“ Change is the only constant in life. Ones ability to adapt to those changes will determine your success in life !” – Benjamin Franklin
ह्या इतक्या चकचकीत मुलामा दिलेल्या शब्दांतला मथितार्थ एका मध्यमवर्गीय घराला आयुष्यातले टक्के टोणपेच जास्त शिकवतात . माझे इन्फोसिस मध्ये कॅम्पस मध्येच सिलेक्शन झाले होते , त्यावेळी अत्यानंदाने आणि अभिमानाने आई बाबांची छाती अभिमानाने फुलून गेली होती . पोरीच्या इतक्या वर्षांच्या अभ्यासाचे , चिकाटीचे फळ मिळाले म्हणून कृतज्ञतेने बाबा सारखा देवापुढे येताजाता पुटपुटत गाऱ्हाणं घालायचा . माझी आजी सारखी जवळ घेऊन अलाबाला घेत आपल्या कानामागे बोटं मोडायची . चेहऱ्याने गंभीर , खंबीर असलेली लोण्याहून मऊ मनाची माझी माय डोळ्यांतला प्रेमाचा झरा ओसंडून वाहू द्यायची . थोडक्यात काय , माझं घोडं गंगेत न्हालं होतं , आता तो वारू फक्त प्रगतीच्या मार्गावर कष्टाने दौडवायचा बाकी होता ! फायनल इयरचा निकाल म्हणजे ” चेरी ऑन द केक ” होता . आता फक्त ट्रेनिंग साठी म्हैसूर नी नंतर पुणे किंवा बंगलोरला पोस्टिंग .. इतकं सगळे मनासारखं होत असताना आई माझी काळजीने हुरहुरली , एकेक दिवस न बोलता ढकलत होती . घरापासून पहिल्यांदाच तिचे कोकरू दूर राहणार होतं ना .. परंतु आपली तगमग शिताफीने झाकायचा प्रयत्न करीत होती . जाण्याचा दिवस जवळ आला तसे एके दिवशी मला आमच्या चाळीच्या बोळात गेलेले पाहून पटकन तिने आजीपुढे स्वतःचं मन रितं केलं . ” आये , तळहाताच्या फोडी प्रमाणे जपलेल्या माझ्या स्मितुला बाहेरचं जग मानवेल काय , किती तर्हेची माणसं , कशी वागतील , कसा त्रास होईल , आपण दूर , कसं ग आये .. … ” आजी आपली सुरकुतलेली निमुळती बोटं तिच्या दंडावरून फिरवत , ” अगं सुमन , आपली पोर होतकरू आहे , मेहनती आहे , काहीही झालं तरी चिकाटीनं राहील , आणि पाण्यात पडल्यावर हातपाय हलवायचे का राहते कोणी, तू निश्चिन्त राहा , आपण आशीर्वाद द्यायचे ! ” डोळ्यांनी अंध असलेलया माझ्या आज्जीने मनाची कवाडे सताड उघडून विश्वासाचा एक उजेड नकळत आमच्या घरात तिच्या या छोट्या उद्गारांतून पसरवला ! मी दारात आडबाजूने त्यांचे हे संभाषण ऐकत होतेच . ” काय अवनाशी कार्टी आहे , ” म्हणून जिचे रट्टे खाल्लेत तिच्या तोंडून स्वतःची स्तुती ऐकताना अगदी अवॉर्ड मिळण्याहून जास्त आनंद नाही का? घरात शिरून आजीचा मुका घेताना , बाय मला म्हैसूरचा मऊ पाक घेऊन येशील ना , अशी तिने मागणी केल्यावर आमच्या घरात जणू डोंगराएवढा उत्साह संचारला !
त्यानंतर सहा महिन्यांचे ट्रेनिंग म्हैसूरला व्यवस्थित पार पडले . कॅम्पसमध्येच राहण्याची उत्तम सोय, अगदी फाईव्ह स्टार हॉटेल सारखीच , वेगवेगळे खाद्यसंस्कृती जपणारे अर्ध्या डझनाहून अधिक मोठ्ठाले फूड कोर्ट्स , तर रुची पालट आणि वीकएंड वेल्लेपन्ति साठी कॅम्पस बाहेरचे पंजाबी ढाबे , या सगळ्यांचा आस्वाद घेताना , रोज माझा आनंदी आवाज आई ऐकायची आणि आपण उगाचच काळजी करत होतो , म्हणून स्वतःला टपली सुद्धा मारून घ्यायची !
