
” I built my comfort zone with Mom’s food!” -Kani
खरं आहे ना .. कंफर्ट फूड म्हटले की गूगल राव तोऱ्यात अगदी आपल्या तोंडावर व्याख्या फेकतात , ” जे पदार्थ खाताना जुन्या आठवणींना , पर्यायाने भावनांना उजाळा मिळतो असे पदार्थ !” माझ्या बाबतीत तर माझे पूर्ण खाद्यजीवन ही आठवणींची गुहा आहे , अलिबाबाच्या गुहेसारखी … जितकी खोलवर आत जाईन तितकी त्या द्रव्याने मन दिपवून टाकणारी ! माझ्या मुळात खादाड पिंडाला अजून लाडावून ठेवले गेले , ते माझ्या घरातल्या दोन बायकांनी – एक माझी माता , नी दुसरी मातेची माता – माझी आज्जी ! भले घरातलेच पदार्थ असो परंतु चवीच्या बाबतीत उच्च दर्जाचे . चाळीतल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी गौरी-गणपतीत याचा अनुभव कित्येकदा घेतलाय .
माझ्या आजीच्या हाताला उरक फार होता , एकाच वेळी स्वयंपाकासोबत कित्येक कामांचा ती हा हा म्हणता फडशा पाडत असे . . कधी कधी आजीचा साधा स्वयंपाक सुद्धा तिच्या हातातल्या मूळच्या गोडव्यामुळे अगदी चविष्ट लागे . माझी आई सुद्धा चटचट कामे उरकण्याच्या मागे , परंतु तिची स्वयंपाक करण्याची तर्हा ही निगुतीची . खोबरे इतके म्हणजे इतके भाजले गेलेच पाहिचे , मोदकांची पिठी नवीन तयार असलीच पाहिजे , जुनी पिठी वापरून आयत्या वेळेला फजिती नको , कालवणं मोठ्या आचेवर रटारटा उकळण्याच्या पूर्ण विरोधात असलेल्या तिला मंद आचेवर हळूहळू शिजणाऱ्या रस्श्याचा जास्त सोस ! आई माझी सुग्रण आहे की नाही याचा दावा करण्यापेक्षा मी एवढेच सांगेन की , तिच्या हातची चव चाखणाऱ्याने नेहमी पसंतीचीच आणि कौतुकाचीच पावती दिलेली आहे .
मागे काही वर्षांपूर्वी , आई रिटायर होण्याआधी , गावच्या जुन्या घराचे आम्ही नूतनीकरण सुरु केले होते . त्यावेळेला श्रावणातला कोणता तरी चांगला दिवस असावा , आईने अगदी मातीच्या ढिगाऱ्या शेजारी, सवय नसतानाही छोटी चूल मांडून त्यावर मुगाच्या डाळीची अप्रतिम अशी खीर करून , आलेल्या कामकऱ्यांना आणि शेजार्यांना वाढली होती . त्या साध्या खिरीचे कौतुक आजही मी जेव्हा गावी जाते , तेव्हा आमचा नेहमीचा कॉन्ट्रॅक्टर , पुजारी आपल्या कानडी हेलात मला म्हणतोच , ” आक्का , आंटी काय पायसम बनवते , बोटं चाखून राहिलो की मी .. ” चैत्रातल्या उत्सवांत जेव्हा पारायणाला आलेल्यांना आईच्या हातचे रव्या-नारळाचे लाडू चाखायला मिळतात , तेव्हा भजनी मंडळी आमच्या कवाडी वरून , ” ए इनोदा, वैनीस सांग लाडू बेस झाले हां , आता एकदा जेवायस बोलीव ..” असे खी खी करत पुढे प्रस्थान करतात . आईच्या ऑफिसमधील पुरुष सहकारी सुद्धा आईकडून तिच्या भाज्यांची रेसिपी लिहून घेऊन घरी जायचे . आई मला नेहमी म्हणते , नेहमीसारखेच जेवण ते , फक्त लक्ष केंद्रित करून कोणतेही काम केले , ते काम उत्तम होणारच तसेच आहे स्वयंपाकाचे ! आणि मला वाटते हेच तिच्या उत्तम स्वयंपाकाचे गिमिक असावे . तिचा हा सल्ला मी सुद्धा प्रयत्नपूर्वक अंमलात आणायचा प्रयत्न करतेच आहे . तिच्या हातचे अनेक पदार्थ , मला यादी करणेदेखील कठीण आहे , इतके आहेत की माझं अवघं आयुष्य त्या चवींनी भारून गेलेय ! हेच आहे माझ्यासाठी कंफर्ट फूड -” आईच्या हातचं “! आता तुम्ही हे मातृप्रेम म्हणालात तरी काही वावगे वाटणार नाही मला !

२०१५ साली माझं यु ट्यूब चॅनेल सुरु करण्यामागे मूळ उद्देश हाच होता की मी माझ्या घरात बनणाऱ्या रेसिपीज सगळ्यांसोबत शेअर करीन . त्यावेळेपासून ते आजतागायत मला कॉन्टेन्ट जनरेशन मध्ये काय करू , काय दाखवू असा प्रश्न कधीच भेडसावला नाही . चॅनेल वर दर्शकांचे कौतूक करणारे अभिप्राय आणि कोणत्या ना कोणत्या रेसिपीज ची लाडिक मागणी यांमुळे माझ्या मेंदूतला आठवणींचा गाभा हा नेहमी टवटवीत राहिला . मागच्या वर्षीच्या आखाडात मी “कोकणातलो आखाड” कोकणातलो आखाड या शीर्षकाखाली कोंबडी सागोती आणि कोंबडी वडे ह्या रेसिपीज शेअर केल्या होत्या . त्याच वेळी व्हिडिओत बोलता बोलता मी माझ्या घरात बनणाऱ्या कोंबडीच्या रस्श्याच्या एका पद्धतीचा उल्लेख केला होता . एका चाणाक्ष दर्शकाने ते बरोब्बर हेरले आणि मला ती रेसिपी शेअर करण्याची विनंती केली . बाकी रेसिपीजच्या धबडग्यात मी ही रिक्वेस्ट पूर्ण विसरून गेले होते . परंतु आता ठरवले की या आखाडासाठी माझ्या घरात बनणारा कोंबडी रस्सा तुमच्यासाठी आणतेच !
या कोंबडीच्या रस्श्याची एक गंमत सांगते . कोकणात जागेवाल्याची राखण म्हणून कोंबडा असो की देवीच्या जत्रेतील बोकड असो , त्याला ” म ss टा ss न ” असेच म्हणतात , नो चिकन किंवा मटण ! माझा बाबा डोंगरावर भातशेती असणाऱ्या पिळणकरांना येता जाता हटकतोच , ” पिळणकरांनू , मिरग आलाय, आता कोंबो आणलाव की नाय मटनाक ..” म्हणूनच मला कोंबडीला इंग्रजीतच फक्त चिकन म्हणतात यावर अगदी माझ्या गद्धेपंचविशीपर्यंत विश्वास होता .

माझ्या आईचा जन्म तिच्या आजोळी मुरुडास झाला , पहिली नात म्हणून लाडाने पणजीने सुरवातीची काही ४-५ वर्षे गावीच तिला ठेवून घेतली . नोकरीनिमित्त आजोबा आजीला सोबत घेऊन मुंबईत राहत होते . गावी ही माझी आई – लहानगी सुमन चांगली रमली . तिथल्या शाळेत जाऊ लागली , आणि तिने घरच्याच खुराड्यातील एका कोंबडीचे पिल्लू लाडाने पाळले . त्याला ती न्हाऊ- माखू घालायची , त्याच्याशी खेळायची . कालांतराने पिल्लू मोठे झाले आणि त्याचे एका राजबिंड्या तुरेवाल्या कोंबड्यात रूपांतर झाले . आता कोकणातल्या घरांत नारळी- पोफळीच्या , आंब्या- रातांब्याच्या बागा , मासेमारी , कुक्कुटपालन हे पोट भरण्याची साधने असतात , ते या लहानग्या सुमनला काय हो ठाऊक .. एके दिवशी पणजोबांच्या व्यापारातली कोण बडी असामी घरी येणार म्हणून जंगी मेजवानीचा बेत ठरला होता . घरातल्या सगळ्या सुगरणी झाडून रांधपात गर्क होत्या . मुरुडच्या घरात पणजोबांनी अगदी लहानपणापासून सांभाळलेला घरगडी होता – तान्या मामा , असे आई नी तिची भावंडे त्याला हाकारीत , आमचा तो तान्या आज्या ! तो होता तेव्हा ऐन विशीत , आपले पिळदार काळेकभिन्न दंड फुरफुरीत ” नानी , घेव काय तो कोंबो मागे परसात , मंगे जाईन बाजारात !” असे म्हणून तो कधीचकन आईचा लाडका कोंबडा उचलून परसात गेला सुद्धा , नी त्याने त्या कोंबड्याचा कार्यक्रम सुरु केला . तेव्हा एका लहानगीच्या आर्त रडण्याने तान्या मामाने मागे गर्रकन वळून पाहिले , आपली लहानगी सुमन हमसून हमसून रडत होती . तान्यामामाने ओशाळून तिला तसेच काखेत उचलेले आणि पणजीजवळ आणून दिले .पणजीच्या नकी नऊ आले होते , तिला गप करताना ! मग मात्र त्या रात्री सुमन तापाने फणफणली आणि तो ताप उतरता उतरता त्या इवल्या जीवाने तिच्या आयुष्यातील एक भीष्म प्रतिज्ञा केली , की आयुष्यात कधी मटणाचे सेवन करणार नाही . आजतागायत माझी आई फक्त मासे खाते , चिकन , मटणाला तिने तिच्या ताटात कधीच वाढून घेतले नाही , अगदी रस्सा सुद्धा नाही !

तिच्यावर नंतर कोणी मटण खायची किंवा बनवायची माहेरी जबरदस्ती सुद्धा केली नाही . नंतर लग्न करून संसारात पडल्यावर , मात्र आपल्या घरातल्या खवैयांना खाऊ घालावे म्हणून ती चिकन आणि मटण शिजवायला लागली . फक्त बाबा ते स्वच्छ धुऊन देतो , आणि पातेल्यात घालताना आई त्याला स्पर्श न करता अलगद चमच्याने ढकलते . चिकन/ मटण शिजले की नाही हे बाबा असला तर खाऊन सांगतो किंवा तो आसपास नसला तर ती घड्याळात वेळ पाहून अगदी बरोब्बर अंदाजाने परफेक्ट शिजवते . आषाढातील गताहारी अमावास्येला स्ट्रिक्टली दीप पूजन असल्याकारणाने त्याआधीचा मांसाहाराचा दिवस पकडून आई कोंबडी रस्श्याचा घाट घालते . लंगडीत कोथिंबीर , पुदिन्याच्या वाटणात हळूहळू शिजणारे रसरशीत चिकन आणि बाजूला काहिलीवर चटचट आंबोळ्या काढणारी किंवा पोळपाटावर ओल्या कापडावर वडे थापणारी आई .. या कोंबडीच्या रश्श्यात पुदिना का , त्याचे कारण म्हणजे आईचे आजोळ हे मुकादम – कोकणी भंडारी ! पणजोबांचे व्यापारात कोकणी मुस्लिम भागीदार होते आणि काही शेजार देखील जवळचा होता . त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव हा त्या मित्रप्रेम अन शेजारधर्मासोबतच आला असावा . किती हा पदार्थांचा सुंदर प्रवास …
माझ्या आठवणी आणि खाद्यजीवन , ही अशी एक अजब सरमिसळ आहे . आता पाऊस सुरु झालाय , मुद्दामहून एखाद्या वीकएंडला हा कोंबडीचा रस्सा मी आवर्जून बनवते , आणि बाल्कनीतून कोसळणाऱ्या धारा पाहताना या आठवांनी चिंब चिंब भिजून जाते.


- साहित्य:
- • ७५० ग्रॅम गावठी/ ब्रॉयलर कोंबडीचे चिकन , स्वच्छ धुऊन , मध्यम आकाराच्या तुकडे करून
- • १ कप कोथिंबीर
- • अर्धा कप पुदिन्याची पाने
- • ४ हिरव्या मिरच्या
- • दीड इंच आल्याचा तुकडा
- • ७-८ लसणीच्या पाकळ्या
- वाटणासाठी :
- • पाऊण कप = ७५ ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- • १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब चिरलेला
- • ५-६ लसणीच्या पाकळ्या
- • १ टीस्पून हळद
- • ५ टेबलस्पून मालवणी मसाला
- • अर्ध्या लिंबाचा रस
- • मीठ
- • तेल
- कृती:
- • चिकनच्या तुकड्यांना हळद ,थोडे मीठ आणि लिंबाचा रस चोळून १० मिनिटे बाजूला ठेवून द्यावे .
- • मिक्सरमधून आले , लसूण , मिरच्या , कोथिंबीर आणि पुदिना पाव कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
- • एका प्रेशर कूकरमध्ये ३-४ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात हिरवं वाटण घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे ( ४-५ मिनिटे )
- • आता चिकनचे तुकडे घालून नीट मसाल्यात एकत्र करून घ्यावेत . आच मंद करून झाकून ३-४ मिनिटे एक वाफ काढावी .
- • चिकनला थोडे पाणी सुटू लागते . कुकर मध्ये दीड कप पाणी घालून कुकर बंद करावा . मंद ते मध्यम आचेवर १० -१२ मिनिटे चिकन शिजवून घ्यावे . २-३ शिट्ट्या काढल्या तरी हरकत नाही .
- • कुकर थंड होईपर्यंत वाटप करून घ्यावे . एका तव्यात सुके खोबरे चांगले खरपूस भाजून घ्यावे ( ५-६ मिनिटे ) . एका ताटलीत काढून घ्यावे .
- • त्याच तव्यात १-२ टेबलस्पून तेल घालून लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी . नंतर कांदा घालून चांगला खरपूस भाजून घ्यावा ( ८ ते १० मिनिटे ) .
- • नंतर भाजलेले सुके खोबरे मिसळून गॅस बंद करावा . वाटप थंड झाले की मिक्सरमध्ये पाऊण कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
- • एका मोठ्या लंगडीत ३-४ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात मालवणी मसाला घालून तो करपू नये म्हणून थोडे पाणी घालावे . तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे .
- • आता वाटण घालून मंद आचेवर चांगले परतून घ्यावे ( ५मिनिटे ) .
- • नंतर चिकनचे तुकडे घालून त्यातच चिकन शिजवलेले पाणी घालावे . मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी . चवीपुरते मीठ घालावे . झाकून मंद आचेवर ५-७ मिनिटे रस्सा मुरत शिजवून घ्यावा .
- • हा कोंबडीचा रस्सा पोळी , भाकरी , आंबोळी , वडे किंवा भातासोबत वाढावा.
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply