“तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका ,आमच्याशी कधी भांडू नका !” संक्रांतीच्या या चारोळ्या जवळजवळ सर्वांनाच पाठ असतात !
इतर दिवशी घराघरांत, शेजारीपाजारी आणि नातेवाईकांत उडणारे छोटे मोठे खटके या दिवशी विस्मरणाच्या बासनात गुंडाळून भूतकाळात विलीन केले जातात ! एरवी सासवा-सुना, नणंद – भावजय, आणि जावा -जावांमधली शीतयुद्धे मकरसंक्रांतीच्या दिवशी मात्र भरजरी साड्या आणि सौभाग्याच्या विविध अलंकारांनी नटून तहाची बोलणी करू लागतात ! आहेच हा सण असा , प्रेम आणि उत्साह पसरवणारा !
हेमंत – शिशिर ऋतूतील थंडीचा कडाका सोसण्यासाठी शरीराला जशी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते, तशीच नात्यांत स्निग्धता , ऊब आणण्यासाठीच जणू काही संक्रांत येते ! आपले बाकी सण हिंदू पंचांगानुसार तिथीप्रमाणे साजरे केले जातात ,परंतु संक्रांत ही त्याला एक अपवाद ठरू शकते . आपली आदित्यराणूबाई म्हणजेच सूर्यदेवता १२ राशींमध्ये भ्रमण करीत असते. जेव्हा सूर्य धनु राशीत भ्रमण करीत असतो ,तो आपला हेमंत ऋतूतील धनुर्मास म्हणजेच धुंधुर्मास ! बळीराजा शेतात पिकलेले सोन्यासारखे धान्य पाहून सुखावलेला असतो, आणि थोडे या शेतकरी राजाला आराम द्यावा म्हणूनच कि काय धुंधुरमासात निसर्गाने आपल्या भाज्या आणि फळरुपी खजिन्याची लयलूट केलेली असते! धुंधुरमासाचा शेवटचा दिवस हा भोगी , ज्या दिवशी आपल्या कष्टाचे फळ निरनिराळ्या खाद्यपदार्थांच्या रूपात भोगून बळीराजा तयार होतो , सुगीच्या म्हणजेच कापणीच्या दिवसांना ! भोगीनंतर येते मकर संक्रांत , धनु राशीतून मकर राशीत सूर्य प्रवेश करतो . आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांनी त्यांच्या विवरणात संक्रांतीच्या दिवसाचे महत्तव फार उत्तम प्रकारे सांगितले आहे ,” संक्रांत ही थंडीच्या दिवसांत येत असल्याने, शरीराला उष्णतेची फार गरज भासते. काळ्या वस्त्रात सूर्याची उष्णता जास्त शोषली जाते , म्हणून संक्रातीला काळी वस्त्रे परिधान करण्याची पद्धत आहे ! प्रकृतीने उष्ण असलेल्या तिळाच्या तेलाचा अभ्यंग करणे, तीळ वाटून अंगाला लावणे, तिळगुळाचे लाडू बनवून खाणे , असे अनेक आचार -विचार प्रचारात दिसून येतात !घराबाहेर राहून सूर्याची उष्णता जास्तीत जास्त मिळावी म्हणून गच्चीवर पतंग उडवण्याची प्रथा रूढ झालेली दिसते !”
तिळाचे लाडू , गुळपोळी या पदार्थांशिवाय संक्रांत ही अपूर्णच ! आणि हे पदार्थ बनवणे हेदेखील धीराचे काम! मला आठवतेय ,लहानपणी आम्ही संक्रांतीच्या संध्याकाळी नवीन परकर पोलके घालून तिळगुळ वाटायला निघायचो! चाळीतल्या एखाद्या तरी काकूंचा तिळगुळाच्या लाडवांचा पाक बिघडलेला असायचा आणि त्यांचे टणक लाडू खपविण्यासाठी त्या जरा अंमळ जास्तीच गोड बोलत आमच्या हातांत लाडू कोंबायच्या ! चाळीतल्या बोळात बसून परकरांत आणि सदऱ्याच्या खिशांत आणलेले हे सारे लाडू एकत्र करून त्यांची वर्गवारी व्हायची , कशी तर.. चिमण दातांनी चावून , मस्त चुरचुरीत लाडू, आणि कडक लाडू यांत! मस्त लाडवांचा तुम्हाला सांगायलाच नको , लगेचच फडशा पडायचा आणि जे लाडू टणक असायचे त्यांच्यासाठी आजीचा अडकित्ता पळवून आणला जायचा! मग काय , करा चुरा लाडवांचा आणि भरा की बकाणा ! पाक बिघडवलेल्या काकूंना ही लाडू संपण्याचे समाधान मिळायचे ! संक्रांत हेच तर मनांवर बिंबवते की ” सगळ्यांशी प्रेमाने वागा, आणि कोणाची मने दुखावू नका!” होते हो कधी कधी रेसिपी मध्ये गडबड , पण मी खात्रीने सांगते हां , ही माझी लाडवांची रेसिपी करूनच बघा , नक्की छान होतील लाडू आणि मला लिहायला विसरू नका , खाली कंमेंट सेक्शन मध्ये !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- 200 ग्रॅम्स तीळ ( पॉलीश न केलेले गावठी तीळ घेतले तर उत्तमच )
- 200 ग्रॅम्स चिक्कीचा गूळ
- 100 ग्रॅम्स =१/२ कप शेंगदाणे
- 50 ग्रॅम्स =1/2 कप किसलेले सुके खोबरे
- 2 टेबलस्पून तूप
- 1 टीस्पून वेलची पावडर
- एका कढईत शेंगदाणे भाजायला घेऊ. कढई चांगली तापवून मध्यम आचेवर सतत हलवून शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊ. तिळाच्या लाडवांची सामग्री भाजताना एकच दक्षता घ्यावी कि कोणतीही वस्तू करपू देऊ नये. नाहीतर लाडवांची चव खराब होते. शेंगदाणे एकसमान भाजून झाले ( लागणारा वेळ : ८ मिनिटे ) की एका ताटलीत काढून पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यांच्या साली काढाव्यात!
- त्याच कढईत आपण आता तीळ भाजून घेणार आहोत. थोडे थोडे तीळ घालून आपण ते हलक्या करड्या रंगावर छान परतून घ्यायचे आहेत. जितके तीळ छान चुरचुरीत भाजले जातील ना तितके लाडू मस्त चुरचुरीत बनतात. तीळ भाजून एका ताटलीत काढून थंड होऊ द्यावेत.
- आता किसलेले सुके खोबरे भाजून घेऊ. खोबरे बारीक किसलेले असले तर ते लाडवाचा मिश्रणात चांगले एकजीव होते.
- भाजलेल्या शेंगदाण्यांना हलके कुटून घेऊ जेणेकरून त्यांचे फक्त एका दाण्याचे २ तुकडे होतील. जास्त बारीक पावडर करू नये. सारी भाजलेली सामग्री एकत्र मिसळून घेऊ.
- कढईत २ टेबलस्पून तूप वितळवून घेऊ. मंद ते मध्यम आचेवर गूळ विरघळून घेऊ. आपण गूळ मंद आचेवर ७ मिनिटे शिजवून घेतला आहे. गुळाचा पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गुळाच्या पाकाचे काही थेंब एका पाणी भरलेल्या वाटीत टाकावेत. जर ह्या पाकाची हातात गोळी बनत असेल आणि ताटात आपटल्यावर टणकन आवाज येत असेल तर समजावा कि गुळाचा गोळीबंद पाक तयार झाला. या उप्पर जर गूळ शिजवला तर लाडू अतिशय टणक होतात.
- वेलची पूड घालून गॅस बंद करावा. या गुळाच्या पाकात बाकीचे सारे मिश्रण मिसळून घ्यावे.
- आता खरी परीक्षेची वेळ, हाताच्या तळव्यांना तूप चांगले चोपडून लाडवांचे मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात करावी. थोडे हाताला चटके बसतात परंतु तूप हाताला लावले तर थोडे कमी जाणवतात . छोटे छोटे लाडू बांधून घ्यावेत. लाडू वळता वळता जर मिश्रण थंड होऊन कोरडे पडले तर परत मंद आचेवर फक्त ३० सेकंड गरम करून परत लाडू वळावेत. लाडू वळून झाले कि एका घट्ट हवाबंद झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत.
- महत्त्वाची टीप: जेव्हा आपण तीळ भाजून घेत असतो तेव्हा तिळाचा एक भरणा भाजून थंड झाला की मग लगेच एका हवाबंद डब्यात भरून ठेवावा म्हणजे बाहेरच्या हवेने तीळ नरम न पडता खुसखुशीत राहतात आणि पर्यायाने आपले तिळाचे लाडू सुद्धा !

Leave a Reply