स्थळ: कोकणातील गजालवाडी हे पंचवीसेक उंबऱ्यांचे कौलारू टुमदार गाव
दिवस: भाद्रपद गणेश चतुर्थी
वेळ : वाडीत घरोघरी लोकांच्या गणपतींची आरती उरकून रात्री भजनी मंडळ आपापल्या घरी परतताना …
गंपूशेटच्या गजाली ऐकण्यात गुंग असलेला भजनीवृंद अचानक गेंगाण्याच्या तार सप्तकातल्या ओरडण्याने दचकतो .. ” तात्यांनू मी चंद्राचा तोंड बघलंय .. आता माझेवर चोरीयेचा आळ येतलंय … ” गावचे सरपंच राजाभाऊ गेंगाण्याचे रडे आवरायचे सोडून त्याच्यावरच कावतात , ” सगल्यांनी तुका बजावले होते ना, वर बगु नको , बगु नको , सगली पोरा कशी खाली मान घालून चालतत , तू एकलोच मोठो वर बगान अवलोकन करणारो, मोठो ss गॅलिलीओ … ” या तोफमाऱ्यात गंपू शेठ ने सुद्धा आपला दारुगोळा ठासून भरला , ” आता सगळ्यांची गाली लिओ , म्हंजे तुझ्यावरचा हा अरिष्ट टळेल ..” त्यानंतर गेंगाण्याने आपल्यावरील आळ टळावा म्हणून , कितीही लोकांना उकसवून भांडणाचे प्रयत्न केले तरीही त्याला गावात कोणीही शिव्या दिल्या नाहीत . बिचार्याने मग थेट सरपंचाच्या पोटच्या पोराप्रमाणे असलेल्या परसदारातील तवशा – काकडीच्या मांडवालाच हात घातला . तरीही त्याची डाळ सरपंचाने शिजू दिली नाही . या सगळ्या प्रसंगातील विनोद निर्मिती आणि कोकणातील परंपरा अफलातून रित्या लिहिली आणि पडद्यावर घडवून आणलीय , ते ” मालवणी डेज ” या काही वर्षांपूर्वी झी मराठी वरील प्रसारित झालेल्या मालिकेत !
आज हा ब्लॉग लिहिण्याच्या निमित्ताने , माझ्या वाचकांसाठी हा मजेदार प्रसंग लिहावासा वाटला . कोकणात गणपती – गौरीला जितके निसर्गरूपात पूजले जाते , तितके कदाचितच इतरत्र कुठे पाहण्यात येत असावे . घाम गाळून केलेली आषाढातील आवणी , श्रावणसरींनी चिंब तृप्त झालेली धरणी , भादवात हिरवीगार झालेली डोलणारी शेते, गणपती बाप्पाला पाटावर बसवून दाखवत डोक्यावरून मिरवत घरी आणले जाते ! कुठे सुगडींच्या , तर कुठे मातीच्या मुखवट्यांच्या , तर कुठे पाणवठ्यावरून खड्यांच्या रूपात आणलेल्या माहेरवाशिणी गौरी घरात विसावतात !
भाद्रपद शुक्ल चतुर्थी पासून सुरू झालेला गणेशोत्सव म्हणजे आप्तेष्ट, मित्र परिवार, माहेरवाशिणीची भेट यामुळे अत्यानंदाचा सोहळा!रोज बाप्पासाठी वेगळा खाऊ, प्रसादाची खिरापत , त्यानंतर आपल्या गणपती बाळामागे माहेरपणाला गौराईचे आगमन , या ना त्या कारणाने स्वयंपाक घरात गोडाचा घमघमाट पसरलेला!
कोकणवासीयांना दारातल्या लेकुरवाळ्या पपई, चिबूड , भोपळा, पपनस, पडवळ , तवशावर खूप माया! फक्त खाण्यासाठीच नाही तर गणपतीच्या माटी वर कृत्रिम सजावटीपेक्षा या फळा- भाज्यांना बांधून सजवण्यात येते . कोकणात जून काकड्यांना तंवसे म्हणतात . या पावसाळ्यातल्या काकड्यांना अप्रतिम वेगळी अशी चव .. आमच्याकडे गणपतीला प्रसादात मिश्र फळांची खिरापत वाटली जाते , त्यात पपनस नी तंवसे असले की काय चव येते सांगू …आरतीला येणारे खिरापतीचे जरा अधिकच द्रोण त्या दिवशी उचलतात !
हरताळका – गणेशोत्सवाचे वेध लागले की पाखाडीवरून जाताना कोणाच्या दारात तवशा – भोपळ्याचा वेलू बहरलाय नी कोणाच्या परसदारातून पिकलेल्या चिबुडाचा घमघमाट येतोय , हे बरोब्बर हेरले जाते . मग कधी आपसांत प्रेमाने यांची देवाणघेवाण होते तर कधी हळूच रात्रीच्या अंधारात कवाडीवर टांगा टाकून मिश्किल कोल्हेकुई करत तंवसे नी भोपळे पळवून खट्याळपणाला ऊत येतो ! रत्नागिरी स्थित माझी फेसबुक मैत्रीण आणि ज्येष्ठ मानस भगिनी स्वाती ताई जोशी , यांनी आपल्या एका लेखात हरताळकेच्या आदल्या दिवसाची एक सुंदर कोकणी परंपरा – ‘अवार्णा ‘ याविषयी लिहिले आहे .या प्रथेप्रमाणे घरातील कर्त्या स्त्रीने – म्हणजे सासूबाई , आजेसासूबाई किंवा तत्सम ज्येष्ठ स्त्री आपल्या घरातील लेकीसुनांना कौतुकाची थाप म्हणून “आवरणं ” साजरी करते . त्या दिवशी घराची झाडलोट तसेच दुसऱ्या दिवशीची हरतालिकेच्या पूजेची तयारी यांमुळे गोडाधोडाचा परंतु जरासा कमी फाफटपसाऱ्याचा स्वयंपाक केला जातो , आणि यात गोडाचे पोळे बनवले जातात ! स्वाती ताईंच्या पोस्टची लिंक येथे देत आहे : https://www.facebook.com/swati.joshi.589/posts/4210577252346429
त्यानंतर पूर्वा नक्षत्रात आगमन झालेल्या गौरीच्या ववशांत म्हणजे सुपांत खीर नी भोपळ्याचे घारगे किंवा तवशांचे घारगे तर घरी आलेल्या पै पाहुण्यांना , आप्तेष्टांना, पटापट गोडाच्या आंबोळ्या वरून तूप घालून नारळाच्या दुधासोबत वाढणे, घरच्या अन्नपूर्णेसाठी सोईस्कर ठरते!
ही गोडाची आंबोळी म्हणजेच तवशाचे पोळे खास हरताळका आणि गौरी विशेष! परंतु रोजच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यात हे छोटुसे गोड पॅनकेक म्हणून सुद्धा देऊ शकता कारण या पोळ्यांचा हळदवी रंग खाणाऱ्याला लगेच आकर्षित करतो . मग आता या पावसाळ्यात बाजारात गावरान काकड्या मिळत आहेत तर व्हा लाभार्थी या गोड पोळ्यांचे !

- साहित्य:
- • १ कप = २०० ग्रॅम्स लहान दाण्यांचा तांदूळ - सुवासिक प्रतीचा असला तर उत्तम
- • पाव कप = २५ ग्रॅम्स पोहे , स्वच्छ धुऊन
- • अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ताजे खोबरे
- • अर्धा टीस्पून हळद
- • पाव कप = ५० ग्रॅम्स गूळ
- • १ जून काकडी ( तंवसे ) किसून
- • पाव टीस्पून मीठ
- • तेल
- कृती:
- • तांदूळ स्वच्छ धुऊन २ कप पाण्यात ८ ते १० तासांसाठी भिजत घालावेत . तांदूळ भिजले की ते पाणी फेकून न देता बाजूला वाडग्यात काढून घ्यावे .
- • तांदूळ , पोहे , गूळ , खोबरे आणि हळद मिक्सरमधून साधारण पाऊण कप पाणी घालून बारीक परंतु घट्टसर वाटून घ्यायचे आहे .
- • वाटलेले पोळ्याचे पीठ झाकून साधारण दहा तासांसाठी उबदार जागी ठेवून द्यावे .
- • पीठ दहा तासानंतर तयार होते . तेव्हा काकडी सोलून किसून घ्यावी . या किसात मीठ घालावे आणि पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यावा .
- • काकडीचा कीस त्याला सुटलेल्या पाण्यासकट आंबोळीच्या पिठात मिसळून घ्यावा . गरज असेल तर अगदी थोडे किंचित पाणी मिसळून पीठ तव्यावर घालण्याइतपत सरसरीत करून घ्यावे .
- • मध्यम ते मोठ्या आचेवर काहील किंवा नॉनस्टिक तवा चांगला तापवून घ्यावा . त्यावर थोडे तेल पसरवून घ्यावे .
- • आच मध्यम करून एक ते दीड डाव पोळ्याचे पीठ तव्याच्या मध्यभागी नीट गोलाकार पसरवून घ्यावे . जरासे जाडसरच पोळे घालावेत . दोन मिनिटे मंद आचेवर झाकून शिजू द्यावी . त्यानंतर पोळा उलटून दुसऱ्या बाजूने देखील २- ३मिनिटे शिजवून घ्यावा .
- • हे पोळे गाडी थंड झाले तरी लुसलुशीत लागतात . वरून तूप घालून नारळाचे दूध आणि गुळाच्या मिश्रणासोबत हे खावयास द्यावे .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply