Ukadiche Modak recipe in Marathi-उकडीचे मोदक- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ:३० मिनिटे
बनवण्यासाठी वेळ:६० मिनिटे
किती बनतील : ३० -३५
साहित्य:
 • मोदकांच्या उकडीसाठी:
 • २ कप = ३०० ग्रॅम्स सुवासिक तांदळाची बारीक पिठी ( बासमती किंवा आंबेमोहोर )
 • २ कप = ५०० ml पाणी ( ज्या कपाने पिठी मापलीये त्याच कपाने पाणी मापून घेणे ) ( पाणी आणि पिठीचे प्रमाण १:१)
 • १/२ टीस्पून तूप
 • मोदकांचे सारण बनवण्यासाठी :
 • २ कप = २०० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
 • पाऊण कपाहून जास्त आणि एक कपाहून थोडा कमी गूळ बारीक चिरून किंवा किसून ( १८० ग्रॅम्स )
 • १ टेबलस्पून पांढरे तीळ
 • २ टेबलस्पून खसखस
 • १ टीस्पून जाडसर कुटलेली वेलची पावडर
 • १ टेबलस्पून तूप
Instructions
कृती:
 1. सर्वप्रथम गणेशाचे मनोमन नामस्मरण करून नैवेद्य बनवण्यास सुरुवात करूया ! पहिल्यांदा आपण मोदकाची उकड काढून घेणार आहोत. एका खोलगट जाड बुडाच्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे . जितके कप तांदळाची पिठी घेतली आहे त्याच कपाने पाणी घ्यावे सम प्रमाणात , कमी नाही की जास्त ! जास्त पाणी घेतले तर उकड फार चिकट होते आणि कमी पाणी घातले तर उकड कोरडी पडून मोदकाला भेगा पडतात !
 2. पाण्यात अर्धा टीस्पून तूप घालावे म्हणजे उकड छान मऊ होते . जास्त तूप घालू नये नाहीतर उकड पसरते म्हणजेच फार मऊ होते आणि मोदकांचा आकार देताना त्रास होतो.
 3. पाणी उकळत आले की आच मंद करावी व तांदळाची पिठी त्यात वैरावी. चमच्याने चांगली पाण्यात ढवळून घ्यावी. पिठीने पाणी शोषले की गॅस बंद करून पातेल्यावर घट्ट झाकण ठेवून वाफ दवडू देऊ नये.
 4. उकड जरा थंड होतेय तोवर मोदकाचे सारण बनवून घेऊ. एका जाड बुडाच्या कढईत किंवा नॉनस्टिक कढईत १ टेबलस्पून तूप घालावे. किसलेला गूळ घालून मंद आचेवर वितळू द्यावा .
 5. ५ ते ७ मिनिटांत मंद आचेवर गूळ पूर्णपणे वितळला की त्यात ओले खोबरे, खसखस आणि पांढरे तीळ घालावे हे सर्व मिश्रण एकत्र ढवळत छान कोरडे होईपर्यंत शिजवावे. गूळ आणि नारळाचे पाणी कढईत राहू देऊ नये. फार जास्त वेळ शिजवले तर गुळाचा पाक होऊन सारण कडक होते , आणि मोदक फाटतात ! फार पातळ सारण राहिले तर मोदक वळताना त्रास होतो.
 6. वेलची पावडर घालून , ढवळून गॅस बंद करावा. सारण पूर्ण थंड होऊ द्यावे.
 7. उकड जरा उष्ण असतानाच मळायला घ्यावी , पूर्ण थंड झाल्यावर मळताना त्रास होतो. हाताला तूप किंवा तेल लावून , पाणी न वापरता उकड चांगली दाब देऊन मळून घ्यावी .
 8. मोदक बनवण्यासाठी सारण आणि उकड तयार आहे . हाताशी एक पाण्याची वाटी व तुपाची वाटी तयार ठेवावी. तसेच एका थाळीला तुपाचा हात लावून एक मलमल किंवा सुती कापड भिजवून घट्ट पिळून तयार ठेवावे .
 9. हाताच्या तळव्यांना तूप लावून उकडीचा छोटा गोळा बाजूला काढावा व बाकीची उकड पातेल्याखाली झाकून ठेवावी म्हणजे कोरडी पडत नाही .
 10. आपल्याला ज्या आकाराचे मोदक बनवायचे आहेत त्या आकाराचे छोटे गोळे बनवून घ्यावेत . गोळ्याला मध्यभागी अंगठ्याने खोल दाबून एका छोट्या वाटीचा आकार द्यावा . हाताच्या दोन अंगठ्यांचा व बोटांचा वापर करत गोल फिरवत मोदकाची पातळ पारी करून घ्यावी . ही पारी सुबक , एकसंध बनली गेली पाहिजे , जर ती भेगाळली तर उकड परत चांगली मळून घ्यावी .
 11. पारी हाताच्या तळव्यावर ठेवून हाताची पहिली दोन बोटे पाण्यात बुडवून मोदकांना कळ्या पाडून घ्याव्यात . अगदी जवळ जवळ आणि जितक्या जास्त कळ्या तितका तो मोदक देखणा दिसतो .
 12. आता मोदकात सारण भरून घेऊ . सारण फार दाबून भरू नये , एक किंवा २ चमचे भरून ठीक ! हाताची पोकळी करून मोदकांच्या कळ्या जवळ आणून मोदकांचे शिर बंद करून घ्यावे. व्यवस्थित चिमटीत पकडून मोदक , नाहीतर उकडताना मोदक उमलतात!
 13. अशाच प्रकारे एका भरण्यात मोदकपात्रात बसतील एवढे मोदक बनवावे . जसजसे मोदक बनतील तसतसे ते कपड्याखाली झाकून ठेवावेत .
 14. मोदकपात्रात पाणी उकळत आले की मोदकांच्या थाळीला तूप लावून किंवा केळीच्या पानावर मोदक ठेवावेत . थाळी मोदकपात्रात ठेवून झाकण घालून मध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटे उकडून घ्यावेत .
 15. गरम गरम मोदकांवर सजून तुपाची धार घालून नैवेद्य दाखवावा !
 16. " गणपती बाप्पा मोरया !"
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/ukadiche-modak-recipe-marathi/