शूरवीर महारथींचा देश माझा – महाराष्ट्र माझा! शौर्य आणि देशाभिमान नसानसांत भिनलेला ! मिळमिळीतपणा ना वागण्यात , नाही जेवणात गावायचा ! काय मंडळी खर आहे कि नाही !
वागण्यातला रोखठोकपणाला जोड मिळते संस्कारांची आणि विचारसरणीची , आणि जेवणाला चव आणि झणझणीतपणा देतो , इथले विविध प्रकारचे मसाले – जे प्रत्येक गावागणिक वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. असाच हा आपला काळा मसाला – भाजीचे जेवण असो कि वशाटाचे , हा मसाला पडला कि नुसत्या वासाने जिभा खवळल्या म्हणजे समजा !
मला आणि पार्ट्नरला झणझणीत खायला खूप आवडते, मागच्या वर्षो डिसेंबर मधे महाबळेश्वरच्या ट्रिप मधे सातार्याची झणझणीत मटण हांडी चापली होती. निघताना राहवल नाही म्हणून हॉटेलच्या मराठमोळ्या मालकाला विचारले की ” भावा ,अरे कोणता मसाला होता रे, अगदी आत्म्याच्या पण नाका तोंडातून पाणी आले”! इतका स्वाद होता त्या मटण रस्स्यात , काय सांगू !
त्याने हसत हसत सांगितले की , ” आमच्या आईसाहेबानी बनवलेला घरगुती काळा मसाला आहे. ” जी चव त्या मसाल्याची जिभेवर अजुनही रेंगाळतेय , विसरता विसरेना ! नंतर भीमथडी जत्रेत , चव कळण्यासाठी म्हणून, हा सोलापुरी काळा मसाला विकत घेतला आणि मला आठवतेय , हो नक्कीच संतकृपा महिला बचत गटाचा तो स्टॉल होता, जे उखळात कुटलेले मसाले आणि गावरान पद्धतीचे मडक्यातलं लोणचे बनवण्यासाठी भीमथडी जत्रे त दरवर्षी प्रसिद्ध आहेत! बोलघेवड्या विक्रेत्याने अगदी आपुलकीने मसाल्यात वापरलेल्या जिन्नसांची यादी सांगितली. या मसाल्याचा वापर करून मी एकदा झणझणीत भरली वांगी केली आणि घरात सगळ्यांनी मिटक्या मारीत संपवली. मग मनाशी ठरवले कि आता हा काळा मसाला घरात बनवूनच टाकूया. मसाला घरात बनवणे हा माझा छंद म्हणण्या पेक्षा मी एका प्रॉजेक्ट सारखे त्यावर काम करते. “Research, Study, Plan, Trial and Finalize the recipe”! मग काय हा मसाला महाराष्ट्रातला नक्की कुठला इथून रिसर्च ला सुरुवात! माझे मित्रमैत्रिणी महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आहेत , एका नागपूरच्या मैत्रिणीने तिच्या आजीच्या जुन्या डायरीत लिहिलेल्या रेसिपीचा फोटो काढून मला पाठवला! जळगावच्या मैत्रिणीने तर छोट्या डब्यात भरून तिकडचा काळा मसाला पाठवला , माझ्याकडे ऑलरेडी भीमथडीचा मसाला होताच आणि मी असे काळ्या मसाल्यांचे निरनिराळे सॅम्पल्स जवळ घेऊन एकेकाची चव घेत ,त्यात काय फरक आहे ह्याचा शोध लावण्यात मग्न झाले. हसाल तुम्ही पण मसाले चाखून जीभेने हात टेकले कि बास्स आता माझा धूर काढलास!
वेड्यासारखे इंटरनेट धुंडाळल्यावर आणि लई फोनाफोनी केल्यावर थकलेल्या पापण्या कधी मिटल्या कळलेच नाही. ह्या एवढ्या गडबडीत एक गोष्ट चांगली घडली कि मला हे कळले कि सोलापुरात देखील हा काळा मसाला जास्त प्रमाणात वापरला जातो , मग काय… दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याउठल्या पहिल्यांदा विठाताईंना फोन लावला. जर तुम्ही माझा ब्लॉग पहिल्यांदा वाचत असाल तर विठाताईंची ओळख करून देते. या म्हटले तर माझ्या डोमेस्टिक हेल्प -हे एवढेच आमचे प्रोफेशनल नाते, पण वयाने आणि स्वभावाने आमच्या दोघिंची अशी काही सांगड घातली आहे कि आता त्या आमच्या कुटुंबाचाच एक भाग झाल्यात. विठाताईंना म्हटले आज माझ्याकडे जरा वेळ काढुनच या थोडे जास्त काम आहे.विठाताइंच गाव सोलापूरमधले अकलूज , दरवर्षी गावी जाऊन आपल्या वहिनी बरोबर मिळून त्या वर्षभराचा साठवणीचा काळा मसाला बनवतात ! लगबगीने ताई घरी आल्या आणि जे आम्ही २ तास मांडी घालून बसलो, मी हातात डायरी घेऊन आणि त्यांनी स्पीकरवर आपल्या वहिनीला फोन लावला. त्यांच्या वहिनीने सांगितलेला शब्दन शब्द टिपून घेतला डायरीत! अशी मिळाली हो मला एकदम गावाकडच्या काळ्या मसाल्याची रेसिपी ! मग काय लगेचच लागले कामाला , मसाला बनवल्यावर पहिल्यांदा विठाताईंना सॅम्पल चवीसाठी दिला. , खूप आवडला त्यांना , आणि म्हणाल्या की ताई अगदी गावच्यासारखा मसाला झालाय!
माझा आनंद . गगना पार, कठीण विषयाचा पेपर सोपा गेल्यासारखा !
आज तुमच्यासाठी खास आणलाय सोलापुरी काळा मसाला ! थोडे मेहनतीचे आणि धीराचे काम आहे – मसाले घरात बनवणे , परंतु एकदा जेव्हा हे मसाले तुमच्या स्वयंपाकाला चविष्ट बनवतात ना तेव्हा खरंच झालेल्या कष्टांचे चीज होते . म्हणतात ना ” मेहनतीचे फळ हे गोड सॉरी मसालेदार असते !”
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- 8 ग्रॅम जिरे
- 8 ग्रॅम खसखस
- 8 ग्रॅम बडीशेप
- 8 ग्रॅम मोहरी
- 3 ग्रॅम शाही जिरे
- 8 ग्रॅम पांढरे तीळ
- 1-2 ग्रॅम जायफळ
- 3 ग्राम दगडफूल
- 100 ग्रॅम्स बेडगी सुक्या लाल मिरच्या रंगासाठी
- 150 ग्रॅम्स पांडी सुक्या लाल मिरच्या तिखटपणासाठी - पांडीच्या ऐवजी संकेश्वरी किंवा लवंगी मिरच्या वापरल्या तरी चालतील
- 3 ग्रॅम्स दालचिनी
- 3 ग्रॅम जावित्री
- 3 ग्रॅम चक्रीफूल
- 3 ग्रॅम मसाला वेलची
- 3 ग्रॅम मायपत्री
- 3 ग्रॅम नागकेशर
- 3 ग्रॅम तिरफळे
- 3 ग्रॅम काळी मिरी
- 2 ग्रॅम मेथी दाणे
- 3 ग्रॅम लवंग
- 3 ग्रॅम हिरवी वेलची
- 60 ग्रॅम सुके खोबरे
- 70 ग्रॅम लांब आणि पातळ चिरलेला कांदा
- 5 ग्रॅम हिंगाचा खडा
- 3 ग्रॅम सुंठेची गाठ
- 10 ग्रॅम हळकुंडे
- 5 ग्रॅम तमालपत्र
- 50 ग्रॅम धणे
- तळण्यासाठी तेल
- 1 टेबलस्पून जाडे मीठ / खडे मीठ
- मसाले भाजण्यासाठी एका मोठ्या शक्यतो लोखंडी किंवा नॉनस्टिक कढईचा वापर करावा . एक मोठे उलथणे किंवा सिलिकॉन स्पॅचूलाचा वापर करावा. सर्वप्रथम आपण जे मसाले कोरडे भाजायचे आहेत ते भाजून घेऊ. कृपया मसाले भाजताना एकत्र ना भाजता वेगवेगळे खरपूस भाजावेत. प्रत्येक मसाला हा वेगवेगळ्या तापमानावर स्वतःचे सुगंध आणि गुणधर्म बदलतो म्हणून ते भाजताना तापमानाची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. तरच मसाला हा जास्त स्वादिष्ट आणि फार काळ टिकतो. आच शक्यतो मंद ते मध्यम ठेवावी . मसाले कोरडे भाजून घेतल्यावर एका मोठ्या परातीत बाजूला काढून थंड होऊ द्यावेत.
- आता आपण जे मसाले थोड्या तेलात भाजायचे आहेत त्यांना भाजून घेऊ. त्याच कढईत २ टेबलस्पून तेल घालून घेऊ आणि एकेक मसाला मंद आचेवर भाजून घेऊ. बिलकुल घाई न करता एकेक मसाला त्याचा सुगंध दरवळे पर्यंत छान खरपूस भाजावा. गरज लागली तर थोडे थोडे तेल आपण आणखी घालून मसाले भाजू शकतो. हे लक्षात घ्यावे कि हा मसाला नावाप्रमाणेच गडद करड्या रंगाचा काळसर असतो. मोठ्या आचेवर मसाला भाजला तर करपू शकतो आणि करपलेला मसाला फेकून देण्याशिवाय गत्यंतर उरत नाही . जेव्हा आपण मिरच्या भाजतो तेव्हा त्या अगदी चुरचुरीत भाजायच्या आहेत. मसाले भाजून झाले की थंड होण्यासाठी परातीत काढून घ्यावेत.
- सगळ्यात शेवटी आपण जे मसाले तेलात तळायचे आहेत त्यांना तळून घेऊ. अर्धा कप तेल कढईत घालू आणि मंद आचेवर एकेक मसाला खरपूस करड्या रंगावर तळून घेऊ. मसाले तळताना त्यांच्या रंगामुळे तेल थोडे काळसर होते, परंतु याच तेलात सारे मसाले तळून काढावे. हे मसाले देखील परातीत काढून थंड होऊ द्यावे.
- सारे मसाले थंड झाल्यावर आपण त्यांना थोडे थोडे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. पहिल्यांदा कोरडे भाजलेले मसाले वाटावेत, नंतर थोड्या तेलात भाजलेले मसाले , तेलात तळलेले मसाले आणि सगळ्यात शेवटी लाल मिरच्या वाटून घ्याव्यात . मिरच्या वाटतानाच त्यात खडे मीठ घालून फिरवावे म्हणजे मीठ चांगले मिसळले जाते.
- सगळे मसाले वाटून झाले की हातात ग्लोव्हस घालून किंवा मोठ्या उलथन्याने हे सर्व मसाले एकत्र मिसळून घ्यावेत. चांगले ५ -६ मिनिटे त्यांना मिसळत राहावे जेणेकरून ते चांगले मिसळून जातील.
- आपला साठवणीचा काळा मसाला तयार झाला आहे , एका घट्ट झाकणाच्या बरणीत हा भरून ठेवावा . त्यात एक हिंगाचा खडा घालावा आणि बरणीच्या झाकणाला कापड गुंडाळून ठेवावे. जर तुम्ही दमट वातावरणात राहत असल्यास हा मसाला एका झिपलॉक पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवला तरी वर्षभर टिकतो.
- कांदा तळताना लवकर ब्राऊन व्हावा म्हणून चिरल्यानंतर २-३ तासांसाठी एका ताटात पसरवून उन्हात वाळवून घ्यावा. त्याचे पाणी सुकून जाते आणि विश्वास ठेवा रेकॉर्ड ब्रेकिंग कमी वेळेत चटकन तळून होतो.

Leave a Reply