
“Variety is the Spice of Life!” नवीन नवीन अनुभव , आयुष्याची नागमोडी वळणे ,जीवन जगणे अतिशय रंजक बनवून टाकतात .
ही वरील उक्ती मला तर भारतीय खाण्याच्या बाबतीतही अगदी योग्य जाणवते . बघा ना , जसे वेगवेगळे अनुभव आयुष्य सुंदर बनवतात तसेच भारतीय जेवणातले विविध मसाले प्रत्येक खाद्यपदार्थाची रुची वाढवतात! उदाहरणादाखल जास्त दूर जायलाच नको, महाराष्ट्रातच विविध प्रदेशांत निरनिराळे मसाले घरी कांडले जातात आणि एकच पदार्थ निरनिराळ्या महाराष्ट्रीयन थाळीत वेगळ्या रुचीचा बनतो!
हा ब्लॉग लिहिण्यापूर्वीच पार्टनरच्या ऑफिसमधल्या सहकर्मचारीणीला व्हॉट्सअँपवर भरल्या वांग्याची रेसिपी देत होते. ही आमची मैत्रीण आयुषी मोहंती मूळची उडीसाची , परंतु नोकरीमुळे पुण्यात काही वर्षांपासून स्थायिक! मिष्टान्नावर प्रचंड प्रेम असले तरी तिखटजाळ खाण्यात एकदम पटाईत. तिला महाराष्ट्रीयन जेवणाची ओढ पुण्यात राहायला लागल्यापासूनच लागली ! मी कोल्हापूरला गेले तेव्हा आवर्जून तिच्यासाठी कांदा लसूण मसाला उर्फ कोल्हापुरी चटणी विकत आणून दिली होती. या पठ्ठीने चक्क रोज पोळीबरोबर आणि भाताबरोबर तोंडी लावण्यात संपवली. मजेचा भाग सोडला तर तिचे हे खाद्य प्रेम मला खूप भावते. भरली वांगी हा तिचा वीक पॉईंट , सगळ्या महाराष्ट्रीयन मैत्रिणी तिच्यासाठी डब्यात जास्तीची भरली वांगी न चुकता घेऊन येतात !मीही तिला आता हीच रेसिपी सांगत होते . तिने मला विचारले तेव्हा पहिल्यांदा मी थोडी विचारात पडले की हिला नक्की कोणत्या पद्धतीची भरली वांगी सांगू ? म्हणजे बघा ना आमच्या कोकणात भरल्या वांग्यात शेंगदाण्याचा कूट, कांदा – खोबऱ्याचे – कोथिंबीरीचे वाटण आणि न चुकता कोकणी किंवा मालवणी मसाला घातला जातो . जरा पुण्याकडे सरकलो की ब्राह्मणी पद्धतीच्या भरल्या वांग्यात कांदा लसूण वर्ज्य करून गोडा मसाला आणि चिंच गूळ घालायला विसरत नाहीत! उत्तर महाराष्ट्राची बातच निराळी , पांढरे तीळ , कारळे , खसखस , शेंगदाणे यांचा मुक्त हस्ते वाटणात वापर करून वर त्याला झणझणीत बनवले जाते , वेगवेगळे मसाले वापरून ! मग तो तर्री देणारा कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला असो , सातारा सोलापूरचा काळा मसाला असो , की वऱ्हाडी पद्धतीचा काळा मसाला ! हे मसाले नावाने जरी सारखे तरी त्यांच्या घटक पदार्थांत आणि बनवण्याच्या पद्धतीत प्रदेशांप्रमाणे काही बदल नक्कीच आहेत !

मी या आधी ब्लॉगवर सोलापुरी काळा मसाल्याची रेसिपी दिली आहे . ही रेसिपी म्हणजे माझ्या विठाताई आणि त्यांच्या वहिनींच्या गावाकडची !
आज मी हाच काळा मसाला वापरून भरले वांगे बनवणार आहे , ही रेसिपी सुद्धा विठाताईंच्या घरचीच! काळ्या मसाल्याबरोबरच यात मी कारळे सुद्धा घातलेय . भाजलेले कारळे काय खमंगपणा देऊन गेलय या वांग्याला , हे मी शब्दांत सांगूच शकत नाही ! हे झणझणीत , चवदार भरले वांगे एकदा नक्की बनवून बघा , आणि मला तुमचा अभिप्राय कळवा!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा . Read this recipe in English

- ३२५ ग्रॅम्स लहान ते मध्यम आकाराची काटेरी वांगी , दोन उभ्या चिरा देऊन , पूर्ण न कापता, मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावीत जेणेकरून काळी पडणार नाहीत
- १ लहान = ६० ग्रॅम्स कांदा , बारीक चिरलेला
- २ मध्यम आकाराचे टोमॅटो = १२५ ग्रॅम्स , बारीक चिरलेले
- १ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून जिरे
- पाव टीस्पून हिंग
- १ टीस्पून हळद
- मीठ चवीप्रमाणे
- १० -१२ कढीपत्ता
- तेल
- १ कप = ७५ ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- १ लहान कांदा = ६० ग्रॅम्स , बारीक चिरलेला
- ३ टेबलस्पून शेंगदाणे
- पाव कप कोथिंबीर बारीक चिरून
- २ हिरव्या मिरच्या
- १ इंच आल्याचा तुकडा
- १०-१२ लसणीच्या पाकळ्या
- २ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- १ टीस्पून धणे पावडर
- दीड टेबलस्पून काळा मसाला (recipe)
- २ टेबलस्पून पांढरे तीळ
- १ टेबलस्पून कारळे
- सर्वप्रथम वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊ. शेंगदाणे मध्यम आचेवर करड्या रंगावर खरपूस भाजून घेऊ. साधारण ३ ते ४ मिनिटे लागतात . एका ताटलीत काढून घेऊ.
- त्याच तव्यात पांढरे तीळ भाजून घेऊ. २ ते ३ मिनिटांत तीळ खरपूस भाजून झाले की कारळे भाजावे. कारळे भाजले गेले की त्यांचा रंग थोडा फिकट होतो , एका ताटलीत काढून घ्यावेत. त्यानंतर सुके खोबरे चांगले करड्या रंगावर भाजून घ्यावे. एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सारे घटक भाजताना जराही करपले जाऊ नयेत नाहीतर वांग्याच्या मसाल्यात तो करपट वास राहतो!
- भाजलेले शेंगदाणे थंड झाले की त्यांच्या साली काढून जाडसर कूट करावा ( पाणी घालू नये ) .
- एका मिक्सरच्या भांड्यात बाकीचे भाजलेले घटक पदार्थ जसे की तीळ, कारळे आणि खोबरे घालावे. त्यातच एक चिरलेला कांदा , हिरव्या मिरच्या , आले, लसूण आणि कोथिंबीर ( कोवळ्या देठांसकट घालावी , छान सुगंध येतो मसाल्याला ) घालून , पाव कप पाणी वापरून बारीक दाटसर मसाला वाटून घ्यावा .
- हा वाटलेला मसाला एका मोठ्या वाडग्यात काढून घ्यावा. त्यात धणे पावडर, लाल मिरची पूड, आणि काळा मसाला घालावा. चवीप्रमाणे मीठ घालावे आणि छानपैकी एकत्र करून घ्यावे. हा मसाला आपल्याला वांग्यात भरायचा आहे. वांगी मिठाच्या पाण्यातून बाहेर काढावी . वांगी देठासकट ठेवावीत , चविष्ट लागतात . मसाला वांग्यांत दाबून भरावा , परंतु वांग्याचे तुकडे पडू देऊ नयेत . सारी वांगी भरून झाली की उरलेला मसाला आपण वांग्याच्या रस्स्यात घालू.
- एका कढईत ३ ते ४ टेबलस्पून तेल गरम करावे . गरम तेलात मोहरी, जिरे , हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा घालून तो चांगला पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा . साधारण ४ ते ५ मिनिटांत कांदा मऊ होतो. आता टोमॅटो घालून घेऊ. हळद व थोडे मीठ घालावे जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतात. मीठ घालताना जपून घालावे कारण आपण वांग्याच्या मसाल्यात देखील मीठ घातले आहे. झाकण घालून मंद आचेवर टोमॅटो शिजू द्यावेत.
- साधारण ६ मिनिटे झाकून शिजवल्यावर टोमॅटो मऊ होतात. आता भरलेली वांगी घालून मिसळून घ्यावीत. मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी घालून ते पाणी कढईत घालावे. मंद आचेवर झाकण घालून ४-५ मिनिटे शिजू द्यावीत.
- वांगी थोडी शिजून मऊ होतात आणि पाणी ही सुटते. आता उरलेला मसाला घालावा , नीट एकत्र करून घ्यावा.
- साधारण दीड कप गरम पाणी घालून रस्सा तयार करावा. आपल्याला हवा तास पातळ किंवा घट्ट रस्सा ठेवावा. हा रस्सा मोठ्या आचेवर उकळू द्यावा. आच मंद करून झाकण घालून वांगी पूर्ण शिजू द्यावी.
- १० मिनिटांनंतर वांगी शिजली आहेत की नाही हे पाहावे. सारी वांगी शिजली नसतील तर परत झाकण घालून अजून ५ मिनिटे शिजू द्यावीत.
- वांगी शिजली की रस्साही थोडा घट्ट होतो , आता त्यात शेंगदाण्याचा कूट घालून मिसळून घ्यावा. हलक्या हाताने मिसळावा नाहीतर वांगी तुटतात.
- सोलापूरच्या झणझणीत काळ्या मसाल्यातली भरली वांगी तयार आहेत. कोणत्याही भाकरी किंवा चपातीबरोबर गरम गरम वाढवीत, मला तर ऊन ऊन भातासोबतही खूपच आवडतात !
Leave a Reply