त्या दिवशी व्हाट्सऍपवर एक फॉर्वर्डेड मेसेज वाचून तुफान हसले , ” आजकाल दोन गोष्टी दुपारी अजिबात झोपू देत नाहीत . एक उन्हाच्या झळा आणि दुसरी कुल्फीवाल्यांच्या सायकलच्या घंट्या !”
खरंच पुण्यात सध्या उष्माघाताच्या लाटा, तापमान अशक्य वाढवत आहेत . पारा रोज ४२-४३ डिग्रीला पोचतोय आणि इथे घामाच्या धारा थांबता थांबत नाहीयेत ! हा उन्हाळा असह्य असला तरी या मेसेज मुळे ह्रदयाची तार छेडली गेली हे मात्र नक्की !
मे महिन्याची टळटळीत दुपार, मुंबईचा घामेजलेला उन्हाळा , चाळीच्या आवारातील वटवृक्षाच्या गर्द सावलीत लगोरीचा खेळ रंगात आलेला आणि एका आजोबांची सायकल ट्रिंग ट्रिंग करत शिरते ना शिरते तोच लगोरीचा खेळ अर्धवट टाकून सारी बच्चे पार्टी घेराव घालून उभी ठाकते ! साठी ओलांडलेला , तरतरीत नाकाचा , पांढरीशुभ्र पैरण आणि धोतर घातलेला वृद्ध आपली सायकल झाडाच्या कडेला स्टॅन्ड लावून उभी करतो, तिलाही बिचारीला जरा सावलीचा थंडावा मिळो ! कपाळावरचा घाम पुसत डोक्यावरचा गमचा काढून म्हातारा खांद्यावर उपरण्यासारखा टाकतो, आणि हाश्श हुश्श्श करत तिथेच झाडाखाली आपली टोपली जवळ घेऊन उकिडवे बसतो. इथे दोन तीन कार्टी एकमेकांशी उगाचच वाद घालत , की कोण पहिल्यांदा आलेय आणि कोण उशिरा! ” सबको मिलेगी कुल्फी बच्चनजी , झगडो मत ” म्हणत म्हातारा तोंडभर हसतो! बच्चे मंडळी आ वासून कधी एकदा तो ते लाल कापड टोपलीवरून हटवतोय त्याची वाट बघत.. आणि अखेर त्याचे कुल्फी वाटप सुरु होते . काय आहे ना दिवसाला १ किंवा २ रुपये खायला मिळायचे , मग सकाळपासून ते तिन्हीसांजेपर्यंत , खरतर जोपर्यंत आई किंवा आजी फरफटत घरी नेईपर्यंत , हा १ रुपया खाण्याला पुरवावा लागण्याचे दिवस ते ! मग त्यात कैऱ्या , बोरे , बर्फाचे गोळे, पेप्सीकोला आणि ही कुल्फी अशा बऱ्याच गोष्टींचे बजेट बसवावे लागायचे !मग ज्याच्या हाफ पॅंटीच्या किंवा झग्याच्या खिशात जितके आणे उरलेत त्यावर ह्या कुल्फीचा आकार ठरायचा ! पंचवीस पैशाची नाजूक , पन्नास पैशाची जराशी बसकी आणि रुपयाची कुल्फी म्हणजे लांबलचक आणि मस्त गुबगुबीत ! कुल्फीचे वाटप झाले की त्या वडाच्या पारावर शिस्तीने एकत्र बसून आरामात कुल्फी चाटत सगळ्यांची ब्रह्मानंदी टाळी लागायची ! कमीत कमी १५ मिनिटे तरी त्या वडाला “पिन ड्रॉप सायलेन्स” काय असते ते समजायचे ! ज्याची कुल्फी मोठी , त्याच्याकडे थोडेसे असूयेने पाहत , हातावर ओघळणारे कुल्फीचे दूध चाटत मनोमन ठरवले जायचे की उद्या पैसे वाचवून १ रुपयाची कुल्फी खायची !
कुल्फी खाणे आटपलं की तो लगोरीचा खेळ फ्रीझ झाला होता तो परत सुरु व्हायचा! आणि प्रत्येक संध्याकाळी शर्टावर , झग्यावर पुसलेले ते मातीचे , गोळ्यांचे हात आणि कुल्फीच्या खुणा घेऊनच घरी परतायचे !
हे सगळे अगदी एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यांसमोरून झरझरते , आणि नकळत जगजीत सिंह यांच्या भावपूर्ण गझलीतल्या या ओळी ओठांवर येतात ,
“ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो,
भले छीन लो मुझसे मेरी जवानी।
मग़र मुझको लौटा दो बचपन का सावन,
वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी।”
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
माझे कुल्फीचे मोल्ड्स आवडले असतील तर तुम्ही ते इथून ऑर्डर करू शकता
Popsicle Moulds
Aluminium Mould
Kulfi Molds

- १ लिटर घट्ट सायीचे दूध ( म्हशीचे दूध घेतले तर उत्तम )
- ४०० ग्रॅम्स कंडेन्सड मिल्क
- २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
- १ टेबलस्पून बदाम
- १ टेबलस्पून काजू
- १ टेबलस्पून पिस्ता
- ४-५ हिरव्या वेलच्या
- एका मोठ्या कढईत कंडेन्सड मिल्क घालावे. त्यात दूध घालून नीट ढवळून एकत्र करून घ्यावे, गुठळी राहू देऊ नये! थोडे पाव कप दूध वेगळे काढून घ्यावे, त्यात कोर्नफ्लोर घालून नीट पेस्ट बनवून घ्यावी.
- नोट : कुल्फी बनवताना नेहमी कच्च्या दुधात कंडेन्सड मिल्क मिसळून मगच उकळायला ठेवावे. तरच कुल्फी चांगली दाटसर बनते! आधी दूध उकळून त्यात कंडेन्सड मिल्क नंतर मिसळू नये.
- हे दुधाचे मिश्रण मध्यम आचेवर उकळू द्यावे . त्यात जाडसर कुटलेली वेलची पावडर घालावी. वेलची पावडर आवडत नसल्यास जायफळाची पूड घातली तरी चालेल!
- दुधाला उकळी आली की आच मंद करून दुधात कोर्नफ्लोअरचे मिश्रण घालून नीट ढवळून घ्यावे . कोर्नफ्लोअरमुळे कुल्फीला घट्टपणा येतो. दूध मधून मधून सारखे ढवळत राहून कढईच्या कडेला चिकटणारी साय दुधात मिसळत जावी जेणेकरून दूध घट्ट होईल.
- जवळजवळ २० मिनिटांत दूध आटून अर्ध्यापर्यंत येते. आपल्याला दूध एक तृतीयांश आटेपर्यंत आचेवर ठेवायचे आहे .
- अर्ध्या तासात दूध आतून घट्ट होते . आता त्यात बदाम, काजू आणि पिस्त्याची जाडसर [पावडर घालून ढवळून घ्यावे. गॅस बंद करून थंड होऊ द्यावे.
- मिश्रण थंड झाल्यावर ते कुल्फीच्या साच्यात किंवा घरी छोटे चहाचे उभट ग्लास असतील तर त्यात भरून फ्रिझरमध्ये किमान २४ तासांसाठी ठेवावेत .मस्त कुल्फी जमून येते ! साचे नसतील तर एखाद्या गोल किंवा चोकोनी प्लॅस्टिकच्या डब्यांत कुल्फीचे मिश्रण घालू शकता!
- २४ तासांनंतर कुल्फी खाण्यासाठी एकदम तयार ! ही कुल्फी छान घट्ट जमते आणि लवकर विरघळतही नाही !
- माझे कुल्फीचे मोल्ड्स आवडले असतील तर तुम्ही ते इथून ऑर्डर करू शकता

Leave a Reply