कॅरॅमल कस्टर्ड हे एक क्लासिक फ़्रेंच डेझर्ट आहे . आजकाल छोट्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये आणि कॅफेज मध्ये एग पुडिंग या नावाने हे सर्रास मिळते.
आपण भारतीयांना दुधापासून बनवलेले गोड़ पदार्थ अतिशय पसंत आहेत , तर हे कस्टर्ड देखील इन मिन ४-५ इन्ग्रेडिएंट्स वापरून खूप सहज आणि पटकन बनवता येते. लहान मुलांच्या पार्टींसाठी किंवा तुमच्या पाहुण्यांसाठी तुम्हाला हे बनवायचे असेल तर आधी बनवून फ्रिजमध्ये सहजतेने ठेवता येते. हे बनवायला सोप्पे असले तरी बनवताना काही गोष्टींची दक्षता घ्यावी लागते. यात अंडे वापरले जाते आणि बेक किंवा स्टीम करताना तापमानाचा अंदाज घेणे खूप जरूरी आहे. नाहीतर अंडे जास्त शिजून याचे टेक्सचर रबरी होऊ शकते. कॅरॅमल कस्टर्ड बनवणे हे अगदी क्रियाबद्ध काम आहे , थोड्या सरावाने हे अतिशय उत्तमच बनते! म्हणूनच कि काय हॉटेल मॅनेजमेंट च्या रिक्रुटमेन्ट ड्राईव्ह मध्ये शेफ च्या पोस्ट साठी कॅरॅमल कस्टर्ड बनवायला सांगितले जाते आणि बेकिंगच्या पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा हेच कस्टर्ड शिकवले जाते .
चला तर मग बनवूया आपण हे कॅरॅमल कस्टर्ड !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- 1.5 कप =375ml घट्ट सायीचे दूध ( म्हशीचे )
- 3 अंडे
- 200 ग्रॅम्स साखर ( ३/४ कप + २ टेबलस्पून ) कॅरॅमल बनवण्यासाठी
- 125 ग्रॅम्स ( /२ कप ) साखर कस्टर्ड बनवण्यासाठी
- ½ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
- 1 टेबलस्पून पाणी
- कस्टर्ड मिश्रण बनवण्यासाठी एका मोठ्या बाउल मध्ये अंडी फोडून घ्यावीत, त्यातच १२५ ग्रॅम्स साखर आणि व्हॅनिला इसेन्स घालून एकत्र ढवळून घ्यावे. २-३ मिनिटे मिश्रण चांगले ढवळल्यानंतर ते फिकट पिवळ्या रंगाचे फेसाळ दिसू लागते .
- साखर पूर्णपणे विरघळली असल्याचीच खात्री केल्यानंतरच त्यात तापवून कोमट केलेलं दूध घालून घ्यावे. . गरम दूध अजिबात घालू नये नाहीतर अंड्याच्या गुठळ्या होतात.
- कस्टर्डचे मिश्रण तयार आहे, हे मिश्रण एका गाळणीतून गाळून घ्यावे जेणेकरून त्यातील हवेचे बुडबुडे निघून जातील. कस्टर्ड ला स्मूथ टेक्सचर येण्यासाठी ही कृती न विसरता करावी.
- कस्टर्ड बेक करण्यासाठी मी पोर्सलीन रामकीन बाऊलस वापरणार आहे , तुम्ही सिलिकॉन कपकेक्स मोल्ड्स वापरू शकता , अलुमिनिम मोल्ड्स वापरू शकता, फक्त अलुमिनिम मोल्ड्समध्ये कस्टर्ड मिश्रण घालण्याआधी त्यांच्या तळांना लोणी / बटर लावून घ्यावे.
- एका पॅन मध्ये मंद आचेवर २०० ग्रॅम्स साखर कॅरॅमल बनवण्यासाठी वितळू द्यावी. त्यात १ टेबलस्पून पाणी घालावे. साखरेला सतत ढवळत राहून साखर वितळू द्यावी. साखर पहिल्यांदा विरघळते, तिच्यातील पाणी उडून गेले कि तिचे खड्यांमध्ये रूपांतर होते, हे खडे नंतर परत वितळून साखरेचे कॅरॅमल बनायला सुरुवात होते. हे करताना आच मंदच ठेवावी . कॅरॅमल जसे जसे सोनेरी रंगावर येऊ लागले कि ते गॅसवरून उतरवून कस्टर्डच्या साच्यांत १ ते २ टेबलस्पून घालावे. साचे गोल फिरवून कॅरॅमल नीट तळाला पसरू द्यावे. ही कृती चटकन करावी कारण कॅरॅमल लगेच कडक होते.
- १० मिनिटे मोल्ड्स तसेच एका बाजूला ठेवावेत, त्यात कॅरॅमल नीट सेट झाले कि कस्टर्डचे मिश्रण घालून घ्यावे. कॅरॅमल थंड झाल्यावर त्यातून थोडा कडकड असा आवाज येतो, परंतु त्याने काही फरक पडत नाही.
- मोल्ड्स मधे कस्टर्डचे मिश्रण भरल्यानंतर अलुमिनिम फॉईल ने मौल्ड्स झाकून घ्यावेत.
- आपण दोन पद्धतिने कस्टर्ड बेक करणार आहोत. ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ओव्हन कॉनवेकशन मोडमध्ये १६० डिग्री सेन्टी ग्रेड ला प्री हीट करून घ्यावा.
- ओव्हन प्री हीट झाला कि लो रॅकवर बेकिंग ट्रे ठेवावा. या ट्रे मध्ये गरम पाणी घालून ते कस्टर्डच्या मोल्ड्स च्या ३/४ उंचीपर्यंत येईल एवढे पाणी घालावे. आता या गरम पाणी भरलेल्या ट्रे मध्ये कस्टर्ड मौल्ड्स ठेवावेत .
- कॉनवेकशन ओव्हन मोड - तापमान : १६० डिग्री सेन्टी ग्रेड - वेळ : ३५ मिनिटे - स्टार्ट !
- दुसऱ्या पद्धतीत आपण इडली स्टीमर चा वापर करणार आहोत. स्टीमरमध्ये पाणी घालून त्याला उकळी येऊ द्यावी. पाण्याला उकळी आली कि आच मंद करावी आणि स्टीमरची चाळणी लावून घ्यावी. त्या चाळणीत राहतील तितके कस्टर्डचे मोल्ड्स ठेवून मंद आचेवर २५ मिनिटे झाकून स्टीम होऊ द्यावे.
- स्टिमर नसेल तर प्रेशर कूकरचा वापर स्टीमर सारखा करता येतो , फक्त शिटी काढून ठेवावी.
- ओव्हनमध्ये ३५ मिनिटे आणि स्टीमरमध्ये २५ मिनिटे स्टीम केल्यानंतर कॅरॅमल कस्टर्डस तयार झाले आहेत. मोल्ड्स पूर्ण थंड झाल्यावरच ते फ्रिजमध्ये ठेवायचे आहेत. फ्रिजमध्ये ४ ते ६ तास थंड केल्यावर कस्टर्ड ना मोल्ड्स मधून बाहेर काढायचे आहे. ज्या प्लेट मध्ये कस्टर्ड सर्व करायचे आहे तिच्यात मोल्ड् उलट करून हलक्या हाताने थापटून कस्टर्ड बाहेर काढता येते. गरज वाटल्यास कस्टर्डच्या कडा एका चाकूने सैल करून घ्याव्यात .
- कॅरॅमल कस्टर्ड तयार आहे , ताज्या स्ट्रॉबेरीस ने सजवून थंड खायला द्यावे.

Leave a Reply