काही वर्षांपूर्वीपर्यंत माझ्या चटखोर जिभेचे “ळ ” अक्षराने अंत होणाऱ्या भाज्यांशी नेहमीच वाकडे होते ! घोसाळी, शिराळी , दुधी भोपळा, पडवळ हे अगदी माझ्या बाजार पिशवीतून तडीपार … परंतु तरीही आई दुधी भोपळ्याचा हलवा , चणा डाळ घालून झणझणीत आमटी आणि माझ्या आवडत्या वालाच्या भाजीत पडवळ घालून कसे बसे मला खाऊ घालायचीच आणि आज्जीचे वटारलेले डोळे पाहून तर गप गुमान मी ते गिळायचे देखील !
परंतु जेव्हा स्वयंपाकघराची धुरा स्वतःच्या हातात सांभाळायची वेळ आली तेव्हा मात्र रोज काय डब्यात न्यायचे , संध्याकाळी काय भाजी बनवायची याचा विचार करता करता ब्रह्माण्ड आठवले ! खाण्यापिण्याच्या बाबतीत जर हे आवडत नाही ते आवडत नाही म्हटले की आपोआपच पर्याय कमी होऊन तेच तेच खायचा कंटाळा येऊ लागतो . आणि म्हटले तर या ” gourd ” कुटुंबातल्या फळभाज्या पौष्टिकतेत अगदी अव्वल!पोटातली उष्णता कमी करून शरीराला थंडावा देणाऱ्या , रक्त शुद्धीसाठी अगदी उपयोगी ! हळू हळू मग या भाज्यांशी मी येनकेनप्रकारेण मैत्री जमवलीच , आपल्याला कोणाशी जास्त वेळ कट्टी राहताच येत नाही , हो कि नाही ! मग कधी घोसाळ्याची चणा डाळ टाकून घट्ट मसालेदार भाजी . शिराळ्याची चटणी , घोसाळ्याचे भरीत किंवा दुधी भोपळ्याचे रायते असे पदार्थ वारंवार बनू लागले आणि सगळ्यांच्या आवडीचे कधी झाले कळलेच नाही !
मागे एकदा आम्ही सहपरिवार अष्टविनायक यात्रेला गेलो होतो , तिथे वाटेत हायवे वरच्या एका ढाब्यावर झणझणीत मिसळ पाव चापतांना माझे लक्ष वारंवार तिथे ठेवलेल्या तेलाच्या कढईकडे जात होते , कांदा भजी , बटाटा भजी आणि तिसऱ्या पातेल्यात बेसनात काय बुडवून ठेवलेय याची उत्सुकता मला लागून राहिली होती! तरी हात धुवायचे निमित्त करून मी भजी तळणार्या काकूंच्या भवती एक गिरकी मारलीच , तरीही नाही समजले मग मात्र भोचकपणे विचारलच , ” काकू ही कसली भजी हो ..” आडवे मळवट कुंकू लावलेल्या काकू तोंडाला पदर लवून फिस्कनं हसून उत्तरल्या ,” घोसाळी हायेत ताजी मळ्यातली , खाती का गरम भजी , ५ मिंट थांब , देती काढून ..”
मग आमच्या ड्राइवर दादांसोबत सगळ्यांनी पोट भरलेले असूनसुद्धा त्या गरमागरम घोसाळ्यांच्या भज्यांवर जो काही आडवा हात मारलाय , अहाहा तिखट ओली लसणाची चटणी आणि गोडसर चवीची भजी ! बेसन तर इतके भारी फेट्ले होते काकूंनी की भजी तोंडात टाकताच गट्टम होत होते , इतकी खुसखुशीत !
आज हीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेयर करणार आहे , तुमच्या पाहुण्यांसाठी कधी मिक्स पकोडा मध्ये या घोसाळ्याच्या भजी नक्की करून पाहा , आवडतील त्यांना !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- २ घोसाळे ( २५० ग्रॅम्स )
- ८ हिरव्या मिरच्या
- पाव कप कोथिंबीर
- १ कप १२५ ग्रॅम्स बेसन
- तेल
- पाणी गरजेनुसार
- १ टीस्पून जिरे
- १ टीस्पून पांढरे तीळ
- १ टेबलस्पून रवा
- मीठ चवीनुसार
- घोसाळी स्वच्छ धुऊन त्यांच्या पातळ गोल चकत्या कापून घ्याव्यात . मी थोडे तिरके कापून त्यांना लांबट कापते , दिसायला छान दिसतात !
- चिरल्यानांतर लगेचच त्यांना थंड पाण्यात बुडवून ठेवावे , म्हणजे काळे पडत नाहीत.
- आता हिरवा मसाला वाटण्यासाठी , एका मिक्सरच्या भांड्यात जिरे, हिरव्या मिरच्या, आणि कोथिंबीर पाणी न घालता घट्ट गोळा वाटून घेऊ.
- आता बेसन मंद आचेवर भाजून घेऊ म्हणजे त्याला अजून खमंगपणा येईल. बेसनाचा रंग बदलू द्यायचा नाहीये , फक्त एकच मिनिट भाजून घ्यायचे आहे.
- एका मोठ्या बाऊलमध्ये हे भाजलेले बेसन घालून त्यात रवा , वाटलेला हिरवा मसाला , चवीपुरते मीठ आणि ३ टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालून नीट एकत्र करून घ्यावे. गरजेनुसर पाणी घालून भज्यांचे पीठ सरसरीत करून घ्यावे. बेसनाचे मिश्रण चांगले हलके होईपर्यंत फेटावे . जितके फेटले जाईल तितक्या भजी हलक्या बनतील! हे मिश्रण फार पातळ नसावे . मी पाऊण कप पाणी वापरले आहे . मिश्रण झाकून थोडे १० -१५ मिनिटे बाजूला ठेवावे.
- भजी तळण्यासाठी मध्यम आचेवर कढाईत तेल तापवून घ्यावे. तेल चांगले तापले की आच मंद ते मध्यम ठेवावी आणि मगच घोसाळ्यांच्या तुकडयांना बेसनात घोळवून तेलात अलगद सोडावे. दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्यावेत.
- या गरमागरम भजी लाल मिरचीच्या ओल्या ठेच्यासोबत खूपच चविष्ट लागतात! नक्की करून पहा !

Leave a Reply