” भरजरी ग पितांबर दिला फाडून , द्रौपदीस बंधू शोभे नारायण !”
पुराणातली ही कथा … श्रीकृष्णाचे बोट कापले , भळाभळा रक्त वाहू लागले , नारद मुनी तात्काळ सुभद्रेकडे जखम बांधायला चिंधीची मागणी करतात , परंतु भरजरी पैठणी आणि शालू फाडून कसे काय चिंधी द्यावी या विचारांतच सुभद्रा गढून जाते . तेवढ्यात द्रौपदी आपल्या भरजरी साडीचा पदर फाडून भगवंताची जखम बांधते ! तिच्या मनातील या संवेदना पहा किती छान शब्दांत अत्र्यांनी व्यक्त केल्यात :
“द्रौपदी बोलली, “हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून….”
अशा अनेक गोष्टी रक्षाबंधनाविषयी पुराणात आहेत . देवांचे गुरु बृहस्पती यांनी इंद्राला राखी बांधावयाचा सल्ला दिला होता असुरांपासून वाचण्यासाठी ! इतिहासातही असे अनेक दाखले मिळतात जिथे राखीचा हा नाजूक धागा मोठ्या मोठ्या संकटांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पेलवताना दिसलाय ! चित्तोडच्या राणी कर्णावती ने हुमायून ला राखी पाठवून शत्रूपासून बचाव करण्याचे आवाहन केले होते !हा रक्षाचा धागा पूर्वी गुरुकुलात शिष्य आपल्या गुरूलाही बांधत असत ! अशा बऱ्याच भावना या राखीशी निगडित आहेत , म्हणतात ना , नाती ही रक्तानेच बनतात असे नाही , परंतु मनाने मात्र नक्की बनतात !
मी आई बाबाची एकुलती एक , आणि माझा बाबासुद्धा आजीआजोबांचा एकुलता एक मुलगा ! त्यामुळे रक्षाबंधन हा सण आमच्या घरात साध्या परंतु वेगळ्या रीतीने साजरा व्हायचा ! लहानपणी रक्षाबंधनाच्या दिवशी शेजारपाजारच्या घरांतली लगबग पाहून , सगळ्यांना नटलेल सजलेल पाहून माझे बालमन हिरमुसायचे! मग धुसफूस करतच , मी आईला विचारायचे , “आई मी कोणाला राखी बांधू ग ?” मग माझी आजी माझा लाल झालेला नाकाचा शेंडा हळूच ओढत , देव्हारातल्या बाळकृष्णाकडे बोट दाखवून म्हणायची , ” बाय त्याला बांध हो राखी , तो जगताचा पाठीराखा , तुझाही पाठीराखा !” निरांजनाच्या सोनेरी प्रकाशात चमकणाऱ्या , एका हातात लाडू घेऊन रांगणाऱ्या त्या पितळेच्या लड्डू गोपाळाच्या मूर्तीवरचे निरागस हास्य माझ्याही चेहऱ्यावर स्मितरेषा उमटवून जायचे !
आई देवांसाठी खास त्या रंगीबेरंगी कापसाच्या गोंड्याच्या राख्या आणायची , गुलाबी, लाल , केशरी , जणू रंगांचे गोळेच ! मग सकाळी सकाळी पूजा करताना ताम्हणात सगळे देव घासून पुसून लख्ख करून त्यांना साग्रसंगीत राख्या बांधल्या जायच्या ! एक राखी आजी माझ्याही मनगटावर कौतुकाने बांधायची ! आदल्या दिवशी नारळीपौर्णिमेच्या निमित्ताने नारळीभात , ओल्या नारळाच्या करंज्या असे पदार्थ चापून झालेले असायचेच ! या दिवशी मग नैवेद्यासाठी वेगळे काय करायचे असा नेहमी सतावणारा प्रश्न त्या दिवशी आईला पडायचा नाही ! नारळी बर्फी ठरलेली…. आणि ही थोडी थोडकी नाही तर किलोभर बर्फी तरी आई बनवायची ! एक तर मयेकर बाईंच्या म्हणजे माझ्या आईच्या हातची नारळी बर्फी तिच्या पोष्ट ऑफिसात फेमस… आणि दुसरे म्हणजे ही बर्फी डब्यांत भरून आमच्या चाळीत साफसफाईसाठी येणारा दादा व तळमजल्यावर राहणारा आमचा मॅन्युअल दादा यांच्याकडे पोचते करण्याचं काम माझ्याकडे लागले असायचे ! हा जो आमचा मॅन्युअल दादा आहे ना त्याच्या बद्दल मी तुम्हाला थोडे सांगू इच्छिते ! हा गोव्याचा कॅथलिक ख्रिश्चन आणि गणपतीवर अपार श्रद्धा ! म्हणून प्रत्येक संकष्टीला , अंगारकी चतुर्थीला न चुकता आईला दुर्वा खुडून आणून द्यायचा, आईच्या पूजे मार्गे स्वतःचे गाऱ्हाणे गणपतीला पोचव म्हणून हसत हसत विनंती करायचा आणि आता स्वतः २ पोरांचा बाप झाला आहे तरी त्याच्या या सेवेत आजतागायत खंड पडलेला नाही ! कसले जातीभेद घेऊन बसलोय हो आपण ,, माणुसकीच सर्वश्रेष्ठ धर्म, बरोबर ना ! तर या दोन्ही घरी प्रत्येक सणा सुदीला आणि रक्षाबंधनाला तर आवर्जून आई गोडधोड पाठवायची ! आई म्हणायची , सफाई करणारा दादा आपली अस्वच्छता दूर करतो , जेणेकरून आपल्याला आरोग्याचे संरक्षण मिळेल , याहून मोठी रक्षा ती काय असू शकते , म्हणून आपल्याकडून एक छोटीशी कृतज्ञता ! तर असा साजरा व्हायचा आमच्या घरी रक्षाबंधन!
आज आईच्या संस्काराची शिदोरी पूर्ण आयुष्याला पुरेल इतकी आहे , म्हणूनच आजही कृष्णाला राखी बांधताना , त्याच्याशी लडिवाळ पणे गप्पा मारताना डोळे आनंदाने भरून येतात . आमच्या गल्लीत रोज न चुकता कचरा गोळा करणारी छोटी घंटा गाडी येते . मागच्या वर्षी त्या गाडीच्या ड्राइवर दादाच्या हातात ” रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा” , असे म्हणत मिठाईचा पुडा दिला , इतका खुश झाला ना भाऊ ! यावर्षी मी स्वतः बनवलेली नारळाची बर्फी देणारेय , किती खुश होईल ना दादा …
बापरे नारळ किसून घ्यायचाय , चला चला पळते मी बर्र का स्वयंपाकघरात , तुम्ही रेसिपी नक्की वाचा , दोन प्रकारे बनवलीय आणि अभिप्राय कळवायला विसरू नका हं….
रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
- दीड कप = १५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- अर्धा कप = १२५ ग्रॅम्स साखर
- ७५ ml ताजे क्रीम ( अमुल क्रीम किंवा दुधाची ताजी साय )
- २ टेबलस्पून पिठीसाखर
- पाव कप पिस्त्याची कुटून जाडसर पावडर ( किंवा बदाम काजू पावडर ) - नाही घातली तरी चालेल
- चुटकीभर वेलची पावडर
- तूप गरजेनुसार
- खाण्याचा लाल रंग ( २-३ थेंब ) - आवडत असल्यास घालावा
- एका नॉनस्टिक कढईत किसलेला नारळ, साखर आणि ताजे क्रीम म्हणजेच दुधाची मलई घालून नीट एकत्र करून घ्यावे. मंद आचेवर साखर विरघळू द्यावी.
- साधारण २ मिनिटांत साखर विरघळू लागते . अजून १०-१२ मिनिटे मिश्रण मंद आचेवर शिजू द्यावे जोपर्यंत साखर पूर्णपणे खोबऱ्यात शोषली जात नाही ! मिश्रण कढईच्या तळाशी लागू नये म्हणून ढवळत राहावे.
- साधारण १२ मिनिटांत मिश्रण हळूहळू घट्ट होऊन कढईचा तळ सोडू लागतो . वेलची पावडर घालून घ्यावी. गॅस बंद करून मिश्रण २-३ मिनिटे जरा वाफ दवडून थंड होऊ द्यावे.
- २ मिनिटांनंतर पिठीसाखर घालून बर्फीच्या मिश्रणात नीट एक सारखी करून घ्यावी.
- एका ताटलीला तुपाचा हात लावून किंवा ट्रे मध्ये बटर पेपर पसरवून त्यावर तुपाचा हात लावून घ्यावा. बर्फीचे मिश्रण छान चौकोनी आकारात आपल्या हव्या तितक्या जाडीचे थापून घ्यावे.
- वरून थोडी वेलची पावडर भुरभुरावी आणि पिस्त्याची पावडर सुद्धा ! हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे .
- एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये किसलेला नारळ, साखर आणि फ्रेश क्रीम घालावे. त्यातच २-३ थेंब खाण्याचा लाल रंग घालावा. नसेल आवडत तर रंग नाही घातला तरी चालेल ! नीट एकत्र करून घ्यावे .
- हा बाउल ओव्हन मध्ये ठेवून पुढील सेटीन्ग्स करावेत:
- मोड: मायक्रोवेव्ह
- पॊवर : ९०० वॅट ( हाय )
- वेळ : ४ मिनिटे
- स्टार्ट चे बटण दाबावे.
- ४ मिनीटांनंर्र बाउल बाहेर काढून एकदा मिश्रण वर खाली करून घ्यावे व अजून शिजवण्यासाठी खालील सेटीन्ग्स करावेत :
- मोड: मायक्रोवेव्ह
- पॊवर : ९०० वॅट ( हाय )
- वेळ : २ मिनिटे
- स्टार्ट चे बटण दाबावे.
- २ मिनिटांनंतर वेलची पावडर घालून ढवळून घ्यावे. आणि फक्त १ मिनिटासाठी वरीलप्रमाणेच सेटीन्ग्स ठेवून शिजवावे.
- केवळ ७ मिनिटांतच नारळाची बर्फी मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये तयार झाली . २-३ मिनिटांनी जरा थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर मिसळून घ्यावी . ट्रे मध्ये बटर पेपरवर थापून घ्यावी. वरून वेलची पावडर आणि पिस्ता पावडर भुरभुरावी!
- एका तासानंतर या बर्फीचे सुरीने तुकडे करून घ्यावेत परंतु तिला वेगळे करू नये . पूर्ण १ दिवस किंवा किमान ६-८ तास तरी ही बर्फी झाकून सेट होऊ द्यावी .
- दुसऱ्या दिवशी या मस्तपैकी घट्ट सेट होतात आणि अतिशय सोप्प्या रीतीने एकमेकांपासून वेगळ्या होतात !
Leave a Reply