
आपले हिंदू पुराण हे असंख्य कथांनी युक्त , या कथा कोणी लिहिल्या , का लिहिल्या , कशा सुचल्या याची उत्तरे अचूक मिळणे तसे दुरापास्त ! परंतु दानशूरता , शौर्य , धैर्य , प्रामाणिकता , चतुराई असे अनके गुण शिकवणाऱ्या या कथा मनुष्यजन्माला जगण्याचा आधार देतात , नाही का ? सण, व्रत वैकल्ये आणि त्यासंबंधीच्या प्रथा व त्यांना दिलेली धार्मिक जोड , हे जगण्याचे मर्म सांगून जातात .
आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी . पुढले १० दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा पाहुणचार करण्यात सगळी मंडळी व्यस्त असतील .
गणेशोत्सव आणि आनंदाचे उधाण हे अतूट समीकरणच , गणेशाचे स्वागत झालेय हे कुठे ढोल ताशांचा कडकडाट , तर कुठे शांत अथर्वशीर्षाची आवर्तने कानावर पडून आपल्याला घरी बसल्या बसल्या कळतेच ! या गणरायांच्या रंगी सगळेच एकरूप होतात . मला तर एरवीसुद्धा कुठे प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील ” पार्वतीच्या बाळा , तुझ्या हातात वाळा ..” किंवा ” टीम टीम टीमबाली ” अशी कोळीगीते वाजली की आपल्या मुंबईची मिरवणूकच अंगात येते ! लालबाग परळला झालेली आयुष्याची जडणघडण हो , सुज्ञास सांगणे न लगे !

या बाप्पाच्या जन्मापासूनच्या कथा देखील किती मनोरंजक , योगी प्रवृत्तीच्या शिवाने मुलाची जबाबदारी घेण्यास नापसंती दर्शवल्यावर शांत बसेल ती पार्वती कुठली हो , साक्षात “शक्ती” असलेल्या तिने आपलया शरीरावरील तैल आणि हळद मिश्रीत उटण्यापासून बालक जन्माला घातला , तोच हा ” विनायक ” ज्याला जन्म घेण्यासाठी नायकाची गरज भासली नाही ! शंकराने दिलेल्या आशीर्वादाने हा विनायक गणांचा अधिपती आणि प्रत्येक शुभ कार्याच्या सुरवातीला वंदनीय ठरला !
गणपती हा बुद्धीदाता , त्याच्या पोटात साऱ्या विश्वाच्या ज्ञानाचे भांडार ! त्याला प्रिय असणाऱ्या मोदकांची संज्ञा देखील किती सुरेख आहे पहा . मोदक हे या जीवनातील ज्ञानार्जनाचा श्रेष्ठ मार्ग सांगतो . मोदकाचे पोट मोठे आणि टोक निमुळते …. मानवाला ज्ञान प्राप्त करण्यासाठी छोटो छोटी पावले उचलून , निमुळत्या अरुंद रस्त्यांची , परिश्रम करत वाटचाल केली पाहिजे आणि मगच ज्ञानाच्या अथांग सागरात स्वतःला झोकून त्याची प्राप्ती केली पाहिजे , असे शास्त्र म्हणते . म्हणूनच मोदकाचा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्या शिरापासून ते नारळ गुळाचे सारण भरलेल्या त्याच्या तळापर्यंत , असाच तो खाल्ला गेला पाहिजे . ” मोदक ” हा शब्द मूळ संस्कृतातून ” मोद” या शब्दापासून बनलेला… ” मोद” म्हणजे ” आनंद , हर्ष , उल्हास ! जो ग्रहण केल्यावर गणपतीला व त्याच्या भक्तांना आनंद होतो तोच हा ” मोदक” ! नैवेद्यासाठी विविध प्रकारचे मोदक केले जातात , परंतु गूळ खोबऱ्याच्या सारणाचा उकडीचा लुसलुशीत मोदक हा पारंपारिक आणि त्याला वरील पौराणिक आधार लाभलेला ! गूळ हा शक्तिवर्धक आणि नारळ हे साक्षात श्रीफळ … म्हणूनच गणपतीच्या नैवेद्यात उकडीचे मोदक करण्याचा आनंद अवर्णनीय !

