पावसाळा मला जाम आवडतो , आता आपल्या काही मैत्रिणी म्हणतील पण , की काय भंजाळली आहे ही, इथे आमचे कपडे वाळत नाहीत , आणि काय त्या दिवसभर रपरप करणार्या पावसाचे कौतुक! खर्र आहे , होते माझी पण चिडचिड! तरीही आई शप्पथ सांगते , मला पाऊस खूपच आवडतो!
मला वाटते हा पाऊस मानवी स्वभावाचे अप्रत्यक्षितरित्या दर्शन घडवितो. बघा ना .. उत्साही आणि आनंदी लहानग्यांसारखा बागडणारा , पानापानांतून झिरपणारा पाऊस, प्रणयाची धुंदी चढवणारा , आनंदाचे शिडकावे करणारा , रडक्या शेंबड्या पोरासारखा दिवसभर चिरचीर् करणारा आणि रागात बेभान झालेला, मनातल्या घुसमटीला वाचा फोडणारा गडगडणाऱ्या ढगांसकट , विजेच्या चमचमाटातला मुसळधार पाऊस ! उगाचच नाही आपल्या साहित्यात पवसावर एवढ्या कविता आणि निबंध लिहिले गेलेत….
असा हा पावसाळा मला अजुन एका गोष्टीसाठी प्रिय आहे की मी मनसोक्त तळलेले पदार्थ बनवू आणि खाउ शकते जे इतर वेळी खाताना मला डाएट नावाच्या राक्षसाची भीती वाटते! आता असे म्हणता येते ना , अरे इतका छान पाऊस पडतोय एकेक वडापाव किंवा ब्रेड पॅटीस होऊन जाउ दे ….
जितका मला वडा पाव आवडतो ना तितकाच ना हा वडापाव चा भाऊ ब्रेड पॅटीस मला लईई आवडतो. काय झाले बटाट्याची ही दोन पोरे, एकाने सूत जमवले पावाशी आणि दुसर्याने गाठ बांधली ब्रेडशी! दिसायला दोघे ही वेगळे पण चवीला , अहहाआआ , झक्कास!!
इंजिनियरिंग कॉलेज मधे सिन्सियर स्टूडेंटचा टॅग लागलेल्या ग्रूपचे आम्ही लीडर, म्हणजे लेक्चर न बंक करता पूर्ण दिवस कॉलेज अटेंड करून , ट्रेन पकडायच्या आधीचे हे आमचे खाद्य – वडापाव, ब्रेड पॅटीस, सामोसा पाव, बटाटा भजी पाव किंवा दाबेलि! कितीतरी आठवणी जोडल्या गेल्यात … डाव्या हातात चट्नी लावलेल्या ब्रेड पॅटीसचा घास घेताना, उजव्या हाताने हालत्या ट्रेन मधे असाइनमेंट लिहीण्याचे उद्योग करायला टॅलेण्ट लागते नाही का , ते पण जर्नल वर चटणीचा डाग न पडता! 😊
तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, सतत पडणार्या पवसावर चिडचिड करण्यात काही अर्थ नाही , चला काढा आपला झारा आणि कढई , बनवूया ब्रेड पॅटीस …. अरे हाय काय आणि नाय काय! 😊
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Also read this recipe in English
- ४ उकडलेले बटाटे = ३०० ग्रॅम्स
- १ कप = १२५ ग्रॅम्स बेसन
- ६ ब्रेड स्लाईसेस
- ५-६ कढीपत्ता
- ५ हिरव्या मिरच्या
- १ इंच आल्याचा तुकडा
- ७-८ लसणीच्या पाकळ्या
- १ लहान कांदा बारीक चिरून = ६० ग्रॅम्स
- पाव कप कोथिंबीर बारीक चिरून
- हिरवी चटणी ( रेसिपी लिंक )
- लाल चटणी ( रेसिपी लिंक )
- अर्धा टीस्पून मोहरी
- एक टीस्पून जिरे
- पाव टीस्पून हिंग
- अर्धा टीस्पून हळद
- पाव टीस्पून लाल मिरची पूड
- अर्धा टीस्पून ओवा
- मीठ
- १ टीस्पून लिंबाचा रस
- अर्धा टीस्पून साखर
- तेल
- सर्वप्रथम हिरवे वाटण करून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता , लिंबाचा रस घालून जाडसर पेस्ट करून घेऊ. लागल्यास १ टीस्पून पाण्याचा वापर करू शकता .
- एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घालून त्यात हळद , लाल मिरची पूड, ओवा, आणि मीठ घालून मिसळून घेऊ . त्यात २ टेबलस्पून कडकडीत गरम झालेले तेल घालून घ्यावे. अर्ध हिरवे वाटण घालून थोडे थोडे पाणी घालून नीट एकत्र करून घेऊ. मी पाऊण कप पाणी घातले आहे . ६-७ मिनिटे मिश्रण चांगले फेटून घ्यावे. जितके चांगले फेट्ले जाईल तितके भजी छान हलक्या होतात , बेकिंग सोडा वगैरे वापरायची काहीही आवश्यकता नाही.झाकण घालून थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ.
- एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल घालून त्यात मोहरी, जिरे,आणि हिंगाची फोडणी करून घ्यावी. बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका करडा होईपर्यंत ४-५ मिनिटे परतून घेऊ.
- आता थोडी चिरलेली कोथिंबीर घालून त्यात उरलेले हिरवं वाटण घालून घेऊ. चवीपुरते मीठ घालू आणि हा मसाला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत नीट परतून घेऊ. आता साखर आणि उकडून मॅश केलेले बटाटे घालू. आवडत असल्यास पाव टीस्पून हळद देखील घालू शकता. मला सारणाचा रंग पिवळसर नको हवा होता म्हणून मी सारणात हळद नाही घातली. चांगल्या रीतीने ढवळणीच्या चमच्याने किंवा पोटॅटो मॅशेर ने बटाटे नीट मॅश करून घ्यावेत जेणेकरून ते ब्रेडच्या स्लाइसवर नीट पसरतील.
- उरलेली कोथिंबीर घालून , एकत्र करून घ्यावी. हे सारण गॅसवरून उतरवून पूर्णपणे थंड होऊ द्यावे.
- ब्रेड पकोड्यासाठी २ ब्रेड स्लाईसेस घेऊ. ब्रेडच्या कडा अजिबात कापू नयेत , एका स्लाईसला हिरवी चटणी आणि दुसऱ्या स्लाईसला लाल चटणी लावून घेऊ.
- दोन्ही स्लाईसमध्ये बटाट्याचे सारण हाताने अलगद टोकापर्यंत पसरून घेऊ. हे ब्रेड पॅटिस सुरीने दोन त्रिकोणी भागांत कापून घेऊ जेणेकरून तळायला सोप्पे जाईल . अशाच प्रकारे सारे पॅटीस बनवून घेऊ .
- तळण्यासाठी पॅटीस बुडतील इतके तेल एका कढईत गरम करून घेऊ. तेल गरम झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी बेसनाच्या मिश्रणाचे ३-४ थेंब गरम तेलात घालू . जर ते तळून लगेचच वर आले तर समजावे तेल गरम आहे .
- आच मध्यम करावी . पॅटीस नीट बेसनात घोळून त्याचे एक्सट्रा घोळ खाली १० सेकंड गळू द्यावे आणि मगच तेलात अलगद सोडावे . मंद ते मध्यम आचेवर पॅटीस दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
- हे गरमागरम ब्रेड पॅटिस किंवा ब्रेड पकोडा मुंबई स्पेशल वडापावची लसणाच्या चटणीसोबत खावयास द्यावे .
Leave a Reply