
लोकं शाकाहारी असतात , मांसाहारी असतात , मी स्वतःला मत्स्याहारी जास्त मानते . एखाद्या आठवड्यात मासा मग तो कोणत्याही आकारमानाचा म्हणजे २-३ फुटाची सुरमई किंवा रावस ते सांडग्यांच्या आकाराच्या कोळंबी असल्या तरी आपले काम चालते . ते सुकट , सोडे , जवळा हे असे म्हणजे फक्त तोंडी लावणे , ते या आधीच्या प्रकारात मोडत नाहीत .
तरी या लॉक डाऊन काळात मी जवळ्याला ” तू कोळंबी आहेस ” असे वारंवार म्हणून त्याची चटणी गपगुमान भाकरीसोबत खाल्लीय नी माझा वर्षभराचा सुक्या मासळीचा स्टॉक दोन महिन्यांत संपवलाय .
लहानपणी आमच्या मुंबईच्या चाळीत दारावर येणाऱ्या कोळीण मावशीची या काळात मी इतकी आठव काढली की तिचा बिचारीचा जीव उचक्या लागून लागून मेटाकुटीस आला असेल ! मावशीची ताज्या माशांनी भरलेली टोपली, टोपलीच्या बाहेर डोकावणारी सुरमई , घोळाची शेपटी , एका बाजूला कोळंबी , मांदेली चा डोंगर , बाजूला निळ्या जाळ्यात गच्च बांधलेल्या कुर्ल्या , चमचमणारे बांगडे , आणि दिमाखात बसलेले हये एवढे मोठे जाडजूड हलवे नी पापलेट …सुंदरसा देखणा एक पापलेट स्मिताने उचलला , नी ” आईईई मावशीने पापलेट आणले ग… ” अशी आरोळी ठोकते ना ठोकते तोच मावशीने खसकन तो पापलेट स्मिताच्या हातातून हिसकावून घेतला , नी म्हणते कशी , ” ए बाय ठ्येव तो म्हावरा तुज्या साठी न्हाय ” , आणि स्फुंदत स्फुंदत खालचा ओठ बाहेर काढून स्मिताने भोकांड पसरले , नी पाय आपटत आईकडे धाव घेतली ! आता पहाटे साडेपाच ला पडलेलं हे स्वप्न नी मी झोपेत झाडलेले पाय पार्टनरच्या पार्श्वभागावर पडून त्याची झोपमोड झाल्याने वैतागून त्याने घातलेला मला धपाटा , या सगळ्यांचा एकच परिणाम असा झाला की उठल्यावर पहिल्यांदा आम्ही कॉन्टॅक्ट केला खडकीच्या आमच्या नेहमीच्या मासेवाल्या भाईजान ला!
हा आमचा भाईजान खडकी बाजारातले मोठे माशाचे दुकान चालवतो . नदीतलया माशांपासून ते समुद्रातले सगळे ताजे फडफडीत मासे मिळतात . आणि मुख्य म्हणजे मला माहित असलेलं सारे बारीक मासे त्याला ठाऊक आहेत आणि तो सांगितल्याप्रमाणे माझी ऑर्डर आणूनसुद्धा ठेवतो . आमच्या कोळीण मावशीचा हा भाईजान पर्याय मला खूप भावलाय ! त्याने पटकन सांगितले , “दीदी अभी होम डिलिव्हरी चालू करतोय , तुम बोलो सिर्फ क्या पाहिजे, अपना लडका येईल ..”

त्याने सांगायचं अवकाश दिल्या आम्ही धपाधप ऑर्डरी तोही असला मजेशीर , एवढे घेतल्यावर म्हणतो , दीदी भैयाको बोंबील पसंद है ना , देऊ काय १ किलो ..”
नाही म्हणायला काही कारणच नव्हते .. काय सांगू तुम्हाला ज्या दिवशी आला ना घेऊन मासे , ते न बघताच आधी मी नृत्य सुरु केले ,” किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला ,,” पार्टनरने टपली मारून म्हटले ” हां हां बाद मे बताना किती आनंद झाला , पहले साफ कर के रखते हैं !” काय ते देखणे पापलेट , आणि हो मी हातात घेतल्यावर कोणी नाही हुसकावून घेतले हो .. तर याच पापलेटची आज मी तुम्हाला साधी सोप्पी रेसिपी सांगणार आहे , अशा रीतीने पापलेट तळून आमच्या घरात सर्रास बनवले जातात . ही एक पद्धत आहे , माझ्या पुढच्या तळलेल्या माशांच्या रेसिपीज मध्ये मी नक्की वेगवेगळया पद्धती सांगायचा प्रयत्न करिन . झटपट होणारा कुरकुरीत तळलेला हा पापलेट मला तर फक्त वरण भातासोबत सुद्धा आवडतो, कधी पाहुणे घरी येणार असतील तर पूर्ण स्वयंपाक व्हायला अवकाश असला तर पहिल्यांदा हे पापलेट च तळून पुढ्यात ठेवते, एकदम चविष्ट आणि कुरकुरीत!
आता मासे तळण्यासंबंधीच्या काही टिप्स देते कारण मागे एका मैत्रिणीने मला फोन करून विचारले होते , की तळताना मासे तिच्या तव्याला चिकटून तुकडे पडतात .
१. मासे तळताना आपण त्यांना रवा किंवा पीठ लावतो . त्या पिठाच्या मिश्रणात मासे घोळवताना सर्वप्रथम मासे किचन वापराच्या स्वच्छ कापडाने पूर्ण कोरडे करून घ्यावेत . ओले मासे पिठात घोळवले तर ते पीठ किंवा रवा नीट एकसंध चिकटत नाही आणि मासे तळल्यावर त्याच्या गुठळ्या माशांवर दिसून येतात .
२. मासे तुम्ही स्वच्छ करून जर फ्रीझरमध्ये ठेवले तर ते तळायला लगेच घेऊ नयेत . जरा रूम टेम्परेचर वर येऊ द्यावेत , तसेच बर्फ़ाळ मासे तळले तर ते तव्यात खूप पाणी सोडतात नी व्यवस्थित तळले जात नाहीत .
३. मुख्य म्हणजे तेल आधी मध्यम आचेवर नीट गरम करून घ्यावे , आणि मग मासे मंद आचेवर तळावेत . थंड तेलात मासे तळले तर ते तव्याला चिकटतात .
आता आपण सज्ज आहोत मासे तळायला , तर वेळ न घालवता पटकन रेसिपी पाहून घ्या.

Prep time:
Cook time:
Total time:

- ४०० ग्रॅम्स पापलेटच्या तुकड्या ( साधारण अर्धा इंच जाडीच्या ) , स्वच्छ करून , धुऊन ,
- २ टेबलस्पून कोकम २-३ टेबल्स्पून गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून , ( कोकमं नसल्यास १ टेबलस्पून लिंबाचा रस ) ,
- १ टीस्पून हळद,
- मीठ ,
- ६ टेबलस्पून तांदळाचे पीठ ,
- ३ टेबलस्पून मालवणी मसाला (मालवणी मसाला नसल्यास २ टेबलस्पून बेडगी किंवा काश्मिरी मिरची पावडर आणि १ टेबलस्पून गरम मसाला ),
- तेल
- कोकम चुरून त्याचा घट्ट रस टाकावा नी गाळणीतून हा घट्ट रस म्हणजेच आगळ बाजूला काढावे .
- पापलेटच्या तुकड्यांना कोकमाचे आगळ , हळद नी मीठ लावून १५ मिनिटे बाजूला ठेवावेत .
- एका ताटात तांदळाचे पीठ , मालवणी मसाला , मीठ घालून एकत्र करावे .
- माशाची तुकडी अगदी घट्ट दाबून या मिश्रणात घोळवावी .
- तव्यात २-३ टेबलस्पून तेल चांगले गरम करावे . मंद आच करून कडेने पिठात घोळवलेले मासे सोडून चांगले ३-४ मिनिटे प्रत्येक बाजूने परतून घ्यावेत .
- मासे कुरकुरीत तळावेत .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply