” ओ मयेकरांची सुकन्या, बरं झाले इथेच भेटलात , हे पोस्टकार्ड आलेय बघा आईच्या नावाने , घेऊन जा वर नीट “, असे म्हणून रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पोस्टमन काकांनी माझ्या हातात पत्र दिले . ” चिरंजीव सुमन , हिस माझे अनेक आशीर्वाद ! बऱ्याच दिवसांत तुमची खुशाली जाणून घ्यायची इच्छा होतीच आणि आता पत्र लिहिण्यास देवकृपेने तसे कारणच मिळाल्याने ….. ” असं मोठ्यामोठ्याने वाचत , आमची स्वारी ,वय वर्षे नऊ , एका हातात मिल्टनची गोलमटोल राणी रंगाची पाण्याची बरणीसदृश बाटली आणि पाठीवर दप्तराचा, मांड्यांपर्यंत येणारा बोजा सांभाळत बिल्डिंगमध्ये शिरत होती .
जिन्यावरून धाडधाड बूट आपटत वर जाताना , खालच्या परळकरांनी त्यांची दुपारची वामकुक्षी भंग पावल्याने ” क्काय कटकट आहे , कार्ट्यांची “, असं म्हणत दार उघडून परत धाडकन लावून घेतलं . घरात शिरताच ” आज्जी कोणा प्रभामावशीचे पत्र आलेय बघ.. ” हे मी म्हणायचा अवकाश …आजीने लगेच ओले हात आपल्या ओच्याला पुसत पत्र माझ्या हातून घेतलं . एका डोळ्याची नजर पार गायब झालेली, चौथी शिकलेली माझी आजी , हळूहळू जाड भिंगाच्या चष्म्यातून एकेक अक्षर लावत ते पत्र वाचत असताना तिच्या चेहऱ्यावरची एकेक सुरकुती सुद्धा तिच्या म्हाताऱ्या ओठांवर फुलणाऱ्या हास्याप्रमाणे सरळ ताणली जात होती. पत्र वाचून झाल्यावर आमची म्हातारी अगदी तोंडाचे बोळकं पसरून हसली , तोपर्यंत मी माझ्या दोन्ही गालांवर हात टेकवून तिच्याकडे गोंधळून पाहत होतेच . एरवी शाळेतून आल्या आल्या ‘बूट जागेवर ठेव , दप्तर फेकू नको , डबा घासायला टाक ‘, इत्यादी इत्यादी सूचनांची सरबत्ती करणारी आज्जी आज चक्क माझा प्रेमाने गालगुच्चा घेऊन म्हणाली , ” स्मितु तुझ्या साधना मावशीचे लग्न आहे येत्या एप्रिलला , येशील माझ्या बरोबर आंजर्ल्याला .. ” ” हो येईन की आज्जी तू जिथे जाशील तिथे “.. माझा निरागस होकार गेला , पण ही कोण साधना मावशी नी प्रभा आजी कोण , या विचारांनी काही माझी पाठ सोडली नाही .
संध्याकाळी आई आल्यावर परत एकदा पत्र वाचन नी आई- आजीचा स्मरणरंजनाचा खेळ रंगला . त्यातून मला एवढे कळले की आजीची तीन नंबरची बहीण प्रभा – आईची मावशी नी माझी प्रभा आजी ! या प्रभाआजीचे पती काही महिन्यांपूर्वीच हृदयविकाराने देवाघरी गेल्याचे समजले होते , तिच्या मोठ्या मुलीचे साधनाचे लग्न ठरले होते , त्याच आमंत्रणाचे पत्र होते ! माझ्या आजीला , सगळी भावंडे ,तसेच तिच्या माहेरच्या गावातील लोकं ” माई” म्हणून हाक मारीत . या माईची सगळ्यांसाठी धडपड म्हणून सगळ्यांचा हिच्यावर अपार जीव ! या पत्रातून सुद्धा प्रभा आजीने आपल्या आईसम बहिणीला ” माईला ” भेटण्याची अपार इच्छा व्यक्त केली होती . त्याच भावनांचा उमाळा हे पत्र वाचताना या दोघी मायलेकींच्या डोळ्यांतून वाहत होता . आईला येणे शक्य नसल्याने तिने माझे आणि आजीचे ठरल्या तारखेचे तिकीट काढून आणले . खरं तर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आई बाबा ऑफिसला गेल्यावर चाळीत दंगा करून लोकांच्या तक्रारी घरी आणणार नाही , याचेच माझ्या जन्मदात्यांना कित्ती हायसं वाटत होते , त्यातून कोकणात मला चांगले २ महिने राहायला मिळणार याचे माझ्या आई बाबाला भारी कौतुक … तसे मी दोन वर्षांपूर्वीच्या उन्हाळी सुट्टीत अलिबाग आणि मुरडास जाऊन आले होते , आणि मावस/मामे भावंडांसोबत खूप धमाल सुद्धा केली होती .
लग्नाच्या ठरलेल्या तारखेच्या चार दिवस आधी परेल डेपोला मुंबई सेंट्रल वरून सुटलेला ” आंजर्ला ” चा ठळक बोर्ड लावलेला रातराणीचा लाल डब्बा आमची वाट पाहतच उभा होता . ” नावात काय आहे “, खर्र म्हंटलय बुवा शेक्सपिअर ने … ” नाव सोनुबाई नी हाती कथलाचा वाळा ” तशी गत या बसची .. नाव रातराणी , पण बसच्या डेपोमध्ये सुगंध ( कि दुर्गंध ? ) मात्र पान खाऊन थुंकल्याचा , मधेच विकायला येणाऱ्या वड्यांचा , आणि बसमध्येच चपाती नी सुक्या बटाट्याच्या भाजीसहित केल्या गेलेल्या क्षुधाशांतीचा ! बस जशी सुरु झाली तशी थंड वाऱ्याच्या झुळकीने हे सगळे सुगंध , दुर्गंध मागे पडले . आजीने अंगावर घातलेली मऊ शाल आणि तिच्या काटकुळ्या हातांचा माझ्याभोवती पडलेला प्रेमळ वेढा मला निद्रादेवीच्या अधीन करून गेला! स्वप्नात सुद्धा मुरडास पाहिली होती त्याप्रमाणे माडा -सुपारीची झाडे, केळी – पोफळीची बाग , पायऱ्यांची विहीर , तिच्या बाजूचे पाण्याचे हौद , आंब्याचे ढीग , पुळणीच्या टेकड्या , , भाताच्या उंडव्या , काय ना काय … या नवीन गावाविषयी मी आधीच मानसचित्रं रंगवून ठेवली होती !
” वेळवी ssss ” , कंडक्टर ने अर्धवट झोपलेल्या माझ्यासकट बॅग उचलून आजीला उतरायला मदत केली . आजूबाजूला पाहत डोळे चोळत , मी मख्खासारखी उभी होते , नुकतेच उजाडले होते . आजीने बाजूला स्टॉप वर अबोलीची टोपली घेऊन बसची वाट पाहत असलेल्या एका बाईला विचारले , ” महाडिकांचे घर ..” त्या बाईने तंबाखू मळून काळे पडलेले बोट रस्त्याच्या खालच्या अंगाला दाखवत इशारा केला . एका हातात पत्र्याची सूटकेस सदृश दिसणारी बॅग पकडून , माझ्या हातात गोणपाटाची वरवरच्या सामानाची पिशवी देऊन , आजी हळूहळू माझा हात घट्ट पकडून उतारावरून चालू लागली . आजूबाजूला फक्त काळे, धिप्पाड डोंगर , कातळाची खडकाळ जमीन , कुठेही लाल मऊसूत मातीचा लवलेश नाही , उगवलेली छोटी झुडपे सुद्धा काटेरी .. पायातले हवाई चप्पल सारखे वाकडे होऊन माझ्या तोंडातून आई, ऊई निघत होते . बिचारी माझी आज्जी ” पोरी दम धर , आलेच बघ जवळ .. ” असे म्हणून स्वतःच्या नऊवारी पातळाचा घोळ सांभाळत मला सुद्धा सावरीत होती !
” आज्जी आपण कुठे जंगलात आलो का काय , रस्ता चुकलो वाटतं ..आआईईई ” असे म्हणून मी भोकांड पसरते न पसरते तोच समोरून नुकताच मिसरूड फुटलेला एक सतरा -अठरा वर्षांचा पोरगा , ” मावशे .. कशी आहेस ग , दे इकडे बॅग , स्मिता ना ही ., अर्रे एवढीशी होती नाय रमेशदादाच्या ( माझा सख्खा मामा ) लग्नात , काय ग रडतायेस का अशी”, एवढे घडाघडा बोलून , आजीच्या पटकन पाया पडून , तिच्या हातातली बॅग घेऊन , वर मला एका हाताने कमरेवर बांधून पुढे सणसण चालू लागला . आजी माझी संभ्रमात , हा नक्की कोण , ” अरे थांब रे बावा , थांब . कोण तू , परभाने पाठवलान काय तुला .. ” असे म्हणून त्याच्या मागे जवळजवळ धावत … आजीला असे पाहून , हा माणूस मला उचलून नेतोय या भीतीने मी आतापर्यंत थांबवलेले भोकांड जोर्रात पसरले . त्या पोराचा तोंडाचा पट्टा अखंड चालू होता , “मावशे आज मानपान काढायचेत , ओट्या काढायच्यात , नारल मागवलेत आंजर्ल्याहून , हिते न्हाय ना आमचे माड.. ” तेवढयात आजीला काय आठवण झाली नी ती उद्गारली , ” अरे अतुल ना तू , परभाचा धाकटा .. ” , या वाक्यासोबत तो गर्र्कन फिरला नी खोखो हसत म्हणाला ,’ न्हाय ग मावशे मी वाटेवरचा चोर तो , आलो तुमा मुंबैकरांसी लुटायला .. ” हा माझा अतुल मामा , माझ्या आईचा मावस भाऊ ! पहिल्याच भेटीत आपल्या जबरदस्त हसऱ्या चेहऱ्याने आणि थोडासा कोकणी खोचक परंतु न बोचणाऱ्या विनोदी स्वभावाने समोरच्याला आपलेसे करणारा !
थोड्याच क्षणांत बाहेरून निळ्या , लाल रंगातले , चिर्यांच्या दगडांनी बांधलेले . कौलारू , ऐसपैस असे घर दृष्टीस पडले . घर कसले ते , माझ्या नजरेत तर विस्तृत अशा पसरलेल्या डोंगरदर्यांतील मध्यभागी असलेला तो हिमगौरीचा छोटेखानी महालचा भासला ! साधे तरीही सुंदर .. ओटीवरून प्रभा आजी पुढे आली , अतुलमामाच्या कम्बरेवरून मला खाली उतरवत , ” कशाला रडवलेस रे पोरीला ,,” असे त्याला रागे भरून माझे प्रेमाने मुके घ्यायला लागली . सगळ्या आज्यांत ही आजी कडक हो , अशी मला भीती घातलीच होती . परंतु माझ्यावर माया करताना , गोड हसताना तिच्या किंचित काळ्या वर्णाकडे झुकणाऱ्या तेजस्वी चेहऱ्यावरचा डावीकडचा चामखीळ मला भलताच भावला होता . प्रभा आजीचे सासर म्हणजे महाडिकांचे घराणे हे पिढ्यानपिढ्या खोत , सरकारमान्य सावकारी अशा व्यवसायांत मोठे तालेवार . कित्येक एकर जमीन मालकीची , तसेच चिर्यांच्या खाणीचे मालक .. परंतु त्यांचा अकाली मृत्यू , मग कालांतराने सगळे काही भाऊबंद्कीत्त अडकलेले . म्हणून भातशेती व चिऱ्यांची खाण हे मुख्य उत्पन्नाचे साधन .. तर मोठा मुलगा म्हणजे अरुण मामा हा ट्रान्सपोर्ट चा बिझनेस करायचा , स्वतःच्या मालकीचा ट्रक घेतला होता त्याने .. मधला मुलगा अनिल कुक्कुटपालन आणि शेती पाहायचा .. म्हणजे एकूण पूर्ण घरात सगळेच जीवापाड कष्ट करणारे .. प्रभाआजीला सगळे पंचक्रोशीत मानाने संबोधायचे . कारण कोणीही दारात कोणत्याही वेळेला मदतीसाठी हजर झाला की विन्मुख होऊन कधीच परतायचा नाही . कधी जमेल तर पैसे , कधी धान्य असे देऊन ती नक्की गरजवंताची नड भागवत असे ! मग स्वतः कितीही पैशापाण्याच्या अडचणीत का असेना .
मला आठवतेय याच वेळेच्या भेटीत एके दिवशी तुफान वादळ कोकणात थडकले होते. हा भाग पूर्ण जंगलाचा .. डोंगरावरून रों रों करीन पावसाळी वारे जोराने झाडांवर , घरांवर आदळत होते . आम्ही सगळे जीव मुठीत घेऊन माजघरात बसलो होतो . अचानक जवळच असलेल्या आदिवासी पाड्यावरन एकच हाहाकार ऐकू येऊ लागला . त्यांच्या घरांची छप्परे उडाली होती . जवळच्या नदीला पूर येऊन घरांत पाणी शिरले होते , तान्ही , नवजात कच्ची बच्ची पोरे , म्हातारी कोतारी , लहानुली कुत्री , बकरी टोपल्यांत घालून आदिवासी तरुण नी त्यांच्या बायका प्रभा आजीच्या घराकडे धावल्या . जवळजवळ पन्नासेक माणसे ते तुफान सरेपर्यंत रात्रभर आजीच्या आसऱ्याला आले होते . फक्त लाज झाकण्याइतके कपडे, थंडीत कुडकुडणारी लहानगी बालके, वादळ शमावे म्हणून प्रार्थनेसाठी जोडलेले हात .. आजही मला तो प्रसंग लख्ख आठवतो ! त्या रात्री दोन्ही चुलींवर रटरटणारी पिठले त्या पन्नासेक जणांना तृप्त करून गेली !
हा आदिवासी पाडा सरकारने आजीकडून जागा घेऊन मान्य केलेला . हा कातकरी समाज , निसर्गपूजक , जंगलात राहून , त्याचे नुकसान न करता , जंगल जे मुक्त हस्ताने देऊ करील त्यावरच गुजराण करणारा ! हे कातकरी तरुण स्त्रीपुरुष कधी चिऱ्याच्या खाणीत तर कधी भातशेतीवर सुद्धा रोजावर काम करीत . तसेच जंगलात जाऊन मधुमक्षिका पालन , काजूच्या झाडांची लागवड आणि संवर्धन अशी कामे मुख्यत्वे करीत . काही वयाने प्रौढ कातकरी बायका भात कांडायला , घरात ” आवणी” च्या वेळेला स्वयंपाकात मदतीला सुद्धा येत . त्यातच मुकाई यायची . हिचे खरं नाव नाही ठाऊक .. सत्तरीच्या पुढची म्हातारी , आयुष्यभर नवऱ्यासोबत कष्ट करून एकुलत्या एका मुलासोबत राहायची . मुलाला शिकवून मुंबईला धाडले , तो सरकारी कोट्यातून नोकरीला लागला , पण आई बापाकडे काय परत माघारी आला नाही ! तरीही ही माय खुश असायची . दोघे नवरा बायको आपल्या जंगलाला आपलेसे मानून काजू बिया काढायला जायचे . एके दिवशी मुकाईचा नवरा मुकाईला पुढे धाडून मागाहून येतो म्हणाला . जंगलात काळोखात परत येताना जनावर चावले नी जागच्या जागी गेला . रात्री उशिरा कंदिलाच्या प्रकाशात पाड्यावरच्या लोकांनी डोलीत घालून आणला , तोंडाला फेस आलेला , निश्चल शरीर . मुकाई रडली नाही पण ती नंतर कधीच बोलली नाही ! पोटच्या मुलाने पाठ फिरवली तिने सहन केले पण तिच्या जिव्हेला आता जणू नशिबाने लुळे केले . तरीही म्हातारी हसायची , रोज आजीच्या घरी यायची . हातवारे करत आजीसोबत खीखी करत हसत बसायची . काही ना काही काम करून मानाने घास खायची . तिला कधीही कोणीही केव्हाही खायला घालावे अशी आजीने घरात तंबीच दिली होती . माझ्या जवळ आली की नेहमी हातात रानातून आलेले आळू , करवंदे , जांब पळसाच्या पानात बांधून द्यायची . एखाद्या दिवशी यायचीच नाही . मग एकदा माझ्या आजीने प्रभा आजीला विचारलेच , ” परभे, मुकाई नाही आली ती , आजारी का काय ..” प्रभा आजी म्हणायची ” आगा माई नाही , ती ग्येली असेल आज जंगलात , आल्यावर बघ मजा ..” आणि खरंच मुकाई आली नी चार बोटं चिंधी नेसलेल्या तिच्या त्या फाटक्या पदरात जणू काही सोनं घेऊन आल्याच्या अविर्भावात ! काय होते त्यात .. तर कोवळ्या कोवळ्या काजूच्या हिरव्याकंच बिया , नी डोक्यावरच्या टोपलीत काजूची पिवळी धम्मक रसरशीत फळे ! मला आठवतेय ती आंबट , गोड फळे खाऊन जीभ मस्तपैकी जडावली होती माझी ! बसली पडवीतच फतकल मारून मुकाई , नी माझ्या आजीला हातवारे करून लंगडी आणायला लावलीन . हातात दाभणासारखे हत्यार घेऊन बरोब्बर फटाफट बिया सोलून अख्खा गर लंगडीत एका बाजूला करीत होती .
मधूनच हातवारे करून हसत प्रभा आजीला सांगत होती , की या लहानगीला काजूची भाजी खायला घाल , वाटण देते मी वाटून ! प्रभा आजी हळूच मला म्हणाली , बघ पोरा हातावर चिकामुळे भाजता तरी तुजसाठी गेली होती काजू आणायला ..” खरोखरच मुकाईच्या हात , दंड , छातीपर्यंत चिकाच्या जखमांचे खोल व्रण होते .
त्या दिवशी , इतके दिवस मुकाईच्या अवताराला , पेहरावाला घाबरणारी मी आपणहून तिला मागून मिठी मारली . केवढी खुश झली म्हातारी , छातीशी कवटाळून डोळ्यांनी बोलत , किती वेळ बसली होती .. मुकाईने पाट्यावर वाटलेले वाटण , प्रभा आजीने चुलीवर बनवलेली ती ओल्या काजूगरांची आमटी आणि कंदिलाच्या प्रकाशात समाधानाने उजळलेले चेहरे हेच आमच्यासाठी सुख होते . त्या दिवशी विजेचा शिरकाव न झालेल्या त्या गावात , कठोर कातळावरच्या त्या घरात , ‘आहे त्यात सुख कसे मानावे ‘, हे सांगणारा जणू समाधानाचा , आनंदाचा दडलेला झरा उसळून आला होता !
या गावच्या आठवणी पुढे देखील माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला वाचायला मिळतीलच ! तूर्तास एवढेच सांगेन , आजही कुठेही रत्नागिरीला , मुंबईला ओले काजू पाहिले की मुकाई नी प्रभा आजी आठवल्याशिवाय राहत नाही .
आज तुमच्यासाठी खास कोकणातील ओल्या काजूगरांची उसळ !
- साहित्य :
- 1. दीड कप = २०० ग्रॅम्स ओले काजूगर , धुऊन आणि सोलून
- 2. १ लहान आकाराचा बटाटा = ५० ग्रॅम्स चौकोनी तुकडे करून
- 3. १ मध्यम आकाराचा कांदा = ७० ग्रॅम्स बारीक चिरून
- 4. १ मोठा टोमॅटो = ८० ग्रॅम्स बारीक चिरून
- मसाल्याचे वाटण :
- 5. १ मध्यम आकाराचा कांदा = ८० ग्रॅम्स लांब पातळ चिरून
- 6. दीड इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून
- 7. ८-१० लसणीच्या पाकळ्या
- 8. अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- 9. पाव कप कोथिंबीर
- गरम मसाला :
- 10. १ तमालपत्र
- 11. १ चक्रीफूल
- 12. ३ वेलदोडे
- 13. ३-४ लवंग
- 14. ५-६ काळी मिरी
- 15. अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
- 16. २ टीस्पून धणे
- 17. अर्धा टीस्पून बडीशेप
- 18. १ टीस्पून जिरे
- 19. १०-१२ कढीलिंबाची पाने
- 20. अर्धा टीस्पून मोहरी
- 21. पाव टीस्पून हिंग
- 22. अर्धा टीस्पून हळद
- 23. दीड टीस्पून मालवणी मसाला
- 24. चवीपुरते मीठ
- 25. १ टीस्पून चिंचेचा गोळा १ टेबलस्पून गरम पाण्यात भिजवून
- 26. १ टीस्पून गूळ
- 27. तेल
- कृती :
- • गरम मसाल्याचे सगळे साहित्य मंद आचेवर चांगले २-३ मिनिटे भाजून घ्यावे . त्यानंतर थंड झाले की मिक्सरमधून ताजा सुगंधी गरम मसाला वाटून घ्यावा .
- • त्याच कढईत किसलेले खोबरे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे . बाजूला काढून घ्यावे .
- • नंतर कढईत २-३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात आले, लसूण घालून परतून घ्यावे . लसूण जराशी तपकिरी झाली की त्यात लांब चिरलेला कांदा घालून खरपूस परतून घ्यावा . कांदा चांगला ७-८ मिनिटे परतून झाला की त्यात ताजी कोथिंबीर घालावी . नीट तेलात एकत्र करून घ्यावी . मग भाजलेले खोबरे घालून एकत्र करून घ्यावे . नंतर गॅस बंद करावा आणि वाटण थंड झालयावर मिक्सरमधून अर्धा कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
- • एका कढईत ३ टेबलस्पून तेल घालावे . तेल चांगले तापले की त्यात मोहरी , हिंग, कढीलिंबाची फोडणी करावी . मग बारीक चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
- • नंतर हळद आणि मालवणी मसाला घालून परतून घ्यावा . मसाला करपू देऊ नये , थोडे पाणी घालून नीट तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा .
- • आता बटाटयाच्या फोडी व काजूगर घालून २-३ मिनिटे परतून घ्यावेत . आता अर्धा कप पाणी घालून जरा उकळी येऊ द्यावी . नंतर आच मंद करून झाकून ५-७ मिनिटे शिजू दयावे .
- • आता टोमॅटो घालून ते लवकर मऊ व्हावेत म्हणून थोडे मीठ घालावे . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावेत .
- • आता वाटण घालावे , गरम मसाला घालून नीट मिक्स करून घ्यावे. २ कप पाणी घालून मध्यम आचेवर रस्सा उकळू द्यावा . नंतर मंद आच करून झाकण घालून भाजी चांगली शिजू द्यावी .
- • साधारण १२ मिनिटे भाजी शिजल्यावर त्यात गूळ , चिंचेचा घट्ट कोळ आणि चवीपुरते मीठ घालून एकत्र करून घ्यावे .
- • गॅस बंद करावा , आणि भाजी झाकून जरा मुरू द्यावी . ही काजूगरांची उसळ आंबोळी , पोळी , घावन , वडे तसेच भातासोबत उत्तम लागते .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply