईपर्यंत परतावा. सगळ्या भाज्या घालून घ्याव्यात - भोपळी मिरची, गाजर, आणि कोबी. भाज्या परतूनच शिजवाव्यात . फार शिजेपर्यंत नाही तर त्यांत एक क्र्न्च असेपर्यंतच शिजवाव्यात .
- आता मॅग्गी सिजनिंग क्युब कुस्करून घालावे , अर्धा टीस्पून मीठ आणि काळी मिरी पावडर घालून नीट एकत्र मिसळून घ्यावे.
- आता शिजवलेले नूडल्स घालून दोन फोर्क्स च्या मदतीने भाज्यांसोबत एकत्र करून घ्यावेत .
- व्हिनेगर घालून मिसळून घ्यावेत . गॅस बंद करावा .
- व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत . टोमॅटो केचअप किंवा शेजवान चटणीसोबत गरमगरम वाढावेत .
Leave a Reply