आज देवाची पूजा करताना , मनात नेहमीचा उत्साह नव्हता . अगदी यांत्रिकपणे पोकळी निर्माण झाल्यासारखे पूजा करायचे कार्य केले . दिवा लावताना मात्र माझ्या देवघरात बसलेल्या त्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या टपोऱ्या डोळ्यांत पाहतांना मनात दाटून आलेले आभाळ डोळ्यांतून टपटप वाहू लागले , काय झाले मला .. दिव्याची वात धूसर दिसू लागली , कसबसं २ काड्या जाळून एकदाचा वातीने पेट घेतला ! आज हात जोडायचे , स्तोत्र म्हणायचे काही सुद्धा केले नाही , फक्त कितीतरी वेळ स्तब्ध उभं राहून मनातली गाऱ्हाणी त्याच्यासमोर आळवत बसले होते .
मागील काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान , त्याच्याशी लढा देणारी माणसे आणि शासकीय यंत्रणा , त्यातच मृतांच्या टाळूवर लोणी खाण्यासारखे कृत्य करणारे काही समाजकंटक , चहू बाजूंनी बातम्यांचा भडीमार , एक सुन्न वलय स्वतःभोवती जे निर्माण झाले होते, ते मनाने आक्रंदतच तोडले आज !
२६ जुलै २००५ , असाच एक दिवस जो मुंबईकर स्वतःच्या हयातीत तरी विसरणार नाहीत . कमरेपर्यंत आलेल्या पाण्यातून वाट काढत कशीबशी दुपारी कॉलेजमधून घरी पोचले ,परंतु आई बाबा कधी पोचतील याची चिंता लागून राहिलेली ….. लॅन्ड लाईन फोन बंद पडलेला , मोबाईल नेटवर्क ठप्प , अशा अवस्थेत ते पुढचे आठ तास आंधळ्या आजीला घट्ट मिठी मारून कसे काढले ते माझे मलाच माहीत ! कदाचित तिच्या अनुभवांचा आणि श्रद्धेचा डोळस आधार आम्हा दोघींना तारून गेला ! रात्री नऊच्या सुमारास डोक्यापासून पायापर्यंत चिंब भिजलेली आई , घरी आली , तिच्या मागोमाग काही वेळाने बाबाही घरी आला ! गटाराच्या घाण पाण्यामुळे आईच्या पायाची कातडी सोलवटलेली , बाबा पाण्यात धडपडल्यामुळे त्याचा चष्मा ही फुटला होता ! तरी माझे सर्वस्व मला सही सलामत मिळाले म्हणून त्या रात्री देखील आमच्या घरात आईने मला देवापुढे निरांजन लावायला सांगितले !
तो दिवस आणि १४ वर्षांनी आलेली ही आजची महाभयंकर पूरस्थिती ! जवळजवळ पूर्ण महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपलेय , अर्धा महाराष्ट्र पाण्याखाली गेलाय . ब्रह्मा सृष्टीचा निर्माता , विष्णू पालनकर्ता आहे , आज या दोघांनीही पडती बाजू घेऊन सारे काही शंकराच्या हाती सोपवलेले दिसतेय ! असे म्हणतात पाप वाढले की देव महेश या सृष्टीचा नाश करण्यासाठी तिसरा डोळा उघडतात , तसेच काहीसे झालेय … निसर्गाचे तांडव सुरु झालेय जणू ! देवा , मान्य आहे की आम्ही माणसांनी निसर्गाला खूप गृहीत धरलय , आततायीपणाने बऱ्याच चुकीच्या गोष्टी करून तू निर्माण केलेल्या या सुंदर सृष्टीची नासाडी केलीये …. परंतु आता यातून वाचण्यासाठी देखील तुझाच आधार आहे ना ? मनुष्याप्रमाणेच मूक प्राण्यांचा हा आकांत आता नाही पाहवत ! एरवी संथ वाहणारी शांत कृष्णामाई जिला तीरावरल्या सुखदुःखांचीही जाणीव नसते , तिनेच आज ब्रह्मनाळला नऊजणांचा घास घेतला तेही पुरातून वाचण्यासाठी फक्त २० मीटर अंतर राहिले असताना….
नाशिकचे त्र्यंबकेश्वर तीर्थस्थान पाण्याखाली , जगाला मनाचे सामर्थ्य पटवून देणाऱ्या श्री रामदास स्वामींच्या अजिंक्य ताऱ्याचा प्रदेश सातारा , आज पुराशी झगडतोय, कोकण रत्नागिरीचा रवळनाथ , काळभैरव , ज्याची अवजड पालखी डोक्यावर घेऊन मिरवली जाते , आज त्यांनी डोळेझाक केली कि काय अशी शंका यायला लागलीये ! साऱ्या जगताची आई अंबाबाई , आपले करवीर क्षेत्र पाण्याखाली जाताना पाहून तिचेही मन द्रवले असेलच ना ! रत्नागिरीला धो धो पाऊस पडत असताना सुद्धा आज माझी आई , दारावर येणाऱ्या गावदेवीच्या पालखीसाठी नैवेद्य बनवून , ‘ या संकटातुन सगळ्यांना वाचव ‘ म्हणून साकडे घालण्याची तयारी करत होती ! फोनवर बोलता बोलता गळा भरून आला तिचा , कोल्हापूर रत्नागिरीला अगदी सख्खा शेजारी… लग्नानंतर रत्नागिरीला गेल्यावर रीतीप्रमाणे कोल्हापूरच्या अंबाबाईला आणि जोतिबाला जोडप्याने दर्शन केल्याचा दिवस आठवत होती माझी माउली !
किती ही दैवाची विडंबना.. तिथे मराठवाड्यात पावसाची वाट पाहत शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू सुकले , तिथे कृत्रिम पावसाची तयारी करावी लागत आहे आणि इथे अतिवृष्टीने हाहाःकार माजवलाय ! संपूर्ण विश्वरूपी घरावरचे आकाशरूपी छप्पर आज भेदले गेलेय …
देवा तुझ्याकडे तक्रार नाही करत , परंतु आता हे निसर्गाचे तांडव थांबावं, म्हणून मनापासून गाऱ्हाणे घालतेय . झालीये तेवढी दैना पुरे आता … घरदार तुटलेलया , पुराच्या पाण्यात सगळे वाहून गेलेल्यांना परत उभे राहण्यासाठी शक्ती तूच निर्माण करू शकतोस रे ! आज कित्येकजणांच्या मनातले देव मदतीला धावून आलेत हेही तुझ्याच कृपेने यात शंका नाही ! मला खात्री आहे की हे चित्र पालटेल , परत सगळे पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ लागेल , परंतु ते नक्की होईल , मात्र पाणी ओसरल्यानंतर घरी परतलेल्यांना आपला भग्न संसार समेटताना, ते कोसळलेले तुळशी वृंदावन , अंगणात झाडांच्या मध्ये हौसेने बांधलेला श्रावणझुला तुटून , लोंबकळताना पाहून , मनावरच्या या ओल्या जखमा जन्मभर पुरतील !
आज तुझ्याकडे एकच मागणी ,
” है सुना ये पूरी धरती तू चलाता है , मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है, भगवान है कहाँ रे तू , हे ख़ुदा है कहाँ रे तू!”
Leave a Reply