पावसाळा सुरु झाला की माझे मन भन्नाटायला लागतं . जसे बाहेरचे वारं अंगात शिरते म्हणतात ना , आणि तो वारं लागलेला मनुष्य कसा पिसाटल्यासारखा वागतो तस्साच पाऊस जणू माझ्या अंगात शिरतो . हे माझ्या धन्याला पक्कं ठाऊक आहे कारण बाल्कनीतून मुसळधार पडणारा पाऊस पाहून कुठेतरी वर्षा विहारासाठी जावे याचा विचार करत सुस्कारे सोडताना , त्याने अनंत वेळा मला पाहिलेय!
म्हणूनच माझ्या ईमेल वर ” मिस्टी माथेरान” चे बुकिंग कन्फर्मेशन फॉरवर्ड केल्यावर, माझे आश्चर्याने विस्फारलेले डोळे पाहून गालातल्या गालात हसत उभा होता . आई म्हणते , मी तशी पहिल्यापासूनच लवकर खुश होणारी , तिने स्वतःच्या हाताने विणलेला लोकरीचा गुलाबांचा हेअर बँड हौसेने घालून शाळेत पूर्ण दिवसभर आपल्याशीच खुदुखुदू हसणारी , आजीने देवळातून आणलेल्या प्रसादरूपी बुंदीचा अर्धा लाडू सुद्धा चाखून चाखून बराच वेळ खात राहणारी …
आम्ही वर्षातून एक दोनदा बाहेर फिरायला जातोच , परंतु पावसाळी सहल करून बरीच वर्षे झालीत . तसे मागच्या वर्षी आम्ही सहकुटुंब खोपोलीच्या वॉटरपार्क रिसॉर्ट मध्ये एक रात्र वास्तव्य केले होते , पण तसले बंद दरवाजे आणि खिडक्यांच्या आडून पाऊस पाहणे माझ्या अंतरात्म्याला नाही सुखावत ! मागे २००८ मध्ये आम्ही सारे मित्रमैत्रिणी काहीही पूर्वतयारी न करता अचानक एका वीकेंडला माथेरानला थडकले होतो, आणि तो जो पावसाचा अनुभव आम्ही घेतला होता तो आजतागायत जेव्हाही मैत्रीचा फड जमतो, त्या सहलीच्या आठवणी काढून आम्हा सर्वांच्या डोळ्यांत पाऊस तरारतो. आता त्याच माथेरानला इतक्या वर्षांनी परत जाताना मनात आनंदाची कारंजी उसळत होती.
प्रवासाची पूर्वतयारी :
“अहो राया मला पावसात नेऊ नका .. “ हे पूर्णतः प्रसंगाला विरोधाभास असणारे गाणे गुणगुणतच मी माळ्यावरून बॅगा खाली काढल्या ! एरवी कधीही बॅग पॅकिंग या विषयात नाक न खुपसणारा नवरा ते पाहून जवळजवळ खेकसलाच. त्याचे स्पष्ट म्हणणे की आपण बॅकपॅक बॅगच घ्यायची अँड स्ट्रिक्टली नो शोल्डर बॅग्स! त्याचे हे म्हणणे तेव्हा ऐकले ते बरं केलं , असे नंतर माथेरानला गेल्यावर पटले बुवा , का ते सांगते … माथेरान हे रायगड जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून उंच पठारावर साधारण ८०० मिटरहून जास्त उंचावर वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे , हे सर्वज्ञात आहे . पहिल्यांदा जाणाऱ्यांसाठी लिहू इच्छिते की तिथे थोड्याफार वळणांची , चढ उतारांची वाट भरपूर आहे , तसेच दगड धोंड्यांच्या रस्त्यावर खांद्यावर ओझे घेऊन जाणे किंवा चाके असलेली बॅग ओढत घेऊन जाणे हे निव्वळ सहलीची किरकिरी करण्यासारखे आहे . कोकणातली लाल माती , पावसाने झालेला तिचा चिखल तुडवत जाताना हात जितके मोकळे असतील तितके उत्तम .
आणि हो आता विषय निघालाय तर सांगूनच टाकते , चांगल्या ग्रीपचे पावसाळी बूट किंवा क्रॉक्स किंवा मजबूत सँडल्स/फ्लोटर्स घेऊन जा . कापडी स्पोर्ट्स शूज पावसात भिजल्यावर हॉटेल रूम फक्त दुर्गंधीत करण्यासाठी दोषी ठरतात , जे आमच्या रावसाहेबांनी केले . सांगत होते फ्लोटर्स घाल पण नाही .. असो मी बरी शहाणी , माझे क्रॉक्स घालून गेले होते .
जर तुमच्याकडे पूर्ण गुडघ्याखाली येणारे असे रेनकोट असतील तरच घेऊन जा , नाहीतर माथेरानला पोचेपर्यंत छत्र्या आपले काम चोख बजावतात . वर मार्केट मध्ये पोचल्यावर प्रत्येक हॉटेलमध्ये, रस्त्यावरील विक्रेत्यांकडे, इतकेच काय तर पानाच्या गादीवरदेखील ३० रुपयांमध्ये अंगभर रेनकोट आणि हॅट्स आरामात मिळतात . माझ्या फोटोज आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच . जर चुकून चप्पल सॅंडल विसरायला झालेच तरी काळजी नको , जागोजागी पावसाळी बूट , क्रॉक्स आणि चप्पल विकण्यासाठी दुकाने थाटली गेलीयेत , अरे हाय काय आणि नाय काय ! आणि इतके सुंदर सुंदर रंगसंगती त्या बुटांची काय सांगू . माझ्याकडे असूनसुद्धा मोह आवरला नाही मला , मी घेतले गुलाबी रंगाचे सॅंडल !
बॅग पॅक करताना घ्यायची विशेष काळजी म्हणजे कपडे, मोबाईल चार्जर्स , हेडफोन्स, पाकिटे आणि किंबहुना प्रयेक वस्तू ही प्लास्टिक ( पर्यावरणाला नुकसान न देणारे – ५० मायक्रोनहून जास्त जाडीचे ) मध्ये गुंडाळून मगच बॅगेत भरावी. केस लवकर वाळवण्यासाठी आणि हो ओल्या कपड्यांसाठीही हेअर ड्रायर ठेवला तर अति उत्तम ! एक टॉईलेट्रिस ची किट म्हणजे छोटी टूथपेस्ट , बॉडी वॉश किंवा साबण अशा तत्सम वस्तू (ऍडव्हान्स बुकिंग नसेल तर आयत्यावेळी कुठलं हॉटेल आणि काय सोयी असतील यांचा नेम नाही ) व प्रथमोपचार म्हणून खरचटणे वगैरे साठी अँटिसेप्टिक क्रीम , मुरगळणे , चमक भरणे यांसाठी स्प्रे वगैरे वस्तू ठेवाव्यात . गरज पडल्यास तिथे मेडिकल शॉप्स देखील आहेत .
तिकडे मला फारसे ATM दिसले नाहीत , आणि फक्त मोठ्या हॉटेल्समध्ये कार्ड सिस्टिम चालते . परंतु माथेरानमध्ये खादाडी करण्यासाठी आणि घोड्यावरून माथेरान दर्शन करण्यासाठी पुरेसे पैसे पाकिटात ठेवावेत.हा महत्वाचा मुद्दा विसरून चालणार नाही .
कपडे नेताना शक्यतो लवकर वाळणारे असे नायलॉन किंवा पातळ सुती न्यावेत, जे पॅक करायला ही सोपे ! सांगायचं मुद्दा असा की जितके लाईट वेट पॅकिंग करता येईल तितके करावे ! म्हणजे पाठीवर लादून मजा करायला आपण मोकळे !
प्रवास माथेरानचा :
गुरुवारी सकाळची हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस जिला पुण्या मुंबईत प्रेमाने मुंबई एक्सप्रेस म्हणतात त्या गाडीने आम्ही कर्जत ला पोहचण्याचे ठरवले . ऍडव्हान्स रिझर्वेशन असल्यामुळे आणि अर्धा तास आधीच पुणे स्टेशनला . पोचल्यामुळे खूप वेळ हातात होता. गाडीत वाचण्यासाठी साग्रसंगीत कादंबऱ्या खरेदी करणे वगैरे जाहले आणि बरोब्बर ९ वाजता शानदार भोंगा वाजवत ” १७०३२- हैदराबाद मुंबई एक्सप्रेस ” मोठ्या दिमाखात फलाटावर आली. गाडी थांबते ना थांबते तोच उतरणाऱ्यांची आणि चढणाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. गाडी तशी १० मिनिटे स्टेशनात थांबते पण गोंधळ घालणार नाही तो मनुष्य धर्म कसला हो ! डब्यात जणू काय लग्नाचे वऱ्हाडच होते , त्यांचे हळूहळू उतरेपर्यंत आम्हा चढणार्याना धीर निघेना . मी आपले मूळ मुंबईकरांचे रक्त उसळवीत डब्यात मारली मुसंडी ( लोकलच्या प्रवासाची प्रॅक्टिस हो ..) आणि माझी सीट पाहून ” भगवान देता है तो छप्पर फाडके ” याचा प्रत्यय आला . चक्क साईडची खिडकी .. मग काय मांडी ठोकून बसले आरामात , आणि वेळेत ट्रेनने पुणे स्टेशन सोडले . भपक भपक करत आगगाडी घाटांतून वळणे घेत चालली , आणि बाहेरचे मनोहारी दृश्य हृदयाचा ठाव घेत होते. अंधाऱ्या बोगद्यांतून शिरत बाहेर हिरव्यागार वनराईतून मन उधाण वाऱ्याचे होऊन झोके घेऊ लागलं . ” हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट , सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट ” या प्रश्नाचे उत्तरही देऊ न शकण्याइतकी ही चेडवा भारावून गेली होती !
बरोब्बर २ तासांनी ऑन टाईम ट्रेन कर्जत स्टेशनात आली , तिथे पुढचे नेरळसाठी तिकीट काढून आंम्ही लोकल ट्रेनमध्ये चढलो . जेमतेम १०-१५ मिनिटांचा प्रवास आणि नेरळ स्टेशनला उतरल्या उतरल्या बाहेरच आमच्या लहानपणी ” किडनॅपिंग ची नॅशनल व्हॅन ” म्हणून प्रसिदध असलेल्या ओमनी सदृश दिसणाऱ्या असंख्य प्रायव्हेट व्हॅन्स उभ्या होत्या . हे शेअरिंग मध्ये ८० रुपये एका व्यक्तीमागे घेतात आणि वर माथेरान च्या प्रवेशद्वाराशी म्हणजेच दस्तुरी नाक्यापर्यंत पोहचवतात . मागच्या सीटवर बसल्यामुळे फँटसिलॅन्ड मधलया एखाद्या राईडवरच बसल्याचा अनुभव येत होता . पूर्ण हा २० ते २५ मिनिटांचा प्रवास डोंगराची एक टोकदार वळणांची चढण होती. एखादा निपुण चालकच ते अंतर पार करू शकतो. म्हणून जर स्वतःचे वाहन घेऊन जात असाल तर ही राइड चॅलेंजिंग आहे बरं का !
दस्तुरी नाक्यावर प्रवेश फी प्रत्येकी फक्त ५० /- देऊन आम्ही माथेरानच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो . इथून पुढे वाहनांना जायला मज्जाव आहे कारण हा प्रदेश प्रदूषणमुक्त ठेवायचा सरकारी निर्णय आहे आणि तो नक्कीच स्वागतार्ह आहे . तुमची गाडी असेल तर ती तुम्हाला पे अँड पार्क च्या योजनेचा लाभ घेत इथेच पार्क करावी लागते! इथून माथ्यावरच्या रानात म्हणजेच माथेरानला पोचायचे ३ पर्याय : एक म्हणजे घोडेस्वारी किंवा बग्गी ( जी २-३ माणसे ओढतात , विशेषतः वृद्धांसाठी ), दुसरा पर्याय ” टॉय ट्रेन” आणि तिसरा म्हणजे आपली पदयात्रा ! आम्ही आधीच ठरवल्याप्रमाणे “निश्चयाचा महामेरू” होऊन घोडेवाल्यांना निक्षून नाही सांगितले , आणि चालत जायचे ठरवले . पावसाने जोर धरला होता आणि आनंदाने बागडत चालतानाच माझ्या सॅक ला मागून जोरात कोणीतरी लोम्बकळल्याचा भास झाला , पार्टनर ओरडला , ” बंदर है बंदर!” हे ऐकल्यावर तंतरली ना माझी , जागच्याजागीच थिजून मी किंकाळ्या फोडायला सुरुवात केली . माकडाने माझ्या सॅकच्या बाजूच्या कप्प्यात असलेले उरलेल्या चिप्सचे पॅकेट ,तो कप्पा न फाडता अगदी सराईत पाकिटमारासारखे लांबवले होते ! आपली कामाची वस्तू घेऊन , बाकी कसली ही इजा न करत कपीमहाशय बाजूला बसून चिप्स मिटक्या मारत खाऊ लागले ! इतके हसू आले काय सांगू तुम्हाला ,, तर असे झाले आमचे स्वागत माथेरान मध्ये !
जरासे पुढे गेलो आणि ” अमन लॉज” ह्या टॉय ट्रेनच्या स्टेशनवर पोचलो . तुम्ही कधी कार्टून सिनेमात पाहिले असेल ना , किंवा ” हिमगौरी आणि सात बुटके ” या लहानपाणी वाचलेलूया पुस्तकांत जशी चित्रे होती ना तशाच पिवळसर विंटेज लुक असणारे ते सारे दृश्य .. छोटेसे स्टेशन , कडेला असलेली छोटी तिकीट विक्रीची खिडकी आणि एखाद्या सुंदर स्त्रीच्या कमनीय बांध्यालाही लाजवतील असा निमुळता रूळ … पावसाळ्यामुळे खालची नेरळ ते माथेरान अमन लॉज पर्यंत असलेली टॉय ट्रेन बंद होती , बहुधा ती पावसाळ्यात बंदच असते ! म्हणून तिथलया तिकीट खिडकीवरची रांग पाहून कुतूहलाने पार्टनरने एका माणसाला विचारले ” इथे ट्रेन येते का ? ” त्यावर त्याने होकारार्थी मान हलवत अजून १० मिनिटांनी येईल असे सांगितले. तसाही मी माकडांचा धसका घेतला होताच आणि टॉय ट्रेन मध्ये बसण्याची उत्सुकता देखील होती, मग पदयात्रेचा प्लॅन रद्द करून लागलीच २ तिकिटे काढली ( प्रत्येकी ४५ रुपडे ) आणि जरा प्लॅटफॉर्मवर स्थिरावलो.
अचानक रुळांमधून एकामागून एक माकडे जणू काही शत्रूवर चाल करून आल्याच्या आविर्भावात , आम्ही जिथे उभे होतो पार तिथपर्यंत पोचली आणि क्षणार्धात जिथे नजर जाईल तिथे माकडेच माकडे… एक लेकुरवाळी तर पोटच्या बाळाला घेऊन स्टेशनच्या टपावर चढली आणि तिचे पोरट सुद्धा अगदी गच्च पकडून होते तिला ! माझ्या आतापर्यंतच्या पूर्ण आयुष्यात मी इतकी सारी माकडे एकाच वेळी कधीच नाही पाहिली ! आता मात्र कळून चुकले होते की ही वानरसेना आपल्याला जिकडे तिकडे भेटणारेच आहे तर घाबरण्यापेक्षा त्यांच्या ह्या विनोदी हालचालींचा निव्वळ आनंद घ्यावा . तसे ही थोड्या वेळापूर्वीच्या माझ्या स्वागत समारंभामुळे मला कळून चुकले होते की जर हातात खाऊ असेल तर तो माकडाने हिसकावून नेला म्हणून बोंब ठोकण्यात काहीच अर्थ नाही ! म्हणूंन एक सूचना तुमच्यासाठी , माथेरानमध्ये कधीही खायची वस्तू मग तो वडा पाव किंवा आईसक्रीम का असेना जिकडे खरेदी केलेय तिथेच उभे राहून किंवा बसून खाऊन टाकावे . खात खात फिरत राहिलात की आलीच मग स्वारी हिसकवायला !
हळूचकन मोबाइल कॅमेरा चालू केला आणि ही वानरसेना माझ्या कॅमेरात अगदी छानपैकी कैद झाली .. विडिओ मध्ये ही क्लिप बघताना तुम्हाला नक्कीच हसू फुटेल . आणि एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की या प्राण्यांना म्हणजे माकडे आणि कुत्रे विशेषतः , इतकी सवय झालीये की ट्रेन कधी येते जाते याचा त्यांना अचूक अंदाज येतो आणि बरोब्बर १० मिनिटे अगोदर स्टेशनवर येऊन आपापली पोझिशन्स घेतात ! प्रवाशांकडून काही ना काही खायला मिळायची आशा हो अजून काय !
त्यांच्या हालचाली टिपून घेण्यात रममाण असतानाच लांबूनच ” कुईईईई …. ” असा आवाज करत आली की हो माथेरानची राणी .. काय तिचे ते रुपडे , डोळ्यांत साठवून घेण्यासारखे , असे वाटले की आपल्या बालभारतीच्या पुस्तकातली मामाच्या गावाला जाणारी आगीनगाडी प्रत्यक्ष अगदी डोळ्यांसमोर … इंजिनाचा आवाज आणि सोबत धुक्याची वलयं , रंगीबेरंगी . लयबद्ध तालात हळुवार झुकझुक करीत … ” झुकझुक झुकझुक आगीनगाडी , धुरांच्या रेषा हवेत काढी , पळती झाडे पाहूया , माथेरानला जाऊया .. ” असे गुणगुणतच मी गाडीत चढले . असे म्हणतात की १९०७ मध्ये ‘आदमजी पिरभॉय’ नावाच्या पारशी गृहस्थाच्या प्रेरणेने ही झुकझुकगाडी सुरू झाली (Wiki links मधून ) . या ट्रेनचा लुक बराचसा ब्रिटिशकालीन आहे ! ही फक्त प्रवाशांसाठी नसून जड सामान वाहून नेण्यासाठीही तिचा खूप उपयोग होतो. ट्रेन १० मिनिटे थांबून सुरु झाली .
आणि मग सुरु झाला कधीही न संपो असा वाटणारा प्रवास.. डोळ्यांन न मावणारे काळ्या निळ्या ढगांनी गच्च भरलेलं आभाळ, दूरवर पसरलेल्या पर्वतांच्या कडा , छातीत धस्स करणाऱ्या दऱ्या आणि झुळझुळणारं झरे पाहून पुढचे दोन दिवस स्वर्ग सुखाचे असणार आहेत याची खात्री पटली !
२० -२५ मिनिटांचा प्रवास आणि आम्ही उतरलो हॅरी पॉटरच्या सिनेमात दाखवतात तसल्या धुकेमय ” माथेरान ” स्टेशनवर … हे स्टेशन अगदी मार्केटला लागूनच आहे आणि बरीचशी हॉटेलं इथे आसपासच आहेत . जरासे ५ मिनिटे चालत गेल्यावर राममंदिर घोडे तळावर पोचलो आणि घोडेवाल्यानी आम्हाला माथेरान दर्शनासाठी घोड्याचा भाव सांगीत गराडा घातला . त्यांच्या घोळक्यातून बाहेर पडलो आणि लगेचच बाजूला आम्ही जिथे बुकिंग केले होते त्या ” मिस्टी माथेरान” चा बोर्ड दिसला . हॉटेल तसे नवीन कोरकरीत बांधकाम असल्यामुळे दिसायला छान होते . कॉटेज सिस्टिम असल्याने आणि विटांच्या डिजाईनमुळे थोडा गावच्या वास्तव्याचा भास होत होता . मुख्य म्हणजे झोपाळे होते , रात्री त्यावर मनसोक्त झुलायचे असे ठरवून रूमची किल्ली आम्ही ताब्यात घेतली!
भ्रमंती पहिल्या दिवसाची :
माथेरानला एका दिवसासाठी जाऊन येणे हे पुणे-मुंबईकरांसाठी अगदी सहज शक्य आहे , आणि इथे कॉलेज युवक-युवतींचे , प्रेमी युगुलांचे , पूर्ण कुटुंबासहित ट्रिप आणि हो ज्यांना निसर्ग पाहण्यापेक्षा ओल्या पार्ट्या करायचा जास्त इंटरेस्ट असतो अशांचे येणे अधिकतर आहे . परंतु आम्हाला कामाच्या व्यापातून खरंच एका ब्रेकची नितांत गरज होती म्हणून आम्ही २ दिवस आणि २ रात्रींचे बुकिंग केलं होते. तसही फिरायला जाताना अति घाईगडबडीत ट्रिप करायला आम्हा उभयतांना मुळीच आवडत नाही , यावर आमचे नेहमीच एकमत असते ! आमच्या हॉटेलवर हारून नावाचा एक १८-१९ वर्षांचा मुलगा कस्टमर सर्विस साठी काम करतो , जसे की ” हारून २ चहा आणून देतोस का , हारून अंघोळीला गरम पाणी आणून देतोस का ” बिचारा एका हाकेत आणि एका व्हाट्सऍप कॉल वर ( कारण तिथे सगळे नेटवर्क्स नांग्या टाकतात बरं का ) सगळे अगदी हजर करून द्यायचा . त्याने आल्या आल्या आम्हाला स्वतःहून २ कप चहा पाजला , चवीला जरा गडबडच होती परंतु प्रवासाचा शीण घालवायला तो दुधाळ , जरासा कमी उकळलेला चहा सुद्धा पुरेसा ठरला ! आम्हाला खूप भूक लागली होती, दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेली होती , लगेच फ्रेश होऊन आम्ही निघालो आसपास फेरफटका मारण्यासाठी अँड नॉट टू फॉरगेट खादाडीसाठी !
तसे कुठल्याही ठिकाणी जाण्याआधी आम्ही थोडीशी पूर्वतयारी करून जातो जसे की खाण्यासाठी असलेली प्रसिद्ध ठिकाणे , काय काय आणि कोठे विकत घ्यावे , अशी माहिती आम्ही गुगल बाबाच्या मदतीने फोनवर नोट्स मध्ये मी सेव्ह करून ठेवते . अशीच एक लिस्ट आमच्याकडे आधीपासून तयार होती , दिनेश उपहारगृह, माथेरानचा फेमस कदम वडापाव आणि शब्बीर भाईची फेमस बिर्याणी. मार्केट मधून पुढे जातानाच कदम वडापाव आणि शब्बीरभाई ही दोन्ही ठिकाणे आम्ही हेरून ठेवली होती आणि कोणत्या वेळी काय खायचे हेही! मार्केटच्या मध्यभागी जामा मशीद आहे , तिथे एका बग्गीवाल्याला विचारले की दिनेश उपहारगृह कुठे आहे ? त्याने बोटाने सरळ रस्ता दाखवला जो पिसारनाथ मार्केट कडे जातो . पिसारनाथ हे शंकराचे देवस्थान माथेरान मध्ये प्रसिद्ध आहे . त्या बाबतीत दुसऱ्या दिवशीच्या माथेरान भ्रमंतीमध्ये मी पुढे उल्लेख करणारच आहे ! पिसारनाथ मार्केट कडे जाताना मला वाटेत एक जैन मंदिर दिसले . पारशी , गुजराती , मराठी , मुस्लिम लोकांचे इथे वास्तव्य आहे . या छोट्याश्या हिल स्टेशनवर सुद्धा निरनिराळ्या जाती धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात हे पाहून खरंच खूप आनंद झाला . चालत चालत आम्ही दिनेश उपहारगृहात कधी पोचलो कळलेच नाही ! तसे हे छोटेखानी हॉटेल , रस्त्याच्या कडेला लागून . तशी त्यासारखी बरीच हॉटेल माथेरान मध्ये आहेत . परंतु इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीत या उपाहारगृहाचे कौतुक वाचनात आले होते . एक तर याचे मालक अगदी साधा , प्रेमळ माणूस , अदबीने वागणारा आणि गिऱ्हाईकाला आदर देणारा ! दुसरे म्हणजे माथेरानात सगळीकडे दुधाळ चहा मिळतो , परंतु इथे मात्र अगदी कड्डक आल्याचा चहा तो ही ताजा बनवून ! आम्हा दोघांसाठी तर चहा म्हणजे जणू अमृत , आणि तो कड्डक, भरपूर आले ठेचून घातलेला व कमी साखरेचा हवा यासाठी आम्ही आग्रही ! बाकी तिकडे मिळणारे पदार्थ मोजकेच परंतु चविष्ट जसे की पोहे , उसळ पाव , मिसळ पाव, ब्रेड ऑम्लेट , बुर्जी आणि बटाटावडा वगैरे . म्हणजे भुकेलेल्याचे पोट भरणारे आणि चवीचे खाणाऱ्यांची जिव्हा तृप्त करणारे!
तिथे प्रत्येक छोट्या छोट्या हॉटेलमध्ये दुसरे काही मिळेल ना मिळेल परंतु गरम गरम मॅग्गी आणि तिचे नानाविध प्रकार जसे शेजवान मॅग्गी , चीज मॅग्गी मिळतेच मिळते . मॅग्गीची ही प्रसिद्धी पाहता आम्हालाही राहवले नाही , आम्ही २ दिवसांत इतक्या वेळा मॅग्गी खाल्ली की आम्ही आता महिनाभर तरी मॅग्गी खाणार नाही ! एकदा तरी मॅग्गी त्या थंड वातावरणात नक्की खाऊन बघा , खूपच चविष्ट लागते ! दिनेश उपाहारगृहात मालकांसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतानाच त्यांनी आम्हाला काही जेवणासाठी हॉटेल सुचवली . तसेच तो पॉईंट पिसारनाथ मार्केटचा असल्या कारणाने तिकडेही एक घोडे तळ आहे . आम्ही तिथूनच दुसऱ्या दिवशी फिरण्यासाठी सबिन भाईंचे २ घोडे बुक केले . काही जुजबी सामानाची जसे की रेनकोट , हॅट वगैरे आणि मी म्हटले ना आधी की तिकडे थाटलेल्या बुटांच्या दुकानातील रंगसंगती पाहून मीही लहान मुलीसारखा हट्ट करीत एक गुलाबी सॅंडल घेतलेच विकत !
आता वेळ आली होती हॉटेलवर जाऊन थोडा आराम करायची . २-३ तासांनी आम्ही परत निघालो मार्केटची सैर करायला . यावेळी पाऊस जोरात सुरु झाला होता आणि बरीच दुकानेही उघडली गेली होती. आम्ही गरम गरम भाजलेली कणसे खात चालू लागलो , आता तर मोमोज ही मिळायला लागले होते . पोटात फक्त जागा शिल्लक नव्हती . फेरफटका मारून दमल्यावर आम्ही कदम वडापाव खाण्यासाठी वळलो , हे एगज्याक्टली जामा मशिदीच्या समोर आहे , आणि माथेरानचा सुप्रसिद्ध वडापाव . परंतु दुर्दैवाने आमच्या २ दिवसांच्या वास्तव्यात एकदाही ते उघडले नाही , कदमांनू ह्ये बेस नाय झालं … 🙂 काही हरकत नाही मी पुढच्यावेळी नक्की खाऊन बघेन , पण तुम्ही आता माथेरानला जात असाल तर ह्यांचा वडापाव नक्की खा आणि मला खाली कंमेंट सेक्शन मध्ये कळवा.
माझी जीभ काही मानायला तयार नव्हतीच , मग आम्ही राममंदिरासमोर शेलार वडे वाले आहेत त्यांच्याकडे वडापाव खाल्ला . परंतु ते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे झाले , वडापाव फार उत्तम होता असे नाही म्हणणार मी, ठीक आहे , चालतंय की! पार्टनर ने माझ्या डोळ्यांत पाहत म्हटले सुद्धा ,”आपण एन्जॉय करायला आलोत ना मग प्रत्येक गोष्ट एन्जॉय कर “ ! आत्ता जरासा काळोख व्हायला लागला होता , सूर्य कधी मावळला कळलेच नाही , कारण तिथे सूर्य दिसेल तर शप्पथ ! दिवसाचा प्रत्येक प्रहर हा ९० टक्के धुकेमयच असतो . मार्केट मध्ये जामा मशीद हा अगदी नाक्याचा पॉईंट ! तिथे एक छानसे कारंजे आहे आणि त्या भोवती बसण्यासाठी बाकडे आहेत . एका बाकड्यावर आम्ही स्थिरावलो , बाजूचा बाकड्यावर रिटायर व्हायच्या वयात आलेले जोडपे होते. काका काकू अगदी खुशीत गप्पा मारत रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ पाहत होते.आमच्याही गप्पा चालू होत्या , काय काय दृश्ये इतकी मजेदार होती ना , प्रत्येक दुकानाच्या छपरांवर चढून माकडे इकडून तिकडे नुसता कल्ला करत होती. दुकानदार बिचारे खालून काठी ठोकत त्यांना पळवून लावायचा निष्फळ प्रयत्न करीत होते. मधेच एखाद्या कुत्र्यांचे टोळके त्यांच्या हद्दीत आलेल्या दुसऱ्या कुत्र्यावर दात विचकून गुरकावत होते. पार्टनर ने एक बिस्किटांचे पुडके घेऊन एका छोट्याश्या भोळसट दिसणाऱ्या कुत्र्याला बाजूला घेऊन खायला घातले . आणि मी नको नको म्हणत असताना अजून बिस्किटांचे पुढे घेऊन सगळ्या कुत्र्यांना खायला घालू लागला . आणि मग झाली ना त्या टोळ्यांत झुंबड , एकमेकांवर भुंकत , गुरकावत नुसता कालवा उठवला , मग काय आम्हाला नीट बसू पण दिले नाही बाकड्यावर! माथेरान मध्ये काही दृश्ये मात्र खरंच मनाला भिडणारी आहेत , गोशाळेत नेऊन गवत खाल्ल्यावर काही विनामालकीच्या गायी मृत पावत होत्या . मग अशा गाई रस्त्यांवर भटकतात . त्या गाईंना तिथले दुकानदार , तिथले राहती लोकं आपापल्या परीने काहीना काही खायला घालून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात . आणि त्या गाईही इतक्या रुळल्यात की ज्या दुकानातून खायला नेहमी मिळते तिकडे जाऊन बरोब्बर उभ्या राहतात ! आणि सांगू तुम्हाला एक दृश्य पाहून मला तर आजही माणसांमध्ये माणुसकी , भूतदया जिवंत आहे याचा प्रत्यय आला . एक मुस्लिम गृहस्थ मशिदीतून अज़ान ऐकल्यानंतर संध्याकाळच्या नमाजासाठी चालले असताना या प्रत्येक गायीला आपुलकीने तिच्या मानेखालची पोळी खाजवत चालले होते आणि तीही ते लाडाने करून घेत होती , नेहमीची ओळख असावी बहुधा ! का हो आपण जातीभेदाच्या धर्माच्या बेड्यांत अजूनही पडून आहोत .. मी काय म्हणतेय हे सुज्ञास विश्लेषण करून सांगणे न लगे !
रात्रीच्या जेवणासाठी आठच्या दरम्यान आम्ही “आमंत्रण” या हॉटेलकडे मोर्चा वळवला , स्टेशनच्या जवळ आहे . इथे मुख्य मेनू कोकणी / मालवणी पद्धतीचा आहे . परंतु पंजाबी जेवणसुद्धा मिळते! दुपारच्या जेवणात भाकरी , घावणे वगैरे हमखास मिळतात . परंतु रात्री भाकरी आणि घावणे अव्हेलेबल नव्हते म्हणून आम्ही सरळ कोंबडी वडे थाळी ऑर्डर करून वर अजून रवा मांदेली फ्राय देखील मागवले . थाळ्या यायला थोडा २०-२५ मिनिटे वेळ घेतला … कारण हे जेवण ते ताजे करून देतात ऑर्डरप्रमाणे ! जेवण आल्यावर अक्षरशः आम्ही तुटूनच पडलो . खमंग खुसखुशीत भाजणीचे वडे , झणझणीत चिकन सुक्का , चिकन रस्सा, सोलकढी आणि कुरकुरीत मांदेली फ्राय! जेवण छान होते परंतु त्यात मालवणी मसाल्या ऐवजी बेडगी किंवा तिखट मिरची पावडर वापरली होती असे मला प्रकर्षाने जाणवले ! जेवणाच्या उत्तम चवीबद्दल शंकाच नाही . मासे ही ताजे होते . एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा “आमंत्रण” ! जेवणानंतर मुखशुद्धीसाठी छोटूभाई पानवाले यांच्याकडे दोन कलकत्ता मीठा पानाचा तोबरा भरून आम्ही आमच्या निवासस्थानाकडे परतलो .
माथेरानची भ्रमंती- दिवस दुसरा:
सकाळी आम्ही अलार्म न लावतासुद्धा साडेसात ला उठलो . लवकर उठण्याची एकदा सवय लागली ना की सुट्टीच्या दिवशी सुद्धा झोप येत नाही . परंतु आम्ही दोघे ठरवूनच कधीही व्हेकेशन ला गेल्यावर उशिरापर्यंत झोपणे टाळतो नाहीतर बाहेर खात हुंदडायचा वेळ कमी होतो ना ! आज आमची घोड्यावर ऐटीत बसून माथेरान भ्रमंती होणार होती . खूप एक्ससायटमेन्ट तर होती पण थोडी धाकधूक ही ! रेनकोट वगैरे घालून आम्ही तयारीतच दिनेश उपाहारगृहात पोचलो कारण सबिन भाईंना आम्ही तिथेच यायचे कबूल केले होते. एक गोष्ट मी सांगायला विसरले , माथेरान च्या राम मंदिर घोडे तळावर एक मोठा डिस्प्ले लावलेला आहे त्यावर काही हॉटेलच्या जाहिरातींसोबत , प्रवासी दर जे तिथलया नगरपालिकेने घोडेमालक संघटनेच्या मदतीने कायदेशीररित्या दर्शवले आहेत , जेणेकरून कोणीही पर्यटकांची नाहक फसवणूक करू नये . म्हणूनच एकदा त्या डिस्प्लेवर जरूर नजर टाका आणि मगच घोडेवाल्यांशी संभाषण साधा , असा मी सल्ला देईन!
दिनेश उपाहारगृहात मस्तपैकी ब्रेड ऑम्लेट , मिसळ पाव , मॅग्गी आणि अर्थातच कड्डक आल्याचा चहा घेऊन आम्ही सबिन भाईंसोबत घोड्यांवरून माथेरान दर्शनासाठी निघालो . घोड्यावर जेव्हा चढून बसायची वेळ आली तेव्हा मात्र आतापर्यंत घेतलेला झाशीच्या राणीचा आवेश गळून पडला . माझी फजिती आणि घोड्यावर बसताना उडालेली तारांबळ बघून पार्टनर आणि सबिन भाई दोघेही फिदीफिदी हसत होते. व्हिडिओत दिसेलच तुम्हाला ! आम्ही नीट बसलो याची पक्की खात्री झाल्यावरच सबिन भाई आम्हा दोघांच्या ही घोड्यांना घेऊन चालत निघाले . विचार करा , आपण घोड्यांवर, काटेकुटे , खळग्यांची घनदाट जंगलातली वाट , आणि हे घोडे वाले रोज दिवसातून कितीतरी वेळा पायी चालतात ! श्रम आहेत हो.. पहिल्यांदा ओळख करून घेतली आमच्या घोड्यांधी , माझा घोडा अगदी काळाभोर होता अमावास्येच्या रात्रीच्या दाट काळोखासारखा ..मुलायम रेशमी त्याची काळी आयाळ , एकदम राजबिंडा , त्याला दृष्ट लागू नये म्हणून जन्मतःच त्याच्या कपाळावर पांढरे उभे गंध लावून पाठवले होते देवाने … त्याचे नाव होते ” रिओ” आणि पार्टनर ज्या घोडयावर होता ते नुकतेच वयात आलेले तरुण पोर होते, अल्लड , पांढया करड्या रंगाचे , दिसायला खूपच देखणे , त्याचे नाव होते ” ओरिओ ” , अगदी ओरिओ क्रीम बिस्किटासारखेच !
माणसापेक्षा प्राणीच किती समजूतदार हो ,, वाटेत आलेल्या झाडाझुडपांना अजिबात न तुडवता थोडेसे तिरपे होऊन घोडे हळूहळू पुढे जात होते . सबिन भाई हा एकदम मस्त मौला माणूस … छानपैकी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही चाललो होतो , मधेच आम्हाला माथेरानची माहिती ते सांगत होते. हळूहळू एकेक पॉईंट जवळ येऊ लागला. माथेरान हा डोंगरकपारीचा , कड्यांचा प्रदेश , तिथे एकाच ठिकाणी बरेचसे पॉईंट्स जवळपास आहेत . जसे की आम्ही पहिल्यांदा शार्लेट तलाव इथे पोहोचलो. तिथेच जवळ सिलिआ पॉईंट , लॉर्ड्स पॉईंट , आणि पिसारनाथ मंदिर आहे . या पॉईंट्स ना इंग्रजांनी दिलेली नावे आहेत हे तुमच्या लक्षात आलेच असेल . माथेरानचा शोध कसा लागला हे विकी लिंक्स वर खालील शब्दांत लिहिले आहे :
“इ.स. 1850 मध्ये मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी ठाण्याचा कलेक्टर होता. त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला. तो स्वतः एक ट्रेकर होता. त्यामुळे तो ह्या डोंगराकडे आकर्षित झाला. तिथल्या एका पाटलाला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वन ट्री हिल पॉईंटवरून वर चढला आणि रामबाग पॉईंटवरून खाली उतरला. नंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा एकदा इथे आला आणि राहण्यासाठी घर बांधले. त्याच्या मागोमाग त्याचा इतर मित्र परिवार आणि इंग्रज माथेरानला स्थायिक झाले.” खरंतर मुंबईच्या दमट वातावरणामुळे , इंग्रजांनी या हिल स्टेशनचा विकास केला स्वतःच्या राहणीसाठी . हे तिकडे असलेल्या काही पडीक बंदिस्त वास्तूंवरून दिसून येते .
शार्लेट तलावाला पाहताच डोळ्यांवर विश्वासच बसेना . दूरवर किनारा नसलेले अथांग पाणी , पावसाने तुडुंब भरून या जलाशयातले पाणी एका छोट्याश्या धरणवजा जागेतून खळाळत खाली सिलिआ पॉईंट द्वारे वाहत कड्यावरून खाली कोसळतेय. आणि ते कोसळताना कड्याच्या खालून धुक्यांची अगणित वलये वर आकाशात तरंगतायेत , हे दृश्य एखाद्या हॉलिवूड सिनेमातल्या ग्राफिकस प्रमाणे ! इतका सुंदर देखावा याची देही याची डोळा पाहण्यात जे सुख आहे ते घरी बसून कितीही मोठ्या इंचाच्या एलईडी टीव्हीवर पाहण्यात नाही . मला तर तिथून बिलकुल हलावेसेच वाटत नव्हते . काही एक दिवसीय मान्सून ट्रिप करण्यासाठी आलेले बरेचसे ग्रुप धाडस करून त्या धरणाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेत होते आणि आम्ही रिमझिम बरसणाऱ्या धारांचा !
सबिन भाई ने तसा अर्ध्यापाऊणतासाचा वेळ दिला होता भटकायला , शार्लेट लेकवरील पुलावरून पुढे जात आम्ही लॉर्ड्स पॉईंट च्या प्रवेशद्वाराशी पोचलो. हा माथेरानचा खरंच अतिशय देखणा पॉईंट! त्या लाल पायवाटा , ती गर्द वनराई , मधूनच एखादा वृक्ष आपली अवाढव्य मुळे वाटेत पसरवून बसलेला , पायवाटेच्या दोन्ही बाजूंना खोल दऱ्या … शेवटी त्या पॉईंट ला आलो आणि डोळ्यांत मावता न येणारा निसर्ग .. ज्या डोंगरांचे कडे दरीत कोसळलेले आहेत तेच हे पॉईंट्स प्रसिद्ध झालेत . धुक्यांची दुलई पांघरलेली हिरवाई , त्या डोंगरांच्या ओबडधोबड सुळक्यांतही निसर्गाची एक मनोहारी चित्रकला ! हा निसर्ग डोळ्यांवाटे पिऊन हृदयात गच्च भरून घ्यावा , पण त्याच्यासहीत खेळ करू नये हेच दर्शवणारे ते एक लोखंडी रेलिंग , एका रेलिंग ने मनुष्य आणि निसर्ग यातली सीमा ठरवलेली ! कोसळणारे प्रपात , क्षणात झाडीच्या आड लपून दुसऱ्या दिशेने अधिकच उंच कोसळणारे , मनुष्याला हीच शिकवण देतात की ” वाटेत दगडांसारख्या कितीही अडचणी आल्या तरी त्यांना वळसा घालून आपला मार्ग चोखंदळायचा !”
माथेरानचे वर्णन करताना आता खरंच माझी लेखणी अपुरी पडायला लागलीये . म्हणतात ना एखादी जागा soulful आहे , ती ही आहे , यात शंकाच नाही ! लॉर्ड्स पॉईंट प्रमाणे आम्ही बरेच पॉईंट्स घोड्यावरून आणि चालत पाहिले , त्यात मला जितके आठवतात त्यात पिसारनाथ मंदिर, किंग एडवर्ड पॉईंट, एको पॉईंट , मलंग पॉईंट , लुईझा पॉईंट हे आहेत. अधिक माहितीसाठी या लिंक वर वाचून पाहू शकता
जवळजवळ आम्ही अडीच तीन तास ही भटकंती केली आणि मग जिथून सुरुवात केली होती त्या घोडे तळावर सबिन भाईने आम्हाला सुखरूप आणून सोडले . त्यानंतर सडकून भूक लागली होती . सकाळीच आम्ही एक “सुयोग हॉटेल” हेरून ठेवले होते , ते राममंदिराच्या समोर एक छोट्याश्या गल्लीत आहे . हे मी तुम्हाला ” मस्ट ट्राय ” म्हणून रेकमेंड करिन. थाळी सिस्टिम आणि छोटे मिल्स जसे कि चपाती किंवा भाकरी आणि एखादी भाजी किंवा मासे / चिकन / अंडी मसाला वगैरे. आम्हाला रात्री शब्बीर बिर्याणी खायचीच होती म्हणून आम्ही थाळी न मागवता तांदळाची भाकरी व सुका जवळा मसाला आणि कोळंबी मसाला ऑर्डर केले आणि सोलकढी सुद्धा ! खरं सांगू मला असे वाटत होते की ही एकदम घरची चव होती. सोलकढी तर अप्रतिम ,,, प्रश्नच नाही , अगदी घरी बनवल्यासारखी ! सुका जवळा इतका छान मसाल्यामध्ये जमून आला होता , भरपूर कांदा आणि हिरवी मिरची घातलेला ! कोळंबी मसाला चविष्ट होताच परंतु ती कोळंबी परफेक्टली अगदी जस्ट शिजेपर्यंतच शिजवली होती , तिचा स्वतःचा एक रसाळपणा त्यात शाबूत होता , मला अति शिजवून चिवट झालेली कोळंबी अजिबात आवडत नाही ! अर्थात हा ज्याच्या त्याच्या चवीचा प्रश्न आहे. मला आणि पार्टनरला जेवण भयंकर आवडले आणि मुख्य म्हणजे त्यांची पोर्शन साईझ ३ माणसांसाठी ही पुरु शकते इतकी आहे , म्हणून मागवताना जरा सांभाळून मागवा . अन्न टाकून देणे बरोबर नाही म्हणून आम्हाला थोडे ते जेवण खूपच पोटभर झाले , हरकत नाही , मार्केट ला ३ राऊंड मारून मगच हॉटेलवर अराम करायला जायचे असे ठरवून आम्ही बाहेर पडलो !
आता मात्र पोटऱ्या आणि पायाचे तळवे ठणकू लागले होते . माहित नाही शिवरायां चे सैन्यदळ इतकी घोडदौड कसे करीत होते . आमची ३ तासांत हवा निघाली होती. मग मस्त २ तासांची झोप काढून मी थोडे परतीच्या प्रवासाची तयारी म्हणून पॅकिंग करायला घेतले . हे यासाठी की बॅगेत किती जागा उरतेय आणि आम्ही किती सामान विकत घेऊ शकतो याचा अंदाज यायला ! . कारण तिकडे हातात पिशव्या घेऊन तुम्ही नाही चालू शकत , का माहित आहे ना … “दहशतssss माकडांची ” ! थोडे फार बॅगेत कोंबण्यासारखे एक चोरकप्पा करून आम्ही संध्याकाळी पहिल्यांदा चिक्की घेण्यासाठी गेलो . जसे महाबळेश्वर ला जाऊन स्ट्रॉबेरीला विसरणे हे घोर पाप आहे तसे माथेरान ला चिक्की खरेदी करावीच लागते , शास्त्र असत ते हो.. मी तशी फार चिक्की फॅन नाही , परंतु आता मात्र मी म्हणेन इकडली चिक्की खाऊनच बघा . तसे नरिमन मार्ट इथले फेमस , परंतु पार्टनरचे डोळे मात्र काही वेगळेच शोधात होते , सांगतही नव्हता नीट , मग मी खेकसले , “अरे ते काय समोर नरिमन मार्ट आहे , चल ना !” त्याने अचानक जाऊन कणीस वाल्याला विचारले की इथे जॉली चिक्की मार्ट कुठेय ? जिथे विचारल त्याच्या अगदी बाजूलाच होते , आम्ही उगा चकवा पडल्यावाणी गोल फिरत होतो !
आता जॉली चिक्की मार्ट हा माझ्या या ब्लॉग मधील सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट , याचे जे मालक आहेत श्री . भद्रेश शहा , त्याहूनही इंटरेस्टिंग व्यक्तिमत्त्व ! अगदी पुल देशपांडेंच्या ” व्यक्ती आणि वल्ली ” यांच्या पुस्तकात शोभून दिसेल इतका वेगळं आणि मजेशीर ! पहिल्यांदा त्यांना मी सांगितले की तुमचे नाव इंटरनेट वर एका ब्लॉग मध्ये मी वाचून आलेय तेव्हा खुश तर ते झालेच परंतु उगाचच हुरळून न जाता त्यांनी आम्हाला त्यांच्याकडच्या एकेक चिक्कीचे वैशिष्ट्य सांगत जवळपास अर्धा डझन फ्लेवर्स तरी चाखायला दिले . आणि कोठे हि जोर जबरदस्ती नाही , तुम्ही खा आणि आवडले तर घ्या किंवा नाही घेतलेत तरी हरकत नाही अशा ऍटिट्यूड चा हा मनुष्य . परंतु त्यांच्याकडल या चिक्कीची चवच इतकी भारी होती ना की मी त्यांना स्ट्रॉबेरी , मँगो , माझी अत्यंत आवडती तिळाची चिक्की , आणि पारंपरिक गुडदाणी पॅक करवून घेतली . वर त्यांनी मला पिस्ता चिक्कीचे काही तुकडे असेच चवीसाठी फ्री दिले .
मी काही दिवसांपूर्वी ” सकाळ” मध्ये एक लेख वाचला होता , त्यात म्हटले होते की बिजनेस मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सामान्यज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज असणे गरजेचे आहे . गिर्हाईकासही संवाद साधताना जर त्याच्या संस्कृतिविषयी , राहत्या प्रदेशाविषयी माहिती असेल तर तो गिर्हाईक तुमच्याशी लगेच कनेक्ट होतो . हेच धंद्याचे यशस्वी सूत्र भद्रेश यांनी जाणले आहे . गिर्हाईक मुंबईचा असो कि पुण्याचा कि अजून कुठला ,त्यांची संवाद साधण्यात हातोटी आहे . त्यांच्याकडून आम्ही चॉकोलेट फज विकत घेतला , खूपच चविष्ट आणि ते तो स्वतः बनवतात , त्यांची स्वतःची रेसिपी ! या फजमध्ये अंजीर फ्लेवर सुद्धा आहे , तुम्ही एकदा नक्की जॉली मार्ट ला भेट द्या . त्यांच्याशी बोलून खूप बरं वाटते , आनंदाचा झरा आहे तिकडे !
आम्ही चिक्कीचे आणि फजचे पाकीट टोप्यांत लपवून पहिल्यांदा हॉटेलवर आमच्या सामानात ठेवून आलो . नंतर आम्ही वळलो जामा मशिदीच्या गल्लीत , शब्बीर भाईंकडे ! इथेही मांजर आडवे गेले होते की काय असे वाटायला लागले , शब्बीर भाईंचा ढाबा बंद होता , मला खूप वाईट वाटले ! तुम्ही नक्की खा हां त्यांच्याकडे , माथेरानची फेमस बिर्याणी आहे म्हणतात ! मग आम्ही फक्त काहीतरी हलके फुलके खायचे ठरवून “अलंकार रेस्टोरंट “मध्ये एकच ” झमझम पुलाव ” मागवला ! हा पुलाव एक पारंपरिक मुस्लिम डिश आहे ज्यात भाज्या , अंडी , चिकन आणि मटणाचे पिसेस घालून बनवतात . वरून बरेच ड्राय फ्रुटस घातलेले असतात ! चवीला ठीक होता पुलाव , परंतु मी अजून काही ठिकाणी ऑथेंटिक चव चाखण्याचा प्रयत्न जरूर करीन !
जेवण झाल्यावर तसल्या थंड वातावरणातही , पार्टनरला आइस्क्रीम खाऊसे वाटत होते . सॅकविल हे एक छोटेखानी हॉटेल , स्पेशली स्ट्रीट फूड जसे पावभाजी , वडापाव , मिसळ , चाट यांसोबत मस्त आइस्क्रीम देखील मिळते . आम्ही चॉकलेट आइस्क्रीम अगदी चवीचवीने चाखत बसलो . एक सांगायचे विसरले हां .. माथेरान ला मलाई गोळा जरूर ट्राय करा , आम्ही एको पॉइंटला खाल्ला होता ! मी जास्त नाही लिहीत या बाबत .. व्हिडिओमध्ये डिटेल गोळा मेकिंग कृती आहेच ! तर अशी ही आमची माथेरानची मान्सून सहल – साठा उत्तरां सुफळ संपूर्ण !
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही १० च्या दरम्यान चेक आउट करून परतीच्या प्रवासाला निघालो , डोळ्यांत निसर्ग साठवून , मनात नवी उभारी घेऊन आणि पूर्ण ताजेतवाने होऊन!
तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला हे जाणून घ्यायला आवडेल मला ! तुमच्या अभिप्रायांची वाट पाहत आहे …
Click to watch recipe video
Nice piece written. Girl, you know how to live LIFE! Keep it on.
With love, Jayashritai Mane
Thank you so much Tai , loved to hear from you 🙂