डिसेंबर २०१२ ची अखेर ! पार्टनरचा वाढदिवस ३० डिसेंबर , एक पंधरा दिवस आधी असेच ऑफिसमध्ये मॉर्निंग शिफ्ट मध्ये कामे आवरताना रवीचा फोन आला.
हा आमचा रवी म्हणजे उत्साहाचा जणू धबधबा !तसा तो पार्टनरचा कॉलेजपासूनचा मित्र , परंतु माझा मानस बंधू ! या नात्याची कहाणी कधीतरी एका पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन .आता फक्त बॅकग्राऊंड पुरताच उल्लेख करते, नाहीतर आजचा ब्लॉग रवीच्या नेव्हर एंडिंग उत्साहासारखा वाहवत जाईल ! फोन वर अचानक त्याने घोषितच केले की या वर्षाची अखेर त्याला सपत्नीक आमच्याबरोबर साजरी करायचीय . रवीने काही प्लॅन केले की त्याला नाही म्हणणे हे ब्रह्मदेवालाही शक्य नाही . मी फक्त हो ये, इतकेच म्हटले , असे नाही की मला आनंद नाही झाला परंतु त्याचा आग्रह होता की आपण पुण्याबाहेर २-३ दिवस फिरायला जाऊ. आता आली का पंचाईत , डिसेंबर अर्धा उलटून गेलेला , नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोकं सहा सहा महिने आधी रिसॉर्ट , कोकणातली हॉटेल बुक करून ठेवतात , इतकेच काय चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे म्हटले तरी एकतर टेबल मिळेपर्यंत खूप ताटकळायला लागते आणि हे महाराज हातात फक्त १०-१२ दिवस असताना बाहेर नवीन वर्ष मनवायचे दिवास्वप्न पाहत होते. तरीही आम्ही फुल्ल फाईट मारून तारकर्लीला ( मालवण ) गजानन कुबल यांच्याकडे अक्षरशः वेटिंग लिस्ट वर २ दिवसांसाठी बुकिंग केले . आमच्या लाडक्या मित्रासाठी आणि त्याच्या नवपरिणीत वधूसाठी इतना तो बनता है ना यार ! ही आमची तारकर्ली ट्रिप अगदी लक्षात राहण्यासारखी मनोरंजक ठरली . आपल्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत केलेली फुल्ल टू धमाल हे तर कारण होतेच , परंतु मुख्य म्हणजे कोकणातली गोड रसाळ फणसांसारखी असलेली तिथली माणसे आणि चविष्ट खाद्यपदार्थ ! मी स्वतः रत्नागिरीची असल्याने आणि थोडेफार मालवणी येत असल्याने जरा जास्तच भाव खाल्ला तिकडे ! वॉटर स्पोर्ट्स करता करता थकलेले आम्ही वाळूत पाय पसरून बसलो होतो, आणि साठीकडे झुकलेले एक काका स्वच्छ घासलेल्या हिंडालिम च्या इडली पात्रात तांदळाचे घावन, चटणी आणि उकडीचे मोदक घेऊन आले . उन्हाने आणि कष्टाने रापलेलया चेहऱ्यावरचे हसू ढळू न देता अतिशय स्वस्त दरात ते घावन आणि मोदक विकत होते . त्या मागची मेहनत आणि पुण्यामुंबईकडचे उकडीच्या मोदकांचे दर मला ठाऊक असल्याने माझे मन त्यांच्याविषयी कौतुकमिश्रित आनंदाने भरून गेले. त्या दिवशी किती घावणे आणि मोदक खाऊन पोट तुडुंब भरलोय याची आम्हाला आजतागायत गणती लागली नाहीये.
आजचा माझा हा ब्लॉग पूर्णपणे घावणे या विषयालाच समर्पित! याचे कारण सांगते , की बऱ्याच लोकांना घावन , आंबोळी अशा तांदळाच्या पदार्थांत काय फरक आहे हे माहित नाहीये , अतिशयोक्ती नाही , परंतु मला फेसबुक , यूट्यूबवर वेगवेगळ्या वयोगटांतील महिलांकडून हा प्रश्न विचारण्यात आला होता. याचे एक मुख्य कारण असे आहे की बऱ्याच ब्लॉगर्स नी गूगल वर आंबोळी आणि घावन हा एकच पदार्थ आहे , असे छातीठोकपणे आपापल्या ब्लॉग्समध्ये लिहिले आहे . तर हा गैरसमज दूर करण्यासाठीच आजचा माझा लेखनप्रपंच!
देशाचा कोकण किनारा हा गोव्यापासून , महाराष्ट्रामार्गे कर्नाटकापर्यंत पसरलेला . या पश्चिम घाटात वरुणराजाची कृपा , वेगवेगळ्या तांदळाचे अमाप पीक घेतले जाते . हापूस आंब्याच्या मोहराचा सुगंध असलेला आंबेमोहोर, हा इथला प्रसिद्ध तांदूळ! भात आणि तांदळाचे पदार्थ हे मुख्य अन्न ! माझ्या ब्लॉगवर आंबोळीची रेसिपी आहेच , तरी इथे थोडक्यात सांगते .. आंबोळी ही दक्षिणेच्या डोश्यासदृश . तांदूळ आणि उडीद डाळीचे , चणाडाळीचे वाटलेले मिश्रण आंबवून बनवली जाते . ही आंबोळी कधी कधी रव्याची सुद्धा बनवली जाते . दोन्ही रेसिपीस आहेत या ब्लॉगवर, नक्की वाचा ! घावन हे थोडे कमी खटपटीचे , कोकणात याचा न्याहारीत खूप मान ! तांदूळ रात्रभर भिजवून , सकाळी पाणी काढून त्याचे पाट्यावर किंवा मिक्सरमधून बारीक वाटून त्यात पाणी, चवीपुरते मीठ घालून पातळ केले जाते . बिडाच्या काहिलीवर पसरवून हे पातळ लुसलुशीत घावन बनवले जाते . तांदळाचे पीठ बनवून त्यात पाणी घालूनसुद्धा घावन बनवतात !
हे घावण न्याहारीत नारळाच्या चटणीसोबत , गौरी पूजनाच्या नैवेद्यात नारळाच्या दुधातली गुळातली खीर म्हणजेच घाटले सोबत वाढले जाते . सातकाप्याचे घावन हा एक कोकणातला प्रसिद्ध पदार्थ ! कर्नाटकातील नीर डोसा हा अगदी घावनासारखाच बनवला जातो , फक्त तांदळाची वेगळी जात वापरली जाते इतकेच !
मला असे वाटतेय की तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलच असेल की काय फरक आहे आंबोळी आणि घावन मध्ये! अजून बरेच काही सांगायचंय कोकणातल्या खाद्यसंस्कृतीविषयी , थोडे पुढच्या ब्लॉगसाठी राखून ठेवतेय , तुम्ही वाचत राहा हं .. ” कभी अलविदा ना कहना …”
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English
- १ कप = २०० ग्रॅम्स लहान दाण्यांचा तांदूळ
- मीठ
- तेल
- पाणी गरजेनुसार
- घावन बनवण्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे . सुरती कोलम , बासमती तुकडा किंवा कोकणात हमखास मिळणारा आंबेमोहोर तांदूळ घेतला तरी चालतो. तांदूळ स्वच्छ पाण्याने चांगला धुऊन घ्यावा . मग तांदळाला कमीत कमी ६ तासांसाठी किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा . त्यानंतर त्याचे पाणी चाळणीत गाळून काढून टाकावे.
- हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यावी. खूप जास्त पाणी घालू नये . थोडे थोडे पाणी घालून फिरवून घ्यावे. पेस्ट रवाळ राहिली तर घावनाला तव्यावर भेगा पडतात . मी तांदळाची पेस्ट बनवण्यासाठी अर्धा कप पाणी वापरल आहे.
- आता या तांदळाचौ पेस्टमध्ये पाणी घालून आपल्याला ते पातळ करायचे आहे . मी अजून अडीच कप पाणी घालून घावनाचे मिश्रण पातळ केले आहे . म्हणजे तांदूळ वाटताना अर्धा कप आणि नंतर अडीच कप असे ३ कप पाणी वापरले आहे.
- आता चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे.
- लगेच घावन बनवायला सुरुवात करू , यांना तुम्ही झटपट होणारे डोसेही म्हणू शकता !
- एका नॉनस्टिक तव्याला किंवा बिडाच्या काहिलीला नीट तेल लावून चांगले गरम करून घ्यावे. तवा चांगला गरम झाला की आच मध्यम करून तव्याच्या कडेने २ डाव भरून घावनाचे मिश्रण तव्यावर पसरवून घ्यावे. मिश्रण एकसंध पसरावे. आच मंद करून झाकण घालून शिजू द्यावे.
- साधारण मंद आचेवर ४ मिनिटे शिजवले की घावन तव्याच्या कडा सोडायला लागते . एका ताटात केळीचे पान किंवा सुती कापड पसरून त्यावर घावन काढून घ्यावे. घावन हे मऊ आणि लुसलुशीत असते म्हणून ते दुसऱ्या बाजूने फिरवून शिजवले जात नाही !
- अशाच प्रकारे सगळे घावन बनवून घेऊ. पुढचे घावन तव्यावर घालण्याआधी तव्याबर तेल पसरवायला विसरू नये!
- गरमागरम घावन नारळाच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या दूधासोबत वाढावे!
nice recipes, looking forward sp for goan fish curry receipes
Thanks Prajakta for your wonderful feedback ! Please check our playlist on blog where you would find the different fish curries recipes from Goa, Ratnagiri, Malvan ,Karnataka and Kerala :
https://kalimirchbysmita.com/category/seafood/