उकडीचे मोदक हा जितका जिव्हेला आनंद देणारा पदार्थ , तितकाच स्वतः बनवायचा म्हटले की भल्या भल्या सुग्रणींच्या कपाळावर घर्मबिंदु चमकवतो ! याचे मुख्य कारण म्हणजे मोदकांची उकड .. आपण कितीही पदर खोचून किंवा टीशर्टच्या बाह्या वर दुमडून सुरुवात केली तरी कुठे तरी माशी शिंकतेचं ! कधी उकड कोरडी होते आणि मोदक बिचारा भेगाळतो किंवा फुटतो तर कधी उकड इतकी सैल होते , की मोदकाच्या कळ्या पाडतानाच त्या भुईसपाट होतात ! मग त्या उकडीच्या भाकऱ्या किंवा निवग्र्या करण्यावाचून काही उपाय राहत नाही . याहून जास्त सणाच्या दिवशी मन खट्टू होते ते वेगळेच !
माझ्या दैवकृपेने मी आजवर केलेल्या असंख्य मोदक प्रयत्नांना नेहमीच यश आलेय , अगदी पहिल्या प्रयत्नापासूनच ! म्हणून मी माझ्या अनुभवांनी जाणलेल्या आणि आमच्या घरातल्या ज्येष्ठ सुग्रणींना जवळून निरखून मगच काही टिप्स खालील रेसिपी मध्ये दिल्या आहेत . त्या जर तुम्ही पाळू शकलात तर निश्चितच मोदक फसणार नाहीत !

मोदकांची उकड मऊसूत निघणे , हे त्यासाठी वापरलेल्या तांदळाच्या पिठीवर म्हणजेच पिठावर अवलंबून असते . आता हे पहा , आपण कोणतेही तांदूळ घेतले व नीट साफ करून चक्कीतून दळून आणले तर ते पीठ हे सरसरीत किंवा अगदी म्हणायचे झाले तर हाताच्या बोटांना चरचरीत लागते . या पिठापासून आपण भाकऱ्या , थालीपीठे , भजी असे नेहमीच्या जेवणातले विविध पदार्थ बनवू शकतो . परंतु मोदकांच्या उकडीची पिठी बनवताना तांदूळ स्वच्छ धुऊन , तो सावलीत किंवा घरातच पंख्याखाली सुती कापडावर वाळवून मग दळला जातो . तांदूळ धुतल्यावर तो जितके पाणी शोषून घेऊ शकतो तितकेच पाणी त्यात राहून तो जरासा फुगतो . तसेच धुतल्याने त्यावरील कोंडा किंवा तत्सम काही जाड आवरण असेल तर ते निघून जाते. असे तांदूळ दळल्यावर ते पीठ अगदी रेशमासारखे मऊसूत असते , आणि त्यात अंगीभूत चिकटपणा देखील असतो ! ही मोदकाची पिठी लवकर खराब होऊ शकते किंवा जास्त जुनी पिठी वापरली तर मोदक एकतर भेगाळतात किंवा वातड होतात. ( संदर्भ : ” स्वयंपाकघरातील विज्ञान ” – डॉ. वर्षा जोशी ) शक्यतो मोदकाची पिठी घरी बनवण्यासाठी , आंबेमोहोर किंवा बासमती अशा सुवासिक तांदळाचा वापर करावा . घरी बनवणे शक्य नाही झाले तर बाजारात निरनिराळ्या ब्रँडची सुगंधी मोदक पिठी मिळते , तिची फक्त एक्सपायरी डेट पाहून खरेदी करावी .

मोदक सुबक रित्या वळणे ही एका सुगरणीची कलाच म्हटले पाहिजे , परंतु याचा अर्थ असा नाही की कोणी ते बनवूच शकणार नाही . मी लहानपणापासून आईला मनापासून जर कधी स्वयंपाकघरात मदत केली असेल तर ती ही गणेशोत्सवातच , हे मोदक वळताना … कारण बाप्पा आणि मोदक ह्या दोघांवर माझे प्रचंड प्रेम! पहिल्या प्रयत्नात मोदक अगदी सुरेख जमणे थोडे अशक्य , परंतु ” प्रयत्नांती परमेश्वर ” ह्या वाक्प्रचारावर जर तुमचा विश्वास आजवर बसला नसेल , तर हे मोदक बनवताना नक्की बसेल ! आणि त्यातूनही नाहीच जमले तर घालायचे साच्यात आणि वळायचे मोदक ! हाय की आपला बाप्पा ,घेईल आपली धडपड गोड मानून !

मग खाली दिलेली रेसिपी आणि विडिओ लिंक नक्की पहा आणि करा सुरुवात !


- मोदकांच्या उकडीसाठी:
- २ कप = ३०० ग्रॅम्स सुवासिक तांदळाची बारीक पिठी ( बासमती किंवा आंबेमोहोर )
- २ कप = ५०० ml पाणी ( ज्या कपाने पिठी मापलीये त्याच कपाने पाणी मापून घेणे ) ( पाणी आणि पिठीचे प्रमाण १:१)
- १/२ टीस्पून तूप
- मोदकांचे सारण बनवण्यासाठी :
- २ कप = २०० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- पाऊण कपाहून जास्त आणि एक कपाहून थोडा कमी गूळ बारीक चिरून किंवा किसून ( १८० ग्रॅम्स )
- १ टेबलस्पून पांढरे तीळ
- २ टेबलस्पून खसखस
- १ टीस्पून जाडसर कुटलेली वेलची पावडर
- १ टेबलस्पून तूप
- सर्वप्रथम गणेशाचे मनोमन नामस्मरण करून नैवेद्य बनवण्यास सुरुवात करूया ! पहिल्यांदा आपण मोदकाची उकड काढून घेणार आहोत. एका खोलगट जाड बुडाच्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे . जितके कप तांदळाची पिठी घेतली आहे त्याच कपाने पाणी घ्यावे सम प्रमाणात , कमी नाही की जास्त ! जास्त पाणी घेतले तर उकड फार चिकट होते आणि कमी पाणी घातले तर उकड कोरडी पडून मोदकाला भेगा पडतात !
- पाण्यात अर्धा टीस्पून तूप घालावे म्हणजे उकड छान मऊ होते . जास्त तूप घालू नये नाहीतर उकड पसरते म्हणजेच फार मऊ होते आणि मोदकांचा आकार देताना त्रास होतो.
- पाणी उकळत आले की आच मंद करावी व तांदळाची पिठी त्यात वैरावी. चमच्याने चांगली पाण्यात ढवळून घ्यावी. पिठीने पाणी शोषले की गॅस बंद करून पातेल्यावर घट्ट झाकण ठेवून वाफ दवडू देऊ नये.
- उकड जरा थंड होतेय तोवर मोदकाचे सारण बनवून घेऊ. एका जाड बुडाच्या कढईत किंवा नॉनस्टिक कढईत १ टेबलस्पून तूप घालावे. किसलेला गूळ घालून मंद आचेवर वितळू द्यावा .
- ५ ते ७ मिनिटांत मंद आचेवर गूळ पूर्णपणे वितळला की त्यात ओले खोबरे, खसखस आणि पांढरे तीळ घालावे हे सर्व मिश्रण एकत्र ढवळत छान कोरडे होईपर्यंत शिजवावे. गूळ आणि नारळाचे पाणी कढईत राहू देऊ नये. फार जास्त वेळ शिजवले तर गुळाचा पाक होऊन सारण कडक होते , आणि मोदक फाटतात ! फार पातळ सारण राहिले तर मोदक वळताना त्रास होतो.
- वेलची पावडर घालून , ढवळून गॅस बंद करावा. सारण पूर्ण थंड होऊ द्यावे.
- उकड जरा उष्ण असतानाच मळायला घ्यावी , पूर्ण थंड झाल्यावर मळताना त्रास होतो. हाताला तूप किंवा तेल लावून , पाणी न वापरता उकड चांगली दाब देऊन मळून घ्यावी .
- मोदक बनवण्यासाठी सारण आणि उकड तयार आहे . हाताशी एक पाण्याची वाटी व तुपाची वाटी तयार ठेवावी. तसेच एका थाळीला तुपाचा हात लावून एक मलमल किंवा सुती कापड भिजवून घट्ट पिळून तयार ठेवावे .
- हाताच्या तळव्यांना तूप लावून उकडीचा छोटा गोळा बाजूला काढावा व बाकीची उकड पातेल्याखाली झाकून ठेवावी म्हणजे कोरडी पडत नाही .
- आपल्याला ज्या आकाराचे मोदक बनवायचे आहेत त्या आकाराचे छोटे गोळे बनवून घ्यावेत . गोळ्याला मध्यभागी अंगठ्याने खोल दाबून एका छोट्या वाटीचा आकार द्यावा . हाताच्या दोन अंगठ्यांचा व बोटांचा वापर करत गोल फिरवत मोदकाची पातळ पारी करून घ्यावी . ही पारी सुबक , एकसंध बनली गेली पाहिजे , जर ती भेगाळली तर उकड परत चांगली मळून घ्यावी .
- पारी हाताच्या तळव्यावर ठेवून हाताची पहिली दोन बोटे पाण्यात बुडवून मोदकांना कळ्या पाडून घ्याव्यात . अगदी जवळ जवळ आणि जितक्या जास्त कळ्या तितका तो मोदक देखणा दिसतो .
- आता मोदकात सारण भरून घेऊ . सारण फार दाबून भरू नये , एक किंवा २ चमचे भरून ठीक ! हाताची पोकळी करून मोदकांच्या कळ्या जवळ आणून मोदकांचे शिर बंद करून घ्यावे. व्यवस्थित चिमटीत पकडून मोदक , नाहीतर उकडताना मोदक उमलतात!
- अशाच प्रकारे एका भरण्यात मोदकपात्रात बसतील एवढे मोदक बनवावे . जसजसे मोदक बनतील तसतसे ते कपड्याखाली झाकून ठेवावेत .
- मोदकपात्रात पाणी उकळत आले की मोदकांच्या थाळीला तूप लावून किंवा केळीच्या पानावर मोदक ठेवावेत . थाळी मोदकपात्रात ठेवून झाकण घालून मध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटे उकडून घ्यावेत .
- गरम गरम मोदकांवर सजून तुपाची धार घालून नैवेद्य दाखवावा !
- " गणपती बाप्पा मोरया !"
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply