“आला वसंत ऋतू आला ,
वसुंधरेला हसवायाला ,
सजवीत , नटवीत लावण्याला ,
आला आला वसंत ऋतू आला ! ”
वसंत हा सर्व ऋतूंचा राजा जणू … चौफेर आनंद पसरलेला , कडाक्याच्या थंडीच्या शिशिरातून बाहेर येऊन धरती वसंताच्या प्रेमळ उबेने सुखावून गेलेली असते. शेतांमधून आणि झाडांवर पिवळे फुलारे फुललेले , अतिशय सुंदर आणि रोमहर्षक असा हा वसंत!
शांताराम आठवलेंच्या लेखणीतून साकारलेले , आशाताईंच्या स्वरातले हे मधुर गीत ऐकताना , नकळत लक्षात आले की वसंत आला की वेध लागतात ते होळी आणि गुढीपाडव्याचे ! तसे मला सारे सण इथंभूत साजरे करायला आवडतात , पण होळी ही अंमळ जास्तच आपलीशी ! अंगात रक्त रत्नागिरीचे सळसळतेय ना … ज्यांना कोकणातली होळी माहित असेल , जिला रत्नागिरी आणि मालवणला शिमगा असेही म्हटले जाते, त्यांना माझी ही कोटी नक्कीच समजेल ! असो ही मजा कधी मी नक्कीच माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये लिहीनच ..
मी तशी थोडीशी पारंपारिक विचारसरणीची , म्हणजे होळी म्हटली की पुरणपोळी , गुढीपाडवा म्हटले की श्रीखंड, अशी माझी समीकरणे ठरलेली ! परंतु सासर माझे उत्तर प्रदेशातले अलाहाबादचे आणि सासूबाईंचे माहेर म्हणजे देवभूमी बनारस ! आणि त्यात पार्टनर एक नंबरचा खादाड .. त्याला नवनवीन पदार्थ खायला आणि बनवायला सुद्धा आवडतात ! रोज काहीतरी, कुठेतरी वाचून, ऐकून नवीन नवीन पदार्थांच्या आयडिया घेऊन येईल, याचा काही नेम नाही ! मलाही त्याच्यासाठी स्वयंपाकघरात तासन तास उभे राहून खायला बनवायला खूप आवडते, अहो हो… खरंच , हसताय काय , मी खूप प्रेमळ आणि समजूतदार बायको आहे….. बघा किती हा माझा नवरा दुष्ट… हा ब्लॉग प्रूफ रीड करताना या वाक्यावर खाकरतोय! हे आमचे असे टॉम अँड जेरी चालूच असते , तर एक गम्मत सांगते .. काही वर्षांपूर्वी याच्या मावशीच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस होता लखनऊ मध्ये ! आम्ही सहकुटुंब गेलो होतो , तिथे रात्रीच्या जेवणात हलवाई एका मोठ्या कढईत मालपुवे तळत होते . अस्स्सल देशी तुपाचा स्वाद , साखरेच्या पाकात आकंठ बुडालेले गरमागरम खव्याचे मालपुवे द्रोणात वाढले जात होते .. आणि त्यावर थंडगार केसरी रबडी…. अहाहाहाहाहा ! काय चव होती म्हणून सांगू ,, आतपर्यंत मुरलेला पाक, जिभेवर रेंगाळणारी रबडीची रसवंती ,आणि दाताखाली आलेला तो बडीशेपचा दाणा.. मी हळूच चोरट्या नजरेने पार्टनरकडे पाहिले , डोळे बंद करून चक्क स्वाद घेऊन खात होता ! एरवी डाएट डाएट म्हणून चिडचिड करणारा, पटकन जाऊन दुसरा मालपुवा पण गट्टम करू लागला ! आता मात्र मला धडकी भरली , कारण त्याचे पुढचे वाक्य मला ठाऊक होते , ” सुन ना , हम वापस जायेंगे ना तो बनायेंगे घर पर मालपुवा ! ” आली का पंचाईत , त्याला नाही म्हटले तर स्वतःच स्वयंपाकघरात कुकरी पुस्तके घेऊन शिरतो आणि मग त्याची डिश बनेपर्यंत स्वयंपाकघराची अवस्था खिंडीत लढणाऱ्या बाजीप्रभूसारखी होते , कुठे तुपाचे डाग तर कुठे पाकाचे शिंतोडे ! पण म्हणतात ना त्याच्या हौसेला मोल नाही , चालतंय की !
होळीला मला माझ्या विठाताईंकडून नेहमी पुरणपोळी येते ,आणि मी त्यांना माझ्याकडे बनलेले गोडधोड देते . विचारच करत होते की काय बनवू होळीला , तेवढ्यात हा आला की गुणगुणत,
“मेरी छोटी सी भूलों को तू नदिया में बहा देना
तेरे जूड़े के फूलों को मैं अपनी शर्ट में पहनूँगा
बस मेरे लिए तू मालपुए कभी-कभी बना देना…….
आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई
आज से मेरा घर तेरा हो गया!”
मालपुवा हा तसा उत्तर भारताचा , परंतु देशात विविध भागांमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो ! माझी आई गुळाचे झटपट बिना पाकाचे मालपुवे बनवते , मला ते सुद्धा खूप आवडतात , पुढच्या वेळी नक्की शेअर करीन . आज हे मालपुवे खास राजस्थानी पद्धतीचे !
तुम्हा सर्वांना होळीच्या मनःपूर्वक रंगीबेरंगी शुभेच्छा !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English

- १०० ग्रॅम्स खवा/मावा
- १/४ कप = ४५ ग्रॅम्स मैदा
- १/४ कप = ५० ग्रॅम्स रवा
- १/२ टीस्पून बडीशेप जाडसर कुटून
- १/४ टीस्पून वेलदोडे पावडर
- तळण्यासाठी तूप
- १ कप=२५० ml दूध
- १ १/४ कप = २९० ग्रॅम्स साखर
- १ कप = २५० ml पाणी
- केशराचे धागे
- सर्वप्रथम आपण मालपुआचे मिश्रण बनवून घेऊ. एका मोठ्या बाउल मध्ये मैदा आणि रवा एकत्र मिसळून घेऊ. नंतर त्यात खवा हाताने कुस्करून किंवा किसून घालू . दूध घालून मिश्रण चांगले फेटून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नयेत. मालपुआचे मिश्रण हे सरसरीत असावे , त्यासाठी आपण पाऊण कपापेक्षा थोडे जास्त दूध एकूण २२० ml वापरले आहे.
- आता बडीशेप आणि वेलदोडे पावडर घालून मिसळून घेऊ. हे मिश्रण झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत साखरेचा पाक करून घेऊ.
- एका पॅन मध्ये १ कप पाणी उकळत ठेऊ. त्यात साखर घालून ती मंद आचेवर विरघळू देऊ. साखर विरघळून पाक हलका चिकट झाला की त्यात केशराचे धागे घालावेत. केशराचा हलकासा रंग उतरेपर्यंत १-२ मिनिटे पाक शिजवून घेऊ. हा पाक एकतारी पाक होईपर्यंत शिजवू नये. फक्त चिकट होईपर्यंतच शिजवावा . नंतर गॅसवरून उतरवून घेऊ .साखरेचा पाक बाजूला झाकून ठेऊ.
- मालपुवा तळण्यासाठी कढईत २०० ग्रॅम्स तूप तापत ठेऊ. जवळजवळ अर्धा इंच कढईत भरेल इतके तूप घालावे. मालपुवा तळण्याआधी तुपाचे तापमान तपासून पाहावे. थोडे मिश्रणाचे थेंब तुपात पाडून जर ते लगेचच पृष्टभागावर तरंगायला लागले की समजावे तूप गरम झाले आहे आणि मालपुवा तटाळण्यास काही हरकत नाही .
- मिश्रण ढवळून एका डावाने तुपात अलगद सोडावे. ढवळू नये. ते आपोआप तळाशी जाऊन पसरते आणि गोल आकार घेते. कडा सोनेरी रंगावर तळून होईपर्यंत मंद ते मध्यम आचेवर तळावेत . जसे जसे मालपुवा कढईच्या तळापासून वेगळे होऊन तरंगू लागतात ते पालटून दुसऱ्या बाजूने ही तळून घ्यावेत ( तळण्यासाठी लागणारा वेळ : ३ मिनिटे )
- एवढ्या मिश्रणात ८ ते १० मालपुवा बनतात . थोडा वेळ त्यांना किचन टिश्यू पेपर वर काढून घ्यावेत. नंतर त्यांना साखरेच्या पाकात २ मिनिटे बुडवून ठेवावेत. लक्षात असू द्या साखरेचा पाक हलका गरम असावा , फार जास्त गरम किंवा थंड असू नये नाहीतर मालपुवा पाक शोषून घेत नाहीत.
- हे मालपुवा थंडगार रबडीसोबत किंवा असे नुसते खायला सुद्धा फार छान लागतात !
- टीप: मालपुवा मंद आचेवर तळल्याने ते कडांना कुरकुरीत आणि मध्यभागी नरम राहतात आणि खायला फार मजेदार !

डियर स्मिता,
नेहेमीप्रमाणेच हा सुध्दा ब्लॅाग मजेशीर आणि वाचनीय झाला आहे.
वाचताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली आणि मनापासून आवडलीही ती म्हणजे ‘मराठीने केला उत्तरप्रांतीय भतार’ आणि त्यामध्ये रमलेली आमची महाराष्ट्रीय मुलगी. मी लग्न करून १९७२ मध्ये अमेरिकेत आले तेव्हाचा आमच्या पिढीचा काळ डोळ्यांसमोर आला आणि आताचा काळ बघताना जाणवले ते म्हणजे भारताच्या प्रगतीची जी घोडदौड चालू आहे त्यात ‘परप्रांतीय’ ही भावना मावळली आहे. अमेरिकेप्रमाणे माणसे एकमेकांचा स्वीकार करताना जातपात, धर्म, प्रांत, देश यांच्या माणसांनीच घातलेल्या बंधनांना ओलांडून जात आहेत. आता खर्या अर्थाने प्राचीन भारताने केलेले ‘वसुदेव कुटुंबकम्’ अनुभवायास मिळते आहे. माझी सुन अमेरिकन आहे आणि ती आपली मराठी भाषा आणि पदार्थ शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. असो. तुम्हा उभयतांस होलीकोत्सवाच्या अनेक शुभेच्छा .
नमस्कार जयश्री ताई ! तुमची कंमेंट येणे म्हणजे माझे आईसारखे कोणीतरी लाड कौतुक करतेय अशातला भाग झालाय ! तुम्हाला रिप्लाय करायला मला असे वेळ काढून करायला खूप आवडते ! घाईघाईत मी कधीच करत नाही म्हणून लगेच रिप्लाय नाही आला तर रागवू नका हां ! 🙂 ज्या दिवशी तुमची कंमेंट आली ना तेव्हा सासूबाईंपासून ते मैत्रिणींपर्यंत , विठाताईंना सांगेपर्यंत दिवस गेला ! फुलपाखरासारझे झाले जणू.. आता मागील २ दिवसांत आईकडे गेले होते रत्नागिरीला , तिलाही तुमच्या आधीपासूनच्या सगळ्या कंमेंट्स वाचून दाखवल्या ! किती खुश झाली माझी मॊऊली .. 🙂 आज सकाळीच लॅपटॉप लावलाय खास तुम्हाला रिप्लाय करायला ! बस काय हवय जगण्याला , तुमच्यासारख्यांच्या निर्मळ प्रेमाची शिदोरी , हे लिहितानाही डोळे भरून आलेत 🙂
आतापुरते लेखणी आवरते .. Love you Tai!
तुमच्या सुंदर कुटुंबाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा !