
” छप्पन भाषा आणि अठरा पगड जाती ” अशी प्राकृत मराठीत म्हण आहे ! त्याचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर जास्त लांब जायला नको . आपल्या सर्वांची लाडकी मुंबई या उदाहरणांनी खच्चून भरली आहे . मुंबईवर तसे बऱ्याच जणांनी अधिराज्य गाजवले , मौर्य, मुघल ते ब्रिटिशांपर्यंत …
परंतु या मुंबईवर खरं जे प्रेम कोणी केले असेल , कोणत्याही हक्क अधिकार गाजवण्याशिवाय तर ते आपले कोळी बांधव! कोळी बांधवांप्रमाणेच काही मुस्लिम जमाती , पारशी , ईस्ट इंडियन , भंडारी ( मी या समाजातून येते ) , वाडवळ, पाचकळशी , सुतार , परभू असे बरेच समाज ज्यांच्या निखळ प्रेमाने आणि मेहनतीने या मुंबईचे सिंचन केले आहे ! ( संदर्भ : गोविंद नारायण माडगांवकर यांचे ” मुंबईचे वर्णन” या पुस्तकातून )
आज मुंबईचे हे वर्णन करण्यामागे उद्देश हाच की श्रावणी पौणिमा म्हणजेच नारळीपौर्णिमा जवळ आलीये . देशभरात ही पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणून साजरी केली जाते ! महाराष्ट्रात ही पौर्णिमा २ दिवस प्रामुख्याने साजरी होते , एक तर रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा ! या श्रावण पुनवेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राची आणि पर्यायाने वरुण देवाची पूजा करतात . आपल्या कोळी भगिनी समुद्राला भाऊराया मानून त्याची पूजा करून सोन्याचा नारळ अर्पण करतात . पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो , त्याला शांत करण्यासाठी , आणि आपल्या समुद्रात गेलेल्या कोळी बांधवांना सुखरूप परत आणण्यासाठी बहिणींनी भावाला घातलेली ही सादच होय !
कोळी बांधवांविषयी सांगायचे तर माझ्या डोळ्यांसमोर येते ती अनेक रंगांची उधळण ! हसरी , जीवाला जीव लावणारी माणसे आणि वेळ पडली तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी कदापि मागे न सरणारी माणसे ! भीती हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीच जणू! इतके सुंदर , रंगीत , तितकेच साधे राहणीमान आणि त्याचबरोबर समुद्राच्या भरतीप्रमाणे जिभेला खवळायला लावणारी यांची खाद्यसंस्कृती , जीवाला अगदी वेड लावण्यासारखी ! लहानपणी कितीतरी कोळी गीतांवर ग्रुप डान्स करून आम्ही बक्षीसे पटकावलीत , आजही ती गाणी या ओठांवर अजरामर आहेत !

या सणाआधी साधारण २ महिने मासेमारी बंद असते , कारण आपल्या सर्वाना माहीतच असेल ! एक तर समुद्राला भरती आणि दुसरे म्हणजे जलचरांचा हा प्रजननाचा काळ ! या नैसर्गिक कालचक्राचे भान ठेवून कोळी बांधव आपल्या नावा किमान दोन महिने तरी समुद्रात नेत नाहीत . मग येते ही नारळी पौर्णिमा , या दिवशी मासेमारीचा सीजन परत सुरु करण्यात येतो ! आणि पुन्हा गलबतांची शिडे उभारली जातात , सुंदर सजवलेल्या होड्या , आणि नटलेले, सजलेले आपले कोळी बंधू भगिनी नाचत गात किनाऱ्यावर समुद्राची पूजा करून सोन्याचा नारळ अर्पण करतात ! हा नारळ परत किनाऱ्यावर वाहून तो तो त्या खाया हवामानात रुजून त्याचा वृक्ष व्हावा हीच प्रेमळ आशा ! किती हे निसर्ग आणि मानवाचे निखळ मैत्रीचे नाते !

या दिवशी मुख्यत्वे नारळ आणि गुळाचे पक्वान्न बनवले जातात , जसे नारळी पाक म्हणजे नारळाच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या आणि विसरून चालणारच नाही तो म्हणजे नारळी भात ! आंबेमोहोर तांदळाचा सुवास आणि गूळ नारळाच्या पाकाचा घमघमाट प्रत्येक घराघरातून येणे हे ठरलेलेच आहे !
मी प्रत्येक नारळी पौर्णिमेला आवर्जून नारळी भात बनवतेच , आमच्या घरात खूप आवडतो . तो बनवता बनवता एका बाजूला नकळत मोठ्याने हे कोळी गीत म्हणत पायांनी आपसूकच ताल धरलेला असतो , बघा आता लिहिता लिहिता सुद्धा गातच लिहितेय मी 🙂
” सण आयलाय गो आयलाय गो
नारली पुनवचा …
मनी आनंद मावना , कोल्यांच्या दुनियेचा !
आर बिगिन बिगिन चला किनारी जाऊ,
देवांच्या पूंजेला ..
हात जोरूंशी नारळ सोन्याचा ,
देऊया दरियाला !”
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- अर्धा कप = १२५ ग्रॅम्स सुवासाचा तांदूळ. आंबेमोहोर किंवा बासमती
- अर्धा कप = १०० ग्रॅम्स गूळ बारीक चिरून
- १ कप = १०० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- अर्धा कप = १२५ ml नारळाचे जाडसर दूध
- अर्धा कप = १२५ ml पाणी
- तूप गरजेनुसार
- १ टेबलस्पून बदाम
- १ टेबलस्पून काजू
- १ टेबलस्पून मनुका
- ३ हिरव्या वेलच्या
- ३ लवंग
- पाव टीस्पून मीठ
- तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊन किमान ३० मिनिटे तरी पाण्यात भिजवून ठेवावेत . दाणे छान फुलून येतात . तोपर्यंत आपण सुक्या मेव्याचे बारीक तुकडे कापून घेऊ. बदामाचे उभे काप , काजू आणि मनुक्याचे बारीक तुकडे करावेत .
- एका कढईत १ टेबलस्पून तूप गरम करून त्यात मंद आचेवर हा सुका मेवा मिनिटभर परतून घ्यावा. छान फुलून येतात आणि खायला अजून चविष्ट लागतात ! कढईतून बाजूला काढून घ्यावेत .
- त्याच कढईत अजून १ टेबलस्पून तूप घालून त्यात लवंगा, वेलच्या घालून परतून घ्यावयात . करपू देऊ नयेत . जरा फुलून आल्या की भिजवलेला तांदूळ वैरावा. १-२ मिनिटे तांदूळ तुपात मंद आचेवर परतून घ्यावा . प्रत्येक दाणा तुपात घोळला जातो आणि छान मोकळासुद्धा शिजतो .
- नंतर अर्धा कप पाणी व मीठ घालून एकत्र करून घ्यावे . आता अर्धा कप नारळाचे दूध घालावे . जर तुम्हाला नारळाचे दूध घालावयाचे नसेल तर , त्याऐवजी अजून अर्धा कप पाणी घालावे म्हणजे तांदूळ शिजवायला १ कप पाणी घालावे. मध्यम आचेवर हल्कीउकळी फुटू द्यावी . वाटल्यास थोड्या केशराच्या काड्या घालाव्यात ( नाही घातलेत तरी चालेल ) . नीट एकत्र करून घ्यावे. आच मंद करावी आणि झाकण घालून शिजू द्यावे .
- भात शिजतोय तोपर्यंत आपण नारळाचा चव आणि किसलेला गूळ एका मोठ्या भांड्यात एकत्र करून घ्यावा. सुका मेवा घालावा. गूळ बारीक चिरला तर पटकन विरघळतो म्हणून चांगला बारीक किसून किंवा चिरून घ्यावा.
- बारीक आगीवर भात ५- ६ मिनिटांत शिजतो. गॅसवरून उतरवून एका थाळीत पसरवून घ्यावा.
- त्याच कढईत १ टेबलस्पून तूप घालावे. नारळ आणि गुळाचे वर एकत्र केलेले मिश्रण कढईच्या तळाशी नीट पसरवून थर लावून घ्यावा. त्यावर भाताचा थर लावून सपाट करून घ्यावा. आच मंद ठेवून झाकण घालून हा भात नारळ गुळाच्या रसात चांगला मुरू द्यावा.
- २ मिनिटे शिजवल्यानंतर झाकण उघडून गूळ विरघळला आहे कि नाही हे पाहावे . गुळाच्या रसात जर भात जास्त शिजला तर पाकाने तो चिवट होऊ शकतो म्हणून गूळ पूर्ण विरघळेपर्यंतच नारळीभात शिजवावा . नारळी भात हा नेहमी मधुर मऊसूत तुपाळ खायला मस्त लागतो !
- आच मंदच ठेवावी . आणि झाकण घालून भात अजून २ मिनिटे मुरू द्यावा.
- दोन मिनिटांनंतर गूळ भातात चांगला मुरला की गॅस बंद करावा , आणि वाढेपर्यंत कढई झाकण घालूनच बंद ठेवावी!
Leave a Reply