जवळ जवळ 90 चे दशक ते! माझ्या लहानपणी सॉफ्ट ड्रिंक असा प्रकार अस्तित्वातच नव्हता . जास्तीत जास्त , जर अचानक पाहुणे आले तर स्पेशली थंब्स अप आणि मॅंगोला च्या बाटल्या आणायला आई दुकानावर पिटाळायची आणि मोजून 5 मिनिटात धावत जाऊन मी त्या घेऊन यायची कारण फ्रीज नव्हता ना , बाटली गरम झाली तर उन्हाने !!.
कधी पोट बिघडले जास्त अबर चबर खाऊन तर आधी आजीची बोलणी खावी लागायची आणि नंतर बाबा खांद्यावर उचलुन घेऊन जायचा एक बाटली सफेद जिंजर प्यायला! मुंबईच्या दमट हवेत तो सफेद जिंजर गटा गट पिताना आई शप्पथ काश्मीर मधे गेल्या सारखे वाटायचे! आताशा फार कमी दुकानांत मिळतो सफ़ेद जिंजर!
बाकी तर आज्जीने मुके घेत दिलेले चार आणे , पन्नास पैसे तर पेप्सीकोला चोखण्यातच उडवले जायचे. एवढीच आमची कोल्ड ड्रिंक्सशी ओळख. आता आठवले की नकळत हसू येते चेहऱ्यावर!. पण आजही आईने मातीच्या मडक्यातलं थंड पाण्यात केलेले ते कोकम सरबत आणि कैरीच्या पन्ह्याला तोडच नाही!
उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी भर दुपारी नदीकाठच्या आंब्याखाली भरपूर धिंगाणा चालायचा. दगड मारुन कैर्या पाडणे हा तर आमचा छंद! मग त्या सार्या कैर्या झग्यात गोळा करून घरच्या चुलीच्या जाळात टाकायच्या, चांगल्या खरपूस भाजल्या की त्याच्या साली काढून गर वेगळा करायचा , मग सगळ्यात धाकटा मामा अतुल मामा येऊन मस्त गुळ घालून पन्हे बनवून द्यायचा! आकाशात सूर्य तळपत असतानाही कमालीचा थंडावा जाणवायचा! “रम्य ते बालपण आणि रम्य त्या आठवणी”!
आज हे जाळावर भाजलेक्या कैरी चे पन्हे शेअर करताना त्याच मिश्र आठवणी जाग्या झाल्यात! करून नक्की बघा , घरात आवडेल सगळ्यांना!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- दोन मोठ्या कैऱ्या 450 ग्रॅम
- पाऊण कप गूळ किसलेला
- 1 टी स्पून काळे मीठ
- 1 टी स्पून वेलची पावडर
- थोडे केशराचे धागे ( आवडीप्रमाणे )
- सर्वप्रथम आपण कैर्यांना गॅसवर जाळावर भाजून घेऊ. त्यासाठी जर तुमच्याकडे पोळी भाजण्याचा स्टॅन्ड असेल तर उत्तमच, अथवा जाळावर प्रत्यक्ष ही भाजता येतात. सुरिने कैर्यान्वर सर्व बाजूंनी उभ्या चिरा मारुन घ्याव्यात. मोठ्या आचेवर कैर्या चिमट्याच्या साहाय्याने फिरवून फिरवून चांगल्या खरपूस भाजून घ्याव्यात.
- कैर्या चांगल्य पूर्णपणे थंड होऊ द्याव्यात आणि नंतरच साली काढून घ्याव्यात. चाकूने किंवा चमच्याने गर वेगळा करून घ्यावा.
- भाजललेला गर मिक्सर च्या भांड्यात काढावा, त्यात गूळ घालावा. वेलची पूड, काळे मीठ आणि केशराचे धागे घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
- हे झाले तयार भाजलेल्या कैरी च्या पन्ह्याचे मिश्रण! आता आपण पन्हे ढवळून घेऊ. एक मोठ्या तोंडा ची बाटली किंवा भांडे घ्यावे. मी इथे 1.25 लिटरचा काचेचा जार घेतला आहे. त्यात तळाशी थोडा बर्फ आणि पुदिन्याची पाने घालावीत . पन्ह्याचे मिश्रण वरुन घालावे. आता 1 लीटर पाणी घालून चांगले तळापर्यंत चमचा पोचेपर्यंत ढवळून घ्यावे.
- प्यायला देईपर्यंत फ्रिज्मधे थंड होऊ द्यावे. याचा चटपटीत स्वाद अगदी लक्षात राहण्यासारखा आहे!

Leave a Reply