त्यानंतर खरी कसोटी लागली ती पुण्यात पोस्टिंग झाल्यावर .. पहिला आठवडा कंपनीने दिलेल्या रो हाऊस मध्ये दिमाखात स्टे झाला , नंतर औंध मध्ये फक्त दोन महिने पेइंग गेस्ट राहून रोज डबेवाल्याचा डबा सुद्धा खाऊन झाला . पण मी घर बदलले , नी परत पिंपळे सौदागर या भागात एका नवीन सोसायटीत मैत्रिणीसोबत चांगला भला मोठ्ठा ३ bhk फ्लॅट भाड्याने घेतला . घर बदलायचे एक कारण म्हणजे माझा सगळा कंपू – मित्रपरिवार हा पिंपळे सौदागर ला राहायचा – कुणाल आयकॉन सोसायटीत . मी एकटीच औंध ला .. दुसरे कारण म्हणजे कुणाल आयकॉन आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे कंप्लीट आयटी कॉम्म्युनिटी .. इन्फोसिस, टीसीएस , विप्रो , पर्सिस्टन्ट असे सगळे कॉर्पोरेट रायव्हल्स तिकडे १/२/३ bhk मधून मात्र गुण्या गोविंदाने नांदायचे. त्यामुळे छोट्या छोट्या हॉटेलवाल्यांचे , ठेले वाल्यांचे तिकडे अमाप पीक .. सूर्य मावळला की रस्त्यांवर फक्त ठेलेवाल्यांच्या चिमण्या , कंदीले , मस्तानी , मेवाड आइस क्रीम वाल्यांचे झगमगा एलईडी एवढाच काय तो उजेड…
दोन मराठी मुलगे आपल्या एका शीख मित्रासोबत तिकडे caravan सदृश दिसणारी एक छोटी टेम्पोवजा गाडी लावून पराठे विकायचे . जे पूण्यातले विशेषतः पिंपरी चिंचवड भागात राहणारे वाचक आहेत त्यांच्यासाठी , मी एक्झॅक्ट जागा सुद्धा सांगते . द्वारकाधीश सोसायटीच्या उजव्या रस्त्याला पलीकडे आणि शिवार गार्डन च्या समोर ! माझ्या मित्रांसोबत ( नुसते मित्रच म्हणेन कारण आमच्या म्हैसूर ट्रेनिंगपासूनच्या ग्रुप मध्ये आमचा फक्त पाच जणांचा ग्रुप होता , माझ्यासोबतची मैत्रीण बंगलोर स्थायिक असल्याने तिने तेथेच पोस्टिंग घेतली ) मी तिथे नेहमी पराठे खायला जायचे , आमचा बरोब्बर आठ वाजताच ठोका होता जेवणाचा . कारण त्यानंतर मिट्ट काळोखात माझ्या सोसायटी पर्यंत मला एकटं जाण्याचा धीर व्हायचा नाही ! ओबडधोबड रस्त्यांमुळे खडबडीत जमिनीवर कसा तरी प्लास्टिक स्टूलवर आमची धूड सावरत बसून आम्ही पराठ्यांची ऑर्डर्स द्यायचो . माझ्या कोकणी घरात आयुष्यात कधी स्टफ्ड पराठे मी खाल्ले नव्हते . आमच्याकडे पिकनिकला जास्तीत जास्त मेथीचे ठेपले इथपर्यंतच आईने पराठे क्षेत्र काबीज केले होते .
त्या caravan ची त्या मुलांनी ज्या प्रमाणे मांडणी केली होती तीच मुळी इतकी आकर्षक होती , की पाहताना पहिल्यांदा कौतुकाने मन भरून यायचे . एक गल्ल्यावर बसून चटपटीतपणे ऑर्डर्स घ्यायचा , पराठ्यासॊबत देण्यात येणारी चटणी , मक्खन , दह्याची वाटी हे सुद्धा तो पटापट द्यायचा . दुसरा साफसफाईची बाजू सांभाळायचा . आणि पराठे बनवणारा जणू मुरारबाजी सारखा खिंड लढवल्याच्या अविर्भावात एक सेन्टिमीटर सुद्धा इकडे तिकडे मान न वळवता तुफानी पराठे बनवायचा . एकेक कणकेचा उंडा सारणाने भरून अस्सा काही लाटत , मग तव्यावर भरपूर मख्खन लावून खरपूस भाजल्यावर प्लेट मध्ये वाढेपर्यंत त्याची एकाग्रता एकलव्यासारखीच मला भासे ! त्याच्या लांबुडक्या कानापुढे व्यवस्थित ट्रिम केलेलया कल्ल्यांवर आतापर्यंत थबकलेले घर्मबिंदु, तयार झालेल्या पराठ्याची प्लेट पुढे काउंटरवर सरकवून झाली रे झाली की निःश्वासाने नॅपकिन ने टिपायचा . मग स्वारी तयार पोळपाट लाटण्यासहीत पुढची ऑर्डर बनवायला ! कुणी पराठ्याची तारीफ केलीच तर हा सरदार अगदी शुभ्र दंतपंक्ती दाखवत मानेनेच आभार मानायचा ! साधारण तप होऊन गेले या प्रसंगांना , तरी त्या वेळी सुद्धा एक छोटेसे फीडबॅक रजिस्टर या मुलांनी ठेवले होते . म्हटले तर हे तरुण आमच्यासारखे ऐन बाविशी तेविशीतले .. आम्ही नोकरीत तर ते धंद्यात जम बसवण्यास धडपड करीत .
आयुष्यातले सगळ्यात चविष्ट पराठे – गोभी पराठा, आलू पराठा , मेथी पराठा , आणि पनीर चीज पराठा मी इकडेच खाल्ले असे म्हणेन . किंबहुना त्या चवीची तुलना मी इतरत्र कुठे करण्याचा प्रयत्न देखील नाही करणार . एका नवीन खाद्यसंस्कृतीची ओळख, एका नवीन चवीची डेव्हलपमेंट ही अशी स्ट्रीटफूड मधून होणे , हे आपल्या देशातच घडते . आपल्या घरातल्या खाद्यसंस्कृतीवर निरतिशय प्रेम करणाऱ्या मला चवींची दालनं खुली करून मिळाली, ही अशीच !
आजही त्या भागात गेले की नकळत काळाचा चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जातो नी फ्रेम बदलून ते सगळे दृश्य तसेच्या तसे नजरेसमोर उभं राहतं . या आणि अशा अनेक घटनांनी माझे जीवन समृद्ध बनवलंय , मला स्वतःला पूर्ण घडवायला मदत केलीय , एक जीवनभर आनंद देणारे उत्तम पॅशन पदरी पाडलंय ..
खरं म्हटलंय कुणीतरी, ” Be willing to change , because life won’t stay the same !
आज या पराठ्यालाच मानवंदना देण्यासाठी , खस्ता पनीर पराठा !

- साहित्य:
- पराठ्यांसाठी:
- • २ कप = २५० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
- • १ टीस्पून मीठ
- • २ -३ टीस्पून तेल
- पनीरचे सारण:
- • १ लहान कांदा = ६० ग्रॅम्स बारीक चिरून
- • ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- • पाव टीस्पून हळद
- • अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- • पाव टीस्पून गरम मसाला पावडर
- • अर्धा टीस्पून धणे पावडर
- • अर्धा टीस्पून भाजलेली जिरे पावडर
- • अर्धा टीस्पून चाट मसाला
- • पाव कप कोथिंबीर बारीक चिरून
- • २५० ग्रॅम पनीर
- • चवीनुसार मीठ
- कृती:
- • एका मोठ्या वाडग्यात गव्हाचे पीठ आणि मीठ एकत्र करून घ्यावे . त्यात तेल घालून नीट चोळून घ्यावे . साधारण पाऊण कप पाणी वापरून पोळ्यांसाठी मळतो तशी कणीक मऊ मळून घ्यावी , फार सैल ठेवू नये . कणकेला तेलाचा हात लावून झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवावे .
- • पनीर चे सारण बनवण्यासाठी एका पॅन मध्ये दीड टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात बारीक चिरलेला कांदा , हिरव्या मिरच्या घालून कांदा मऊ परतून घ्यावा .
- • ३- ४ मिनिटांनंतर कोरडे मसाले घालावेत - हळद, लाल मिरची पूड , गरम मसाला पावडर , धणे पावडर , जिरे पूड , आणि चाट मसाला . सगळे नीट एकत्र परतून घ्यावे .
- • २-३ मिनिटे झाली की चवीपुरते मीठ घालावे . कोथिंबीर घालावी आणि नीट एकत्र करून घ्यावे . नंतर किसलेले पनीर घालावे . २-३ मिनिटे शिजून कोरडे होऊ द्यावे . गॅसवरून उतरवून पूर्ण थंड होऊ द्यावे .
- • कणकेच्या दोन छोट्या फुलक्यांच्या आकाराच्या पोळ्या लाटून घ्याव्यात . एका पोळीवर मधोमध सारण घालून हाताने नीट पसरवून घ्यावे . पोळीच्या कडांना पाणी लावावे आणि वरून दुसरी पोळी ठेवून कांदा दाबून बंद कराव्यात .
- • तांदळाचे पीठ लावून हलक्या हाताने पराठे लाटण्याने एकाच दिशेने लाटत जावे . लाटण्यावर खूप दाब देऊ नये .
- • मध्यम ते मोठ्या आचेवर तवा चांगला तापवून पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावेत . भाजताना तेल , तूप किंवा लोणी वापरावे .
- • गरमागरम पनीर पराठे मख्खन , पुदिना चटणी किंवा दही लोणच्यासोबत फस्त करावेत .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply