माहेरवाशीण आई “ – शीर्षक वाचून थोडे आश्चर्य वाटलं ना ! मी आईकडे आलेय रत्नागिरीला म्हणजे खरं तर माझ माहेरपण चालू आहे .. खाण्यापिण्याची चंगळ, नुसता आराम आणि आईच्या मागे मागे घऱभऱ फिरत माझ्या गप्पा ! बाबांना सुटलेल्या आर्डरी .. बाजारातून हे खायला आणा , शहाळी फोडून द्या,, येंव न तेंव्…
खरंच माहेरपणाचे सुख भोगण्याचा आनंद शब्दांत न सांगता येणारा ! आज आई बाबांची लगबग बघून एक भावना मनात अलगद डोकावून गेली , “ लेकी जावयाचे लाड करताना माझ्या या माऊलीला असे किती माहेरपण लाभले ?” घरातली भावंडांत मोठी म्हणून लहान वयात जबाबदारी पेलणारी तिची ती ठेंगणी , हसरी मूर्ती पाहून आज ठरवले कि जास्त काही नाही , बस थोडी तिची मदत करावी.. तसे ती मला इकडची काडी तिकडे करू देत नाही .. पण आज मनाने ठरवलेच होते .. मग काय “ आई तुझी काहील किती मस्त आहे , बघू मी आंबोळी बनवून ..? “ असे हळूहळू करत मी स्वयंपाकघराचा ताबा घेतला ..
मग कुठे आंबोळ्या बनव , मग भाजी चिरून भाजी फोडणीला घातली , पोळ्यांसाठी आणि पुरणपोळ्यांसाठी कणिक भिजवून दिली ! नंतर पोळ्या लाटताना हळूच तिच्या हातातून लाटणे ओढून घेतले !मला पोळ्या लाटताना पाहून तिला तिची लहानगी स्मितु स्मरली , जिच्या हातचा भातुकलीच्या खेळातला प्रेमाचा घास तिने गोड मानून खाल्लेला !!
आता आरामात बसेल ती माउली कुठली ,,, आमच्या आवारातल्या “सुंदरी “ कुत्रीला कोणी नतद्रष्टाने बांबूने जखमी केले होते ( लईच देखणी आहे ,, म्हणून तिचे नाव बाबांनी सुंदरी ठेवलेय ),, माझी म्हातारा म्हातारी गेलीत कि तिला बर्फाने शेक द्यायला ,, सुंदरीने बी लई लाड करून घेतले स्वतःचे ! तिला कुरवाळताना आईचा हसरा चेहरा ,, कोणी देवाला पाहिलेय का हो ,, असाच आपल्या आईसारखाच दिसत असेल .. नक्की ! त्यानंतर सगळी आमच्या आवारातल्या कुत्र्यांच्या पिढीची पंगत बसली ! जी एक दोन टकली गायब होतीत त्यांना ढुंढाळायला , जेवण वाढायला आई पार मागे वाड्यात खाडीपर्यंत गेली ! साठी उलटून गेली तरी तिचा हा चटपटीतपणा पाहून तिचेच वाक्य मला आठवते ,, “ माणूस शरीराने नाही मनाने रिटायर होतो “.
नवीन लावलेला आंब्याचा कलम , केळीचा घड , अंगणातला बहरलेला तगर दाखवताना तिच्या डोळ्यांतली चमक डोळे दिपवते !
जेव्हा जेव्हा मी परतते ना , तेव्हा नेहमी मला म्हणते कि “तू आलीस कि तुझ्याबरोबर माझी हि मजा असते , नाहीतर आहेच नेहमीचे रहाटगाडगे ! “
म्हणूनच मी म्हटलेय माहेरपण माझं .. माझी आई माहेरवाशीण ! “
आणि आमच्या या दोघींच्या माहेरपणात हमखास बनणारी ही आंबोळी – मऊ आणि लुसलुशीत !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १ कप = २०० ग्रॅम्स लहान दाण्यांचा तांदूळ ( आंबेमोहोर/इंद्रायणी घेतल्यास उत्तम )
- १/२ कप = १०० ग्रॅम्स उडीद डाळ
- २ टेबलस्पून = २० ग्रॅम्स चणा डाळ
- १/४ कप = ३० ग्रॅम्स जाड पोहे
- १ टीस्पून मीठ
- १/४ टीस्पून मेथी दाणे
- तेल
- पाणी गरजेनुसार
- सर्वप्रथम तांदूळ, उडीद डाळ , चणा डाळ , पोहे आणि मेथी दाणे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. नंतर तांदूळ आणि मेथीचे दाणे एकत्र पाण्यात भिजवून ठेवावेत .त्याचप्रमाणे उडीद डाळ, चणा डाळ आणि पोहे एकत्र पाण्यात भिजवावेत . हे दोन्ही किमान ६ ते ८ तासांसाठी भिजवून ठेवावेत .
- त्यानंतर पाणी गाळून काढावे आणि एका मिक्सरच्या भांड्यात डाळ , तांदूळ, पोहे आणि मेथी दाणे घालून बारीक वाटून घ्यावे, पाणी घालून व्यवस्थित बारीक वाटून घ्यावे. मी ३/४ कप पाणी वापरले आहे. वाटलेले इडलीचे मिश्रण एका खोलगट भांड्यात काढावे. हात स्वच्छ धुऊन २-३ मिनिटे हे मिश्रण एकाच दिशेने गोलाकार फिरवून घ्यावे.
- हे पीठ सरसरीत पातळ असावे . झाकण घालून ८ ते १० तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवावे.
- ८ ते १० तासांनंतर हे पीठ चांगले फुगून वर येते . त्यात मीठ घालून हलक्या हाताने डावाने ढवळून घ्यावे.
- आंबोळी बनवण्यासाठी एक बिडाची काहील किंवा नॉन स्टिक तवा तापवून घ्यावा. त्यावर तेल चांगले पसरवून घ्यावे. नारळाच्या शेंडीचा किंवा कांद्याचा वापर करावा तेल पसरवून घेण्यासाठी. आच मंद ते मध्यम ठेवून २ डाव भरून इडलीचे पीठ तव्याच्या मध्यमभागी घालून गोलाकार पसरवून घ्यावे. आंबोळ्या जास्त पातळ न घालता जाडसरच बनवाव्यात . झाकण घालून २-३ मिनिटे एका बाजूने शिजून द्यावी. त्यानंन्तर झाकण काढून आंबोळी पलटवून दुसऱ्या बाजूनेही शिजू द्यावी.
- अशा प्रकारे साऱ्या आंबोळ्या बनवून घ्याव्यात . कोकणात या आंबोळ्या नारळाच्या किंवा कैरीच्या चटणीबरोबर , काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत आणि चिकन / मटणाच्या रस्स्यासोबत फारच छान लागतात !

प्रिय स्मिता,
‘माहेरवाशीन आई’ ह्या नव्या शब्दामध्ये उभे केलेले तुमच्या आईंचे व्यक्तीचित्र थोड्याफार फरकाने
सर्वच माऊलींना लागू पडते. मग ती जन्मदात्री असो किंवा आजी. एवढा सुंदर आणि ओघवत्या शैलीत
लिहीलेला लेख वाचत अस्ताना आणखी पुढे पुढे वाचतच जावेसे वाटले आणि हा ओघवता प्रवाह एकदम धप्पदिशी थांबला त्याची फारच चुकचुक लागली पण प्रवाह जसा एकदम न थांबता नवीन वळण घेतो त्याप्रमाणेच सर्व कोकणवासीयांची आवडती ‘आंबोळी’ची पाककृती पाहून पुढे पुढे वाचतच जावेसे वाटले.
स्मिता, तुम्ही तुमचे हे पाककृती सोबत लिहीलेले लिखाण करता ते अतीसुंदर आहे ते सर्व पुस्तकरूपाने संग्रहीत केल्यास सर्वच साहित्य वाचकांना वाचनीयच वाटेल. तुमच्या पुढील लिखाण आणि पाककृतींच्या वाचनासाठी नेहेमीप्रमाणेच वाट पाहते आहे. अनेक शुभेच्छा – जयश्रीताई माने
नमस्कार जयश्री ताई ! तुम्ही किती सुंदर शब्दांत माझ्या ब्लॉगचे थोडक्यात विवरण मांडले आहे ! मी लिहिताना माझ्या भावनांना मोकळी वाट करून देते , परंतु मनात नंतर एक शंका राहते कि वाचणाऱ्या पर्यंत त्या भावना किंवा मला जे म्हणायचेय ते पोचतेय कि नाही ! आणि खर सांगू का ताई , हा ब्लॉग मी एका फेसबुक ग्रुप वर टाकल्यानंतर मला इतक्या छान आणि भावुक कंमेंट्स आल्या कि वाचताना माझ्या डोळ्यांना पाण्याची धार लागली ! अन्न हे परब्रह्म मानणाऱ्या आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत न जाणो कितीतरी आठवणी आपल्या खाण्यापिण्याशी निगडित असतात , त्याच आठवणींना उजाळा देण्याचा हा मराठी ब्लॉगचा माझा छोटासा प्रयत्न ! 🙂 तुमच्यासारख्यांचे आशिर्वाद पाठीशी सदा राहोत , बाकी माझे लॉन्ग टर्म प्लॅन्स तुम्ही एकदम अचूक ओळखता 😛
मी मनकवडी! बरोबर ना? असो. अनेक शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद.
हो अगदी . मनातले अचूक ओळखणाऱ्या जयश्री ताई! 🙂