समोसा हा खऱ्या अर्थाने इंडियाज फर्स्ट फास्ट फूड आहे अस म्हणतात ते खोटे नाही. खाऊ गल्ल्यांपासून ते पंच /सप्त तारांकित हॉटेलमध्ये फाईन डायनिंग मध्ये हा दिमाखात मिरवतो. जगातील निरनिराळ्या भागांतून प्रवास करत तिथल्या खाद्य संस्कृतीप्रमाणे हा स्वतःला बदलत गेला. आता तर याला वर्ल्ड क्विझिन मध्ये अव्वल स्थान आहे.
समोसा आणि माझी गट्टी फार जुनी … सांगते तुम्हाला ! ९० च्या दशकात जन्म घेतलेल्यांना कधी विचारून पहा, पॉकेट मनी किती मिळायचा ते ? उत्तर ऐकून हसून हसून मुरकुंडी वळेल तुमची ! मला आठवतेय चौथीपर्यंत तर शाळेची पायरी उतरली कि लगेच स्कूल बस वाला दादा उचलून मेंढरांसारखा बस मध्ये कोंबायचा , आणि आम्ही बसच्या खिडकीतूनच पेरू, कैऱ्या आणि चिंचा विकणाऱ्या त्या म्हातारबाबांच्या टोपलीकडे अधाशाकडे बघत लाळ गाळायचो. पाचवी नंतर स्कूल बस सोडावी लागली कारण शाळेत निरनिराळ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अधिक वर्ग किंवा नाटक , नृत्याची तालीम वगैरे कलात्मक प्रकारांत रुची वाढू लागली. तेव्हा रोज बेस्ट बस ने प्रवास करण्यासाठी ५ रुपडे मिळायचे . ३ रुपये तिकीट आणि वरचे २ रुपये खाऊ साठी. मग काय कधी पेरू , तर कधी चिंचा , बडीशेपचे झाड – बऱ्याच जणांना माहित असेल , हे अस नेहेमीच ठरलेले. या २ रुपयांचा हिशोब आई कधी विचारात घेत नसायची. याउप्पर एक २० किंवा ५० रुपयांची करकरीत नोट आई शालेय वर्षाच्या सुरवातीला द्यायची आणि बजावायची कि हे पैसे अडीअडचणीला दिलेले आहेत , आणि ते खाऊ किंवा इतर वायफळ खर्चासाठी नाहीत! मग ती नोट साग्रसंगीत एका वहीत किंवा दप्तराच्या अगदी चोरकप्प्यात सुरक्षित ठेवली जायची, अलिबाबाचा खजिना असल्यागत! मला आठवतेय आईने आठवीत १०० रुपयांची नोट दिली होती आणि ती मी दहावीच्या सेंड ऑफ पर्यंत न खर्च करता जपून ठेवली होती. आईला जेव्हा ती दाखवली तेव्हा किती मायेने जवळ घेतले होते तिने मला! तर हा असा होता आमचा पॉकेट मनी !
इंजिनीअरिंग ला प्रवेश घेतल्यानंतर हा पॉकेट मनी थोडा वाढला कारण कधीही अचानक सबमिशनस मुळे जर्नल पेजेस किंवा कुठले पुस्तक आणावे लागले तर सोबतीला असावे म्हणूनच! परंतु त्या तेव्हढ्याश्या पैशातच बजेटिंग करत आम्ही आमची खादाडी चालूच ठेवायचो. आजही आठवतेय डिप्लोमा कॉलेज मध्ये असताना व्ही जे टी आय च्या कॅन्टीन मध्ये अगणित वेळा खाल्लेला बटाटावडा सांबार आणि चटणी सँडविचेस ! माझे डिग्री कॉलेज थोडे लांब नेरुळला होते, आयुष्यात पहिल्यांदा जवळजवळ ५० मिनिटांचा लोकल प्रवास , रोज मी कॉलेजला जाणार म्हणून माझे तीर्थरूप जरा काळजीने ढेपाळले होते. परंतु तुम्हाला ठाऊकच आहे मुंबईचे पाणीच वेगळे, तिथल्या गर्दीची, गडबडीची सगळ्यांना एक नशाच जणू! माझी ३ वर्षे डिग्रीची अगदी छान सुरळीत पार पडली.
९ ते ५ च्या कॉलेज नंतर आमची ५. २० ची ट्रेन असायची , कॉलेज ते नेरुळ स्टेशन हे अंतर चालत अवघे ५ मिनिटांचे . अगदी रमत गमत गेले तरी आरामात पोचायचो . पण नाही पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असायचा आणि स्टेशनच्या आवारातच परंतु विरुद्ध दिशेला असलेले चाट सेंटर खुणावायला लागायचे. शेवटचं लेक्चर संपायच्या आधीच ठरलेले असायचे कोण काय खाणार आज! आमच्या छोट्याश्या खिश्याला परवडेल एवढे २-३ च खाद्यपदार्थ आम्ही पाळीपाळीने तिथून विकत घ्यायचो. आणि ते असे असायचे कि ट्रेन मध्ये उभ्या उभ्या पण आरामात खाता येतील. एव्हाना तुम्ही ओळखलेच असेल मी वडापाव, समोसा पाव , भजी पाव आणि जास्तीत जास्त ब्रेड पॅटीस बद्दल बोलते आहे ! अहो हे पूर्ण मुंबईचे एनर्जी फूड म्हटले तर वावगे ठरणार नाही! पाठीवर वह्या पुस्तकांनी भरलेली ती गच्च सॅक , हातातल्या पिशवीत असाइन्मेंट ची फोल्डर्स आणि उजव्या हातात घेतलेला तो गरम गरम समोसा पाव घेऊन अगदी जीव घेऊन रेल्वेचा पूल क्रॉस करून ट्रेन पकडणे , याला आता आम्ही जिम मध्ये स्ट्रेंग्थ टेस्ट म्हणतो ! आताशा लिफ्ट बंद असेल तर जिमच्या बिल्डिंगचे २ जिने चढल्यावर दमछाक होते !
मला ना त्या चाट सेंटर चा समोसा फार आवडायचा! एक तर तो इतका छान खुसखुशीत तळलेला असायचा, आणि दुसरे म्हणजे त्याच्या सारणात बटाट्यासोबतच मटार चे दाणे आणि काजू मनुका असायचे! चिंच खजुराची आणि हिरवी तिखट चटणी लावलेला तो पाव आणि पावाच्या मध्ये हा भला मोठा समोसा , तो जवळजवळ १ तासाचा प्रवास अगदी सुखकर होऊन जायचा. समोशाला उगाच नाही फर्स्ट इंडियन फास्ट फूड म्हणतात ! कुठेही, कधीही, कुठल्याही, सारणात तो उत्तमच चवीचा बनतो! मला माहीत आहे कि हे वाचून तुम्हाला हि तुमचे कॉलेज जीवन आठवलच असेल ! या ज्या आठवणी आहेत ना त्या खरंच हृदयाशी अगदी नाळ जोडून आहेत.
मागे एकदा माझ्या मैत्रिणिंसाठी मी समोसे बनवले होते आणि तेव्हा माझी एक मैत्रीण पल्लवीच्या ६ वर्षाच्या मुलाने, संकल्पने समोसा खाऊन म्हटले ,” मावशी किती छोटा क्युट समोसा बनवलाय आणि मला भाजीपण अजिबात तिखट नाही लागली !” त्या छोटुकल्याच्या बोलण्याने मी अगदी हरखन गेले. त्या दिवशी विचार केला कि ही रेसिपी मी माझ्या दर्शकांसाठी आणि वाचकांसाठी नक्की बनवेन. खास करून मी समोसे छोट्या आकाराचे बनवले आहेत कारण ते मुलांनाही आवडतात आणि आजकाल बरेच जण जे डाएट वर असतात त्यांनादेखील कॅलरीज जास्त खाल्ल्याने ओशाळे व्हावे लागत नाही.
तुमच्या डाएटच्या चिट डे ला नक्की बनवा हे समोसे आणि मला प्रतिक्रिया कळवायला विसरू नका खाली कॉमेंट मध्ये!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Rating
- 2 कप = २५० ग्रॅम्स मैदा
- 1-टीस्पून ओवा
- मीठ
- ¼ कप = 50 ग्रॅम्स तूप
- 3 मध्यम आकाराचे बटाटे =250 ग्रॅम्स , प्रेमसुरे कुकर मध्ये उकडून
- ½ कप =75 ग्रॅम्स ताजे किंवा फ्रोझन मटारचे दाणे
- 1-इंच आल्याचा तुकडा
- 5-6 हिरव्या मिरच्या
- ¼ कप ताजी कोथिंबीर बारीक चिरून
- तेल
- 1-टीस्पून बडीशेप जाडसर कुटून
- 1-टीस्पून जिरे
- 1-टीस्पून धणे जाडसर कुटून
- ¼ टीस्पून हिंग
- १/२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- 1-टीस्पून धणे पावडर
- 1-टीस्पून गरम मसाला पावडर
- ½- टीस्पून आमचूर पावडर
- ¼- टीस्पून चाट मसाला
- ½ टीस्पून साखर
- 1-टेबलस्पून काजू बारीक तुकडे करून
- 1-टेबलस्पून मनुका बारीक चिरून
- समोश्याच्या बाहेरील आवरणासाठी पीठ मळून घेऊ. एका परातीत मैदा, मीठ आणि ओवा एकत्र मिसळून घेऊ. तूप हलके कढवून ते मैद्यात हातांच्या साह्याने चांगले चोळून घेऊ.कमीतकमी ३-४ मिनिटे आपण हे तूप मैद्यात चांगले मिसळून घेऊ. तूप मिसळले कि हे मैद्याचे मिश्रण अगदी ब्रेड क्रांम्ब्स सारखे दिसते
- थोडे थोडे पाणी वापरून मैद्याचा एक घट्ट गोळा मळावा . मी जवळजवळ अर्धा कप पाणी वापरून घट्ट पीठ मळले आहे. आता हा मैद्याचा गोळा झाकून ३० मिनिटे ठेवावा.
- समोश्याच्या सारणासाठी आले आणि हिरव्या मिरच्या खलबत्त्यात जाडसर वाटून घेऊ. मिक्सररमध्ये वाटायचं झाल्यास पाणी न घालता वाटावे.
- एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. जिरे आणि हिंग घालून घ्यावे. बडीशेप आणि धणे घालून एक मिनिट परतून घ्यावे. मटारचे दाणे घालून १ ते २ मिनिटे परतून घ्यावेत. जर मटारचे दाणे ताजे असतील तर अजून ३-४ मिनिटे शिजवून घ्यावे लागतील. आले आणि मिरचीची जाडसर पेस्ट घालून १ मिनिट परतून घ्यावे.आता सारे मसाले घालून घ्यावेत. लाल मिरची पूड, धणे पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून हा सारा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. मसाले कोरडे होऊन करपू नयेत म्हणून २-३ टेबलस्पून पाणी घालून परत परतून घ्यावेत. जर तिखट खायला आवडत असेल तर मिरची पावडर जास्त घालू शकता आणि जर मुलांसाठी बनवायचे असेल तर मिरची पूड कमी घालावी.
- ३- ४ मिनिटे आपण हा मसाला शिजवून घेतला आहे. आता साखर घालून घेऊ. साखर घातल्याने सारण जास्त चवदार बनते. आता बटाटे हाताने कुस्करून मसाल्यात मिसळून घेऊ. आता काजू आणि मनूका घालू. आता चाट मसाला, आमचूर पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. हे मिसळून २-३ मिनिटे शिजवून घेऊ. समोश्याचे सारण तयार आहे . गॅस बंद करून सारण थंड होऊ देऊ.
- ३० मिनिटांनंतर मैद्याचा गोळा थोडा नरम होतो. आता आपण समोश्यासाठी पार्र्या लाटून घेऊ. मैद्याच्या गोळ्याचे ३ करून घेऊ . एकेका गोळ्याला पोळपाटावर चांगले मळून लांब वळी करून घेऊ . समान आकाराच्या गोळ्या कापून घेऊ.
- एकेका गोळीला पोळपाटावर दाब देऊन चांगले मळून घेऊ जेणेकरून त्यात भेगा राहणार नाही. तेल लावून लाटण्याने मैद्याच्या पातळ लांबट पाऱ्या लाटून घेऊ.
- आता जवळ एक पाण्याची वाटी, समोश्याचे सारण आणि सूरी ठेवावी. सुरीने पारी मधोमध कापून, २ समान अर्धे भाग करावे. जिथे कापले गेलेय त्या सरळ रेषेवर पाणी लावून घेऊ आणि त्या २ कडा एकमेकांवर चिकटवून कोन बनवून घेऊ. या कोनमध्ये १ ते १. ५ चमचा सारण भरून हलक्या हाताने आत ढकलावे. आता जी पारीची मोकळी वक्राकार बाजू आहे तिलादेखील पाणी लावून घेऊ. आणि ती बाजू समोरच्या कोनाच्या बाजूवर चिकटवावी. अशाप्रकारे सर्व समोसे तयार करावेत.
- समोसे तळण्याआधी ते १० मिनिटे न झाकता हवेवर कोरडे होऊ द्यावेत जेणेकरून तळताना त्यावर हवेचे बुडबुडे येणार नाहीत.
- समोसे तळण्यासाठी कढईत तेल गरम करावे. समोसे तेलात बुडतील इतपत तेल असावे. समोसे मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
- इतक्या सारणात २० ते २२ लहान समोसे बनतात. गरम गरम समोसे पुदिन्याच्या किंवा चिंचेच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचप सोबत स्वादिष्ट लागतात.
Wow Superr!! looks absolutely amazing.. beautiful pictures too.. 🙂 thanks for sharing..
Thank you so much 🙂